Login

हाराकिरी भाग १

Investigation of a Murder

हाराकिरी भाग १


©® सौ. हेमा पाटील.


‌मुंबईतील अंधेरी या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावर काहीतरी विचित्र घडले होते. सकाळी झाडूपोछा करायला येणाऱ्या कमलाबाईने रोजच्या सवयीने आपल्या जवळील चावीने फ्लॅट नंबर ९१३ चे दार उघडले व ती आत गेली. आत गेल्यावर तिने जे दृष्य पाहिले ते पाहून ती जोरात किंचाळली व धावतच फ्लॅटच्या बाहेर आली.
‌‌ कोण किंचाळले हे पाहण्यासाठी त्या मजल्यावरील फ्लॅटचे दरवाजे फटाफट उघडले गेले. घाबरलेली कमला त्या फ्लॅटकडे पुन्हा पुन्हा हात करत होती, परंतु घाबरल्या मुळे तिच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. ते पाहून काहीजण फ्लॅट नंबर ९१३ कडे गेले.

फ्लॅटच्या आत जाणाऱ्या प्रत्येकाला समोरचे दृश्य गारठून टाकणारे होते. २५ वर्षीय तरुणी मेघना पाटील, फॅनला लटकलेल्या अवस्थेत होती. तिचे डोळे सताड उघडे होते. तिची जीभ तोंडाबाहेर डाव्या बाजूला लटकत होती. रुममध्ये आजूबाजूला अस्ताव्यस्त पसरलेले सामान, फुटलेल्या ग्लासचे काचेचे तुकडे, आणि तिच्या पायाशी पडलेला मोबाईल फोन स्पष्टपणे काहीतरी घडल्याची साक्ष देत होते.

कुणीतरी पोलिस स्टेशनला फोन केला. घटनास्थळी पोलिस पोहोचले. इन्स्पेक्टर राघव सूर्यवंशी त्यावेळी ड्युटीवर होते. त्यामुळे हे प्रकरण हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. तपासाला सुरुवात करताना इन्स्पेक्टर राघवने पहिल्यांदा सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला.

मेघनाच्या गळ्याभोवतीच्या फासाचे स्वरूप, तिच्या गालावर डोळ्यांतून सुकलेल्या अश्रूंच्या खुणा, आणि घडलेल्या प्रसंगाच्या छोट्या छोट्या तपशिलांकडे त्याने बारकाईने लक्ष पुरवले.

“ही आत्महत्या आहे का खून?” राघव स्वतःशी पुटपुटला. घटनास्थळ पाहता सकृतदर्शनी त्या तरुणीने स्वतःहून गळफास लावून घेतल्याचे चित्र दिसत होते. कुठून तरी तपासाला सुरुवात करणे आवश्यक होते. त्यामुळे इन्स्पेक्टर राघवने सर्वात आधी तेथे जमलेल्या सर्वांना फ्लॅटबाहेर काढले. हवालदार शिवाजीला त्या सगळ्यांची नावे व मोबाईल नंबर टिपून घ्यायला सांगितले.
" यापैकी कुणी मृत व्यक्तीचे नातेवाईक आहेत का?" असे राघवने विचारले. सर्वांनी नकारार्थी मान हलवली.
" नावे व मोबाईल नंबर दिला की सगळ्यांनी आपापल्या घरी जा. गरज पडेल तेव्हा तुम्हांला बोलावले जाईल" असे सांगितले व त्याने मेघनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची पूर्वतयारी म्हणून ॲम्ब्युलन्स मागवली.
सोसायटीच्या चेअरमन कडून मेघनाच्या घरचा फोन नंबर मिळवून तिच्या घरी इन्स्पेक्टर राघव यांनी फोन केला व परिस्थितीची कल्पना देऊन ताबडतोब इकडे बोलावले.


अशा रीतीने तपासाला सुरुवात झाली.

मेघनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटची कसून पाहणी केली. मिळालेले पुरावे जप्त करण्यात आले. फुटलेल्या ग्लासच्या काचा गोळा करण्यात आल्या. त्यावर कुणाच्या बोटांचे ठसे आहेत हे तपासण्यासाठी फोरॅन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले. इमारतीतील सुरक्षारक्षक व शेजारी यांची चौकशी सुरू झाली. शेजारच्या अंजलीताईने सांगितले,
“काल रात्री साडेदहाच्या सुमारास फ्लॅटमधून बराच वेळ जोरजोरात वादावादीचे आवाज ऐकू येत होते. मग अचानक एकदम शांतता पसरली.”

“रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी एक युवक मेघनाच्या फ्लॅटवर गेला होता. चेहरा नीटसा दिसला नाही, पण त्याच्या पाठीवर काळी सॅक होती.”
" तुम्ही त्यावेळी बाहेर काय करत होता?" राघवने अंजली ताईंना विचारले.
" मी जेवणानंतर रोज शतपावली करते. त्यासाठी मी खाली चालले होते." अंजलीताई उत्तरल्या.

हे तपशील राघवच्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. कोण होता तो युवक? तो तिचा मित्र होता का? की नातेवाईक? की अजून कुणी?

मेघनाच्या मृत्यूचे कोडे उलगडण्यासाठी राघवने तिच्या गत आयुष्याचा शोध घ्यायचे ठरवले. मेघनाने जर आत्महत्या केली असेल तर त्यामागे काय कारण असावे ? तसेच कुणी जर तिचा खून केला असेल तर तो का केला असावा हे शोधण्यासाठी तिच्या आयुष्यात काय घडले होते ते पहाणे आवश्यक होते.

मेघनाच्या घरात असलेल्या तिच्या लॅपटॉपवरून ती सनलामा या आय.टी कंपनीत काम करत असल्याचे समजले. तिच्या तपासासाठी हा एक महत्त्वाचा धागा होता. यामुळे तिच्याबद्दलची बरीचशी माहिती हाती लागेल असे राघवला वाटले.

शोध घेताना तिच्या कपाटात कपड्यांच्या तळाशी एक डायरी सापडली. त्यातील उल्लेख चाळले असता मेघनाला डायरी लिहायची सवय होती हे इन्स्पेक्टर राघवच्या लक्षात आले. यातून तपासाच्या दृष्टीने काहीतरी महत्वाचे सापडेल अशी राघवला आशा वाटली. डायरीमध्ये, ती तिच्या कुटुंबाबद्दल आणि एका “आर” नावाच्या व्यक्तीबद्दल लिहायची हे वरवर चाळताना राघवच्या लक्षात आले.

“माझे जगणे खूप कठीण झालेय. आर ने दिलेले वचन पाळले नाही. मी काय करु ?” असं तिने एका पानावर लिहिले होते.

राघवने तिच्या डायरीतील तो संदर्भ वाचला आणि तो आर कोण आहे हे शोधायचे ठरवले. हा आरच आपल्याला तिच्या खुन्यापर्यंत नेऊन पोहोचवेल असे राघवला वाटले . तिच्या फोनवरील शेवटच्या कॉल्सची माहिती गोळा केल्यावर, राघवला एक नंबर सापडला जो सतत तिच्याशी संपर्कात होता.

फ्लॅटमधून आणखी काही महत्त्वाचे पुरावे सापडले. एक अर्धवट जळालेले पत्र सापडले, जे पूर्णपणे वाचता येत नव्हते. पत्रातील काही शब्द मात्र स्पष्ट दिसत होते,
“तुझे सत्य उघडकीस आले तर सगळेच संपेल.”

राघवसाठी हे प्रकरण केवळ आत्महत्येचे वाटत नव्हते. मेघना एकटी राहणारी, स्वाभिमानी आणि आत्मविश्वासू तरुणी होती. तिच्या फ्लॅटमधल्या उलथापालथीचा तपशील खूप काही सांगत होता. आता पुढील तपासाची दिशा राघवला ठरवावी लागणार होती. आत्महत्या की खून? थोडासाही हलगर्जीपणा झाला तर खून आत्महत्या या सदरात जाऊ शकतो याची राघवला कल्पना होती.


राघवने तिच्या फोनवरून तिला सतत कॉल येणारा नंबर कुणाचा आहे हे शोधण्यासाठी एका विशेष पथकाला जबाबदारी दिली. तसेच, तिच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

तो स्वतःलाही पुन्हा पुन्हा हे प्रश्न विचारत होता,
“कोणाला काय लपवायचे होते? मेघना कशाला घाबरत होती? आणि शेवटचा प्रश्न , त्या सॅक पाठीवर घेतलेल्या माणसाचा तिच्या घरी येण्याचा उद्देश काय होता?”

पहिला भाग इथेच संपलाय,पण अनेक अनुत्तरित प्रश्न सोबत घेऊन...
पुढील भागात, राघवला मेघनाच्या आयुष्यातील गुपिते कळतील का? की रहस्य आणखी गडद होत जाईल? यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.


🎭 Series Post

View all