आनंदाचे डोही आनंद तरंग

आनंदी रहायचं मनापासून ठरवलं असेल तर ?




"जरा रडूबाईच आहे ना गं ही पेशंट? काही प्रॉब्लेम नाही पण कुरकुर कुरकुर चालूच... तिला काही म्हणता येत नाही पण आपल्यालाही बोर होतं मग " स्पंदन हॉस्पिटलमधील सिनिअर डॉक्टर, स्त्री रोग तज्ञ, डॉ. विशाखा मॅडम ज्युनिअर डॉक्टरस बरोबर एकेक पेशंट बघत राउंड घेत होत्या.

एक काळी सावळी, पंधरा वर्षांची चुणचुणीत मुलगी पुढची पेशंट होती. " मॅडम, ही नवीन ऍडमिशन आहे. सोनोग्राफीत ovarian tumor आहे, सगळे findings बघता malignant (कॅन्सरचा) वाटतोय...." ती पुढे बोलत राहिली आणि विशाखा मॅडम स्तब्ध होत्या. त्यांना आतून भरून आलं, एवढीशी ही... Dysgerminoma? अरे बापरे, अवघड आहे. " काय नाव गं तुझं? " त्यांनी प्रेमाने विचारलं. " मी, गोजिरी! मी दहावीत आहे, खूप महिन्यांपासून कधी कधी पोट दुखतंय पण अशात पोट मोठं होत चाललंय म्हणून आई बाबांनी आणलं इकडे पण मॅडम, मी मस्त आहे. ह्या ताई (म्हणजे ज्युनिअर डॉक्टर ) कालपासून बोलताय ते थोडं कळतंय मला. कॅन्सरची गाठ ना? असू देत, मी ट्रीटमेंट घेईन. फक्त ते राजीव गांधी योजनेत बसतंय ना तेवढं बघा. घरची परिस्थिती ठीक नाही. पण मॅडम, मी एकदम ओके आहे बरं का..." तिचा समजुतदारपणा बघून विशाखा मॅडम आश्चर्यचकीत झाल्या. तिच्या आई बाबांना बोलावलं.

ते समोर आल्यावर तर मॅडम हादरल्याच.... दोघेही पोलिओग्रस्त ! घरची आर्थिक परिस्थती अगदीच हालाखीची पण गोजिरी मात्र आनंदी , सतत हसरी. इतर तपासण्या , ऑपरेशनसाठी फिटनेस , सरकारी कागदपत्रे असं सगळं होइपर्यंत तीन दिवस गेले पण तीन दिवसात पोरीने वॉर्डला आपलंसं केलं होतं. गाठीमुळे वाढलेलं एवढं मोठं पोट घेऊन ती आनंदाने आनंद लुटत फिरायची. दुसरा वॉर्ड शोधून देणं असो की कुणाला चहा नाश्ता देणं असो, अगदी सिस्टर्सलाही मदत करायला सतत पुढे.... कॅन्सरमुळे तोळामासा झालेला देह जणू अंगावरचं मांस हसू, आनंद वाटत कमी झालं होतं की काय अशी शंका येई इतकी ही खुश असायची.

कॅन्सर सर्जन, डॉ गोडबोलेंना घेऊन विशाखा मॅडमनी ऑपरेशन केलं. बेंबीच्या वरनं ते थेट खालपर्यंत पोट उघडून मोठ्ठ ऑपरेशन करून गाठ काढावी लागली. सुदैवाने रोग इतरत्र पसरला नव्हता, दुसऱ्या अंडाशयातही आजार नव्हता त्यामुळे गर्भाशय व ते अंडाशय वाचवता आलं. " मॅडम, काळजी घ्या हं हिची, फार मोठं ऑपरेशन केलंय आपण हिचं, खूप pain असेल postoperatively, वेदनाक्षम गोळ्यांचा डोस जास्त लागू शकतो. रडारडी करणार ही खूप....नंतर follow up च्या तपासण्या, औषधं लिहून देइन discharge च्या वेळी. तसं वेळ आहे कारण उठून फिरायलाच ही आठ दिवस घेणार..." म्हणत डॉ गोडबोले थिएटरच्या बाहेर पडले. आता मात्र विशाखा मॅडम काळजीत होत्या. घरी जाऊनही त्यांनी दोन चार वेळा फोन करून गोजिरीची विचारपूस केली, तेवढी गोडच होती हो ती....

दुसऱ्या दिवशी, विशाखा मॅडम राउंडला सगळ्यात आधी तिच्यापाशी गेल्या. " गुड मॉर्निंग मॅडम. कशा आहात तुम्ही? मी एकदम छान आहे, थोडं दुखतंय पण ते दुखणारच ना…..." गोजिरीनेच मॅडमचं स्वागत केलं. मॅडम अचंबित झाल्या, खरंच दुखत नसेल हिला की सहन करत असेल? तिसऱ्या दिवशी तर गोजिरी उठून फिरत होती, हसऱ्या चेहऱ्याने. " गुड मॉर्निंग, कसे आहात? मी मस्त, माझा राउंड नाही घेतला तरी चालेल , मी एकदम छान आहे. तुम्हा सगळ्यांना खूप काम करतांना बघते मी, तेवढाच एक पेशंटचा राउंड कमी....किंवा तुम्ही आलात की मी एक जोक सांगून तुम्हाला हसवेल...." आणि खरंच, ती जोक सांगायची, हसवायची. तिचा राउंड घेऊन जणू सगळी टीम फ्रेश व्हायची. कधी इंजेक्शन, औषध घ्यायला तक्रार नाही की कधी दवाखान्यातील व्यवस्थापनाबद्दल कुरकुर नाही . \"मी पूर्ण बरी होणारच\" ही तर तिची जणू tagline !

दोन दिवस आईला बरं नाही म्हणून विशाखा मॅडम सुट्टीवर होत्या. तिसऱ्या दिवशी त्या दिसताच, ही स्वतः हुन त्यांच्या केबिनमध्ये हजर! " मॅडम, बरी आहे का तुमची आई आता? नका काळजी करू, त्या बऱ्या होतील " असं म्हणत तिनेच विशाखा मॅडमला धीर दिला. मॅडमला वाटलं, कुठून आली हिच्यात एवढी प्रगल्भता? घरी अठरा विश्व दारिद्र्य... आई बाप धड नाहीत, स्वतः कॅन्सरसारख्या भीषण आजाराने ग्रस्त, उद्याच्या पोटाची सोय नाही तिथे भविष्य आणि स्वप्न ह्यांचा संबंधही नाही, नेमकं काय असेल हिच्या मनात ? आनंदी रहाण्यासाठी एकही पॉझिटिव्ह बाब नाही उलट हिचं आयुष्य म्हणजे complaint box आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींची तक्रार करत राहतो आणि ही.....??

न राहवून त्यांनी विचारलं, " बाळा, गोजिरी, तू एवढं मोठं दुखणं, ऑपरेशन होऊनही इतकी खुश कशी राहतेस गं? " गोजिरी तिच्या स्टाईलमध्ये हसली ," मॅडम, मी आज, आतामध्ये जगते. सतत मनाला सांगत असते खूषच रहायचं मग माझ्या शारीरिक, आर्थिक, सामाजिक समस्यांवर मला माझ्या मनाच्या शक्तीने मात करता येते.... अरे, पाटील आजींनी बोलावलं होतं मला. मी गप्पा मारत बसले इथे. चला, मी जाते...."

केवढं मोठं तत्वज्ञान सांगून गेली ही पोर.... आज, आतामध्ये जगायचं ठरवलं तर ही उगाच ओढवून घेतलेली वणवण आपोआप कमी होईल. मनाने ठरवलं असेल आनंदी रहायचं तर बाकी सगळे प्रॉब्लेम्स आपोआप नांगी टाकत क्षुल्लक होतील. आपलं मन हे जर आनंदाचा एक डोह झालं तर त्यात समस्यांचे कितीही दगड पडले तरी उठणारे तरंग मात्र आनंदाचेच असतील, अगदी सहज ही नकळत्या वयातली पोर मला जीवनाचं सार सांगून गेली.

विशाखा मॅडमनी आज वेळ काढून \"आनंदाचे डोही, आनंद तरंग , आनंदची अंग आनंदाचे\" हा अभंग ऐकायचा ठरवलं पण मनात मात्र त्या गुणगुणत होत्या,
\"माझ्या मी टेचात नावाची गोजिरी...
गातीया गानं, झुलतया रान, माझ्या तालावरी....\"

डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर