हरवलेले बालपण

आधी जगलेले बालपण अन् सद्यस्थितीत अनुभवायला मिळणारे बालपण यात कितीतरी पटीने तफावत आहे... तीच अधोरेखित करण्याचा छोटासा काव्यरुपी प्रयत्न...

राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा

विषय - मीच माझा शिल्पकार

कवितेचे शीर्षक -  हरवलेले बालपण


हाती रिमोटसारखे खेळणे असताना

लेकराला कशी ठाव होईल अंगाई

ऍलेक्सा असताना सूर अंगाईचे

कशी छेडणार आजच्या युगाची आई? 


चांदोबाच्या निराळ्या गमतीजमती  

ठाऊकच नाहीत ज्या बाळाला

कळेना, हाती मोबाईल असताना

मामा म्हणेल का ते बाळ चंद्राला?


हल्ली मामाच्या गावाची ओढ

वाटतच नाही ज्या लहानग्याला

एकविसावे शतक असताना

तो सर्वस्व मानेल का या नात्याला?


जर आजोळीची जुनी पायवाट

माहितीच नसेल इथे कुणाला

तर, खरंच व्हिडिओ गेमच्या युगात

लेकरू जगणार का बालपणाला?


कलियुगातले पुरस्कर्ते हे तंत्रज्ञानाचे

घाली शॉर्टकट्सलाच कायम साद

'मीच माझा शिल्पकार' हे शब्द उमजून

लागेल का त्यांना हार्डवर्कचा नाद?


न करता कसलाही शोऑफ 

हृदयात जपून पाहाव्यात आठवणी

हरवलेले बालपण अन् ते सारे क्षण 

कधीतरी घालतील का गवसणी? 


©®

सेजल पुंजे

टीम नागपूर.