आयुष्याचा आनंद

About Life


लग्न ठरले तेव्हापासून प्रिया खूप आनंदी होती. देखणा,हुशार व एक चांगला बिझनेसमन असा अर्णव तिला जोडीदार म्हणून मिळाला होता. तिच्या आईवडिलांना ही तो जावई म्हणून आवडला होता. आपली मुलगी सासरी खूप सुखात राहणार. या विचाराने तेही खूप आनंदी होते आणि लग्नाची तयारी करत होते. लग्नाची तारीख जवळचीच निघाल्याने , लग्नाच्या तयारीला खूप कमी वेळ मिळालाच होता. पण प्रिया आणि आर्णव यांनाही एकमेकांना समजून घेण्यास खूप कमी वेळ मिळाला होता. प्रत्यक्ष भेटणे तर होतच नव्हते आणि फोनवर ही कामापुरतेचं बोलणे होत होते.

"आता काय ? थोड्याचं दिवसात तर लग्न आहे,तेव्हा भरपूर बोला,एकमेकांना वेळ द्या." असे सल्ले प्रियाला मिळत होते.

प्रियाने आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते आणि नोकरीसाठी प्रयत्न करत होती. पण आर्णवचे घरबसल्या स्थळ आले आणि आईबाबांचा आनंदी चेहरा पाहून प्रियाही लग्नाला तयार झाली. तिचे आपल्या आईबाबांवर खूप प्रेम होते. तिच्या यशस्वी आयुष्यात आईबाबांचा खूप मोठा वाटा होता. आताही त्यांनी प्रियाला आर्णव आवडला की नाही ?हे विचारले होते. प्रियाला त्याच्यात नाव ठेवावे. असे काही वाटले नाही त्यामुळे तिनेही आईबाबांच्या पसंतीला आपली पसंती दिली.


आईबाबांची लाडकी लेक लग्न करून सासरी आली. लग्नानंतरचे सर्व विधी,कार्यक्रम छान झाल्यानंतर नवदापत्य हनिमूनसाठी फिरायला गेले. लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेण्यास एवढा वेळ मिळाला नाही त्यामुळे आता आपण एकमेकांना चांगले समजू शकू असे प्रियाला वाटू लागले.
एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार ,स्वप्ने एकमेकांना कळायला हवे.
प्रेम व विश्वास या दोन गोष्टींवर कोणतेही नाते टिकत असतेआणि नवरा बायकोच्या नात्यात तर एकमेकांवर विश्वास आणि प्रेम या गोष्टी तर हव्याचं. या विचारांची प्रिया होती.
आपल्या आईबाबांचे एकमेकांवर असलेले निःस्वार्थ प्रेम तिने पाहिले होते. घरात खूप पैसा नव्हता पण प्रेमाची श्रीमंती खूप होती. कमी पगारामुळे आपण बायकोला चांगली साडी घेऊ शकत नाही. याचे बाबांना वाईट वाटायचे. पण नवऱ्याने आपल्या आवडीचा आणलेला मोगऱ्याचा गजरा पाहून आईला खूप आनंद व्हायचा. एकमेकांवर खरे प्रेम असेल तर पैसा वगैरे या गोष्टींना जास्त महत्त्व नसते. आणि जिथे बाकी गोष्टींना महत्त्व दिले जाते ..तिथे खरे प्रेम नसतेचं!

प्रियाही आपल्या आईबाबांच्या सुखी संसारासारखीच आपल्या संसाराची स्वप्ने पाहत होती. प्रियाला आर्णवच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नव्हता ,जसा तिने अपेक्षित केला होता. प्रिया जितकी मनमोकळेपणाने बोलत होती ,वागत होती तसा आर्णव वागत नव्हता. तो फोनवरच जास्त बोलत होता ,त्याचे लक्ष त्याच्या ऑफिसच्या कामात होते. लग्न व आता फिरायला आल्याने त्याला ऑफिसातून सुट्टी घ्यावी लागली होती त्यामुळे तो फोनवरूनच सर्व कामांची व्यवस्था पाहत होता.
प्रियाला त्याच्या वागण्याबोलण्यातून पैसा,बिझनेस, करियर,या सर्व गोष्टींच ऐकायला मिळत होत्या. प्रिया जितकी रोमँटिक होती तितकाच आर्णव तिला व्यावहारिक व प्रॅक्टिकल वाटत होता..
"आर्णव, आपल्या नात्याला मजबूत बनविण्यासाठी आपल्याला एकमेकांना वेळ द्यायला हवा. आपल्या नात्यात प्रेम व विश्वास असायला हवा. आपण एकमेकांना समजून घ्यायला हवे. "
प्रियाने असे बोलून आर्णवच्या मनातील प्रेम जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

"अगं , प्रेम करायला तर आयुष्य पडले आहे.. मला माझा बिझनेस खूप मोठ्या उंचीवर न्यायचा आहे. बिझनेस उभा करण्यासाठी मला खूप त्रास झाला आहे. मी लहानपणापासून एक चांगला बिझनेसमन बनण्याचे स्वप्न पाहत होतो. ते स्वप्न मी खरे करण्याचा प्रयत्न करत आहे. तू माझी पत्नी म्हणून मला साथ देशील ना ?"


आर्णवचे हे उत्तर ऐकून प्रियाला कळले की, आर्णवचे पहिले प्रेम त्याचा बिझनेस आणि नंतर आपण.

\"प्रेम करायला आयुष्य पडले आहे.\" आर्णवच्या या बोलण्यावर प्रिया विचार करू लागली.

\"प्रेम ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे आयुष्याला अर्थ आहे. जन्मल्यापासून जी नाती मिळतात ,त्यांचे जे प्रेम मिळते त्यामुळेच तर आपण जगायला शिकतो. नात्यांचे प्रेम ,मित्रमैत्रिणींचे प्रेम, प्राणीमात्रांचे प्रेम. मनुष्य प्राणीच नाही तर प्राणी,पशुपक्षी,झाडेझुडपे या सर्वांना प्रेम कळत असते. प्रत्येकात प्रेमाची भावना असते. प्रेम करणे म्हणजे फक्त सतत सहवास असणे , एकमेकांना गिफ्ट देणे हे सर्व का? तर नाही. प्रेम म्हणजे एकमेकांची काळजी घेणे ,सुखदुःखात मदत करणे. जगण्याचे बळ देणे, जीवनात आनंद निर्माण करणे. प्रेमासाठी वय,वेळ ,भाषा,रंग,रूप,पैसा इ. अशा गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाही . प्रेम हे ह्रदयात असावे लागते. मनातले भाव न बोलताही ओळखता यायला हवे.
आपले शिक्षण, नोकरी, उद्योग सोडून प्रेम करावे. असे कोणीही सांगत नाही. आयुष्यात शिक्षण, नोकरी,व्यवसाय हे ही महत्त्वाचे असतेचं . पण जीवनात प्रत्येक गोष्टीला किती व कोठे महत्त्व द्यायचे हे ही प्रत्येकाने ठरवायचे असते.
आपण आयुष्यात खूप पैसा,प्रसिद्धी मिळवली पण आपल्यावर प्रेम करणारी आपली प्रेमाची माणसे जवळ नसतील तर .. काय उपयोग? आयुष्यात प्रेम असेल तर सर्वकाही आहे. प्रेम आहे म्हणून आयुष्य आहे. त्यामुळे अगोदर खूप पैसे कमवू आणि नंतर आयुष्यात प्रेम करू.. हा विचार चुकीचा आहे.
पण तरूण-तरूणी यांनी तरूणपणातील आकर्षण, प्रेम यात वेडे होऊन आपले करीयर, आयुष्य वाया घालवू नये.
प्रेम कधीही चुकीचे नसते, आपला मार्ग चुकत असतो आणि आपण प्रेमाला दोष देत असतो.

बालपण,तरुणपण व म्हातारपण , आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला प्रेमाची गरज असते. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक जण कशावर तरी प्रेम करत असतो आणि प्रेम मिळवत असतो. देवाचे आपल्यावर प्रेम असते म्हणून तर आपल्याला एवढे सुंदर आयुष्य मिळालेले असते.
प्रत्येकाने आपले शिक्षण,नोकरी, व्यवसाय यासर्व गोष्टी करत असताना आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तिंवर,नातेवाईकांवर ,
मित्रमंडळीवर प्रेम करावेचं पण आपल्या स्वतः वरही प्रेम करावे. आणि प्रेमाचा आनंद घेण्यासाठी थोडातरी वेळ द्यावा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा समतोल साधता आला पाहिजे. एका गोष्टीच्या मागे धावत असताना,बाकी गोष्टी आपल्या आयुष्यातून निसटत असतात. त्यामुळे वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा सर्व गोष्टी वेळेत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर \"दात हैं पर चने नहीं और चने हैं तो दात नहीं।\" असे व्हायला नको. \"

प्रत्येक समस्येवर काही तरी
उपाय असतोचं. आर्णवच्या विचारांत आपण थोडातरी बदल घडवून आणू शकू.

आपल्या बिझनेसवर प्रेम करणाऱ्या आर्णवला मी माझ्या प्रेमाने इतके बदलून टाकेल की, तो माझ्यावर ,आपल्या कुटुंबातील व्यक्तिंवर आणि स्वतः वरही प्रेम करायला लागेल.\"

असा मनाशी निश्चय करून प्रिया आनंदाने घरी परतली.


आणि एका वर्षाच्या आतच तिने ठरविले होते तसे करून दाखवले. शेवटी काय ...प्रियाच्या प्रेमाची जादू आर्णववर झालीचं..


समाप्त


नलिनी बहाळकर