हॅपी बर्थडे ईरा

Ira's 3rd Birthday. Ira Is Very Precious For Me

प्रिय ईरा,

सर्वप्रथम तुला तुझ्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपली पहिली भेट ही फेसबुकवर झाली. तुझ्या फेसबुक पेजवर नवनवीन कथा वाचायला मिळत होत्या, म्हणून तुझी मैत्री करायला मला आवडले. मला वाचन आवडत होतं आणि तु माझी आवडत पुरवत होतीस.

सप्टेंबर २०१९ पासून मी लिखाणाला सुरुवात केली. तुझ्यामुळे माझं लिखाण अनेक वाचकांपर्यंत पोहोचलं आणि त्यांना माझं लिखाण आवडलं. तुझ्यामुळे मी एक लेखिका झाले. माझी एक नवी ओळख मला मिळाली.

माझ्यातील सुप्त गुण तुझ्यामुळे बाहेर यायला मदत झाली. मी लिहू शकते, हा आत्मविश्वास तु माझ्यात निर्माण केलास. गेल्या दीड- पावणेदोन वर्षांत मी अनेक कथा लिहिल्या. संजना मॅडमने अनेक स्पर्धा घेतल्या, त्यात मी मनापासून सहभागी झाले. इथून मागे माझ्याकडे एक पण ट्रॉफी नव्हती, पण तुझ्यामुळे पाच ट्रॉफी माझ्या शोकेसमध्ये आहेत.

तुझ्यामुळे अनेक नवनवीन मैत्रिणी मिळाल्या. माझ्या पासून लांब रहाणाऱ्या, काहीही संबंध नसताना तुझ्यामुळे आमच्यात मैत्री झाली. आमचं सर्व लेखकाचं मिळून एक ईरा कुटुंब तयार झालं आहे, ह्या कुटुंबातील सगळेच जण एकमेकांना मदत करण्यासाठी तत्पर असतात.

तुझ्यामुळे माझी पहिली ऑनलाईन मुलाखत झाली. आपण चार लोकांसमोर बोलू शकतो, हा आत्मविश्वास तुझ्यामुळे माझ्यात निर्माण झाला. महिला दिनाच्या निमित्ताने एका चर्चासत्रात मला सहभागी करुन घेतले गेले. तुझ्यामुळे माझ्यात खूप चांगले सकारात्मक बदल झाले. तुझ्यामुळे माझी माझ्यासोबत नव्याने ओळख झाली.

मागच्या वर्षी तुझ्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या वेळीच तुला शुभेच्छा द्यायच्या होत्या, त्याकरता एक पत्रही लिहायला घेतलं होतं, पण अचानक दोन दिवस आधी माझे पप्पा अचानक आम्हाला सोडून देवाघरी गेले. तुला शुभेच्छा देण्याची माझी मनस्थितीच नव्हती.

माझं पहिल्यापासून एक मत आहे की, आपल्या आयुष्यात जे काही घडतं, चांगलं असो की वाईट, त्याचा काही ना काही अर्थ असतोच किंवा आपली एखाद्या नवीन व्यक्तीसोबत ओळख होते, तर त्याचा काहीतरी संबंध आपल्या भविष्यासोबत असतो. आज माझं हे मत आपल्या बाबतीत खरं झालं आहे.

तुझी आणि माझी ओळख का झाली? याचे उत्तर मला गेल्या काही दिवसांपूर्वी मिळाले. माझ्या पप्पांना आदरांजली म्हणून मी त्यांच्या आयुष्याचा प्रवास दर्शविणारे एक पुस्तक लिहिले आहे. आपल्या सर्वांचेच आईवडील आपल्यासाठी खूप काही करत असतात, पण त्यांच्यासाठी आपल्याला जर काही वेगळं करता आलं, तर यासारखा आनंद दुसरा नाही. तुझ्यामुळे मी लेखिका झाले आणि त्याचमुळे मी माझ्या पप्पांच्या आयुष्यावर पुस्तक लिहून त्यांना आदरांजली वाहू शकले. माझ्या आप्तस्वकीयांनी मी लिहिलेले पुस्तक वाचल्यावर माझे कौतुक केले. माझे कौतुक हे फक्त तुझ्यामुळे होऊ शकले. समजा तुझी आणि माझी ओळख झालीच नसती तर मी हे पुस्तक लिहू शकले नसते आणि आज जे मला समाधान मिळाले आहे, ते मिळाले नसते. 

तु अचानक आयुष्यात आलीस आणि माझे आयुष्य बदलून गेले. तुझ्या रुपाने एक जिवलग सखी मला मिळाली. आपली मैत्री माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत रहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. 

Once again happy birthday ira. Thank you so much for coming in my life

                               तुझी सखी, 

                              डॉ सुप्रिया दिघे

©®Dr Supriya Dighe