सुखाचा शोध

To Be Happy All Time
"सुख म्हणजे काय असतं?" हे एका चित्रपटातील गाणे ऐकले आणि मनात विचार आला खरचं सुख म्हणजे नक्की काय असतं?
सुख कशात असत? कोठे मिळत? सर्वांना मिळत का? सर्व जण सुखासाठी चं जगत असतात का?सुख चिरंतर,निरंतर असत का?प्रत्येकाची सुखाची व्याख्या सारखी असते का?सुख मिळते म्हणजे काय?सुखी असणे आपल्या हातात असते की इतरांवर अवलंबून असते? सुखाचा शोध लागला आहे का?
अशा अनेक प्रश्नांची मालिकाचं सुरू झाली.
सुखावर विचार करता करता ऐकलेली गोष्ट आठवली "सुखी माणसाचा सदरा".
या गोष्टीप्रमाणे जगात असा कोणताही व्यक्ती नाही की जो सर्व बाबतीत सुखी आहे म्हणजेचं प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी कारणाने दुःखी असतोचं.प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या दुःखाने रडत असतो.आजारपण असते,पैशाचा अभाव, नोकरी/ व्यवसाय यातील चढउतार, कुटुंबातील जबाबदाऱ्या पूर्ण न होणे,मान-अपमान, यश-अपयश या अशा अनेक समस्या प्रत्येकाला भेडसावत असतात.
तुकाराम महाराजांच्या मते,
"सुख पाहता जवापाडे,दुःख पर्वताएवढे!"

याप्रमाणे प्रत्येकाला चं वाटते की आपल्या आयुष्यात सुख कमी आणि दुःखचं जास्त आहे.आपल्या पेक्षा हा सुखी,तो सुखी असेचं वाटत असते.
गरीबाला श्रीमंत सुखी वाटतो,आजारी माणसाला निरोगी सुखी वाटतो.निपुत्रिकाला मुलबाळ असलेला सुखी वाटतो.अशा प्रकारे प्रत्येकाला आपल्या जवळ जे नाही त्यात तो सुख शोधत असतो आणि यामुळे आपल्या कडे काय आहे ? हे सुद्धा लक्षात येत नाही.

" सुख शोधाया जाती आणि रडती परोपरी"

गरजा आणि सुख यांचा जवळचा संबंध आहे.आपल्या गरजा पूर्ण करणे म्हणजे सुख मिळविणे असे प्रत्येकाला वाटते.भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती धडपडत असते.चांगले खाणेपिणे, चांगले राहणीमान, घरात सर्व सुख सोयीची साधने
हे सर्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणे,पैसा कमविणे आणि त्यासाठी वेळ ,आरोग्य खर्च करणे.
एवढे सर्व करूनही जरी सुख मिळाले तरी ते किती वेळ टिकते?पुन्हा नवीन सुखाच्या शोधात प्रयत्न सुरु होतात.म्हणजे सुख हे काही नेहमीचं आपल्या पदरात असेल असे नाही.

जीवन म्हणजे एक वस्त्र आहे आणि यात एक धागा सुखाचा असेल तर शंभर धागे दुःखाचे असतात.
जसे सुख हे फार काळ टिकत नाही तसे दुःख हे ही क्षणिक असते.वेळेनुसार सुखदुःख बदलत असतात.

रामदास स्वामींनी म्हटले आहे
" जगी सर्व सुखी असा कोण आहे,विचारी मना तूचि शोधूनि पाहे"
जगात असा कोणीही नाही की जो स्वतः ला सुखी समजतो.
सुख आणि दुःख हे आपल्या भावनांचे खेळ आहे.दोघीही गोष्टी आपल्या मानन्यावर असतात. आपण कोणत्या गोष्टीत सुख शोधतो? आणि कोणत्या गोष्टींनी दुःखी होतो? असा विचार केला तर समजते की या गोष्टी कधी संपणार ही नाहीत.म्हणजे आयुष्यभर सुखदुःखाचा लपंडाव सुरुच असतो.

सुख हे कणभर गोष्टीत दडलेल असतं
फक्त ते शोधून उपभोगता यायला हवं

सुखाची येण्याची वाट पाहण्यापेक्षा, आपल्या कडे जे आहे त्यात समाधानी राहून छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधला तर प्रत्येक क्षण सुखाचा होऊ शकतो....

जीवन म्हणजे
सुखदुःखाच येण जाणं
सुखाबरोबर दुःखातही
आनंदाने जगूनि घ्यावं...