गुण्यागोविंदाने 2

तिला घटस्फोट हवाय
तेवढ्यात साक्षीच्या बाबांचा ओरडण्याचा आवाज आला,

"कावेरी..."

आई पळतच खोलीत गेली,

"काय झालं??"

"पाण्याचा तांब्या भरून ठेवायला सांगितलेला ना?? अक्कल नाही का??"

आईने धावत जाऊन तांब्या भरून आणला आणि वडिलांकडे दिला. तशीच ती साक्षीच्या खोलीकडे परत गेली..

"काय झालेलं आई?"

"काही नाही...बाबांचं नेहमीचंच.."

साक्षीला समजलं...साक्षीचे बाबा म्हणजे नुसता आगीचा लोळ. कधीही कोणत्याही गोष्टीबद्दल कधी आवाज चढवतील सांगता येत नाही. त्यांच्यापुढे आईचं काहीएक चालत नसे. वडील म्हणतील तो अंतिम शब्द हा नियमच, मग ते बरोबर असो वा चुकीचं..

आईने विषय बदलला,

"साक्षी नकुलचं नेमकं काय वागणं खटकतं तुला??"

"आई...प्रत्येक माणसात गुण अवगुण असतात आणि त्यांच्यासकट त्या व्यक्तीला स्वीकारायचं या जाणिवेने मी त्याच्यासोबत राहत होते. पण हळूहळू एकेक गोष्टी समजत गेल्या आणि मला असह्य होऊ लागलं. आम्ही खरेदीला जातो तेव्हा प्रत्येक वस्तू त्याला दाखवून, विचारून घ्यायची असं त्याचं म्हणणं. बरं महागडी वस्तू तर नाहीच पण कुठलीही स्वस्त वस्तूची किंमत विचारली तरी त्याचे डोळे मोठे व्हायचे. एक पैसा खर्च करू वाटत नाही त्याला.मला वाटलं काटकसरी आहे, भविष्याचा विचार करतोय पण कसलं काय...चैनीच्या जाऊदे पण रोजच्या वापरातील महत्वाच्या वस्तूमध्ये सुद्धा कंजूशी करतो.

भाजीपाला आणायला सांगितला की मार्केटमधून शिळा झालेला जुना भाजीपाला स्वस्तात आणतो, म्हणतो कसा- "भाजीपालाच तर आहे...काय होतं त्याला.."

कुजकट, मऊ झालेले टमाटे बघून खायची सुद्धा इच्छा होत नाही. बरं ते जाऊदे, आमचं नवीन लग्न झालं आहे. खरं तर हे सगळं सांगायला मलाच कसंतरी होतंय पण सांगते...

एखाद्या दिवशी खूप प्रेम आहे असं दाखवतो आणि दुसऱ्याच मिनिटाला काहीतरी खुसपट काढून भांडत बसतो. 15-15 दिवस जवळ येत नाही, घरी आला की मोबाईलवर टाईमपास आणि मोबाईल बघता बघता झोपायचं. बोलणं नाही की कसली विचारपूस नाही. रोज वाट बघावी लागते मला, हा आज जवळ येईल, उद्या येईल...कधीतरी एखाद्या दिवशी त्याला मूड असला की मगच...त्याला याबद्दल विचारलं की म्हणतो.."आत्ता मागच्या महिन्यात केलेलं की आपण..." हे सगळं मी नातेवाईकांसमोर तर नाही ना सांगू शकत...
*******

🎭 Series Post

View all