Oct 31, 2020
प्रेम

हरवलेलं पत्र

Read Later
हरवलेलं पत्र

#हरवलेलं_पत्र
      
©अर्चना बोरावके"मनस्वी
      निशा  आरशापुढे उभी राहून तयार होत होती. तीचे आज एका इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये गेस्ट लेक्चर होते. पुण्याहून मुंबईला असा कितीसा वेळ लागणार होता, शिवाय त्या कॉलेजने कॅबची पण व्यवस्था केली होती. तिने कॉटनची गुलाबी रंगाची साडी घातली ,  त्यावर मॅचिंग टपोऱ्या गुलाबी मोत्यांचं छोटसं नेकलेस चढवलं..... मोत्याचेच कानातले घातले ... हलकासा मेकअप केला.....अजूनही ती एखादी कॉलेज तरुणीच वाटत होती... शिडशिडीत बांधा....... नाजूकसा चेहरा... टीपटॉप राहणीमान !.... हो! पण केसात आता काही रुपेरी बटा दिसू लागल्या होत्या.... आणि डोळ्यांवर चष्माही आला होता..... पण अजूनही जेव्हा ती बाहेर पडे, कित्येक नजरा तिचा पाठलाग करत. तिच्या कॉलेजमध्ये तर विद्यार्थ्यांपासून प्रोफेसरांपर्यंत सगळेच तिच्यावर फिदा असत. पण तिच्या करारी स्वभावामुळे आणि HOD च्या पोस्ट मुळे, कुणाची तिला काही म्हणायची हिम्मत होत नसे.
       कॅबवाल्याचा फोन आला. निशाने पटकन नाश्ता उरकला. आपले पेपर्स , फाईल, पर्स सांभाळत ती घरातून बाहेर पडली., " आई येते गं... रात्री उशीर होईल... तू जेवून घे आणि झोप. बाय ....." आता अडीच तास भरपूर वेळ होता तिच्याकडे लेक्चरच्या नोट्स तयार करायला! तशी तिला तयारीची काय गरज? मानसशास्त्राची ती प्राध्यापक होती. तिच्यासाठी लेक्चर घेणं, हे रोजचंच! तिचे लेख, प्रबंध आणि पुस्तके खूपच लोकप्रिय होते. त्यामुळेच तिला असे कायम वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चरसाठी बोलावत असत. इतक्या वर्षात तिने खूप मोठी झेप घेतली होती..... खूप काही कमावले होते..... पण मनाचा एक कप्पा मात्र कायम दुःखी होता.... तो कप्पा, जो फक्त तिला माहीत होता! .....  
          कॉलेजच्या गेट मधून आत जाताना ती सर्व न्याहाळत होती. कॉलेज मुंबईचं असो वा पुण्याचे.... एक गोष्ट मात्र सगळीकडे सारखीच असते... उत्साहाने सळसळणारी तरुणाई! अशा तरुणाईच्या सानिध्यात ती तिचा भूतकाळ विसरून जात असे!
          कॉलेजमध्ये तिचे अगदी उत्तम प्रकारे स्वागत झाले. भव्य अशा ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम होणार होता. तो हॉल इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांनी भरून गेला होता. पुढच्या रांगेत सर्व प्राध्यापक बसले होते. स्टेजवर काही गणमान्य व्यक्तिंबरोबर ती स्थानापन्न झाली. स्वागत समारंभ झाला. तणाव व्यवस्थापन या विषयावर वक्त्यांची भाषणे सुरू झाली. निशा विशेष अतिथी असल्याने तिचे भाषण शेवटी होते. तिला भरपूर वेळ होता तोपर्यंत! 
  बसल्या बसल्या ती सर्व श्रोत्यांवर नजर फिरवत होती, तोच तिची नजर पुढे बसलेल्या एका प्राध्यापकावर स्थिरावली..... ते ही तिच्याकडेच बघत होते. नजरानजर होताच दोघेही थबकले . जणू अजूबाजूचे जग त्यांच्या मधून दूर झाले..... ते अनेक वर्ष मागे गेले.
     असेच कॉलेजचे ऑडिटोरियम खचाखच भरले होते... वादविवाद स्पर्धा रंगात आली होती.... आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा होती.... फायनल राऊंड सुरू होता.... शासकीय अभियांत्रिकी कॉलेज विरुद्ध गरवारे कॉलेज.... निशा तिची बाजू मांडत होती... तर दुसर्‍या बाजूने प्रसाद जोरदार आक्षेप घेत होता.... कोण जिंकणार.?   कुणाला समजत नव्हते...... शेवटी प्रसाद स्पर्धा जिंकला..... निशाने त्याचे अभिनंदन केले... पण ती, ही हार विसरणार नव्हती. नंतर अशा अनेक स्पर्धांच्या निमित्ताने ते कायम समोरासमोर येऊन उभे ठाकत.... कधी प्रसाद विजयी व्हायचा तर कधी निशा! ...... आणि अशी एकमेकांशी स्पर्धा करता करता ते कायम भेटत होते.... ओळख वाढली... भेटी होऊ लागल्या..... आणि हळू हळू त्यांना प्रेमाची चाहूल लागली...... कॉलेजच्या जीवनातील ते पहिले प्रेम! .... कॉलेजचे शेवटचे वर्ष संपता संपता त्यांना कळून चुकले कि, ते एकमेकांसाठीच बनले आहेत.... दोघांनी आयुष्य भर एकमेकांची साथ द्यायची शप्पथ घेतली.......
            प्रसाद इंजिनीअर झाला. निशा पदवीधर झाली.  MS करण्यासाठी प्रसादला परदेशातील स्कॉलरशिप मिळाली. तो निघणार होता.. दोन वर्षांसाठी..... तोपर्यंत निशाही पुढचे शिक्षण घेणार होती. तो परत आल्यावर ते घरी सांगणार होते...... दिवस सरत होते. दोघांचा पत्र व्यवहारही सुरू होता.... पण इकडे निशाच्या बाबांनी तिचे लग्न ठरवले. तो काळच तसा होता... आई वडील म्हणतील तेंव्हा  आणि ठरवतील त्याच्याशी  मुलींची लग्ने होत...
   " अहो बाबा, माझं शिक्षण अजून व्हायचे आहे.. कसली इतकी घाई तुम्हाला?"
    " हे बघ, निशा मी शब्द दिलाय त्यांना.... चांगल्या मोठ्या घरचे लोक आहेत... मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे. सुखात राहशील तू."
   "पण बाबा, माझं प्रेम आहे एका मुलावर... तो पुढच्या वर्षी भारतात येईल... मग तुम्ही भेटा त्याला.... आवडेल तो तुम्हाला! "
    हे ऐकताच बाबा संतापून गेले. 
" अगं त्या परदेशी गेलेल्या मुलाच्या भरवशावर तू बसणार का? तो आता कसला भारतात येतोय परत? ... तिकडेच एखादी मुलगी शोधेल......माझं ऐक, त्याच्यासाठी आपलं आयुष्य नको बरबाद करू... मी पुष्कळ जग पाहिलय... परदेशी गेलेली मुले परत येतच नाहीत गं.." 
" नाही बाबा, तो तसा नाही त्याने मला वचन दिले आहे. "
" ठीक आहे. मग त्याला लगेच पत्र लिही. त्याचे मला पत्र आले पाहिजे एक महिन्यात... त्याने लेखी हमी दिली पाहिजे कि, ' तो आल्यावर तुझ्याशीच लग्न करणार ' असे वचन पाहिजे मला. पत्र नाही आले तर... मग माझा निर्णय तुला मानावा लागेल. "
       तिने बाबांनी सांगितल्याप्रमाणे केले. आता रोज पत्राची वाट पाहू लागली. एक महिना उलटला..... दोन महिने झाले..... तीन महिने झाले, पण एकही पत्र नाही! बाबा आता घाईवर आले. ते लोकही थांबायला तयार नव्हते.  रडून रडून निशाच्या डोळ्यातले पाणी सुकून गेले. शेवटी तिने चिडून त्याला पत्र लिहिले, " माझे लग्न ठरले आहे. मला विसरून जा." 


आता मिस. निशा काळे आपल्याला मार्गदर्शन करतील.......
या आवाजाने निशा भानावर आली. तिने मनातल्या विचारांना दूर सारून आपले भाषण नेहमीच्याच सहजतेने दिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. निशा खरं तर अजून थांबून विद्यार्थ्यांशी संवाद  साधणार होती. पण तिने तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून तिथून निघणेच पसंत केले. तिला कॅबपर्यंत सोडवण्याची जबाबदारी प्रोफेसर प्रसाद राणेंवर होती. ते दोघे चालू लागले...... गेट जवळ येताच प्रसाद म्हणाला, " एक कॉफी घेऊ या का?" 
तिच्या तोंडून आपोआप "ओके! " बाहेर पडलं. 
कॅफेमध्ये बसल्यावर तो म्हणाला, " तुझं नाव अजूनही निशा काळेच कसं?   तुझं लग्न झालंय ना? " 
"नाही केलं मी लग्न..... करूच कशी शकत होते? ... तू विसरला तरी मी कसं माझं पहिलं प्रेम विसरू? ... मी त्या आठवणी पुसून नाही टाकू शकत." 
  " मग ते पत्र का लिहिलस?" 
" कारण तू माझ्या पत्राला उत्तर दिले नाही म्हणुन.... किती वाट पाहिली मी! .. "
असं म्हणुन ती रडू लागली. प्रसाद गोंधळून गेला," अगं तुझं पहिलं पत्र मिळाल्यावर लगेच मी तुझ्या बाबांना पत्र पाठवले.... त्यानंतर मी तुलाही किती तरी पत्र लिहिली... पण कशाचेच उत्तर आले नाही. एक पत्र आलं नंतर ., तेही तू लग्न करतेय असं.... मला काही समजतच नाहीये.... खरंच एकही पत्र नाही मिळाले तुला ?" 
  निशा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागली.... तिला काही समजेना.. काहीतरी गोंधळ होतोय..... पण प्रसाद इतक्या विश्वासाने सांगतोय म्हणजे कुठे गडबड झाली? पत्र कुठे हरवले? 
दोघांना खूप पश्चाताप होत होता.... वाट न पाहण्याचा.... एकमेकांवर विश्वास न ठेवण्याचा! ...... त्यावेळी असे फोनही नव्हते हाताशी, त्याचाही राग आला .... 
         
निशा घरी परतली. सरळ आईच्या खोलीत गेली. 
" आई प्रसादचे पत्र आले होते ना? काय केले तुम्ही त्याचे?" 
आईने इतकी वर्ष मनात ठेवलेले शेवटी सांगायचे ठरवले, 
" प्रसादचे पत्र आले होते... पण तुझ्या बाबांचा हट्ट होता त्या मुलाबरोबरच तुझं लग्न लावायचा! त्यांना त्यांचा शब्द तुझ्या प्रेमापेक्षा जास्त मोठा वाटला. त्यांनी तुझ्यापासून हे लपवायचे ठरवले. तू आज ना उद्या तयार होशील अस त्यांना वाटत होतं..... पण झालं उलटच.. तू ठाम अडून राहिली लग्न न करण्यावर...  त्यांना अचानक अॅटॅक आला........ या सगळ्यात एक वर्ष गेले. बाबा गेल्यावरही मी तुला सांगू शकले असते.... पण तुझ्या  मनातली तुझ्या बाबांची प्रतिमा मला मलीन करायची नव्हती, शिवाय आता प्रसादने लग्न केले असेल तर परत तुझं मन तुटून जाईल, या विचाराने मीही हे सर्व तुला सांगितले नाही...... आम्हाला माफ कर बाळा.... आम्ही तुझे गुन्हेगार आहोत...... "
आईने ते पत्र जुन्या ट्रंकेतून काढून निशाला दिले. ते हरवलेले.... तिला कधीच न मिळालेले पत्र..... पाहून तिचा इतके वर्ष साठवून ठेवलेला संयमाचा बांध तुटला...... ती त्या प्रसंगानंतर आज प्रथमच इतकी रडत होती. 

  
   काही दिवसांनंतर....... 

दारावरची बेल वाजली .... रविवारची सुट्टीच असल्याने निशा घरीच होती. तिनेच दार उघडले. समोर प्रसाद उभा! तिला, त्याला आत बोलावण्याचेही भान राहिले नाही. 
तो स्वतःच आत आला. बॅगमधून एक पाकीट बाहेर काढले.....तिच्या पुढे धरले.... पाकिटात एक पत्र होते..... 
  " निशा, मी तुझ्यावर  अजुनही खूप प्रेम करतो...... माझ्याशी लग्न करशील?" 
  निशाला माहीत नव्हते कि, त्यानेही लग्न केले नव्हते. तोही तिला विसरू शकला नव्हता. 
 " निशा, माझं एक पत्र काळाने हरवले... पण आता हे पत्र देऊन मला काळाला हरवायचे आहे! .... मधली वर्ष आपण विसरून जाऊ या.... नवी सुरुवात करू या..... "
  निशा हरखून गेली. आईलाही भरून पावले. 
हरवलेलं पत्र शेवटी सापडलं... आणि दोघांच्या जीवनात प्रेमाची भेट घेऊन आलं.... 
माझे सर्व लेख, कथा आणि कविता वाचण्यासाठी "मनस्वी" या माझ्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या. 
   मला Like आणि follow ही करू शकता. 
©अर्चना बोरावके"मनस्वी"