आनंदी जीवनाचा मंत्र

आनंदी जीवन


कोणाशीही हेवेदावे न करता.. विनातक्रार.. आयुष्य भरभरून जगता  येतं???
हो, नक्कीच का नाही......

चला तर बघू या कसे.....
कोणतीही गोष्ट का नाही करायची , आणि कोणतीही गोष्ट का करायची याची जेव्हा आपल्याला कारणं समजतात तेव्हा ते करणं किंवा नाही करणं जास्त सोप्प होऊन जात. आता विनातक्रार आयुष्य का जगलं पाहिजे, आणि आनंदी आयुष्यच का जगलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, आणि प्रत्येकाची इच्छा तीच आहे.
पण ते शक्य का होत नाही आणि ते शक्य कसं करायला हवं हे आपण पाहुयात. त्या आधी हे लक्षात घ्यायला हवं की ते आपल्या विचारांवर अवलंबून आहे. आणि विचारांची दिशा बदलणं, आपला दृष्टिकोन बदलणं आपल्या हातात आहे.
आयुष्यात प्रॉब्लेम्स, एकतर आयुष्य खूप सिरिअसली घेतल्याने येतात नाहीतर, एकदमच लाइटली घेतल्याने येतात. शेवटी विषय कोणता ही असेना का, बॅलन्स हा महत्वाचा! आपलं आपण काम केलंय, ते एन्जॉय केलंय , त्याबदल्यात जे मिळतंय त्यावर समाधान मानलंय आणि जे आहे त्यात सुखाने राहतोय आणि जे नाही त्यासाठी प्रयत्न करतोय पण दुःख , हेवा, राग मात्र कशाचाच नाही, असं आयुष्य जगणारा माणूस सापडणं कठीण आहे.
अशी माणसं नक्कीच असू शकतात, पण प्रमाण मात्र कमीच. मिळणाऱ्या गोष्टीत समाधान मानणं कधी-कधी कठीण असत, कारण जे मिळतंय त्यापेक्षा आपले कष्ट, प्रयत्न जास्त असतील तर नक्कीच मिळणारी गोष्ट अयोग्य वाटणं साहजिक आहे. पण प्रत्येक गोष्टच कष्टांपेक्षा कमी मिळेल असं देखील होत नाही.
आणि काही गोष्टी तर प्रयत्न न करता देखील मिळत असतात, पण त्यांची तक्रार मात्र केली जात नाही. यावरूनच आपण आपल्याला त्रासदायक असणाऱ्या गोष्टींवर किती फोकस करतो आणि चांगल्या गोष्टींवर किती कमी फोकस करतो हे लक्षात येते.
आपल्यापेक्षा कमी कष्ट करून सुद्धा आपल्यापेक्षा जास्त मोबदला मिळणाऱ्या आपल्याच मित्राचा कधी-कधी हेवा वाटायला लागतो. या व्यतिरिक्त सुद्धा कितीतरी भावना आपल्याला रोज छळत असतात.
कोणी आपल्याला आदराची वागणूक देत नसेल त्याबद्दलचा राग, एखादी गोष्ट करायची राहून गेली त्याच दुःख, आणि याव्यतिरिक्त आयुष्यात नव्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात, त्यांच्याशी सतत डील करावं लागत असत. पण यात भर आपल्याच विचारांची पडत असते.
आपले बरेचसे विचार आपल्याला निराशाजनक आयुष्य जगायला लावत असतात. विचारांमुळेच आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवर फोकस न राहता काय नाही, काय कमी आहे, आणि काय चेंज करण्याची गरज आहे यावरच विचार चक्र सतत फिरत राहत. पण या सगळ्या सायकलला आपणच थांबवू शकतो.
आयुष्य ही खूप मोठी मौल्यवान देणगी आहे. आणि त्या आयुष्याबद्दल कृतज्ञ वाटणं म्हणजेच आयुष्य आनंदाने जगणं. कारण ज्याने हे आयुष्यरूपी भेटवस्तू दिलीये त्याची किंमत, त्याचा आनंदाने स्वीकार करून ते समाधानाने जगणं हाच होय. बोलणं सोप्प आहे आणि करणं अवघड, पण अवघड म्हणजे अशक्य नाही हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे.
आणि कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करतानाच अवघड असते. दुसऱ्यांदा करू तेव्हा त्यातला अवघडपणा कमी झालेला असतो, आणि त्यानंतर परत-परत केली असता त्या गोष्टीची सवय होऊन ती सोप्पी होऊन जाते. पण पहिल्यांदा करण्यासाठी हिंमत करणं म्हणजे खरा शूरपणा! पण ही गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे.
आपलं आयुष्य आपल्याला, सतत विचारात घालवायचं आहे तेही स्वतःच्या नाही दुसऱ्यांना कमी जास्त लेखण्यात घालवायचे की मनमुरादपणे त्याचा आनंद लुटायचा, आणि आपल्याला हवं तसं आपल्या स्वतःच्या अटीवर ते जगायचं, ही आपली चॉईस आहे.
आपली इतरांशी कोणी तुलना केलेली आपल्याला आवडत नाही. पण बऱ्याच वेळा आपणच आपली तुलना कोणाशीतरी नकळतपणे करत असतो. आणि त्याच तुलनेने मनात ईर्षा, हेवा, राग, चीड या भावना जन्माला येतात. आणि या भावनेने मनाची शांतता भंग होते. हेवा केल्याने, राग-राग केल्याने परिस्थितीत काहीच फरक पडत नाही पण आपली मानसिक शांती नक्कीच भंग पावते.
त्यामुळेच अशावेळी तुलना करत बसण्यापेक्षा हातात असलेलं काम प्रामाणिकपणे करणं आणि त्या प्रामाणिकपणात देखील आनंद शोधणं महत्वाचं आहे. कारणं जगात प्रत्येक माणूस प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम करतो असं नाही, आणि त्याचमुळे आपल्यात असणाऱ्या गुणांचं देखील आपल्याला कौतुक आणि समाधान वाटायला हवं.
आपली तुलना स्वतःशीच असावी. कारण आपण ज्या अनुभवांतून गेलेलो असतो त्यातून बाकी कोणी गेलेलं नसत. आणि त्याचप्रमाणे इतर माणसे ज्या अनुभवातून आलेली असतात त्यातून आपण गेलेलो नसतो. आणि त्याचमुळे आपले अनुभव जसे तसं आपलं आयुष्य वेगळं असत. आणि आपल्याला मिळणाऱ्या गोष्टी, प्रॉब्लेम्स हे ही वेगळंच असणार! त्यामुळे तुलना दोन सारख्या गोष्टींत केली जाते हे लक्षात ठेवावं. दोन वेगळ्या अनुभवांतून आलेल्या माणसांची तुलना होऊच शकत नाही.
तक्रार करणं, समाधानी नसणं याने आपण आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा देखील नीट उपभोग घेत नाही, की त्यांना नीट जगत नाही. कारण किती चांगल्या गोष्टी आयुष्यात आल्या तरी आपल्याकडे काय नाही, किंवा काय चुकीचं आपल्याला भोगावं लागतंय यावर आपला फोकस जास्त असतो. त्यामुळे आपल्याला जर खरच आनंदी ,सुखी ,समाधानी राहायचे असेल तर आपल्या जीवनात घडून गेलेल्या आनंदी प्रसंगांना आठवून
रोज एक गोष्ट अशी लिहायची ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत, ज्याबद्दल आपल्याला आनंद, सुख, समाधान वाटते. रोज नियमितपणे या गोष्टी आठवल्या. ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञ वाटावं अशामध्ये काहींसाठी त्यांचं घर येईल, तर काहींसाठी कुटुंब, पैसे, निरोगी शरीर, निरोगी मन, चांगला लाईफ पार्टनर, चांगली मुले इत्यादी असं काहीही येईल. आठवा आठवा.... बघा आठवतात ना त्या गोष्टी ज्या विसरून आपण भलत्याच गोष्टींचा विचार करायला लागतोय आणि आपल्याच जीवनातील सुख समाधान शांती स्वतः मुळेच घालवतोय. आवडणाऱ्या गोष्टींची लिस्ट न संपणारी आहे पण तरीसुद्धा किती सहजपणे आपण त्या विसरून जातो.
या गोष्टी लिहीत असताना त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटणं देखील महत्वाचं आहे. हे सर्व करून तर बघा आपली आयुष्याकडे बघण्याची दृष्टी थोडी का होईना बदलेल अशी मी अाशा करते. कारण वाईट विचार वारंवार केल्याने जस संपूर्ण आयुष्यच वाईट आहे, जग वाईट आहे असं वाटायला लागत.
त्याचप्रमाणे ज्या गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ आहोत, त्यांची आपल्याला किंमत आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला आनंद, समाधान मिळते याचा विचार केल्याने आयुष्यात सकारात्मकता वाढते, आयुष्याबद्दलचा इंटरेस्ट टिकून राहायला मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजचे तेच ते विचार करत बसण्यापेक्षा थोडा वेगळा दृष्टिकोन स्वीकारून थोडं वेगळ्या कलाटणीचं आणि आनंदाचं आयुष्य जगायला नक्कीच नवीन कल्पना आणि प्रेरणा मिळते.
आनंदी आयुष्य जगायला नेहमी अवघड काही करण्याची गरज असते असं नाही, कधी-कधी अशा छोट्या छोट्या कृतीतून सुद्धा एक वेगळाच आनंद आपल्या अनुभवास येतो. आणि या कृतीला तुम्हाला फार वेळ देखील द्यावा लागणार नाही, फक्त आठवणीने रोज एक आनंदी गोष्ट लिहायला काही सेकंड देखील पुरेसे आहेत.

चला तर मग ज्यांना आनंदी ,सुखी आणि समाधानी जीवन जगायचे आहेत ते आपल्या जीवनातील एक घडून गेलेली आनंदाची घटना लिहून काढतील आणि आपल्या जीवनात किती आनंद आहे हे स्वतः अनुभवतील .

🎭 Series Post

View all