Login

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २३)

This is a love story of before marriage and after marriage

आज सोहम खरं तर खूप थकला होता.कारण आज ऑफिसमध्ये खूप काम होते आणि त्याला जवळच्याच गावात  ट्रस्टच्या कॉलेजला कामा निमित्त व्हिजित द्यावी लागली होती. त्यामुळेच सुमेधाताई म्हणजेच साविच्या आईचा  फोन लागला नव्हता.आज त्याने घरी येऊन आराम करायचे ठरवले होते कारण हल्ली त्याला दगदग आणि ट्रेस दोन्ही सहन होत नव्हते.पण आज सावीची मनस्थिती पाहून सावीला घरातून बाहेर घेऊन जाणे त्याला गरजेचे वाटले म्हणून मग त्याने अचानक हा प्लॅन केला.सावीने एक नुकताच शॉपिंग केलेला लेगिंग टॉप घातला आणि ती अगदी सिंपल तयार होऊन आली.खरं तर तिला आज कुठेच जाण्याची इच्छा नव्हती पण सोहमचे मन मोडायला नको म्हणून ती बाहेर जायला तयार झाली होती.

      प्रेम म्हणजे तरी नक्की काय असते अजून! एकमेकांच्या इच्छांचा आदर ठेवणे आणि कधी कधी मनात नसताना ही एकमेकांच्या आनंदासाठी  अशा छोट्या छोट्या गोष्टी करत राहणे! सावी आणि सोहम याच गोष्टी तर त्यांच्या ही नकळत करत होते.सोहमला खरं तर तिचे असे सिंपल तयार होऊन येणे आवडले नव्हते पण तिची मनस्थिती लक्षात घेऊन तो काही बोलला नाही. सोहम ही तयार होऊन आला. अगदी कॅज्युअल टी शर्ट आणि जीन्स!पण त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा सावीच्या नजरेतून सुटला नाही आणि ती त्याला म्हणाली.

सावी,“ सोहम तू खूप थकल्या सारखा दिसत आहेस आज राहू दे जायचे आपण उद्या जाऊयात का?” तिने काळजीने विचारले.

सोहम,“ मी ठीक आहे चल!” असं म्हणून तो कार की घेऊन बाहेर निघाला.

            सावी  गुपचूप  जाऊन त्याच्या शेजारच्या  सीटवर बसली. त्यांना निघायला रात्रीचे आठ वाजले होते आणि थकव्यामुळे सोहमने सावीला जवळच्याच रेस्टोरंतमध्ये नेले. सोहमने जेवणाची ऑर्डर दिली. रेस्टोरंत छानच होते. सुंदर अशी बैठक व्यवस्था! तत्पर स्टाफ आणि एक गायक मंद अशा स्वरात गाणे म्हणत होता.

जब कोई बात बिगड़ जाए 

जब कोई मुश्किल पड़ जाए

ना कोई हैं ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा

तुम देना साथ मेरा ओ हमनवाज़

हो चाँदनी जब तक रात 

देता हैं हर कोई साथ

तुम मगर  अंधेरों में ना छोड़ना मेरा हाथ

तुम देना साथ मेरा ओ हमनवाज़

         खरं तर हे गाणं दोघांच्या ही मनस्थितीला साजेसे  होते. सावी मात्र खुपच शांत होती. सोहमच मधे मधे काही तरी बोलत होता.सावी फक्त त्याला जेवढ्यास तेव्हढे उत्तर देत होती.  वेटर जेवण घेऊन आला आणि दोघे ही जेवले.

सावीच्या मात्र मनात अजून ही द्वंद्व सुरू होते तिला सोहमशी आज खूप काही बोलायचे होते पण ते बोलावे का नको? या विचारात ती अडकली होती. तिचे डोके सांगत होते की नको सांगूस काही नको बोलूस त्याला या विषयावर कारण तुझ्या  आत्ता हे सगळं सांगण्याचा त्याने काही गैरसमज करून घेतला तर? आणि मन सांगत होते सावी तुला हे त्याला कधी ना कधी सांगायचेच होते ना! आता वेळ की कुठं आहे तुझ्याकडे एकच आठवडा तर आहे तुझ्या हातात! सोहमने तुझ्याशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला तर तू तुझ्या मनात लहानपणा पासून काट्यासारखी रुतून बसलेली ही सल हे दुःख त्याला कधीच सांगू शकणार नाहीस या सगळ्या विचारात सावीने कसेबसे जेवण केले.तिचे लक्ष जेवणात नव्हतेच मुळी!

        सोहमच्या मात्र  सावीच्या मनात काही तरी सुरू आहे हे लक्षात आले होते.त्याला सावीला आपल्याशी खूप काही बोलायचे आहे हे तिचा चेहरा पाहून लक्षात आले होते पण ती आपल्याशी बोलावे का नको या द्विधा मनस्थितीत आहे हे ही त्याला कळत होते. म्हणूनच त्याने तिला बोलत करण्याचा प्रयत्न करावा असा विचार केला.

             दोघे ही जेवले आणि निघाले. आज पुन्हा सोहमने  घरा जवळील त्याच गार्डन समोर गाडी  थांबवली. जे त्यांच्यातील अनेक आंबट-गोड क्षणांचे साक्षीदार होते. सावीने  सोहमने गाडी थांबवताच त्याच्याकडे  चमकून पाहिले व म्हणाली.

सावी,“ इथे कशाला गाडी थांबवलीस सोहम तू? घरी चल आता! खूप थकल्या सारखा दिसत आहेस तू! चल बरं आराम कर!” ती काळजीने म्हणाली.

सोहम,“अग थोड्यावेळ बसू इथे मग जाऊ की घरी आणि इतका ही थकवा नाही आला मला सावी!” तो असं म्हणून गाडीतून उतरला. 

       दोघे ही एका बेंचवर जाऊन बसले. रात्री दहा वाजून गेले होते. त्यामुळे सगळीकडे तशी निरव शांतताच होती.कुठून तरी एखादा रात किडा आवाज करत ती शांतता भंग करत होता. सावी आणि सोहम बराच वेळ शांत होते. सावी आता सोहमला सगळे सांगायचे ठरवले होते.काय व्हायचे ते होऊ दे त्याचा गैरसमज झाला तर झाला असा विचार सावी करत.मनात शब्दांची जुळवाजुळव करत होती.सोहमला मात्र तिच्या मनात काय चालले आहे हे जाणून घ्यायचे होते म्हणून तिला बोलत करण्यासाठी तो म्हणाला.

सोहम,“ काय म्हणत होत्या आई अजून मग?”

सावी,“ काही विशेष नाही पण तू कुठं गेला होतास असा नेटवर्क नसलेल्या ठिकाणी?” तिने विचारले

सोहम,“ अग इथून तीस किलोमीटरवर एक छोटं खेड आहे तिथे ट्रस्टचे कॉलेज आहे. ते कॉलेज काही केल्या मेन ऑफिसला इंटरनेटने जोडलेच जात नव्हते म्हणून तिथे काय प्रॉब्लेम आहे ते पहायचे होते. मी रस्त्यात असेन म्हणून आईंचा फोन नसेल लागला!” तो म्हणाला.

सावी,“ म्हणजे तू आज साठ किलोमीटर ड्राइव्ह केलेस! मूर्ख आहेस का तू सोहम?” ती चिडून काळजीने म्हणाली.

सोहम,“wait wait! लगेच चिडू नको मी नाही केलं ड्राइव्ह ड्रायव्हर घेऊन गेलो होतो आणि दिलजीत ही होता माझ्या बरोबर!” तो म्हणाला.

सावी,“ तरी बरं!” ती हसून म्हणाली.

सोहम,“ by the way! सावी असं काय स्वप्न पडले ग तुला की इतकी घाबरली होतीस आणि त्यामुळे अजून ही अपसेट आहेस?” त्याने हळूच मुद्द्याला हात घातला.

सावी,“ काही नाही रे! मला खूप भयंकर स्वप्न पडले! म्हणून घाबरले आणि अपसेट झाले.” ती म्हणाली.

सोहम,“ असं काय भयंकर स्वप्न पडले ग? मी मेलो की काय तुझ्या स्वप्नात! म्हणजे मी आलो तेंव्हा सोहम सोहम म्हणून ओरडत होतीस तू !” असं म्हणून तो हसायला लागला.

सावी,“ झालं तुझं सुरू परत! कुठल्या ही गोष्टीची चेष्टा करू नये सोहम!” ती पुन्हा चिडून म्हणाली.

सोहम,“ come on savi it was a dream!त्यात इतकं घाबरण्यासारखं आणि अपसेट होण्यासारख काय आहे ग!तुझं नाव बदलायला हवं आता आदित्यला सांगतो मी तुला झाशीची राणी म्हणू नकोस म्हणून तुझं नाव आता रडूबाई ठेवूयाआपण!” तो पुन्हा हसून म्हणाला.

सावी,“ सांग हो सांग! तुला काय समजणार म्हणा!तू त्यातून गेलाच नाहीस ना शेवटी ज्याच त्याला माहित असत!” ती भावूक होत म्हणाली.

सोहम,“ बरं बाई नाही करत मस्करी! पण मूड तर ठीक कर तुझा आता की अशीच तोंड पाडून बसणार आहेस!” तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला.

सावी,“ बरं ते सगळं जाऊदे मला तुला काही तरी सांगायचं आहे!” ती सावरून बसत म्हणाली.

सोहम,“ बोल ना मग!” तो म्हणाला.

सावी,“ हे बघ मी तुला जे सांगणार आहे त्याचा तू जो निर्णय घेणार आहेस त्यावर परिणाम व्हावा किंवा तू तुझा निर्णय बदलावा म्हणून अजिबात नाही! तर मला माझ्या आयुष्यातील एक कटू सत्य तुला खूप दिवसां पासून सांगायचे होते. ज्यामुळे माझी विचार करण्याची पद्धत आणि पुरुषां विषयी चुकीचे विचार माझ्या मनात रुजत गेले.खरं तर ते आत्ता बदलले आहेत म्हणा! पण माझ्या आयुष्यातील एक काळी बाजू मला तुला दाखवायची आहे.कारण पुढे मला हे सगळं तुला बोलायला मिळेल की नाही हे मला माहित नाही! आता फक्त आठवडाच राहिला आहे आपला एकमेकां बरोबर त्या नंतर तू काय निर्णय घेणार हे मला माहित नाही!  पण प्लिज सोहम तू गैरसमज नको करून घेवूस!” ती अजिजीने बोलत होती.

सोहम,“ सावी माझ्याशी काही ही  बोलण्यासाठी तुला इतका विचार करायची गरज केव्हा पासून भासू लागली ग? इतके दुरावलो का आपण? की तुला मला तुझ्या मनातलं सांगण्यासाठी इतका विचार करावा लागतो आहे!” तो तिचा हात हातातून सोडून तिला नाराजीने म्हणाला.

सावी,“ तसं नाही रे! पण …” ती त्याचा हात धरत म्हणाली.

सोहम,“ पण काय ग?” तो चिडून म्हणाली.

सावी,“बरं sorry बाबा! ऐक तर ना!” ती हसून त्याला म्हणाली.

सोहम,“ हा बोल बाई आता काय ते! उगीच सस्पेन्स नको अजून!” तो वैतागून म्हणाला.

सावी,“ माझी आई सिंगल पॅरेन्स आहे हे तुला तर माहीतच आहे.तिनेच मला एकटीने वाढवले. माझी आई खरं तर खूप मोठ्या घरची सोलापूरच्या एका मोठ्या व्यापाऱ्याची मुलगी ती ही एकुलती एक! तिची आई तिच्या लहानपणीच गेली. पण माझ्या आजोबांनी तिच्यासाठी दुसरे लग्न केले नाही. ती एका पायाने अधू आहे हे तर तुम्हाला माहीत आहे.माझ्या आजोबांचा सोलापुरी चादरींचा कारखाना होता. आई हुशार होती तिने M. Com केले पण त्या काळात व्यंग असलेल्या मुलीचे लग्न होणे म्हणजे खूप कठीण होते. आजोबा रात्रं दिवस त्याच चिंतेत असायचे पण आईने आता ऑफिस जॉईन केले आणि ती बिझनेस चांगला सांभाळू   लागली.  आजोबांना मात्र तिच्या लग्नाची चिंता होती. त्यांच्याच ऑफिसचा मॅनेजर मनोहर याने ते हेरले आणि माझ्या आईला आजोबा समोर मागणी घातली.मनोहर औरंगाबादचा होता.तो देखणा रुबाबदार आणि हुशार ही होता. आजोबा खुश झाले आणि माझ्या आईचे लग्न मनोहरशी त्यांनी  लावून दिले आणि इथेच आजोबांनी खूप मोठी चूक केली. आजोबा आईच्या लग्नानंतर दोन वर्षातच गेले.तो पर्यंत माझा जन्म झाला होता.आईने ऑफिस आणि कारखान्यात जाणे बंद केले. सगळा कारभार मनोहर म्हणजेच माझ्या बापाच्या हातात गेला. माझ्या आईला गोड बोलून त्याने सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून घेतली. पाचच वर्षात त्याचा आई प्रति व्यवहार बदलत गेला. रात्री उशिरा दारू पिऊन येणे.त्याचे रोजचेच झाले.मी तेव्हा चार वर्षांची असेन आई माझ्या जवळ झोपलेली असली तरी तो माणूस आईला त्याच्या रूममध्ये जबरदस्तीने दारूच्या नशेत घेऊन जात असे आणि आईवर रोज समाज मान्य बलात्कार करत असे आधीच अधू असलेली माझी आई आणखीन खंगत चालली होती. मी रात्र रात्र त्यांच्या रूमच्या बाहेर बसून राहत असे! त्या नीच माणसाला स्वतःच्याच मुलीची ही पर्वा नसे. मी ते सगळं पाहतच दहा वर्षांची झाले आता तर तो आईला मारू ही लागला होता. माझ्या समोर माझ्या बापाने किती तरी वेळा माझ्या आईला बेदम मारलं आहे. आई सगळं सहन करत होती कारण त्याने गोड बोलून सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं. माझी आई तिच्याच हक्काच्या घरात अश्रीता सारखे दिवस काढत होती. मी अकरा वर्षांची असताना माझा बाप त्याच्या पहिल्या बायकोला आणि मुलांना घेऊन  आला.  मला आणि आईला रात्री घरा बाहेर काढले. हो त्या नीच माणसाचे पहिले लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले होती. माझ्या आईशी पैसा आणि प्रॉपर्टीसाठी त्याने लग्न केले आणि सगळं त्याच्या नावावर होताच आईला व मला घरा बाहेर काढले. एक रात्र आम्ही आईच्या मैत्रिणीच्या घरात काढली आणि तिच्या कडून तिकीटला पैसे घेऊन पुण्यात पोहोचलो तिथे आईची मौशी राहत होती. तिने आणि काकांनी आम्हाला आश्रय दिला. आई नोकरी शोधू लागली आणि दोनच महिन्यात तिला एका बँकेत  क्लर्कची नोकरी मिळाली. आम्ही दोघी भाड्याच्या घरात शिफ्ट झालो.त्या नंतर आईने कधी मागे वळून पाहिले नाही ती तिच्या हुशारीच्या जोरावर जनरल मॅनेजरच्या पदा पर्यंत पोहोचली पण आज ही ती मनातून स्वतःला दोष देते तिला वाटते की तिच्या मुळेच आजोबांनी इतक्या मेहतीने उभा केलेला बिझनेस गेला.माझ्या बापाला ही तो बिझनेस व प्रॉपर्टी लाभली नाही आणि तो कंगाल झाला. आज फिरतो आहे सोलापूरच्या गल्ली बोळातून भिकारी होऊन.त्यामुळेच माझ्या मनात लग्न,प्रेम या गोष्टी बद्दल आकस होता आणि पुरुषां बद्दल आढी आईने मला खूप समजावले की प्रत्येक पुरुष वाईट नसतो पण मी जे लहानपाणी पाहिलं अनुभवले ते माझ्या मनावर कोरले गेले.पण माझ्या धारणा विचार चुकीचे होते सोहम ते तू माझ्या आयुष्यात येण्यामुळे हळूहळू कमी होत गेले पण कदाचित त्याला खूप उशीर झाला आहे” सावीने हे सगळं सांगून एक दीर्घ श्वास सोडला आणि डोळे पुसले.

         सोहमला हे सगळं सावीकडून ऐकून धक्काच बसला होता. तो विचार करत होता की या माय-लेकींनी आयुष्यात किती सहन केले आहे आपल्याला तर दुःख म्हणजे काय हेच माहीत नाही कारण आपल्याला एक छान कुटुंब आणि प्रेमळ आई-वडील मिळाले. पण सावी! तीच तसं नाही खूप लहान वयात तिने खूप काही पाहिले आणि अनुभवले त्यामुळे साहजिकच कोणाच्या ही मनावर परिणाम होऊ शकतो.त्याने सावीचा हात धरला आणि तो तिला म्हणाला.

सोहम,“ सावी खरच आईंनी आणि तू खूप काही सहन केलेस ग! मी तर कल्पना ही करू शकत नाही इतकं तुम्ही दोघींनी भोगले आहे आणि तुझे विचार आणि धारणा पुरुषां बद्दल चुकीच्या झाल्या त्यात तुझी काहीच चूक नाही कारण तो तुझा अनुभव होता लहान वयात तुझ्या मनावर तुझ्याच वडिलांनी आघात गेले त्यामुळे  तुझ्या मनात पुरुषां बद्दल आकस आणि अढी असणे साहजिक आहे.”तो तिचा हात प्रेमाने कुरवाळत म्हणाला.

सावी,“ तुला आठवते का आपण मुबंईत घर घेताना मी ते अट्टाहासाने माझ्या नावावर करून घेतले त्याचे कारण माझी असुरक्षितता होती सोहम की माझ्या आईला माझ्या बापाने तिच्याच हक्काच्या घरातून बाहेर काढले उद्या तुही तसेच केलेस तर! म्हणून मी घर स्वतःच्या नावावर करून घेतले.” ती म्हणाली.

सोहम,“ सावी तू काय काय विचार करू शकतेस हे तुलाच माहीत अच्छा म्हणून तू माझ्यावर तारा वरून संशय घेतलास तर कारण आईंना तुझ्या बाबांनी फसवले!” तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला.

सावी,“ सोड ना ते सगळं! आज तुला हे सगळं सांगून खरच मला हलकं वाटत आहे. बरं चल घरी अकरा वाजून गेले बघ!” ती तिच्या हातातल्या घड्याळात पाहत म्हणाली आणि उठली.

             दोघे घरी आले. सावी आज शांत झोपली होती पण सोहमला मात्र झोप लागत नव्हती. तो आज दिवस भर इतका थकला असून ही सावीने जे काही आज सांगितले त्याचा विचार करून सोहमची मात्र झोप उडाली होती. त्याच्या मनात अनेक विचारांचे पोळे आज उठले होते.तो शांत झोपलेल्या सावीकडे पाहून विचार करत होता. या सुंदर,हसऱ्या आणि धाडसी चेहऱ्याच्या मुखवट्या मागे किती दुःख दाटून राहिले आहे त्याचा निचरा कधी झालाच नाही.ते तसेच साचून आहे एखाद्या गढूळ डोहा सारखे!मी सावीवर फक्त प्रेम केले पण तिला समजून नाही घेऊ शकलो. तिच्या मनाच्या खोल डोहात मला कधी उतरताच आले नाही. मी फक्त तिने दिलेली स्वतःचीच दुःख कुरवाळत बसलो.ती माझ्याशी जे वागली बोलली फक्त याचा विचार करून आताताईपणे निर्णय घेत गेलो पण ती अशी का वागली याच्या मुळाशी मला कधी जावेसेच वाटले नाही. तिला काय वाटते? तिला काही दुःख असेल का? तिचे माझ्यावर  प्रेम असून ही ती अशी  का वागते? हे तिला कधीच विचारावेसे मला वाटले नाही.  त्या पार्टीच्या रात्री सावी नशेत मला जे बोलली त्याचा विचार करून मी स्वतःची दुःख कुरवाळत बसलो आणि आताताईपणा करून तिला एकटीला सोडून आलो खरं तर मी तिथेच चुकलो! मी तिचे म्हणणे ऐकून घेऊन तिचा गैरसमज दूर करायला हवा होता पण मी ते केलेच नाही उलट तिलाच दोष देत राहिलो.मी पण चुका केल्याचं होत्या की तिच्या पासून खूप काही लपवले मी! मग तिच्या आजवरच्या अनुभवावरून  तिने काय तर्क काढायला हवा होता सोहम! मी पण कुठे तरी तिच्या बापा सारखा स्वार्थी वागलो. सहा महिने ती कशी जगत असेल याचा एकदा ही विचार नाही केला मी! ती पाश्चात्तापातून इथे  माझी माफी मागायला आली तर तिचे काहीच ऐकून घेतले नाही. जर तिचे शांतपणे ऐकून घेतले असते तर पुढचा अनर्थ टळला असता. तो एक्सिडंट झाला नसता पण तिला वाचवायला जाऊन मी मरणाच्या दारात पोहोचलो आणि मरण यातना मात्र सावीने भोगल्या. वरून माझे दुःख मात्र सगळ्यांना दिसले पण सावीच्या दुःखच काय? इतके होऊन ही मी तिच्याशी तीन महिने अगदी तुसड्या सारख वागलो. तिच्याशी नीट बोललो ही नाही आणि ती मात्र माझी सेवा करत राहिली. माझे डोळे तेंव्हा उघडले जेंव्हा ती आजारी पडली आणि आदित्यने माझी कान उघाडणी केली.खरं तर आदित्य म्हणाला तसं तिला मिळाले असते की पन्नास सोहम पण ती माझ्या मागे मागे करत राहिली. खरं तर मीच कुठे तरी कमी पडलो तिला जाणून घेण्यात! तिला समजून घेण्यात! तिचा विश्वास जिंकण्यात कारण मी जर तिचा  विश्वास जिंकू शकलो असतो तर तिच्या मनातील त्या गढूळ डोहात मी या आधीच उतरू शकलो असतो आणि तिने मला तिचा भूतकाळ तिने भोगलेली दुःखे केंव्हाच सांगितली असती.पण आता बास सावी तुला अजून दुःखी मी नाही पाहू शकत माझा निर्णय झाला आहे पण मी वाट पाहतोय तू माझ्यावर तुझा हक्क गाजवण्याची! जे तू लवकरच करशील कारण मी तुला तो देऊ करण्यापेक्षा तू तो माझ्या कडून हिसकावून भांडून घ्यावास मला तो ठणकावून मागावास असं मला वाटते सावी! Because you deserve all happiness in your life.I love you so much!

        त्याने  हा सगळा विचार करून जवळच झोपलेल्या सावीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यामुळे सावीची झोप चाळवली तिने डोळे उघडून इशाऱ्यानेच सोहमला काय असे विचारले तेव्हा सोहमने काही नाही असे डोळ्यानेच सांगितले आणि सावी त्याच्या कुशीत शिरली.

           कोणत्या ही व्यक्तीच्या वागणूकी मागे त्याच्या विचारांमागे त्याचे पूर्वानुभव असतात. जे त्याच्या आयुष्यात त्याच्या वर्तमान आणि भविष्यावर ही परिणाम करत असतात. सावीच्या ही विचारांमागे तिच्या चुकीच्या धारनांमागे  तिच्या बालपणीचे कटू अनुभव होते. त्यामुळे ती सोहमशी अशी वागली होती.पण तिला या सगळ्याचा पश्चात्ताप होता. सोहमला ही आज तिचा भूतकाळ ऐकून त्याच्या चुकांची जाणीव झाली होती.

 सोहम असं काय करेल की सावी तिचा हक्क त्याला मागेल? पण सावी तिच्या मनात असलेल्या गिल्टमुळे सोहमच्या अपेक्षेप्रमाणे वागू शकेल? पण नियतीने सोहम आणि सावीच्या पुढे अजून एक मोठी परीक्षा मांडून ठेवली होती ज्यातून त्याचे प्रेम तग धरू शकेल का?

     या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

©Swamini (asmita) chougule








 

🎭 Series Post

View all