आनंदी मन

एका आनंदी मनाच्या सुनेची कथा

हसरी, उत्साही शरयू काळेंच्या घरात सून म्हणून आली आणि तिने सासरच्या मंडळींना एकदम आपलेसे करून टाकले. तिचा स्वभावच असा होता की कोणीही तिच्या प्रेमात पडावं! तिचा नवरा अभिषेक तिला म्हणाला, "किती सहज रुळलीस या घरात. असे वाटते किती वर्षापासून चा सहवास आहे आपला!" आता सासरेही आपल्या मुलीप्रमाणे माया करू लागले तिच्यावर.

पण अभिषेकच्या आईला म्हणजेच शरयूच्या सासुबाईंना हे रुचेल कसे? तिचं होणार कौतुक त्यांना सहन होईना. मग त्यांनी शरयूवर अधिकाधिक जबाबदारी टाकायला सुरुवात केली आणि आपण सगळ्या कामातून अंग काढून घेतले. शरयू नोकरी करत होती. तरीही घरचं सारं करून जात होती, अगदी हसतमुखाने आणि न तक्रार करता. आता तिच्या सासुबाईंना रिकामा वेळ खूप होता, तो सत्कारणी कुठे लावावा हेच त्यांना कळेना. मग आपसूकच त्या शरयूच्या प्रत्येक कामाकडे, वागण्या- बोलण्याकडे  जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागल्या. तिच्या कामात चुका काढू लागल्या. तिच्या तक्रारी आपल्या नवऱ्याकडे, मुलाकडे करू लागल्या.
मात्र ते दोघे यांकडे दुर्लक्ष करत होते.
अगदी सुट्टीच्या दिवशीही सासुबाई काही ना काही कामं काढत आणि शरयूला गुंतवून ठेवत. मग अभिषेक नाराज होई, पण शरयूच्या प्रेमळ स्वभावाने लवकरच तो राग विसरूनही जाई.

सासरे कधी कधी आपल्या बायकोला समजावत, "अगं नवीनच लग्न झाले दोघांचे, निदान सुट्टीचा दिवस तरी त्यांना मनाप्रमाणे एन्जॉय करू दे." मग शरयूच्या सासुबाई म्हणत, "इतकी वर्ष मी केलंच ना सारं. आता सून हाताखाली आली तर चार काम करू दे तिला आणि तिची ना नाही ना याला, मग तुम्ही का बोलता आम्हा बायकांच्या गोष्टीत?"
हे ऐकून सासरे तिथून निघून जात, मात्र शरयूला कामात काही ना काही मदत करत. हे पाहून सासुबाई अजूनच चिडत. "इतकी वर्षे मला मदत केली नाही..पण 'हे 'सुनेला मदत करतात" म्हणून रुसून बसत.

पण तरीही शरयू सासुबाईंची कुठलीच गोष्ट मनावर न घेता घर आणि नोकरी यांचा मेळ घालून कोणताही ताण न घेता उत्साहाने आपली कामे करत होती.

ऑफिसमधल्या तिच्या मैत्रिणींनाही आश्चर्य वाटत होते, "सासूने सगळी जबाबदारी टाकूनही, ही आनंदाने सगळं कसं करते! तिला राग, चीड, येत नसेल का? नवीनच लग्न झाले, दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळत नाही, तरीही हिची काहीच तक्रार नाही."
तर अभिषेकलाही आईचे वागणे खटकत होतेच. पण त्याने बोलूनही काही उपयोग झाला नव्हता.

पुढच्याच आठवड्यात सलग तीन दिवस सुट्टी असल्याने अभिषेकने फिरायला जायचा प्लॅन केला. त्यानुसार बुकिंगही केलं. घरी परवानगी घेऊन बॅग पॅक करून शरयू आणि अभि दोघंही दुसऱ्या दिवशी ट्रीपला जाण्याच्या उत्साहात लवकर झोपून गेली.
पण सकाळी- सकाळी सासुबाईंच्या बाथरुममध्ये पडण्याने अभि आणि शरयूची ट्रीप कॅन्सल झाली. त्यामुळे अभिचा मुड गेला आणि शरयूही खूप नाराज झाली.
पण तिने चेहेऱ्यावर नाराजी न दाखवता स्वतः ला सासुबाईंच्या सेवेत गुंतवून घेतले.

आता शरयूला मदत म्हणून बायकोचा पाय बरा होईपर्यंत सासऱ्यांनी आपल्या मुलीला 'आर्याला' बोलावून घेतले. नणंद आल्याने शरयूला मदत झाली खरी, पण सासुबाई आपल्या लाडक्या लेकीला काम न सांगता शरयूलाच जास्त सांगू लागल्या! त्यामुळे तिची धावपळ होऊ लागली. पण तरीही आनंदाने ही परिस्थिती स्वीकारत ती सारी कामे करू लागली.

आर्या पाहत होती, शरयूची धावपळ आणि आपल्या आईचे तिच्यासोबतचे वागणे. तिनेही आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण 'पालथ्या घड्यावर पाणी.'

पण सासुबाईंना आता शरयूची खूप सवय झाली होती आणि तिच्याविषयी त्यांना मायाही वाटत होती. पण तिला हे बोलणार कसे? "आपण तिची इतकी परीक्षा पाहिली तरी, पोरं आनंदाने, न थकता सारे करते. आपण पडल्यापासून तिला चार कामे जास्तच करावी लागली," याबद्दल त्यांना खूप गिल्टीही वाटत होते.
"आता या खाष्ट सासूचा मुखवटा टाकून आपण आपल्या सुनेवर माया करू. अगदी आपल्या अभिसारखीच आणि पाय बरा झाल्यावर तिला सगळी मदत ही करू. म्हणजे सगळा भार पडणार नाही तिच्यावर." असे त्यांनी मनोमन ठरवताच, त्यांचे मन हलके झाले आणि त्या दिवसापासून सासुबाईंच्या वागण्यात थोडा बदल जाणवू लागल्याने शरयूही खुश झाली.

आता आई थोडी-फार हिंडू - फिरू लागल्याने
एका रविवारी सुट्टीच्या दिवशी आईची व्यवस्था लावून आर्या, अभि आणि शरयूला घेऊन बाहेर फिरायला गेली. शेवटी न राहवून तिने विषयाला हात घातलाच.
"शरयू तू न चिडता, न रागावता घरातली सगळी कामे कशी करतेस गं? मी बघते ना, आई तुझ्याशी कशी वागते! कशी बोलते, तुला कामाला लावते सारखी. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला..पण ऐकतच नाही माझे."

तशी शरयू हसून म्हणाली. "ताई आपल्या घरात एखादी नवीन व्यक्ती आली की आपल्याला इनसिक्युअर व्हायला होत, तसचं झालय आईंचं. इतकी वर्षे त्यांनी केलं. आता त्यांच्या सुनेने सारं करावं ही अपेक्षा असेल त्यांची. कधी कधी त्या मुद्दाम करतात हे ही मला माहित आहे. पण त्याचा त्रागा करून काहीच उपयोग नाही. कारण त्रास मलाच होणार. त्यांना नाही! त्यांना फक्त या गोष्टीचा आनंद मिळणार की मला त्रास होतो. नाही का?
आपण कुठल्याही परिस्थितीत 'आनंदी' राहायचं एवढंच मला माहीत आहे. कारण अति स्ट्रेसमुळे आपण अस्वस्थ होतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर, शरीरावर होतो. मग आपण आपल्या मनावर बाहेरच्या गोष्टींचा परिणाम का होऊ द्यायचा?
आपणच ठरवायचं सगळ्या गोष्टीत आनंद कसा अनुभवायचा! कुठलीही परिस्थितीला आपला आनंद हिरावून घ्यायची परमिशन द्यायची नाही.. आणि कामाचं म्हणाल तर मला सवय आहे पहिल्यापासूनच."
हे ऐकून अभिषेकला मनातून खूप आनंद झाला. इतकी समजूतदार बायको मिळाली याचा.

"धन्य आहेस बाई. मी इतका समजूतदारपणा दाखवला तर माझ्या सासुबाई माझी दृष्टच काढतील! आम्ही एकमेकींवर चिडतो काय, भांडतो काय आणि रुसतो देखील. पण पुन्हा एकत्र येतो. त्यातही मजा आहेच की." आर्या शरयूला म्हणाली.

"हो ताई. 'व्यक्ती तितक्या प्रवृती.' पण मला आईंच्या डोळ्यात माझ्यासाठीही प्रेम दिसतं. फक्त त्या बोलून दाखवत नाहीत इतकंच."

इतक्यात शरयूचा फोन वाजला.

"हॅलो."

"अगं कुठे आहात इतका वेळ? शरयू..बेटा रात्रीचे नऊ वाजून गेले गं. फार उशीर झाला, म्हणून काळजीने फोन केला. बरं लवकर या घरी. केव्हापासून वाट पाहते आहे मी."

असे म्हणत सासुबाईंनी फोन ठेवला आणि शरयूचं मन मात्र आनंदानं न्हाऊन निघालं, सासुबाईंनी दाखवलेल्या अव्यक्त प्रेमामुळे!