हॅनाची सुटकेस

पुस्तकं वाचतांना सगळं दृश्य अगदी समोर घडतंय असाच भास होतो

वाचाल तर वाचाल  

हॅनाची सुटकेस -
कॅरन लीवाईन लिखित आणि मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेलं. ज्योत्स्ना प्रकाशन.

हॅना ....
एक तेरा वर्षांची लहान मुलगी.
ही एक सत्यकथा असून 1930 - 40 या दशकामधल्या चेकोस्लोव्हाकिया या देशातल्या एका कुटुंबाचे अनुभव आहेत. 
1939-45 या काळात दुसरं महायुद्ध चालू होत. जर्मनीचा नाझी हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर याला संपूर्ण जगावर राज्य करायचं होतं. ज्यू धर्माच्या लोकांना तो आपला शत्रू समजत होता. त्यांचा नाश करण्यासाठी संपूर्ण युरोपभर तुरुंगासारख्या छळछावण्या त्याने निर्माण केल्या. जवळपासच्या सर्व देशांमधून ज्यू स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलं यांना त्या छावण्यांमध्ये डांबल. तिथे त्यांना भयंकर यातना दिल्या. काहींना ठार मारले तर बरेच जण उपासमार आणि रोगराईने मरण पावले.

1945 मध्ये युद्ध संपल्यावर ज्या भयंकर गोष्टी घडल्या त्या संपूर्ण जगाला समजल्या. हिटलर आणि त्यांचा नाझी पक्ष यांनी ज्यू धर्मीयांचा युरोपमध्ये संहार केला त्या नरसंहाराला इंग्रजीत "हॉलोकॉस्ट" अस म्हणतात. हे कसं घडलं आणि पुन्हा ते घडू नये याकरता काय करता येईल त्यासाठी सगळेच प्रयत्न करत होते.
यासाठीच जपानमधील एक दानशूर गृहस्थ पुढे आले आणि त्यांनी "टोकियो हॉलोकॉस्ट" एज्युकेशन रिसोर्स सेंटर\" ही संस्था उभारली. जेणेकरून या घटनेबद्दल जपानमधल्या लहान मुलांना कळलं पाहिजे आणि तसेच जगात सहिष्णुता, सामंजस्य नांदाव याकरता काही पावलं उचलता येतील.

1999 साली हॉलोकॉस्ट संबंधी लहान मुलांची परिषद भरली. तिथे हॉलोकॉस्ट मधून वाचलेल्या "याफा एलियाच" यांच्याशी भेट झाली. भविष्यात जगामध्ये शांतता निर्माण करण्याची ताकद मुलांमध्ये आहे. ते ऐकून दहा - बारा तरुण जपानी मुलांनी हे आव्हान स्वीकारून "स्मॉल विंग्ज" नावाचा गट स्थापन केला. यामध्ये ते दर महिन्याला भेटतात वार्तापत्र प्रसिद्ध करतात तसेच जपानमधल्या इतर मुलांनी इतिहासात रस घ्यावा यासाठी ते काम करतात.

सेंटरच्या संचालिका "फ्युमिको इशिओका" यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं हे काम चालतं. त्यांच्या या कामाला मिळालेल्या यशाची किल्ली म्हणजे ही सुटकेस - हॅनाची सुटकेस. भूतकाळामधल्या अत्याचारांची आठवण करून देणारी आणि भविष्याबद्दलची आशा जागी करणारी गोष्ट.

हॅनाची सुटकेस -
तपकिरी रंगाची सामान्य दिसणारी सुटकेस, कंडापाशी फाटलेली पण रिकामी. ही सुटकेस टोकियोमधल्या एका वस्तूसंग्रहालयात काचेच्या कपाटात ठेवलेली आहे.
त्यावर एका मुलीच नाव लिहिलेलं आहे - हॅना ब्रॅडी. पुढे तिची जन्मतारीख 16 मे 1931 आणि खाली अजून एक शब्द - वाईजकींड. याचा अर्थ - अनाथ.
ही मुलगी कोण होती?
कुठल्या गावाची होती?
कुठे चालली होती?
त्यात काय भरलं होत?
ती अनाथ कशी झाली?
ती कशी होती?
तीच काय झालं?

असे एक ना अनेक प्रश्न तिथल्या मुलांना पडत असे, तसेच फ्युमिको इशिओकालाही असेच प्रश्न पडायचे.
हे गूढ उकलण्यासाठी, ही सुटकेस ज्या मुलीची आहे तिची माहिती मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्याचं वचन फ्युमिको मुलांना देते. हॅना ब्रॅडीच्या कहाणीचे धागेदोरे शोधण्यासाठी सगळं जग पालथं घालते. आणि शेवटी ती तिच्याबद्दल सगळी माहिती मिळवते.

हॅनाचा लहानपणापासूनचा संपूर्ण प्रवास यात सांगितलेला आहे. ती कुठे राहायची, तिचे आईवडील तिचा भाऊ जॉर्ज ह्यासगळ्यांबद्दल ह्यात लिहिलेलं आहे. ज्यू म्हणून त्यांच्यावर आलेले भयंकर प्रसंग, त्यांच्यासोबत नाझींनी केलेले अत्याचार खूप वेदनादायक होते.

फ्युमिकोने खूप मेहनतीने हॅनाच्या फक्त सुटकेस वरून तिची पूर्ण माहिती मिळवली.
या पुस्तकात हॅना चा संपूर्ण जीवनप्रवास रेखाटला आहे. हे पुस्तक वाचतांना आपल्या डोळ्यासमोर ते सगळं दृश्य अगदी जसच्या तस उभं राहतं. अंगावर अक्षरशः काटे येतात वाचतांना.
हॅना, एक छोटीशी मुलगी. जीच्याबद्दल वाचतांना आपण अगदी हरवून जातो.

नक्की वाचा हे पुस्तकं, तुम्हांला सुद्धा आवडेल हॅनाची सुटकेस.


धन्यवाद
सौं तृप्ती कोष्टी ©®