विषय:-आणि ती...हसली
शीर्षक:- हरवले-गवसले
"किती गोड बाळ आहे गं. गोरीपान मुलगी आहे तुमची."
"अगदी आई सारखी." सुमा आत्या आपल्या ननंदेचे बोलणे खंडीत करत म्हणाली.
"हो बाई वहीणी, तुमच्या वहीणी तर अप्सराच आहेत. आम्ही कुठे नाकारले. पण मुलगीही कुठे अप्सरेपेक्षा कमी नाहीये. आणि हो, आत्यापण रंभा उर्वशी पेक्षा कमी नाहीये म्हंटले..." गमतीने हसत मीराताई म्हणाल्या.
मीराताई सुमाच्या ननंद होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या सुमा कडे आल्या होत्या. जेव्हा कळले सुमाला, आपल्या दादाला मुलगी झाली आहे. ती हाॅस्पीटल मध्ये लगेच भेटायला आली सोबत मीराताई पण आल्या होत्या.
नाॅर्मल डिलीवरी झाली होती नंदा वहीणीची.
कृष्णादादा, वहीणीची आई लीला,
बाबा वसंतराव सगळेच तिथे होते.
थोडावेळ बसून सुमाआत्या वगैरे घरी गेल्यात.
चार दिवस नंदा मुलीसह दवाखाण्यात होती.
मग माहेरी घरी आली. घरात दोन भाऊ दोन वहीणी, दोन्ही भावांना दोन मुली, दोन मुले होती.
आई बाबा आणि आजोबा होते.
सुमा आत्यांचे सासर, नंदाचे सासर आणि माहेर एकाच शहरात होते. त्यामुळे नेहमीच वेळ प्रसंगी सर्व सदस्य एकत्रित यायचे. पारिवारीक संबंध त्यांचे एकमेकांसोबत खुप चांगले होते.
म्हणून त्यासगळ्यांचे एकमेकांच्या बारीक सारीक गोष्टीं मध्ये हस्तक्षेप असायचा. आणि सगळेच समजदार, ब्राॅडमाईंडेड असल्यामुळे ऐकूणही घ्यायचे. कुणी कुणाला रागावल्यास हसण्यावारी न्यायचे.
बाळाचे नाव वृंदा ठेवण्यात आले. काही दिवसाने नंदा सासरी आली. तिला घरी आलेले बघून लहान दीर, मोठ्याजाऊबाई सासूसासरे सगळ्यांमध्ये एक वेगळीच उर्जा निर्माण झाली. नंदाचे पुतणे पुतण्या, वृंदा भोवती पिंगा घालू लागले.
तिचा लाड करुन मांडीवर घ्यायचा त्यांचा प्रयत्न असायचा.
आजीआजोबा सारखे, लक्ष ठेऊन असायचे. बाबालाही तिला कुठे ठेऊ आणि कुठे नाही असे व्हायचे. एकंदरीत घरात लाडाची होती ती सगळ्यांच्या.
घरातील सगळेच तिला प्रोटेक्ट करायचे.
हळूहळू वृंदा मोठी होत होती. बाकीच्या चार भावा बहीणींसोबत ती ही रमली होती. घरात पाहूणे आले की, सगळेच मुले त्यांच्यात मिसळून जायचे. अंगाखांद्यावर खेळायचे. हा तुझा मामा कि माझा मामा, असं व्हायचं नाही. मग येणार्यालाही येताना सगळ्यांचा मिळून भरपूर खावू आणावा लागायचा. एकंदरीत काय तर सगळ्यांना ध्यानात ठेवावे लागे.
एकदा काकांचा म्हणजेच नंदाच्या दीराचा मित्र घरी आला. तो काॅलेजमध्ये असताना घरी यायचा. सगळ्यांच्या परिचयाचा होता. नोकरी निमीत्ताने दुसर्या शहरात रहात होता. त्यारात्री तो तिथेच थांबला. उशीर झाल्यामुळे मुलांच्या खोलीत झोपला.
खरेतर ती खोली आजीआजोबांची होती. मुलांना आजोबांजवळ झोपायला आवडायचे. मग आजोबांनी पलंगावरुन कुणी पडू नये म्हणून खालीच गाद्या अंथरलेल्या होत्या. मुलांना मज्जा वाटायची झोपायला. तर, मित्र साहीलने इकडे तिकडे जागा बघितली. वृंदाच्या बाजूला त्याला जागा दिसली. तो पटकन तिथे झोपला. दिवे मालवले. वृंदाला तिच्या अंगावरचे पांघरुण कुणी तरी ओढल्या सारखे वाटले. तिने कुणकुण केली, तर तिला साहील ने झोप झोप म्हणत थोपटले आणि जवळ ओढून घेतले. आणि तिच्या अंगावरुन हात फिरवत राहीला.
सहा वर्षाची वृंदा तिला काही कळले नाही. पण तिला साहील अजिबात आवडला नाही. साहिल दोन दिवस तिथे राहीला. तो वृंदाचा खुप लाड करत होता. तिला चाॅकलेट्स आणून दिले तिच्या आवडीचे. मधून मधून तिचे पापेही घेत होता. शेवटी जायला निघाला तेव्हा ओठांचाही पापा घेतला. तुझी मला खुप आठवण येईल म्हणाला. घरातल्या सगळ्यांना साहील आवडायचा. तो त्यांच्या घरातीलच सदस्य होता नां म्हणून.
वृंदाला काही तरी चांगले वाटत नव्हते. पण ती बोलूही शकत नव्हती. मग अधून मधून साहील सगळ्यांना भेटायला यायचा. वृंदाला शोधून जबरदस्तीने मांडीवर घेऊन बसायचा. लाड करायचा. पापे घ्यायचा. एखाद्या वर्षाने वृंदा जरा वेगळी वागू लागली. एकदा तिची पेन्सील दादाने घेतली म्हणून तिने त्याच्या पाठीत स्केलपट्टी जोरात मारली. नंतर घरात आलेल्या पाहूण्यांनी तिचा लाड करायचा प्रयत्न केला की ती, पळून जायची. बाहेरच्यांच्या जवळ येत नव्हती. बोलत नव्हती. घरातील कुणीही तिला काही म्हंटले की चूप असायची. उत्तर नाही द्यायची. आणि काही करायला गेली की, वस्तू पाडून ठेवायची किंवा आपल्याच विचारात असल्यामुळे ऐकू यायचे नाही तिला. हळूहळू तिची प्रतिमा एका,"मुर्ख" मुलीमध्ये होऊ लागली. हिला काहीच जमत नाही. असे तिच्या घरच्यांना वाटायचे. घरातील बाकीच्या भावंडांचे मार्क्स खुप चांगले असायचे तर वृंदाचे ठिक ठाक...तिच्या वागण्याचे किंवा तिच्या कमी बोलण्याचा नेहमीच सगळे नातेवाईक हसू करायचे.
साहीलचे लग्न होऊन तो दुसर्या राज्यात बदलून गेला होता.
हळूहळू वृंदाच्या मनातील साहील विषयीची चीड कमी झाली होती. पण कुठेतरी तिचा आत्मविश्वास कमी झालेला होता.
अशातच वृंदा आता काॅलेमध्ये जाऊ लागली. तिच्या सौंदर्यामुळे तिच्याकडे मुलं आकर्षित व्हायचे. पण ती कुणालाही प्रतिसाद देत नव्हती. नाही म्हणायला तिला असे कुणी बघितलेले, तिच्या मागे फिरणारे तिला आवडत होते. वृंदाच्या आता पाचसहा चांगल्या मैत्रिणीही झाल्या. वृंदाला त्यांच्यासोबत रहायला आवडू लागले. ती मैत्रिणींसोबत मनातले सगळे बोलू लागली. पण घरात, नातेवाईकांमध्ये आली की, तिचे ओठ बंद व्हायचे. मनातल्या मनात ती खुप बोलायची तिला कुणी नावे ठेवल्यास, खिल्ली उडवल्यास. पण ती त्यांच्यासमोर बोलण्यात कमी पडत होती.
अश्यातच एक चांगलं स्थळ आलं आणि वृंदाला कुणी नाकारणे शक्यच नव्हते. लगेच तिचे लग्न झाले.
सासरही वृंदाचे भले मोठ्ठे होते. सगळे एकत्रित रहायचे. वृंदाचा नवरा दुसर्या गावी नोकरीला होता. तो जाणे येणे करायचा.
दिवसभर वृंदा घरातील लोकांसोबत असायची. एका गजबजाटातून निघालो आणि दुसर्यात फसलो. अशी अवस्था वृंदाची झाली. पण वृंदा तिथे अॅडजस्ट करत होती. सगळ्यांच्या गळ्यातला ताईत व्हायचा प्रयत्न करत होती.
लग्न झाल्यामुळे कुठे तरी तिचा आत्मविश्वास थोडा बळावला होता. पण कुठे तरी काही तरी सलत होतं. काहीतरी हरवल्या सारखे तिला वाटत होते. तसे नवर्याचे प्रेम तिला भरभरुन मिळत होते. आणि मग तिनेही कुटूंबाला वाहून घेतले.
वृंदाचा नवरा विवेक तिला एकदा म्हणाला. चलते का माझ्या बरोबर. मला कर्मचार्यांचे ट्रेनींग घ्यायचे आहे. तर मला महिनाभर तरी इकडे येता येणार नाही. तुलाही फिरायला मिळेल. घरच्यांची संमती मिळवून मग वृंदा विवेक सोबत आली.
चीन मधल्या घडा मोडी सगळे ऐकतच होते. तिकडचा कोरोना व्हायरस भारतात यायला वेळ लागला नाही. आणि मग जो जिथे आहे तिथेच थांबला. काही दिवसांनी कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे लाॅकडाऊन सुरु झाले.
आठ दिवस ठिक ठाक गेले. पण मग विवेक आणि वृंदाला घर खायला उठले. मोठ्या कुटूंबात राहणारे दोघेही, अचानक एकटे पडले. बोलून तरी किती बोलणार एकमेकांसोबत. घरच्यांची भेट होईल की नाही? वृंदाची तगमग वाढली. कुठून काही चांगली बातमी मिळते का तिकडे तिचे लक्ष लागले होते.
राजकारणी दबा धरुन बसले होते. कुणीच जनतेच्या भूकेलेल्यांच्या पोटापाण्याची, राहण्याची व्यवस्था करत नव्हते. लोकं पायीच आपापल्या गावी निघाले होते. टिव्हीवर हे सगळं बघून वृंदाचे ह्रदय पिळवटत होते.
तिने फेसबुक वर wtup वर दोन दोन ओळीत आपली तगमग मांडली. बर्याच जणांनी तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. हळू हळू वृंदा लेख लिहू लागली. तेही फेसबुक वर लोकांना आवडू लागले. मग सातत्याने तिने मनात जे येईल ते पानावर उतरवायला सुरुवात केली. तिने चालू घडामोडींवर बरेच प्रभावी लेख लिहीले होते. एकदा तिला एका प्रकाशकांचा फोन आला. तिच्याशी बोलल्यावर ते म्हणाले,"तुमच्या लेखांचे आपण पुस्तक बनवूया."
वृंदाचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. आम्ही तुमचे पुस्तक आॅनलाईन प्रकाशित करु म्हणून सांगितले. हो नाही करता करता वृंदाचे एक पुस्तक प्रकाशित झाले.
अचानक एके दिवशी दिल्ली साहित्य अकादमी कडून तिला फोन आला. तुमच्या पुस्तकाला "युवा पुरस्कार" जाहीर झाल्याचे सांगण्यात आले. तिला आणि विवेकला दिल्लीला बोलावण्यात आले. सुरक्षित अंतर पाळून पुरस्कार "वृंदा"च्या हातात देण्यात आला.
आज वृंदा खर्या अर्थाने आनंदली होती. आपल्यावर "मुर्ख" असल्याचा ठपका आज तिने मोडून काढला होता. बालपणातच तिचे निरागस हास्य लोप पावले होते.
पण आज तिच्या हातात तिचा सामाजीक भान असलेला "पुरस्कार" होता. आज खर्या अर्थाने पुन्हा एकदा "ती....हसली" होती. अगदी मनापासून...!
०००
संगीता अनंत थोरात
टीम - अमरावती
27/07/22
ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा