Login

मैत्रीचा आनंद

About Friendship


कथेचे नाव --- मैत्रीचा आनंद
विषय -- नाते मैत्रीचे
कॅटेगरी --- गोष्ट छोटी डोंगराएवढी


\"मैत्री\" म्हटले... म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय ...हो, ना !
नक्कीच ..मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सोनेरी, टवटवीत पान...कधीही न कोमेजणारं !

कोणालाही मैत्रीविषयी बोलायला सांगितले तर, प्रत्येकाची मैत्रीविषयी एक वेगळी भावना असते,प्रत्येकाची एक वेगळी व्याख्या असते. प्रत्येकजण आपल्या नजरेतुन मैत्रीकडे पाहत असतो. प्रत्येक जण आपली मैत्री ही कधी शब्दांतून तर कधी आपल्या वागण्यातून व्यक्त करीत असतो.

जगात कोणी असे असेल का ? ज्यांनी कधी कोणाशी मैत्री केली नसेल?

मला वाटते असे कोणीही नसेल आणि जरी कोणी असे असेल तर त्यांचे आयुष्य कसे असेल ना ?
उदासीन, कंटाळवाणे ....

खरचं विचार करण्यासारखेच आहे ना ?

कारण जीवन जगत असताना, अनेक प्रसंग असे येतात की तेव्हा आपल्याला भक्कम आधाराची गरज भासते.आणि
तो आधार म्हणजेच \"मैत्री\" !

मैत्री म्हणजे असं ठिकाण,असं नातं जिथे आपण आपल्या सुखदुःखाच्या भावना व्यक्त करतो. मनमोकळे बोलतो. आपल्याला कोणीतरी समजून घेत आहे. असे वाटायला लागते.प्रेम आणि विश्वासाचे स्थान असते मैत्री !

मैत्रीवर कितीही बोलत राहिले तरी कमीच आहे....


अशाच \"मैत्री\" या सर्वांच्या आवडत्या विषयावरील कथा -------


"हॅपी बर्थडे ....डिअर आशिष." असे छानसे विश करत आशिषचे आईबाबा त्याला सकाळी झोपेतून उठवत जागे करत होते.

सुरूवातीला थोडी नाटकं केली पण नंतर बर्थडे बॉय उठला आणि आईबाबांना थँक्यू म्हणून आनंदाने उड्या मारत रूमच्या बाहेर गेला.

आशिष हा प्रतापरावांचा आणि मालतीबाईंचा एकुलता एक मुलगा आणि तो ही लग्नानंतर खूप वर्षांनी झालेला. त्यामुळे तो आईवडिलांच्या गळ्यातला ताईतच!

प्रतापराव खूप मोठे बिझिनेसमन होते. आणि त्यांनी उभारलेल्या त्यांच्या ऐश्वर्याचा आशिष हा वारस होता. त्याला ते जीवापाड जपायचे. त्याचे सर्व लाड पुरवायचे.

संध्याकाळी त्याच्या बर्थडेची पार्टी एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवली होती. नातेवाईक, मित्रमंडळी व ओळखीतील व्यक्ती असे सर्व आले होते. बच्चेकंपनी तर मस्त एन्जॉय करीत होती. सर्व जण आनंदी होते व पार्टीचा आनंद घेत होते.पण आशिषची नजर कोणाला तरी शोधत होती. तो मनापासून आनंदी नव्हता. आईबाबांकडेही त्या व्यक्तीची चौकशी केली. काही कारणाने ती व्यक्ती आली नाही असे सांगून त्याला त्यांनी पार्टीत आनंदी राहण्यास सांगितले.
आशिषला त्या व्यक्तिचा खूप राग आला होता आणि \" मी कधीही त्याच्याशी बोलणार नाही.\" असे मनात ठरवून टाकलेही होते.

दुसऱ्या दिवशी "हॅप्पी बर्थडे टू यू डियर आशू "
असे आपल्या गोड शब्दांत बोलत आशिषच्या हातात जयेशने एक छानसं गिफ्ट दिलं.

आपल्याला राग आला आहे असे दाखवत आशिष जयेशशी वागत होता. पण त्याच्या गोड गोड बोलण्याने आशिषचा राग पळालाही.

\"आपण साधी माणसं,आपले राहणीमान साधे सरळ...
मोठ्या लोकांच्या पार्टीत ,त्यांनी बोलवले तरी जाऊ नये. उगाच कोणी आपल्या गरिबीचा अपमान केला तर...\"

या विचाराने जयेशचे आईबाबा जयेशला घेऊन पार्टीला गेले नाही.
जयेशने पार्टीला जाण्याचा हट्ट केला पण त्याला न रागवता काहीही चुकीचे न सांगता त्याचे आवडीचे आईसक्रीम घेऊन दिले ,बाहेर फिरवून आणले. तो खूष झाला.


जयेशही आशिषच्याच वयाचा. जयेशचे वडील प्रतापरावांचे ड्राइवर होते आणि आई घरकामाला होती. जयेशला सांभाळायला कोणी नसल्याने त्याला सोबत घेऊन यायची.

आशिषही एकटाच . वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर . आईही महिला मंडळ ,सोशल वर्क यामध्ये बिझी असायची. दिवसभर आशिषला सांभाळायची जबाबदारी जयेशच्या आईची. आशिष व जयेशला एकमेकांची सोबत व्हायची. खाणेपिणे, खेळणे सर्व बरोबरच . दोघांचे चांगले जमायला लागले होते.
लहाणपण किती निरागस,निष्पाप असतं,काहीच कळत नसतं. जे आवडतं , जसं मिळतं त्यात ते आनंदी असतं!

आशिषलाही आपल्या श्रीमंतीची कल्पना नव्हती ना जयेशला आपल्या गरिबीची जाणीव होती. फक्त आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि आपण आनंदी आहोत .एवढचं त्यांच विश्व होतं.

मुली मोठी होऊ लागली. आशिषच्या भविष्याचा विचार करून त्याच्या वडिलांनी त्याला शहरातील नामांकित शाळेत टाकले.


जयेशला त्याच्या आईवडीलांनी घराजवळील छोट्या शाळेत टाकले.

जयेश आता त्याच्या आईबरोबर फार कमी वेळ आशिषच्या घरी राहू लागला. दोघांच्या शाळेच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने दोघांचे भेटणे होतच नसे.

पण दोघांनाही एकमेकांची आठवण यायची. त्यांना एकमेकांशिवाय करमत नव्हते. भेटण्यासाठी आतुर असायचे. सुट्टीच्या दिवशी च भेटणे व्हायचे.

आशिषने आपल्या वडिलांना जयेशचे ऍडमिशन त्याच्या शाळेत करायचे सांगितले. जेणेकरून जयेश आपल्या सोबत बराच वेळ राहिल .

पण आशिषच्या वडिलांना त्याचे म्हणणे आवडले नाही.
\" नोकरमाणसांच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे कसे वागवायचे ...? \" हा विचार आणि श्रीमंतीचा अभिमान, गरिबाकडे पाहण्याची दृष्टी यामुळे त्यांनी आशिषला दुसरी वेगवेगळी कारणे सांगून नकार दिला.

पण आशिषनेही आपला हट्ट सोडला नाही.

आपला लाडका लेक दुःखी राहू नये म्हणून आशिषच्या वडिलांनी पुत्रप्रेमाखातर जयेशचे ऍडमिशन आशिषच्या शाळेत आणि तेही एकाच वर्गात केले.

आशिष खूप खूश झाला. आशिषची सोबत आणि छान, मोठी शाळा यामुळे जयेशलाही अतिशय आनंद झाला.

आशिषचे वडील आशिषबरोबर जयेशचाही शाळेचा खर्च करणार होते. कारण एवढी महागडी शाळा जयेशच्या आईवडिलांना परवडणारी नव्हती.

पण जयेशचे आईवडील गरीब असले तरी स्वाभिमानी होते. त्यांना माहिती होते की, हे श्रीमंत लोक गरीबांना कमी लेखतात, कायम गरीबीचा अपमान करत असतात. आणि आता जरी मदत म्हणून करत असले तरी भविष्यात कधी ना कधी बोलून दाखवणार.

आपला जयेश चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहे ,त्यामुळे त्याला पुढे चांगली नोकरी मिळाली की आपलीही गरीबी संपेल. या विचाराने त्यांनी गावाकडची जमीन, घर विकून जयेशच्या शिक्षणाची सोय केली. वेळ पडली तर अजून मेहनत करू पण कोणाचे आपल्यावर उपकार नको. असे त्यांच्या स्वाभिमानी मनाला वाटले.

आशिष व जयेशची बालपणापासून सुरू झालेली निखळ, निरागस,निष्पाप मैत्री शालेय जीवनाचा, आपल्या बहरत जाणाऱ्या मैत्रीचा आनंद घेत होते.


शालेय मैत्रीने कॉलेजच्या मैत्रीत प्रवेश केला. मैत्री अजून जास्त घट्ट होत गेली. आशिष व जयेश दोघांनाही तारूण्याची लाली आली होती.आशिष दिसायला गोरापान, देखणे रूप तर जयेशही छान दिसत होता. आशिषपेक्षा थोडासा सावळा असला तरी बोलके डोळे, लांब नाक. खूप हँडसम दिसत होता. कॉलेजला गेल्यामुळे स्टायलिश राहणीमान ...त्यामुळे दोघांचे व्यक्तिमत्त्व रूबाबदार आणि आकर्षक झाले होते.

अनेक नवीन मित्रमैत्रिणी भेटले.आशिष, जयेश,स्वप्निल, रिता,प्रिया या सर्वांचा छान ग्रुप तयार झाला. अभ्यासाबरोबरच खाणेपिणे, हिंडणे,सिनेमा,नाटक पार्टी इ. सर्व सुरू होते. तारुण्यातील मैत्रीचा अनुभव घेत होते. मैत्री फुलत होती. नाते जुळतं होते.


असेच आनंदाचे दिवस आणि मग वर्षेही संपली.

कॉलेजचे शेवटचे वर्ष येऊन ठेपले.
कॉलेजनंतर सर्वांचे मार्ग वेगवेगळे होणार होते.प्रत्येकाचा वेगळा प्रवास सुरू होणार होता.
त्यामुळे येत्या व्हॅलेन्टाईन डे ला जयेशला आपण आपल्या मनातले सांगावे असे रिताने ठरविले.

जयेश दिसायला छानच होता पण त्यापेक्षा त्याचा बोलका , विनोदी व मदत करण्याचा स्वभाव तिला खूप आवडला होता. मैत्रीच्या नात्याचे प्रेमात कधी रूपांतर झाले हे तिलाही कळाले नाही.

जयेशलाही रिता आवडायची आणि तिलाही आपल्याबद्दल काहीतरी खास वाटते , असे जाणवायचे. पण त्याने मनातले कधी ओठांवर आणले नाही.

या व्हॅलेन्टाईन डे ला मनातल्या भावना रिताला सांगाव्या का? या विचारात असतानाच आशिषचा फोन येतो , \"काही महत्त्वाचे काम आहे \" असे ,सांगून घरी बोलवतो.

आशिषच्या बोलवण्यावर जयेश त्याच्या घरी गेल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर आशिषने जयेशला विचारले, " तुला रिताबद्दल काय वाटते ? "

जयेशला तर धक्काच बसला ..\"बापरे! मित्राला आपल्या मनातलं हे पण कळायला लागलं कि काय ? रिता खूप चांगली मुलगी आहे आणि मला ती आवडते. माझे तिच्या वर प्रेम आहे....
सांगू या का ...आशिषला \"

जयेश बराच वेळ त्याच्याच विचारात मग्न होता हे पाहून आशिषने पुन्हा विचारले , " रिताबद्दल काय वाटते? "

जयेश -- " रिता एक चांगली मुलगी आहे. आपली चांगली मैत्रीण आहे . आणि ...

आशिष - " आणि ..काय ? "

जयेश - "हुशार आहे,स्वभाव चांगला आहे..."

आशिष - " बस एवढचं की अजून काही? "

आशिषच्या चेहऱ्यावरील हावभाव, रिताबद्दल चांगले ऐकताना होणारा आनंद पाहून त्याच्या मनात काहीतरी वेगळीच भावना आहे. असे जयेशने ओळखले आणि त्याने \" रिता आपल्याला आवडते \" हे सांगितलेच नाही.

आशिष - " जयेश, आपण अगदी लहानपणापासूनचे मित्र. एकत्र खेळलो,हसलो, कधी भांडलो,रूसलो.
जसजसे मोठे होत गेलो तसतसे मनातल्या गोष्टी, सुखदुःख ही शेअर करत गेलो. काही वेळेस तुझा सल्ला घेण्याची गरज वाटली तर ,तुझा सल्लाही घेतला आणि तुझा सल्ला मला कायम उपयोगी पडला.
आताही तुझ्या सल्ल्याची मला खूप गरज आहे.
मला रिता मनापासून आवडते आणि मी तिच्या वर खूप खूप प्रेम करतो. आणि मला वाटते तीही माझ्यावर प्रेम करत असणार.
या व्हॅलेन्टाईन डे ला तिला मी प्रपोज करायचे ठरवले आहे.तुझे काय म्हणणे आहे ? करू ना ?"

जयेशला काय बोलावे ?हेचं सूचत नव्हते.

मैत्री आणि प्रेम दोघांची परिक्षा होती. एकासाठी दुसऱ्याचा त्याग करावा लागणार होता. आशिष जिवलग मित्र तर रिता पहिलं प्रेम होतं

शेवटी मैत्रीचाच विजय झाला.

जयेशने आशिषला आनंदाने संमती दिली.

व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी ,संधी बघून रिताने जयेशला आपल्या मनातील भावना सांगितल्या.

पण जयेशने मनावर दगड ठेवून तिला सांगितले, " माझ्या मनात तुझ्या बद्दल अशी काहीच फिलिंग नाही आहे . आपल्यात जे आहे ती फक्त मैत्री ...बाकी काहीही नाही. तुझ्यावर आशिष खूप प्रेम करतो आणि आशिष खूप चांगला मुलगा आहे. तू त्याच्या प्रेमाचा स्विकार कर... तो तुला नेहमी सुखात ठेवणार. "


असे बोलत असताना जयेशची रिताच्या नजरेला नजर मिळविण्याची हिंमत झाली नाही. आणि तो डोळ्यातील अश्रू लपवत निघून गेला.


ठरल्याप्रमाणे आशिषने रिताला प्रपोज केले आणि तिनेही त्याचा स्विकार केला.

त्यांच्या दोघांच्या लव्हस्टोरीचा त्यांच्या फ्रेंड्स ग्रुप वर काहीच परिणाम झाला नाही. उलट सर्वांनाच आनंद झाला.


कॉलेज संपल्यावर आशिष बिझनेस मध्ये लक्ष देणार होता आणि रिताशी लग्न करणार होता.


\"आशिष आणि रिताचे लग्न झाल्यानंतर रिताला आपल्या डोळ्यांसमोर सारखं सारखं पाहून आपल्याला त्रास होऊ नये. रिताला माझ्याविषयी काही वाटू नये.त्यासाठी आपण दुसऱ्या गावी नोकरी करू\" असे जयेशने ठरविले.

आशिषला जयेशचा हा निर्णय मान्य नव्हता. पण जयेशने आपल्या गोड बोलण्यातून त्याला पटवून घेतले.

जयेश आपल्या आईवडिलांबरोबर दुसऱ्या शहरात गेला. नोकरी करता करता एम.बी. ए. केले. चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. काही दिवसांत लग्न केले आणि संसारात रममाण झाला.

इकडे आशिषनेही आपल्या बिझनेसमध्ये प्रगती केली. रिताबरोबर लग्न करून संसाराचा आनंद घेऊ लागला.

पण आशिष आणि जयेश आपली मैत्री विसरले नाही. दूर राहूनही आपली मैत्री जपत राहिले. मैत्रीचा आनंद घेत राहिले...



कथा समाप्त..


खरचं,मैत्रीत वय,रंग,रूप,धर्म, जात ,पैसा इ. गोष्टींना महत्त्व नसते. मैत्रीत महत्त्व असते भावनांना, एकमेकांवरील प्रेमाला आणि विश्वासाला.

मैत्रीविषयी कितीही लिहीले तरी शब्द कमी पडतात.

तरीही मैत्रीविषयीच्या भावनांना शब्दरूपात....


ह्रदय रुपी सुपीक मातीत शुद्ध मैत्रीचे बीज रूजवावे

प्रेमरुपी पाण्याचे त्याला सिंचन द्यावे

निःस्वार्थ मदतीचे खतपाणी घालावे

मगं छान मैत्रीचे रोपटे तयार होते

मैत्रीच्या रोपट्याला विश्वासरुपी कुंपण घालावे

वाईट विचार,गैरसमजुती सारखे उपद्रवी तण काढून टाकावे

भेटीगाठी, विचारपूस यातून रोपट्याची काळजी घेत जावे

हळूहळू मैत्रीच्या रोपट्याचे वृक्षात रुपांतर होते

मैत्रीचा वृक्ष बहरण्यास सुरूवात होते

दुःखरुपी रखरखत्या उन्हापासून संरक्षण मिळते

सुखदायी सावलीचे समाधान लाभते

गुदमरलेल्या मनाला मोकळे वातावरण मिळते

मैत्रीच्या कल्पवृक्षाचे आयुष्यभर फळ मिळते..