आनंद की दुःख ?

About Life


आनंद की दुःख ?

"निशा, आज संध्याकाळी कामावरून आली की,तुला क्लासच्या फीचे पैसे देते. आज कामाचे पैसे मिळणार आहेत मला."
निशाची आई सुरेखा निशाला म्हणाली.

सुरेखा दोन भावांची मोठी बहिण. शिक्षण दहावीपर्यंत झालेले. लग्न करून सुखी संसाराचे सुख तिच्या आयुष्यात नव्हते. लग्न झाल्यापासूनच तिला सासरचा त्रास होता. नवराही तिला साथ देणारा नव्हता आणि बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या सुरेखाला घ्यायला व जन्माला आलेल्या तिच्या मुलीला पाहण्यासही सासरचे कोणी आले नाही. तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न करून संसार थाटला होता आणि इकडे सुरेखा आपल्या नशिबाचे रडणे रडत होती. तिचे दुसरे लग्न करण्याचे आईवडिलांचे प्रयत्न सुरू होते पण कोणत्या ना कोणत्या कारणाने लग्न जमत नव्हते.
अशीच वर्षामागून वर्षे जात होती. सुरेखाची निशा बापाच्या प्रेमाविना वाढत होती.सुरेखाच्या माहेरची आर्थिक परिस्थिती साधारणच होती. आईवडील शेताची कामे करायची,दोघं भाऊ थोडंफार शिक्षण घेऊन छोटीमोठी नोकरी करत होते. सुरेखा आपल्या निशाला वाढविण्यासाठी ,तिला सुख देण्यासाठी शेताच्या कामांना जात होती.
सुरेखा ज्या बायकांबरोबर शेतात कामाला जात होती,त्या प्रत्येकीची आपली एक व्यथा होती.

सरलाचा नवरा हार्ट अटॅक ने वारला होता. तिच्या दुःखात अजून भर पडली , जेव्हा तिचा जावई अपघातात गेला आणि मुलगी आपल्या दोन मुलांसह माहेरी राहण्यास आली होती.
सरलाच्या दुसऱ्या मुलीचेही लग्न झालेले होते आणि गावातच तिचे सासर होते. आणि लहान मुलगा अजून शिक्षण घेत होता.
त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी ओळखून सरला व तिची मुलगी शितल या दोघी शेतकामाला जात होत्या.

सुमनचा नवरा व्यसनी होता ,घरात खाण्याचे हाल होत होते. त्यामुळे आपल्या मुलांसाठी सुमन शेतात कामाला जात होती.

लीलाचा नवरा चांगला होता,मुले व संसार सर्व व्यवस्थित होते. पण नवऱ्याच्या कमाईत घरखर्च भागत नव्हता. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ती पण इतर बायकांप्रमाणे शेतात कामाला जात होती.


सुरेखा,सरला,शितल,सुमन , लीला या पाच जणी आणि गावातील अजून इतर दहा जणी या सर्वांचा एक गट होता. त्या सर्व रोज बरोबर कामाला जायच्या आणि बरोबरच घरी परतायच्या. काम करता करता एकमेकांचे सुखदुःख वाटून घ्यायच्या. अडीअडचणीला एकमेकांना मदत करायच्या. सर्वांमध्ये छान मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. काम करताना आपल्या मैत्रीचाही आनंद घेत जीवन जगत होत्या..

नेहमीप्रमाणे आजही सकाळची घरची कामे पटकन आवरून दुपारचे जेवण बरोबर घेऊन सर्व जणी शेतावर जायला निघाल्या.
पंधरा पैकी चार जणी काहीतरी कारणाने येणार नव्हत्या. त्यामुळे आज अकराच जणी गेल्या होत्या.
हसत,गप्पा मारत शेतात पोहोचल्या आणि काम करू लागल्या.उन्हात काम करता करता पाण्याची तहान लागली म्हणून शेतातील विहिरीजवळ आल्या.
अकरा पैकी आठ जणी पाणी पिण्यासाठी आल्या. उरलेल्या तीन जणी म्हणाल्या,
"हातातले काम संपवतो आणि येतोचं,तोपर्यंत तुम्ही सुरूवात करा."

या आठ जणींना पाण्याची खूप तहान लागलेली होती. उन्हाने आणि तहानेने जीव कासावीस झालेला होता. पाणी पिऊन थोडा वेळ सावलीत बसू असे त्यांनी ठरवले . पाण्यासाठी त्यांनी विहिरीजवळची बादली घेतली व त्यात पाणी घेऊन विहिरीचे पाणी पिऊ लागल्या.

"सरला, आज पाण्याची चव बदलली आहे गं,वेगळीचं चव लागत आहे. "
सुरेखा सरलाला म्हणाली.
प्रत्येकीला पाण्याच्या चवीत फरक जाणवला पण पाण्याशिवाय जीव इतका तहानलेला होता की, त्यांनी भराभर पाणी पिऊन अतृप्त जीवाला तृप्त केले.
आठ जणीं पैकी एकीच्या वाटेला पाणी येईपर्यंत बादलीतील पाणी संपले होते आणि ती त्यात पाणी आणण्यासाठी जाणार तोचं त्या साती जणी जमिनीवर कोसळल्या.
त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला , हे सर्व पाहून ती ओरडू लागली व काम करत असलेल्या त्या तिघी पण धावत आल्या. मदतीसाठी त्या आवाज देऊ लागल्या. शेताचा मालक कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असल्याने आज तो शेतात नव्हता.
आजूबाजूच्या शेतात काम करणारे लोक जमा झाले. ते मदतीसाठी फोन करू लागले व शेताजवळील रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना थांबवू लागले.
अकरापैकी सात जणींनी पाणी पिलेले होते व त्यांची प्रकृती गंभीर होती.उरलेल्या चार जणींसाठी हा खूप मोठा धक्का होता.
आपणही पाणी प्यालो असतो तर आपलीही हिचं स्थिती झाली असती. आपण यातून वाचलो यासाठी मनोमन देवाचे त्याआभार मानत होत्या.

आपलाही काळ आला होता पण वेळ नव्हती आली. असे पटकन त्यांच्या मनात येऊन गेले.
असे वाटत असले तरी,त्यांना आपल्या मैत्रीणींच्या जीवाची काळजी लागलेली होती.

"देवा, आमच्या मैत्रीणींना सुखरुप ठेव ."
अशी त्या देवाला प्रार्थना करत होत्या.

सात जणींना हॉस्पिटलमध्ये आणले गेले. त्यांची स्थिती पाहून,निदान करत डॉक्टरांनी सांगितले की,
" कीडनाशक औषधामुळे त्यांची ही स्थिती झाली आहे.
उपचार सुरू केले आहेत पण आताच काही सांगू शकत नाही. आमचे प्रयत्न आम्ही करत आहोत ..शेवटी सर्व देवावरचं.."

पोलिसांना बोलावले गेले, तपास सुरू झाला. तपासात कळाले की, ज्या बादलीतून त्या पाणी प्यायल्या होत्या, त्या बादलीतून सकाळी शेतात काम करणाऱ्या गड्याने पिकांवर कीडनाशके फवारताना पाणी घेतले होते. त्या गड्याचा वेंधळेपणा, आळस ,निष्काळजीपणा की मूर्खपणा ..म्हणा पण त्याची शिक्षा त्या सात जणी भोगत होत्या. त्यांचा जीव धोक्यात होता.

सात जणींची तब्येत चिंताजनक होती. कोण राहील व कोण जाईल हे डॉक्टरही सांगू शकत नव्हते. सर्वांना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते.

सात जणींचे कुटुंब, त्यांच्या मैत्रीणी, शेताचा मालक व पूर्ण गाव त्यांचा जीव वाचावा यासाठी देवाला प्रार्थना करत होते.

गावातील लोकांनी त्यांच्या उपचारासाठी पैसेही जमा केले होते. जेणेकरून चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार होऊन त्यांचा जीव वाचावा.

पण लीलाच्या जाण्याने तिच्या कुटुंबासह पूर्ण गाव दुःखी झाला होता.
बाकीच्या सहा जणींना तर लीला गेली हे माहितही नव्हते... त्याच जिंवत राहण्यासाठी संघर्ष करत होत्या.

लीलाचे दुःख असतानाच सुरेखाही गेल्याचे कळाले.
सुरेखाची बापाविना वाढलेली निशा आज आई गेल्यामुळे पोरकी झाली होती.
सुरेखाचा दोन दिवसांनी वाढदिवस होता म्हणून निशाने थोडे थोडे पैसे जमा करून आईसाठी छान साडी घेतलेली होती. आणि ती आईच्या वाढदिवशी तिला देणार होती.
आई चांगली होऊन घरी आल्यावर तिचा वाढदिवस साजरा करणार होती. पण देवाने आपली आई आपल्याजवळून हिरावून घेतली. याचे वाईट वाटून ती एकसारखी रडत होती.

सातपैकी दोन जणी गेल्या होत्या. बाकी पाच जणींवर उपचार सुरू होते. थोडी थोडी सुधारणा ही होत होती. गावातील लोक व त्यांचे कुटुंब त्या चांगल्या होऊन घरी याव्यात यासाठी देवाला प्रार्थना करत होते, विनवणी करत होते.

लवकरच त्या घरी येतील अशा अपेक्षेत असलेल्या सर्वांना जेव्हा सरला गेली व दोन तासानंतर लगेच तिची मुलगी शितलही गेली हे कळाले तेव्हा.. सर्वांना खूपचं वाईट वाटले. गावातील प्रत्येक व्यक्तीचे डोळे आणि मन दोघेही रडत होते. शितलच्या दोन्ही मुलांकडे पाहून खूप वाईट वाटत होते. त्यांची मावशीच आता त्यांची आई झाली होती. तिला तर आई व बहिण गेल्याचे दुःख होतेच पण बहिणीच्या मुलांनाही सांभाळायचे होते.

गावात यापूर्वी अशी घटना कधी झालेली नव्हती. पूर्ण गाव या घटनेने हादरून गेला होता. आपल्या गावाच्या सुना
व मुली अशा सोडून गेल्या याचे वाईट वाटत होते.


डॉक्टरांच्या प्रयत्नांना काहीतरी यश मिळाले आणि त्या तिघींचे नशीब बलवत्तर म्हणून मरणाच्या दारात जावून त्या तिघी बऱ्या झाल्या होत्या. आणि चांगल्या होऊन सुखरूप घरी आल्या होत्या.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला व गावालाही आनंद झाला होता.
सरला, शितल,सुरेखा व लीलाच्या कुटुंबाला आपली व्यक्ती गेल्याचे दुःख होतेच पण त्या तिघी चांगल्या होऊन घरी आल्या हे पाहून बरे वाटले.

जेव्हा त्या तिघींना घरी आल्यानंतर सर्व कळाले तेव्हा आपल्या मैत्रीणींचे जाणे त्यांच्या मनाला चटका लावून गेले.
आपणही मृत्यूला हरवून परत आलो आहोत,
आपलाही काळ आलेला होता पण वेळ आलेली नव्हती म्हणून की काय आपण यातून वाचलो.
असे त्यांना वाटले.

पंधरा जणींपैकी ज्या चार त्या दिवशी कामावर गेल्या नाही , त्यांना वाटले , "जर आपण आज शेतात गेलो असतो तर...आपले काय झाले असते.."

अकरापैकी तीन काम करत होत्या त्यामुळे पाणी पिण्यासाठी लवकर गेल्या नाही, त्यांच्या मनात विचार आला,
\"आपल्याला देवाने बुद्धी दिली की काय आणि आपण पाणी प्यायला लवकर गेलो नाही, जर गेलो असतो तर...\"

आणि आठपैकी जी एक होती, जिच्या पर्यंत पाणी आलेचं नव्हते.. ती तर आपले नशीब चांगले की काय म्हणून आपण या संकटातून वाचलो. असे विचार करू लागली होती.
मैत्रीणींच्या जाण्याचे दुःख सर्वांना होते पण आपण यातून बचावलो, वाचलो याचा आनंद ही त्यांना होता आणि त्यासाठी देवाचे त्या खूप खूप आभार मानत होत्या.
काहींना वाटत होते, आपला काळही आलेला नव्हता व वेळ ही आलेली नव्हती.
तर काहींना वाटले आपला काळ आलेला होता पण वेळ आलेली नव्हती.
पण ज्या चारी जणी गेल्या त्यांचा काळही वाईट होता आणि वेळही वाईट होती. म्हणून तर त्या सर्वांना कायमचे सोडून गेल्या होत्या.आणि ज्या या संकटातून वाचल्या होत्या ,त्यांना आपण सुखरूप असल्याचा आनंद घ्यावा की मैत्रीणी गेल्याचे दुःख व्हावे  हेचं समजत नव्हते. 


प्रत्येक कथेचा शेवट चांगलाच असावा ,असे लेखकाला वाटत असते आणि वाचकालाही आवडत असते.
पण काही कथांचा शेवट हा लेखकाच्या हातात नसतो, त्या कथांचा शेवट नियती ठरवत असते.
अशाच कथांपैकी ही एक कथा .
आणि लिहीताना वाईट वाटते आहे की, ही एक सत्य घटना आहे.समाप्त

नलिनी बहाळकर