Oct 30, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २०)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २०)

 

        सावी थकून इतकी गाढ झोपली होती की ती रात्री बेडरूममध्ये कशी आली हे ही तिला आठवत नव्हते. ती उठून बसली आणि घड्याळ पाहिले तर आठ वाजले होते. सोहम अजून ही झोपला होता. सावीने तिचे आवरले व  ती किचनमध्ये गेली. तिने नाष्ट्याला पोहे केले. कामवाली बाई आलीच होती.काल खूप  फिरल्यामुळे तिचे पाय ही दुखत होते आणि तिला कंटाळा ही आला होता म्हणून कामवाल्याबाईला स्वयंपाक करायला सांगितले. तिने बेडरूमच्या दारातूनच सोहमला हाक मारली कारण आज काल ती त्याला उठवायला बेडरूममध्ये गेली की तो तिला तिला अर्धा तास तरी सोडत नसायचा! सोहमने तिला दारात उभे पाहिले आणि तो ओरडू लागला.

 

सोहम,“ सावी माझं डोकं खूप दुखतंय!” हे ऐकून सावी पळत त्याच्या जवळ बेडवर जाऊन बसली आणि काळजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

 

सावी,“ काय झालं सोहम खूप दुखतंय का डोकं?”

 

     तसा सोहम उठून बसत तिला जवळ घेऊन हसू लागला. सावीच्या सगळा प्रकार लक्षात आला आणि ती चिडून म्हणाली.

 

सावी,“ असली चेष्टा करतात का सोहम?” 

 

                   तो पर्यंत सोहमच्या मोबाईवर आदित्यचा फोन आला. त्याने फोन उचलला आणि सावी  निघून गेली. आदित्यने तो पोहचला आहे हे सांगण्यासाठी फोन केला होता. सोहम त्याच्याशी बोलला आणि फोन ठेवला घड्याळ पाहिले तर नऊ वाजून गेले होते. तो गडबडीने बाथरूममध्ये शिरला तो बाथरूममध्ये गेलेला पाहून सावीने त्याचे सगळे समान व्यवस्थित काढून ठेवले आणि तिथून गपचुप निघून गेली. सोहम बाहेर आता त्याला सावीला कोणत्याच कारणासाठी हाक मारता येणार नव्हती. तो तयार होऊन पाय अपटतच बाहेर आला. त्याने नाष्टा केला.कामवालीबाई  घरात काम करत असल्याने त्याला काहीच  बोलत येत नव्हते. सावी मात्र त्याची चुळबूळ पाहून मनातल्या मनात हसत होती. तो ऑफिसला निघून गेला पण सावीला मात्र आता चैन पडेना आपण उगीच सोहमशी असं वागलो असं तिला राहून राहून वाटू लागलं.तिने शेवटी त्याला फोन केला.सोहम कामात होता तरी त्याने फोन उचलला.

 

सोहम,“ बोल ग! काय काम होत का?”त्याने विचारले.

 

सावी,“जेवण नीट कर आणि गोळी घे आठवणीने!”ती काही तरी बोलायचं म्हणून बोलली.

 

सोहम,“ सावी अग लंचब्रेक व्हायचा आहे अजून!” तो हसून म्हणाला.

 

सावी,“ बरं ठेवते मग मी!” ती म्हणाली.

 

सोहम,“ लगेच ठेवते काय? फोन का  केला होतास तू?” त्याने सहज विचारले.

 

          सावीने काहीच उत्तर दिले नाही.तिकडून काहीच आवाज नाही म्हणल्यावर पुन्हा सोहमच म्हणाला.

 

सोहम,“ सावी are you there? अग बोलत का नाहीस?”

 

सावी,“ काही नाही रे सहज केला होता!” ती म्हणाली.

 

सोहम,“ अच्छा! बरं ठेवतो मग!” तो म्हणाला.

 

सावी,“ I love you!” ती म्हणाली.

 

सोहम,“ अच्छा हे सांगण्यासाठी केला  होतास तर फोन!” तो हसून म्हणाला.

 

सावी,“ ठेवते मी!” असं म्हणून तिने फोन कट केला.

 

     सोहम मात्र गालातल्या गालात हसत  मनातल्या मनात म्हणाला.वेडी कुठली! 


 

   संध्याकाळी सोहम घरी आला तो लंगडतच! सावीने त्याच्या येण्याची वेळ झाली म्हणून दार उघडे ठेवले होते. ती देवापुढे सांजवात लावत होती.तिने सोहमला येताना पाहिलेच नव्हते.सोहम कसा बसा येऊन सोफ्यावर बसला व सावीला हाक मारून म्हणाला.

 

सोहम,“ जरा पाणी घेऊन ये ग सावी”

 

सावी,“ तुझं तू येऊन घे ना प्लिज! मी कामात आहे” ती म्हणाली.

 

सोहम,“ अग माझा पाय खूप दुखतोय! नीट चालता पण येईना मला!” तो म्हणाला.

 

     सावीला वाटले सकाळ सारखी मस्करी करत असणार हा म्हणून ती किचनमध्ये चहा वगैरे करत बसली.पण पंधरा मिनिटं झालं तरी सोहमची काहीच हालचाल नाही म्हणल्यावर सावीच हॉलमध्ये आली. तर सोहम पाय धरून बसला होता. त्याचा फॅक्चर झालेला पाय खूप सुजला होता. ते पाहून सावी पळतच पाणी घेऊन आली आणि त्याला पाणी देत म्हणाली.

 

सावी,“ सॉरी सोहम मला वाटलं तू सकाळ सारखी मस्करी करत आहेस! अरे पण तुझा पाय इतका कसा सुजला? तिने काळजीने पायाला हात लावत विचारले.

 

सोहम,“ काही नाही ग!असच!” तो पाणी पिऊन नजर चोरत म्हणाला.

 

सावी,“ असाच कसा सुजेल सोहम पाय? तू काय केलंस ते सांग आधी? का मी दिलजीतला फोन लावून विचारू?” तिने दरडावत विचारले.

 

सोहम,“ त्याला  कशाला फोन लावतोस अजून? मी आज मुलांबरोबर फूटबॉल खेळलो खूप दिवस त्यांच्या बरोबर खेळलो नाही म्हणून ती हट्ट करत होती. पण आता पाय खूप दुखतो आहे माझा!”तो रडकुंडीला येत म्हणाला.

 

सावी,“ काय? लहान आहेस का सोहम तू आता मुलं म्हणाली आणि तू खेळलास! अरे डॉक्टरने काय सांगितलं होत तुला की धावपळ करू नकोस! तुझ्या पायाला सिव्हीयर फ्रॅक्चर होत सोहम!  काय करू मी तुझं!” ती चिडून पण काळजीने बोलत होती.

 

सोहम,“ आता काही करणार आहेस की बोलतच राहणार मला!”तो पुन्हा रडकुंडीला येत म्हणाला.

 

सावी,“ तुला तर ना!”ती चिडून म्हणाली आणि त्याचा हात खांद्यावर घेऊन त्याला बेडरूमध्ये गेले.त्याला बेडवर टेकून बसवले.

 

           सावीने बाथरूममध्ये जाऊन गीजर ऑन केला आणि गरम पाणी बकेटमध्ये घेऊन आली  आणि किचन मधून मीठ घेऊन आली. गरम पाण्यात मीठ टाकले व त्याला पाय बकेटमध्ये ठेवायला लावला. गरम पाण्याने पाय शेकला  गेल्याने त्याला जरा बरं वाटू लागलं. हे सगळं सावीने सोहमला एक ही शब्द न बोलता केलं. ती त्याच्यासाठी चहा आणि बिस्कीट घेऊन आली आणि त्याच्या समोर धरले. सोहम तिला पाहून म्हणाला.

 

सोहम,“ तूच चार ना!”

 

सावी,“ पाय सुजला आहे तुझा तो ही तुझ्याच मूर्खपणामुळे हात नाही सुजले गप्प खा आता!” ती चिडून बोलत होती.

 

सोहम,“ सॉरी ना! मला वाटले आता बरा झाला असेल पाय पण काय माहीत इतका सुजेल आणि दुखेल म्हणून!” तिला जवळ ओढत तो लाडिकपणे म्हणाला.

 

सावी,“ जास्त लाडात येऊ नको आता कळलं! उद्या चला आता हॉस्पिटलमध्ये तुझं काय करू मी सोहम!” ती वैतागून त्याच्या जवळ बसत म्हणाली.

 

सोहम,“ काही नको करुस!दुपारी काय म्हणत होतीस ते म्हण एकदा!” तो म्हणाला.

 

सावी,“ काही नाही म्हणणार मी! मी स्वयंपाक करते.तो पर्यंत चहा बिस्कीट खा! मी जाते” ती उठत म्हणाली.

 

सोहम,“जरा बस ना माझ्या जवळ माझा पाय खूप दुखतोय!” तो नुसता चहा पीत तोंड पाडून म्हणाला.

 

सावी,“दुखू दे! तू स्वतः करून घेतलय ते! आणि असले ड्रामे बंद कर तुझे!” ती चिडून म्हणाली.

 

सोहम,“ ठीक आहे जा!मला जेवायला नको आहे. तू तुझ्या पुरते कर आणि खा!” तो ही चिडून पाण्यातून पाय काढून बेडला टेकून बसत म्हणाला.

 

सावी,“ सोहमss you are impossible!” तुला ना खरच बदडला पाहिजे! I will kill you! You stupid!” त्याला चिडून हे सगळं बोलून तिने मिठी मारली.

 

सोहम,“ अच्छा! you want to kill me? मग मार मी नाही आडवलं तुला!” तो तिच्या कानात म्हणाला.

 

सावी,“ love  you!” असं म्हणून तिने त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. थोड्या वेळाने सावी पुन्हा त्याला म्हणाली.

 

सावी,“ काय रे सोहम! तू नवीन नवीन उपव्द्याप करून ठेवतोस! चार लहान मुले परवडली पण तू नको!खूप दुखतंय का तुला!” तिने पायाला हात लावत  विचारले.

 

सोहम,“ दुखतोय पण गरम पाण्याने शेकल्यामुळे कमी झाला जरा!” तो तिला पाहून म्हणाला.

 

सावी,“ आजची रात्र काढू शकशील ना? का आत्ताच जाऊ या हॉस्पिटलमध्ये?” तिने काळजीने विचारले.

 

सोहम,“उद्या जाऊ यात!  मी दोन दिवस घरूणच काम  करेन! असं ही प्रेझेन्टेशन झालं आहे त्यावर काम सुरू व्हायला अजून बरेच दिवस जातील त्यामुळे आता मला जास्त काम नसत!”तो म्हणाला.

 

सावी,“ म्हणून तू हे काम करून बसला का?” ती खोचकपणे म्हणाली.

 

सोहम,“ बास ना सावी किती बोलशील ग! सॉरी ना!” तो तोंड पाडून म्हणाला.

 

सावी,“ बरं बरं मी स्वयंपाक करून घेते मग जेवू!” ती असं म्हणून किचनमध्ये गेली.

 

     सोहम झोपण्याचा प्रयत्न करत होता पण पाय दुखत असल्याने त्याला झोप येत नव्हती. सावीचे ही लक्ष स्वयंपाकात नव्हते कारण तिचे सगळे लक्ष सोहमकडे  लागले होते.तिने कसा बसा स्वयंपाक उरकला आणि त्याचे ताट घेऊन ती बेडरूममध्ये गेली. सोहम जागाच होता. तो उठला आणि सावीला म्हणाला.

 

सोहम,“हे काय एकच ताट का?तुझे ताट कुठे आहे?”

 

सावी,“ अरे तू जेव मग मी जेवण!” ती त्याच्या समोर ताट धरत म्हणाली.

 

सोहम,“ ते काही नाही तू तुझे ताट घेऊन ये!”तो म्हणाला.

 

सावी,“ बरं ठीक आहे!”ती हसून म्हणाली आणि आणखीन एक ताट घेऊन आली.

 

       दोघ ही जेवले आणि थोड्या वेळाने झोपले सोहमचा पाय दुखत असल्याने त्याची चूळबुळ सुरू होती.त्यामुळे सावी उठून बसली.तिने सोहमला काळजीने विचारले.

 

सावी,“ खूप दुखतोय का पाय सोहम?” 

 

सोहम,“ नाही तू झोप!” तो म्हणाला.

 

सावी,“ खोट बोलू नकोस तुझा चेहराच सांगतोय की तुझा पाय दुखतोय खूप मी असं करते तुझ्या पायाला बाम लावते आणि क्राफ्ट बँडेज बांधते!” ती लाईट लावून उठत म्हणाली.

 

सोहम,“ नको सावी झोप माझ्यामुळे किती त्रास घेणार आहेस अजून!” तो अपराधीपणे म्हणाला.

 

सावी,“ हो का? हा विचार  फुटबॉल खेळायच्या आधी करायला हवा होता तू!” ती बाम आणि बँडेज घेऊन बेडवर बसत म्हणाली.

 

     तिने सोहमच्या पायाला बाम लावला आणि क्राफ्ट बँडेज गुंडाळली. त्यामुळे त्याच्या पायाचा ठणका जरा कमी झाला आणि त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी ती सोहमला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.डॉक्टरने सोहमची चांगलीच कान उघाडणी केली. त्याला औषध लिहून देऊन दोन दिवस आराम करायला सांगितला.

 

            त्याच दिवशी संध्याकाळी सोहमने काही फाईल्स मागवल्या म्हणून दिलजीत फाईल्स घेऊन आला. सोहम झोपला होता त्याला उठवून सावीने चहा करून आणला. दिलजीत बोलत होता.

 

दिलजीत,“ ये रही आपने मँगवाई हुई फाइल्स ! अब आपका पैर कैसा हैं सर?”तो फाईल्स ठेवत म्हणाला

 

सोहम,“ thanks दिलजीत!अब थोड़ा ठीक हैं! लेकिन मैं दो दिन के बाद ही ऑफिस आ पाऊंगा!” सोहम म्हणाला.

 

दिलजीत,“ आप भी ना सर! बच्चों ने जीद की और आप भी निकल पड़े खेलने फुटबॉल! अभी अभी तो आप इतने बड़े  एक्सीडेंट से रिकव्हर हुए हैं!अभी भी आपको ऐतिआत बरतनी चाहिए!” तो काळजीने बोलत होता.

 

सावी,“ अब इन्हें कौन समझाएं आप ही कुछ समझाएं मेरी तो कुछ सुनने से रहे! बच्चों के साथ बच्चे बन जाते हैं! आपके सोहम सर!”ती तक्रार करत सोहमकडे पाहत म्हणाली.

 

    सोहम सावीला नजरेनेच गप्प बस असं सांगत होता.

 

दिलजीत,“  वैसे सर को बच्चों से बड़ा लगाव हैं! आप अपना बच्चा कर ही लो अब भाभीजी! मेरे पत्नी भी प्रेगनंट हैं! सातवा महिना चल रहा हैं! कुछ काम सही वक्त पर हो जाने चाहिए। जैसे बच्चे शादी के दो साल में!” तो सहज बोलत होता.

 

        पण हे ऐकून सोहमचा चेहरा एकदम उतरला व तो सावीला पाहून तिरकसपणे म्हणाला.

 

सोहम,“ बच्चे तो दूसरों के ही अच्छे दिलजीत!”तो असं म्हणून बेडरूममध्ये निघून गेला.

 

दिलजीत,“ मैंने कुछ गलत कहा क्या भाभीजी जो सर ऐसे चले गए?” दिलजीतला मात्र सोहम असं का वागला हे कळत नव्हते.

 

         सावीला मात्र सोहम असं का वागला याची पूर्ण कल्पना होती.ती दिलजीतला सारवासारव करत म्हणाली.

 

सावी,“ नहीं नहीं!वो उनका पैर दुख रहा हैं तो ज्यादा देर बैठा नहीं जाता उनसे!”ती म्हणाली.

 

दिलजीत,“ अच्छा! मैं भी अब चलता हूँ!” दिलजीत निघून गेला.

 

      दिलजीतच्या बोलण्याने सोहमच्या जुन्या जखमेवरची खपली निघाली होती आणि ती जखम आज पुन्हा भळभळत होती. सोहमने बेडरूमचे दार आतून बंद केले होते. एकीकडे सावीला मात्र त्याची काळजी वाटत होती तर दुसरीकडे सोहमला तिनेच दिलेल्या आणखीन एका डागणीचा तिच्या मनात अपराधी भाव पुन्हा जागृत झाला होता.  तरी सावीने आवंढा गिळला आणि सगळा धीर एकवटून बेडरूमच्या दारावर तिने नॉक केले आणि ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

 

सावी,“ सोहम दार उघड ना!मला खूप काळजी वाटतेय तुझी!” ती म्हणाली.

 

सोहम,“ please savi leave me alone! तू काळजी नको करुस मी ठीक आहे.मला थोडा वेळ एकट राहायचं आहे” तो आतून म्हणाला.

 

सावी,“ ठीक आहे. मी जेवायला तुला बोलवेण!” ती डोळे पुसत म्हणाली.

 

      सावीच्या मनाचे वारू आज पुन्हा चौफेर उधळत होते.तिला अपराधीपणाची भावना आतून पोखरुन काढत होती. आपण किती चुका केल्या आहेत.याची प्रकर्षाने जाणीव होत होती.पश्चात्ताप होत होता. ती स्वयंपाक करत होती पण तिचे मन मात्र थाऱ्यावर नव्हते. तिने स्वयंपाक केला आणि सोहमला हाक मारली. सोहम आला पण तो अपसेट  दिसत होता. त्याचा चेहरा ही उतरला होता. तो सावीला काहीच न बोलता उगीच जेवायचं म्हणून जेवला कारण त्याची जेवण्याची इच्छा नव्हती. पण तो जेवला नाही तर सावी ही जेवणार नाही हे त्याला माहित होते. तो जेवला आणि काहीच न बोलता बेडरूममध्ये निघून गेला.सावी आवरून रूममध्ये गेली तर सोहम औषध घेऊन झोपला होता. सावी बेडवर सोहम जवळ जाऊन बसली. सोहम गाढ झोपला होता. सावीने त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवला आणि बोलू लागली.

 

सावी,“ I am sorry सोहम! खरं तर मी तुझी कशा कशाची माफी मागू आणि तू तरी मला कशा कशासाठी माफ करणार रे? शेवटी तू ही माणूसच आहेस ना! कोणत्या कोणत्या गोष्टी विसरणार रे तू? मी तुला इतकं दुःख दिलय की तू माझं तोंड ही पाहू नयेस! पण तू इतका चांगला आहेस की तू माझ्याशी तरी ही चांगला वागतोस! खरंच मी तुझ्या लायक नाही सोहम! मी नाही देणार त्रास तुला अजून! निघून जाईन मी तुझ्या आयुष्यातून!” ती असं म्हणत होती तो पर्यंत सोहमने झोपेत तिचा हात धरला. सावीने तिचा हात अलगद त्याच्या हातातून सोडवून घेतला.

 

 ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली.पण काही केल्या तिला झोप येत नव्हती.ती उठून बसली. एकदा सोहमकडे पाहिले. तो अगदी शांत एखाद्या लहान मुला सारखा झोपला होता. माणूस तेव्हाच गाढ झोपू शकतो जेंव्हा त्याने कधीच कोणाचा कोणताच अपराध केला नसेल!  ज्या माणसाने चुका केलेल्या असतात ज्या माणसाने एखाद्याला दुखावलेले असते तो शांत झोपू शकत नाही त्याला शांत झोप लागतच नाही. दिवसाच्या गोंगाटात माणसाच्या मनातील आवाज कुठे तरी दाबला जातो. पण दिवस जसा मावळतीला लागतो आणि रात्र तिचे गारुड पसरायला लागते तस-तसं माणसाच्या मनातील अपराधी भाव जागृत होतो. रात्रीची शांतता त्याचे मन अस्वस्थ करते जसे आपण शांत पाण्याला धवळल्यानंतर तळाशी असलेला  साठलेला गाळ वर येतो तसेच रात्रीच्या शांततेमध्ये माणसाचे मन ढवळून निघते  आणि त्याचे अपराधी भाव त्याला झोप येऊ देत नाहीत तसेच काहीसे आता सावीच्या बाबतीत घडत होते. 

 

        सावी पुन्हा तिच्या ही न कळत पुन्हा भूतकाळ गेली. 

 

      सावी दोन दिवस झाले तिची कलीग आणि फ्रेंड श्वेताच्या गावी आठ दिवस राहून आली होती. श्वेता बरेच दिवस तिच्या मागे लागली होती की धुळ्याला माझ्या गावी चल! तिच्या गावी कसली तरी पूजा होती. सावीने सोहमला विचारले सोहमने ही आढेवेढे न घेता तिला जाऊ दिले होते. पण तिकडून आल्या नंतर सावी जरा थकलेली आणि उदास वाटत होती.दोन दिवस झाले ती ऑफिसला ही गेली नव्हती तिने तिची रजा वाढवून घेतली होती.सोहमने तिला विचारले ही

 

सोहम,“ सावी काय झालंय तुला! मी  तू आल्यापासून पाहतोय तू थकलेली आणि उदास दिसत आहेस! तुझी तब्बेत ठीक नाही का आपण डॉक्टरकडे जाऊयात का?” तो काळजीने तिच्या कपाळाला हात लावून विचारत होता.

 

सावी,“ काही नाही रे! जरा प्रवासामुळे आणि पाणी,हवामान बदलले ना त्यामुळे  थकवा आलाय आणि तब्बेत ही जरा बरी नाही.मी जाईल हॉस्पिटलमध्ये तू जा ऑफिसला!” ती म्हणाली.

 

सोहम,“ मी येतो तुझ्या बरोबर चल हॉस्पिटलमध्ये!” तो काळजीने बोलत होता.

 

सावी,“ काही गरज नाही मी जाईन! तू जा बरं ऑफिसला!” ती वैतागून म्हणाली.

 

सोहम,“ बरं बरं चिडू नकोस! मी आल्यावर मला सांग काय ते!” असं म्हणून तो ऑफिसला निघून गेला.

 

       संध्याकाळी सोहम आला तर सावी झोपली होती.तिला न उठवताच  तो फ्रेश झाला आणि त्याने कॉफी केली. मग सावीला उठवले. सावी उठली फ्रेश झाली.कामवालीबाई स्वयंपाक करून गेली. रात्री दोघे जेवले.सोहमने सावीला हॉस्पिटलमध्ये गेली होतीस का विचारले तर सावीने हो असे उत्तर दिले.

       सोहम त्याच्या कामाची कसलीशी फाईल त्याला सापडत नाही म्हणून ती फाईल शोधत होता.सावी काही तरी वाचत होती. सोहमला सावीच्या वोडरोबमध्ये कसलीशी फाईल सापडली आणि तो आनंदाने सावीला म्हणाला.

 

सोहम,“ सावी!  Are you pregnant? सावी मी खूप खुश आहे!पण तू मला का नाही सांगितलंस? अच्छा म्हणून तुझी तब्बेत ठीक नाही तर! मग तू कशाला गेलीस एवढ्या लांबच्या प्रवासाला  श्वेता बरोबर! वेडी आहेस का तू या अवस्थेत प्रवास करू नये! मी पहिल्यांदा ही बातमी आई-बाबांना देतो मग आईंना सांगतो!” तो आनंदाने बोलत होता.

 

       सावी मात्र खूपच चिडली आणि त्याला ओरडून म्हणाली.

 

सावी,“ will you please shut up! तू कोणाला ही फोन करणार नाहीस!” ती चिडून त्याच्या हातातून मोबाईल काढून घेत म्हणाली.

 

सोहम,“ अग इतकं चिडत का आहेस?” त्याने आश्चर्याने विचारले.

 

सावी,“ कारण मी प्रेग्नन्ट होते आता नाही!” ती बेडवर बसत म्हणाली.

 

सोहम,“ म्हणजे?” त्याने विचारले.

 

सावी,“ मी अबोर्शन करून आले. पण मला आता पश्चात्ताप होत आहे! ” ती अपराधीपणे म्हणाली.

 

सोहम,“ काय? काय बोलते आहेस तू सावी हे! म्हणजे तू श्वेता बरोबर त्यासाठी तर! O my god! सावी तू अस कसं करू शकतेस त्या मुलावर माझा ही हक्क होता. तुझे एकटीचे मूल नव्हते ते या साठी मी तुला कधीच माफ करणार नाही!” तो रागाने बोलत होता.

 

सावी,“ अच्छा तुझा ही हक्क होता का त्याच्यावर पण सगळं सहन तर मलाच करावं लागणार होतं सोहम!  तुम्हा पुरुषांच काय रे तुम्ही सगळं करून मोकळे होता पण स्त्रीला सगळं सहन कराव लागत. नऊ महिने पोटात वाढवावं लागत मूल त्या नंतर त्याला जन्म द्यायच्या यातना सहन करायच्या या सगळ्यात करिअरची आणि शरीराची वाट लागते ती वेगळीच आणि करिअरच्या या टप्प्यावर मला ही जबाबदारी नको होती.म्हणून मी हा निर्णय घेतला! पण मला आता खूप पश्चात्ताप होत आहे” ती रडत  बोलत होती.

 

सोमह,“ निर्णय घेतलास? अग असा निर्णय घेण्याचा अधिकार तुझा एकटीचा नव्हता सावी! त्या मुलाचा बाप होतो मी! तुला मला एकदा ही सांगावस वाटलं नाही आणि करिअरवर असा काय परिणाम झाला असता ग तुझ्या? का प्रेग्नन्ट स्त्रिया काम करत नाहीत का? अगदी आठव्या महिन्या पर्यंत काम करतात की स्त्रिया आणि त्यानंतर मेटर्निटी लिव्ह मिळतेच की! आणि मी आईला बोलवून  घेतले असते की तिने आनंदाने सगळं केलं असत ग आपल्या मुलाचे! पण तू  तर खून केलंस माझ्या मुलाचा! You are a murderer! तुझ्या आईने ही असच म्हणलं असत ना तर तुझा जन्म झालाच नसता की अग त्यांनी तर अदु असून तुला जन्म दिला ना! आणि एकट्या त्यांनी तूच संगोपन केलं तुला काही कमी पडू दिल नाही! तू काय केलंस ग? काय ग तू पुरुषां बद्दल सतत बोलत असतेस? स्त्री जेंव्हा त्याच बाळ पोटात वाढवत असते तेव्हा पुरुषाच्या ते बाळ मनात वाढत असत.त्याच्या अस्तित्वाचा भाग असत ते बाळ! तो ही स्त्री बरोबर एक-एक क्षण जगत असतो. स्त्री मुलाला जन्म देण्याच्या यातना सहन करते सावी पण  लेबर रूमच्या बाहेर तो ही त्या यातना मनातून सहन करत असतो त्याच्या मनाची तगमग त्याची अवस्था तुला काय कळणार? स्त्रीचे नाते बाळाशी त्याच्या जन्माच्या आधीच जोडले जाते त्यामुळे तिला बाळाला आपलस करायला जास्त काहीच करावं लागतं नाही पण पुरुषाला बाळ त्याच असून ही त्याला आपलं करायला खूप काही करावं लागतं. तुला काय कळणार म्हणे बाप काय असतो ते?” तो तावातावाने बोलत होता.

 

सावी,“ mind your language! हो मला नाही माहीत बाप कसा असतो ते कारण मी बापाच्या रुपात  एक राक्षस पाहिला. म्हणूनच मला पुरुषांचा तिटकारा येतो!” ती चिडून म्हणाली.

 

सोहम,“अच्छा मग लग्न का कसेल माझ्याशी ते ही प्रेम करून सावी?मी ही पुरुषच आहे की!” तो मोठ्याने ओरडला.

 

सावी,“ I am sorry! मला तसं म्हणायचे नव्हत सोहम आणि मी केले अबोर्शन पण मला स्वतःलाच अपराधी वाटत आहे.मला पश्चात्ताप होतोय सोहम त्याचा! I am sorry!” ती असं म्हणून खाली बसून रडू लागली.

 

सोहम,“  त्याचा काहीच उपयोग नाही सावी आता आणि सॉरी तर तू म्हणूच नकोस कारण मी तुला यासाठी  कधीच माफ नाही करू शकणार!” तो असं म्हणून निघून गेला.

                सोहम  अर्धी रात्र होऊन गेली तरी घरी आलाच नाही सावीने त्याला खूप फोन केले पण त्याने तिचा फोन उचलला नाही ती आदित्यला फोन करणार तो पर्यंत डोर बेल वाजली. तिने तर उघडले तर सोहमचा एक कलीग त्याला घेऊन दारात उभा होता. त्याने सांगितले की कधी तरी लिमिटमध्ये हार्ड ड्रिंक घेणारा सोहम आज त्याने लिमिटच्या बाहेर घेतली आहे.असं म्हणून तो सोहमला सावीच्या हवाली करून निघून गेला. सोहम पूर्णपणे नशेत होता. सावी त्याला रूममध्ये घेऊन गेली आणि त्याचे बूट काढून, कपडे बदलून व्यवस्थित पांघरून घालून त्याला झोपवले. सोहम दुसऱ्या दिवशी सावीशी काहीच न बोलता आणि न खाता निघून गेला. सावीने त्याच्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण सोहम काहीच बोलला नाही! संध्याकाळी सोहम आला तो पॅकिंग करू लागला न राहवून  सावीने त्याला विचारले

 

सावी,“ सोहम कुठे निघाला आहेस तू?”

 

सोहम,“ मी पंधरा दिवसासाठी जर्मनीला चाललो आहे ऑफिसच्या कामासाठी!” तो तिच्याकडे  न पाहताच त्रोटक बोलला.

 

सावी,“ पण जर्मनीला तर प्रमोद जाणार होता ना?” तिने विचारले.

 

सोहम,“ त्याच आत्ताच लग्न झालं आहे आणि बायकोला घेऊन या टूरला तो नाही जाऊ शकत म्हणून मी जात आहे त्याच्या ऐवजी!” तो त्रोटकपणे पुन्हा उत्तरला.

 

सावी,“ प्लिज सोहम नको जाऊस ना मी नाही राहू शकणार तुझ्या शिवाय! I am so sorry मी नाही करणार पुन्हा अस काही प्लिज” ती त्याला मिठी मारून रडत बोलत होती.

 

सोहम,“ आठ दिवस गेली होतीस  तेंव्हा राहिली होतीस ना माझ्या शिवाय मग आता ही राहा!” तो असं म्हणून तिच्या पासून  स्वतःला सोडवून घेत बॅग घेऊन  निघून गेला.

 

      त्या नंतर सोहमने सावीला जवळ-जवळ दहा दिवस फोन केला नाही आणि तिचा फोन ही घेतला नाही. अकराव्या दिवशी तिचा फोन त्याने उचलला

 

सावी,“ I am so sorry Soham! अजून किती दिवस तू मला शिक्षा देणार आहेस.I can't live without you! Please forgive me!   I will never do this mistake again!”ती रडत बोलत होती.

 

सोहम,“ ठीक आहे.” तो इतकंच म्हणाला.

 

          सावीला हा सगळा विचार करत आणि आठवत रात्री केंव्हा तरी झोप लागली. तिला सकाळी जरा उशिराच जाग आली तर सोहम ही अजून उठला नव्हता. आज तसं ही सोहम ऑफिसला जाणार नव्हता.तिने उठून नाष्टा बनवला.तो पर्यंत सोहम तयार होऊन आला. सावी त्याला म्हणाला. 

 

सावी,“ you are alright?” तिने काळजीने विचारले.

 

सोहम,“ yes I am! मला काय झालं?” तो हसून म्हणाला.

 

सावी,“ काल तू अपसेट होतास म्हणून विचारले!” ती चाचरत म्हणाली.

 

सोहम,“ सोड ना सावी! बरं आज काय स्पेशल करणार आहेस? तेच तेच खाऊन कंटाळा आला मला! नाही म्हणजे तो सध्या घरात असतेस म्हणुन (काही तरी आठवून) सावी तू जॉबच काय केलंस इतक्या दिवसाची  लिव्ह कशी मिळाली तुला की जॉब सोडलास तू?” त्याने विचारले.

 

सावी,“आज का? तुझ्या आवडीचे काही तरी करते! तो पर्यंत चहा घे आणि हा शिरा खा! जॉब मी रिजाईन केला! इथूनच मेल पाठवला होता ऑफिसला करत नव्हते ते एक्सेप्ट पण मी येणारच नाही म्हणल्यावर मग केला एक्सेप्ट त्यांनी!” ती म्हणाली.

 

 सोहम,“ का सोडलास जॉब सावी तू? किती मेहतीने C. E. O. च्या पोस्ट पर्यंत पाहोचली होतीस तुला मी किती वेळा सांगितले की तू जा म्हणून!” तो बोलत होता.

 

सावी,“ झालं तुझं पुन्हा गुऱ्याळ सुरू जा जाचे! मी जाणारच  आहे  अजून फक्त अडीच महिने सहन कर मला! आणि जॉबच म्हणशील तर तू का सोडलास रे तुला तर  ज्युनिअर मॅनेजरची पोस्ट मिळाली होती ना! मला सांगितलंस तरी का एकदा!” ती म्हणाली.

 

सोहम,“ बरं ते जाऊदे! मी मदत करू का काही तुला?” तो प्रश्न टाळत हसून म्हणाला.

 

सावी,“तू ना एकच मदत कर मला फूटबॉल खेळू नकोस वर्ष भर तरी!” ती हात जोडून नाटकीपणे  म्हणाली आणि दोघ ही त्यावर हसले.

 

           कधी कधी माणूस नात्यात अक्षम्य चुका करत असतो पण ज्याला नाते टिकवायचे असते तो त्या चुकांना ही क्षमा करत असतो. सावीने अबोर्शन करून केलेली अक्षम्य चूक देखील सोहमने माफ केली होती कारण त्याचे सावीवर प्रेम होते आणि त्याला त्यांचे नाते टिकवायचे होते 

 

मग  असे काय झाले की सोहमने  सावीशी फारकत घेण्याचा निर्णय  घेतला? असे काय घडले होते त्या रात्री? आणि सावीने तिच्या वडिलांचा उल्लेख राक्षस म्हणून केला तिच्या आयुष्यात असे काय घडले होते की ती इतक्या वर्षांनी ही तिच्या मनात पुरूषां विषयी अढी होती?आता त्याचे नाते पुढे काय कलाटणी घेणार होते? सोहमचा निर्णय लवकरच करणार होता.

 

 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule