हे गतवर्षा..

हे गतवर्षा..


हे गतवर्षा..

बघता बघता हे वर्षही सरून गेलं. आताच तर आपण २०२२ च्या वर्षाचं स्वागत केलं आणि इतक्या लवकर हे वर्ष संपलंही?

काय गणित आहे देव जाणे! पण आयुष्यात बरंच काही मिळवण्याच्या प्रयत्नात जणू काही सारं उणं होत गेलं. हातातून वाळूचे कण निसटावेत तसं आयुष्य हळूहळू सरत गेलं.

ऋतुचक्र फिरत राहतं.. आलेला दिवस सरून जातो. नवा दिवस नवा साज लेवून येतो. शिशिर संपून वसंताची चाहूल लागते. जेव्हा एकीकडे पानगळ सुरू असताना दुसरीकडे नवीन पालवी फुटत असते हा निसर्गाचा नियम आहे मग आपण माणसं तरी कशी अपवाद असणार? म्हणून नव्याचे स्वागत करत असताना जुन्यांना विसरायचं? मग त्या आठवणींचं काय करायचं? त्या कशा संपवायच्या?

मागे वळून पाहतांना, आठवतं मला. विश्वासाचे पंख गळून पडल्यावर माझं कोसळणं. नात्यांवरचा विश्वास उडल्यावर माझं स्वकोषात जाणं. आणि मग आठवतं मला माझं अविरत लिहत राहणं.. आजारपणाचं सावट असतानाही माझं स्वतःला विसरून फक्त लिहत राहणं.. आणि याच लेखनामुळे प्रतिलिपी व्यासपीठावर लागोपाठ दोन स्पर्धेत विजयी होण्याचा मान मिळणं हीच काय ती जमेची बाजू..

खरंतर आयुष्य एक प्रवास आहे. या प्रवासात वळणावळणावर प्रवाशी भेटतात. आपली ओळख होते. काहींशी मैत्रीही होते. काही प्रवासी प्रवासाच्या शेवटापर्यंत आपल्या सोबत राहतात तर काही अर्ध्यातच त्यांचा टप्पा आला की सोडून निघून जातात. काही आपल्याला अनुभव देतात, आनंद देतात तर काही जन्मभरासाठी धडा.. आपण मात्र चालत राहायचं. ज्यांना यायचं ते आपल्या सोबत येतील आणि जे मध्येच सोडून जातील ते कधी आपले नव्हतेच असं समजायचं आणि आपण आपलं मार्गस्थ व्हायचं. खरं सांगायचं तर हव्याहव्याशा वाटणाऱ्या लोकांची साथ मिळत नाही आणि नकोश्या वाटणाऱ्या लोकांचा संग काही केल्या संपत नाही.

हे गतवर्षा! निरोप तुला देताना आठवतं इतकंच आयुष्याच्या वाटेवरचं एक वळण पार झालं. आता नव्याने उभं राहायचं नवे आव्हान पेलण्यासाठी. जगायचं अजून बरंच काही सोसण्यासाठी. मला महाराणी कुंतीसारखं दुःखाचं दान मागायचंय जेणेकरून माझ्या श्रीरंगाचं विस्मरण मला कधीच होणार नाही.

नियतीला खिजवत, सुखाच्या प्रतीक्षेत नव्याने उभं राहायचं.. सज्ज व्हायचं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. पुन्हा एकदा.. पुन्हा एकदा.

सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..
© निशा थोरे (अनुप्रिया)
३१.१२.२०२२