गुण्यागोविंदाने 4 अंतिम

तिला घटस्फोट हवाय
"माझ्या लेकीला अजून एक शब्द जरी बोलला तरी लक्षात ठेवा.."

आईचं अवसान बघून वडील खरोखर घाबरले आणि दोन पावलं मागे झाले..

"काय म्हणत होतात तुम्ही? गुण्यागोविंदाने.... बरोबर...??"

आईने काकू, मामी, बहिणींकडे एकदा पाहिलं आणि विचारलं..

"तुम्ही खरंच 'गुण्यागोविंदाने' संसार केला???"

"सर्व बायका भूतकाळात गेल्या आणि त्यांनी मान खाली घातली.."

त्यांचे नवरे ओरडू लागले, "बोला की...गुण्यागोविंदानेच संसार केलाय आपण.."

बायका बोलायला तयार नाही...आई म्हणाली

"संसार गुण्यागोविंदाचा झाला हे बोलणं सुदधा तुम्ही लादत आहात यावरूनच सगळं कळतंय...गुण्यागोविंदाने संसार म्हणजे नक्की काय हो? ज्यात बायको आणि नवरा दोन्ही सुखी समाधानी असतील..दोघांना समान आदर दिला जात असेल त्याला म्हणतात गुण्यागोविंदाने संसार करणं. पण तुमच्या भाषेत गुण्यागोविंदाने संसार म्हणजे बाईने क्षणाक्षणाला तडजोड करणं, अन्याय सहन करणं आणि मन मारून जगणं...हे जेव्हा होतं तेव्हा पुरुषाला स्वैराचार करता येतो.. आपल्याला हवं तसं, हवं तेव्हा, पाहिजे ते सगळं मिळवता येत असेल आणि समोरचा निमूटपणे सगळं करत असेल तर माणसाला अजून काय हवं?तो आनंदी राहणारच, बायको नावाचं जनावर खुंटीला बांधून ठेवणं ही आहे तुमच्या गुण्यागोविंदाने राहण्याची व्याख्या. फार मोठया अभिमानाने जुनी लोकं सांगतात, की आम्ही इतकी वर्षे गुण्यागोविंदाने संसार केला...पण हे सांगणारा तो फक्त माणूसच असतो...कधीतरी त्या बाईच्या डोळ्यात डोळे घालून तिला प्रामाणिकपणे उत्तर द्यायला लावा...तिच्या डोळ्यात लपलेल्या असंख्य वेदना, मनावर आणि शरीरावर झालेले घाव आणि चक्काचूर झालेली स्वप्न तुम्हाला दिसतील...आणि हे चक्काचूर झालेलं आयुष्य म्हणजे माणसांसाठी परमोच्च आनंद असतो...कारण त्यात रीतसर गुलामी प्राप्त झालेली असते...माफ करा पण माझ्या मुलीला पूर्वापार चालत आलेल्या या गुलामीतून मी बाहेर काढणार...मला माझ्या नवऱ्याने वाऱ्यावर सोडलं तरी चालेल... घटस्पोट घेतला म्हणजे जीवन संपत नाही...माझी लेक दुसरीकडे राहील, स्वतःच्या पायावर उभी राहील आणि आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवेल... दुसऱ्याच्या गुलामीत जगून आयुष्याची माती करून घेण्यापेक्षा स्वतंत्र होऊन समाधानी राहील....तिच्या या निर्णयाला कुणाच्याही परवानगीची गरज मला वाटत नाही...तसा प्रयत्न कुणी केलाच तर कोर्टाची पायरी चढायला मी तयार आहे..."

आईचं हे रूप बघून वडील खरोखर घाबरले...त्यांनी माघार घेतली...कारण आईला जर अजून त्रास दिला तर या वयात आपण एकटे पडू शकतो याची त्यांना भीती निर्माण झाली.

मामी, काकू आणि बहिणी या मुद्द्यावर एकवटल्या, आणि त्यांनीही साक्षीच्या निर्णयाला दुजोरा दिला..अखेर एका गुलामीच्या बंधनातून एका स्वच्छंद मुलीची सुटका झाली...

समाप्त


🎭 Series Post

View all