हपापाचा माल गपापा

एक धमाल विनोदी ग्रामीण कथा
हापापाचा माल गपापा

मंगळवार म्हंजी बाजारचा दिवस.त्यामुळं समदं पिपळगाव एस टी ची वाट बघत फाट्यावर जमलं व्हतं.रामा,शिरपा,गण्या,सर्जा हि चौकडी बी व्हती त्यातच.रामाच्या बायकोनं घरची ज्वारी इकायला दिलती. शिरपा आणि गण्या भाजी घिऊन आलत आणि सर्जा कड पारून घरच तूप इकायला दिलंत.आता सगळी चौकडी जमून पाराव मस्त गप्पा हाणत एस टी ची वाट बगत उभी व्हती.8 ची एस टी बराबर नवा ला फाट्याव टच झाली.समदी लोक तुटून पडली गाडीत बसायला.सगळी गाडी तुडुंब भरली आणि मंग कंडकटर ने बेल मारली.दोन झटके मारून एस टी कशी बशी चालू झाली.कंडकटर ओरडू लागला,"ये आजे, आग बाचक उचिल, ये पावण्या जरा फूड सरक की".एवढ्या गर्दीत तो मार्ग काडत तिकीट काढत व्हता.आता नुसता कल्लोळ आणि गोंगाट व्हता.तेवढ्यात रामा म्हणला,"गण्या वाईच जरा चुनापुडी दे की रं".गण्या बोलला,"न्हाई र शिल्लक".रामा शिरप्याकड वळाला ,त्यानं गुमान पुडी काडून दिली.मस्त गप्पा टप्पा चालल्या व्ह्तया.एक तासाने बाजार गावाला एस टी पोचली.सगळे उतरलं. आपापली जिन्नस मांडून बसली.हळूहळू बाजार रंगायला लागला.
कापड चोपड, खेळणी आणि खाण्या पिण्याची दुकान नुसती गर्दीन फुलून गेली.शिरपा ,रामा ,गण्या आण सर्जा चा सगळा माल इकुन झाला.सर्जा बोलला,"गड्यानो लै भुका लागल्यात".चला आपुन न्याहारी करू !सगळे एका हाटीलात बसले गण्यानं लगीच चार मिसळ सांगितल्या.समदे गप्पा मारत जेवत व्हते.तेवढ्यात सर्जा च्या पाठिव एक थाप बसली.सर्जा गुरकावून मग वळला,"अय पावण्या,काय करतुस?तेव्हा समोरचा गडी हसत म्हणला,"सर्जा लेका आर म्या इलशा".मग ओळख पटली.दोस्तानो हयो माझा दोस्त ईलास, पेडगावचा. पण इलशा तू तर लै थाटात र गड्या,काय खजाना गावला का काय??
विलास हळूच बोलला,"तुला म्हणून सांगतो म्या दर बाजारला एक बिझनेस म्हंजी धंदा करतो.लै पैका हाय बघ.पैसे हा शब्द ऐकला तसे सगळ्यानी कान टवकारले.कोणता???अरे सोप्प हाये काही गरजू माणसं अस्त्यात त्यांना पैसे देतो व्याजानी. म्हंजी बघ या बाजारला 100 दिलं तर पुढच्या बाजरला 150 घ्याच. क्काय????आठ दिसात पन्नास ची कमाई. व्हय ती पण बसून.चौकडीन विचार केला आणि इकलेल्या मालाचे सगळ्यांचे मिळून दहा हजार दिले.विलास पर पैसे बुडायच न्हाय ना??बघ बाबा इश्वास नसलं तरी रहाऊ दे.मग पैसे दिले आणि सगळे घरी जायला निगली. शिरपा म्हणला ,"गड्यानु आर पण घरी काय सांगायचं र!आता याचा तर ईचारच केला नव्हता.तेवढ्यात रामाच डोस्क चाललं.
समदे घरी पोचले.सगळ्यांनी एकच रडगाणं लावलं,सगळे पैसे गण्याच्या खिशात व्हते आन खिसा कापला.बायकांनी हज्जार प्रश्न ईचारलं. पण कुणी फुटलं न्हाई.समदे गडी सपान रंगवीत व्हतं आता आपल्याला पंधरा हजार मिळत्याल मंग यावं करू न त्यांव करू.आठ दिस पाखरागत उडून गेले.आज बाजरला निघताना समदे लै खुश होते.एकतर बायका फसल्या व्ह्त्या आणि दुसरं पैस बी मिळणार.
समदे आपापली जिन्नस इकुन त्या हाटीलात पोचले.ईलासचा कुठंच पत्ता नव्हता.एक तास झाला ,दोन तास झाले आता शिरपा बोलला,"इलशा पळून गेला का काय रं? गप र .आस काय नसलं आर अडकला असलं.हळूहळू समदा बाजार ओसरला.आता सगळे बंद व्हायला आले.ईलास काय आला न्हाय.हाटीलचा मालक म्हणला,"पावन ,आव बाजार संपला की,सर्जा म्हणला मालक थोडा येळ .आता मात्र पाच वाजत आले ,"मालक जवळ आले आता शेवटची एस टी येईल.मंग मात्र समद्यांचा धीर खचला.रामा ने मालकाला ईचारलं आव त्यो पेडगावचा इलशा .....मालक जवळ आला,"तुमी पैक दिलंत का त्यांना?व्हय.मालक त्यांना पाणी देत म्हणाला,"इलशा लै कावेबाज हाय त्यानं गोड बोलून लै लोकांना फसीवल हाये.मालक म्हणाले शाने असाल तर जावा घरला.
सगळी चौकडी जड पावलांनी बाहेर पडली.एस टी त एक शबुद् बी बोलेना.
बायकांना फसवून हापापा केलेला माल इलशां न गपापा केला व्हता.गप तोंडात मारल्यासारखं गप बसून सगळी घरला आली.याला म्हणत्यात हापापा चा माल गपापा.


*कथा पूर्णपणे काल्पनिक*
*लेखक प्रशांत कुंजीर*

🎭 Series Post

View all