Login

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १७)

This is a love story of before marraige and after marriage

     सोहमने गाडी थांबली आणि सावी भानावर आली. सावी गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली.

सावी,“ इथे का थांबवलीस सोहम गाडी? घरी चल ना!” 

सोहम,“ अग जरा बसूयातना गार्डनमध्ये मला एकट किंवा उदास वाटलं की मी इथे येऊन बसायचो! त्या दिवशी नाही का तुझ्याशी भांडून इथेच आलो होतो!” तो गाडीतून उतरूत म्हणाला.

सावी,“ हो ना तू आलास भांडून इथे पण माझी पाचावर धारण बसली होती की! तुला इथे पाहिले आणि जीवात जीव आला माझ्या!” ती त्याच्या मागे जात म्हणाली.

सोहम,“ आजकाल खूपच घाबरट झालीस तू सावी!” तो बेंचवर बसत म्हणाला.

        सावी त्यावर काहीच बोलली नाही आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. थोडावेळ शांततेत गेला. दोघे ही शांतच होते.मग सोहमने बोलायला सुरुवात केली.

सोहम,“सावी तुला काही विचारायचं आहे मला!” तो तिचा हात हातात धरून म्हणाला.

सावी,“ विचार ना!” ती हसून म्हणाली.

सोहम,“ आज तुला इतकं चिडायला काय झालं होतं ग?  मंगळसूत्र काढ म्हणाल्यावर?” त्याने तिला पाहत विचारलं.

      सावीला हा प्रश्न अनपेक्षित होता.आधी तिने याच प्रश्नाचे उत्तर देऊन गप्प बसवले होते पण आजच्या प्रसंगाने पुन्हा तोच प्रश्न तिच्या समोर आ वासून उभा होता.

सावी,“आधीच सांगून झालय तुला!” ती म्हणाली.

सोहम,“ त्या उत्तराने माझे समाधान झाले नाही!” तो तिला रोखून पाहत म्हणाला.

सावी,“ बरं ऐक मग अजून एकदा सांगते! माझ्या पास्टमुळे माझ्या  मनात लग्न ,प्रेम या बाबतीत चुकीच्या धारणा होत्या काही चुकीचे विचार होते पण ते आता गळून पडले. मला मंगळसूत्र, जोडवी, टिकली हे सगळं बंधन वाटायचं पण ते नुसतं  बंधन नाही तर प्रेमाचे बंधन आहे.तुझ्या आणि माझ्या नात्याची खूण आहे. तुझ्या अस्तित्वाची खूण तुझ्या असण्याची जाणीव आहे सोहम! तू I .C.U मध्ये मृत्यशी झगडत असताना मला या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव झाली. तुझं असणं हा माझ्याच अस्तित्वाचा एक भाग आहे आणि त्याची हे मंगळसूत्र ही खूण! ती मला आता कोणत्याही कींमतीवर माझ्या पासून वेगळी नाही करायची समजलं का तुला!” ती डोळ्याच्या कडा पुसत म्हणाली.

सोहम,“O my god! सावी एका घटनेने माणूस त्याचे विचार  इतके  बदलू शकतात it's unbelievable! पण सावी जे नाते अस्तित्वातच राहणार नाही त्याची खूण तू जपून काय करणार आहेस?” त्याने तिला निरखुन पाहत विचारले. जणू तिची परीक्षाच घेत होता तो!

सावी,“ माझ्याशी नाते ठेवायचे की नाही हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे सोहम पण नाते हे दोघांचे असते. ते एकाने तोडून तुटत नाही. तू जरी माझ्याशी नाते तोडले तरी मी मात्र माझ्या बाजूने ते कधीच तोडणार नाही सोहम!” ,तिने ठामपणे उत्तर दिले. 

     

  सोहम या तिच्या उत्तरावर काहीच बोलला नाही. थोडावेळ शांततेत गेला पुन्हा सावीने सोहमला विचारले.

सावी,“ सोहम तू त्या दिवशी मला का वाचवलेस रे? म्हणजे बघ स्वतः चा जीव तू धोक्यात घातलास आणि मला वाचवलेस पण त्या दिवशी माझा अपघात झाला असता तर सगळेच प्रश्न सुटले असते की कारण मला ढकलताना तुझा इतका गंभीर अपघात झाला पण मी जर गाडी समोर असते तर तिथेच गेले असते ना!” ती त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांचे निरीक्षण करत म्हणाली.

सोहम,“ त्या दिवशी ही मी तुला सांगितलं सावी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती. जी माझ्याकडून घडली. पण मीच त्या अपघातात गेलो असतो तर असं ही माझे वाचण्याचे चान्सेस कमी होते म्हणे. तर तू काय करणार होतीस. हे बघ प्रॅक्टिकली विचार केला तर कोणाच्या जाण्याने कोणाचे ही आयुष्य संपत नसते.माणूस थोडे दिवस दुःख करतो मग हळूहळू रुटीनला लागतो आणि वर्ष दोन वर्षात जाणाऱ्या व्यक्तीला विसरून जातो. तर नात्यांच्या अस्तित्वाचे काय घेऊन बसलीस तू! मी तुझ्याशी नाते तोडले तर तू एक दोन वर्षे दुःख कुरवळशील पण पुन्हा नव्याने जगू लागशील! माणूस आहे तो पर्यंत त्याचे अस्तित्व आहे तसेच नात आहे तो पर्यंत त्याचे अस्तित्व आहे.” त्याने शिताफीने सावीने विचारलेल्या प्रश्नाला बगल देऊन तिच्या समोर एक नवीन प्रश्न उभा केला होता.

सावी,“ नुसतं श्वास घेणं म्हणजे जगणं नसत सोहम! आणि असलं अभद्र परत मी नाही ऐकून घेणार तुझ्याकडून! आणि माझ्या बाजूने नात्याचं मी काय करायचं ते मी पाहीन तू तुझ्या निर्णय घ्यायला मोकळा आहेस समजलं! तू बस इथेच मी जाते चालत! तुला गाडी घेऊन यायचं तेंव्हा ये!” ती रागाने  बोलली आणि उठली.

      सोहमने तिचा हात धरला आणि तिला ओढून पुन्हा स्वतः जवळ बसवली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढत म्हणाला.

सोहम,“ हे बरं आहे तुझं तू बोललेल सगळं चालत आणि मी काही बोललो की ते अभद्र का?” तो तिला अगदी जवळ जाऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

सावी,“ सोड सोहम मला पब्लिक प्लेस आहे ही आपलं घर नाही आणि तूच म्हणतोस ना मला वाचवणे ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजेच अनवधानाने झालेली एक क्रिया होती बाकी काही नाही मग तुला माझ्याबद्दल काहीच वाटण्याचे कारण नाही मी जगेन मरेन काय फरक पडतो तुला चार महिन्यांचा तर प्रश्न आहे सोहम! त्यानंतर  तू मोकळा आहेस!” ती त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत म्हणाली. 

     तीच मन आतून आक्रंदत  होत. सोहम म्हण की तुझ्या जगण्या- मरण्याचा मला फरक पडतो. तुला काही होऊ नये म्हणूनच मी तुला वाचवण्याचा  प्रयत्न केला. पण सोहम तिच्या या बोलण्यावर उठून उभा राहिला आणि म्हणाला.

सोहम,“ सावी माझं खूप डोकं दुखतंय चल घरी जाऊ  प्लिज!” तो डोकं धरून म्हणाला.

सावी,“ काय झालं सोहम अचानक तुला चल घरी! तुला नसते विचार पडलेले असतात! मी ड्रायव्हिंग करते आता! घरी गेल्यावर पाहू काय करायचे ते!” ती काळजीने म्हणाली आणि त्याला गाडीत बसवून घरी पोहचली.

      सोहम बेडरूममध्ये जाऊन चेंज करून बेडवर आडवा झाला. सावीने तो पर्यंत त्याला पाणी आणून दिले आणि तिने चेंज केले. ती काळजीने त्याच्या उशाशी बसली आणि त्याच्या केसातून  हात फिरवत  म्हणाली.

सावी,“ खूप दुखतंय का सोहम आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ या का?” तिने काळजीने विचारले.

सोहम,“ अग त्याची काहीच गरज नाही डोकं दुखतंय म्हणजे ते स्टीचेस ठणकतात  ग अधून मधून डोक्याचे ही आणि हाताचे ही!” तो म्हणाला.

सावी,“ काय! मग हे आधी तुला सांगायला काय झालते! किती दिवस झाले दुखते?" त्याचा हात आणि कपाळावरचे बरे झाले  स्टीचेस पाहत  काळजीने म्हणाली.

सोहम,“ relax! सावी अग लागलय म्हणाल्यावर दुखणारच ना आणि जखम वरून बरी झाली तरी ती आतून बरी व्हायला वेळ लागत असतो. त्यामुळे दुखते.त्यात काय इतकं!” तो तिला समजावत म्हणाला.

सावी,“हुंम! बरं उद्या आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ काही पेनकिलर दिलं डॉक्टरने तर पाहू!” तिच्या डोळ्यातून आता गंगा-जमुना वाहू लागल्या होत्या.

सोहम,“ त्याची काही गरज नाही ग त्या दिवशी आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होते आणि तू नर्सशी बोलत होती तेव्हाच डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनमध्ये पेन किलर लिहून दिले होते. फक्त दुखल्यावर खाण्यासाठी तू तो मेडिसिन बॉक्स आन मी गोळी घेतो!आणि रडायला काय झालं इतकं ग! इतक्या दुखण्याने मी काय मरणार नाही. स्ट्रॉग आहे मी! हे रडूबाई सारख रडणं बंद कर आधी माझी आधीची डॉमीनेटिंग सावी कुठे तरी हरवली आहे. I really miss  her!”तो नाराजीने बोलत होता.

     तिने उठून मेडिसीन बॉक्स सोहमला दिला आणि पाणी देत त्याला म्हणाली

सावी,“ डॉक्टरने दिलंय पेनकिलर हे  मला कधी सांगणार होतास तू? आणि तोंड बंद कर आता अजून जास्त त्रास होईल तुला!थोड्या वेळाने दूध देते म्हणजे पेनकिलर घेतल्याचा त्रास नाही होणार तुला!” ती काळजीने म्हणाली.

       सोहमने गोळी घेतली आणि तो सावीच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहिला. सावी त्याच्या केसातून हात फिरवत राहिली. थोड्याच वेळाने त्याला झोप लागली. तिने त्याचे डोके हळूच उशीवर टेकवले व किचनमध्ये जाऊन दूध गरम करायला ठेवले.

      सावी  दूध तापेपर्यंत डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसली. आज पुन्हा सावीच्या मनातले विचार आणि आठवणी ताज्या झाल्या होत्या.तळ्यातल्या पाण्यात आपण दगड टाकावा आणि तळ्यात क्षणात गोलगोल तरंग उठावेत   आणि तळ्यात एका क्षणात उलथापालथ व्हावी तसेच सोहमच्या बोलण्यामुळे सावीचे मनपटल पुन्हा ढवळून निघाले होते.तिचा हात अपचुकच तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेला आणि पुन्हा ती भूतकाळात गेली. 

           लास्ट इअरची दुसरी सेमिस्टरची परीक्षा तोंडावर होती. पहिल्या सेमिस्टर मध्ये तर कायम टॉपर असणारा सोहम झालेल्या हल्ल्यामुळे टॉप करू शकला नाही याची खरं तर सगळ्यांना कल्पना होती आणि त्याचे आश्चर्य ही कोणाला वाटले नाही. सगळ्यांना वाटत होत की कायम दुसऱ्या क्रमांकावर असणारी सावी आता टॉप करणार पण प्रत्यक्षात घडलं भलतंच सावी ही या परीक्षेत टॉप नव्हती. दुसरेच दोघे जे कायच तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर असायचे ते या वेळी टॉप टू मध्ये होते. सावीने मुद्दामच सोहमची जागा घेतली नव्हती. सोहम तर काय पाठीच्या जखमेमुळे जास्त वेळ अभ्यास ही करू शकत नव्हता आणि आदित्यने ही त्याला तसं करू दिलं नव्हतं. 

          सोहम चांगलाच जाणून होता की सावीने त्याच्यामुळे पहिला क्रमांक सोडला आहे.  आता मात्र दोघे ही जोमाने अभ्यासाला लागले. आता महिना भरात परीक्षा सुरू होणार होती आणि कॅम्पस इंटरव्ह्यूव्ह उद्या पासून सुरू होणार होते.  सोहमच्या मनात मात्र वेगळीच घालमेल सुरू होती. आता कॉलेज तर संपणार आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात जॉब लागले तर कसं होणार या विचाराने दोघे ही अस्वस्थ होते. मग सोहमनेच न राहवून सावीला फोन केला आणि  संध्याकाळी तिथून जवळच असलेल्या तळ्या काठी तिला भेटायला बोलावले कारण त्याला एकांतात बोलायचे होते.

     उन्हाळ्याचे दिवस होते.संध्याकाळ होती त्यामुळे जरा गार वारा सुटला होता आणि समोरच्या तळ्यावरून येणारे गार वारे  तनाला आणि मनाला सुखावत होते. सावी किती वेळची येऊन सोहमची वाट पाहत होती. सोहम तिथे आला आणि त्याने सावीला त्याच्या आधी येऊन बसलेले पाहिले.आता ही चिडली असणार हे त्याला माहित होते म्हणून तो जवळ जाऊन तिला कॅडबरी देत म्हणाला.

सोहम,“ sorry त्या आद्याला चुकवून यायचे म्हणजे!” 

   सावी त्याला तोंड फुगवून म्हणाली.

सावी,“ नको मला ते तूच खा!  कशाला यायचं ना त्याच्या बरोबरच राहायचं! माझा वेळ वाया गेला. मी निघते असं म्हणून ती उठू लागली तर सोहमने तिला हात धरून पुन्हा बसवले आणि बोलू लागला.

सोहम,“ बस ना sorry ना! किती चिडशील! मला बोलायचे आहे तुझ्याशी!” तो तिचा हात हातात घरून तोंड पाडून म्हणाला.

सावी,“इतकं तोंड पाडायला काय झालं रे! मी काय लगेच निघून नाही जाणार जाते म्हणाले की!”कॅटबरी घेऊन त्याच्या तोंडात घालत ती हसून म्हणाली.

सोहम,“तुझं काय सांगावे तू जाशील ही!” तो म्हणाला.

सावी,“ अच्छा! इतकं ओळखतो तू मला?” ती म्हणाली.

सोहम,“ माहीत नाही किती ओळखतो तुला! बरं ते जाऊदे मला तुझ्याशी बोलायचं आहे  एकांतात म्हणून इथे बोलवले.” तो गंभीर होत म्हणाला.

सावी,“ हुंम बोल ना मग!” त्याच्या दंडाला धरून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.

सोहम,“ सावी महीन्याने आपली परीक्षा होणार आणि मग कायमच कॉलेज बंद आता कँपस इंटरव्ह्यू सुरू होणार आपल्याला वेगवेगळ्या शहरात नोकऱ्या लागल्या तर कसं होणार आपलं सावी!” तो भावूक होऊन बोलत होता.

सावी,“ माझा शोना ग तो! तुला याच टेन्शन आलं आहे! वेडा कुठला? आपण जगाच्या पाठीवर कुठे ही वेगवेगळे गेलो तरी आपलं नात तेच राहणार ना माझ्या शोना! विकेंडला भेटूच की आणि योग्य वेळ आली की सांगू घरी आम्हाला लग्न करायचं आहे म्हणून आणि मोबाईल फोनचा जमाना आहे बच्चा रोज असणारच ना टचमध्ये ” ती हसून दोन्ही हाताने त्याचे गाल ओढत म्हणाली.

सोहम,“किती सहज बोलतेस ना तू तुला काहीच फरक पडत नाही सावी! मी तुझ्या जवळ असण्याने किंवा नसण्याने!” तो तोंड फुगवून म्हणाला.

सावी,“ अच्छा! अजून काय? वेडा आहेस का सोहम? I love you! You are so important for me! अरे मला जर कुठे लांब शहरातली नोकरीची ऑफर आली तर मी नाही घेणार आणि आई ही मला लांब कुठे नाही सोडणार! मी मुबंई किंवा पुणे या व्यतिरिक्त कोठे नाही जाणार! तू का फुकटचे टेन्शन घेत आहेस उगीच! बघ आ मागच्या वेळी मी मुद्दाम टॉपर होणाचा चान्स सोडला आता नाही सोडणार मग! तू टेन्शन घे मी अभ्यास करते!” ती त्याला चिडवत म्हणाली.

सोहम,“love you too!ठीक ठरलं तर मग मी ही मुबंई किंवा पुण्या व्यतिरिक्त कुठेच जाणार नाही कँपस मध्ये नाही मिळाली नोकरी या ठिकाणी तर मग स्वतः शोधू! आणि टॉपर तर मीच होणार तू दुसऱ्या नंबरवरच राहा कायम!” तो ही तिला चिडवत म्हणाला

सावी,“ राहू दे असं ही आयुष्य भर तू माझ्या मागेच राहणार आहेस!” ती डोळे मिचकावत म्हणाली.

सोहम,“ ते कसं काय बुआ?” तिला एका हाताने जवळ ओढत त्याने विचारले.

सावी,“ तू टॉपर असून बुध्दूच राहणार! देवा हाच नमुना माझ्यासाठी होता का? मला तर सौ. सावनी सोहम सरपोतदार व्हायचं आहे मग कोण राहणार मागे?” तिने भुवया उंचावून त्याचा गाल ओढत विचारले.

सोहम,“ बाप रे इतका विचार नाहीच केला की मी कधी! हुंम मला आवडेल तुझ्या मागे राहायला मग! You are so brilliant!” असं म्हणून त्याने नाटकीपणे  तिची पाठ थोपटली.

सावी,“ yes I am!” असं नाटकीपणे म्हणून ती त्याचा हात धरून त्याच्या खांद्यावर विसावली.

          बराच वेळ दोघे तसेच बसून राहिले. त्या नंतर कँपस इंटरव्ह्यूव्ह मध्ये दोघांना ही नशिबाने एकाच शहरात नाही तर एकाच कंपनीत जॉब मिळाला. हा दोघांचे डिपार्टमेंट एक असले तरी सब डिपार्टमेंट वेगळे होते.पण दोघे ही खूप खुश होते. परीक्षा झाल्या नेहमी प्रमाणे सोहमने टॉप केले.त्याला कंपनी कडून जास्त तर सावीला कमी अन्युअल पॅकेज मिळाले होते. पुढे तीन वर्षे दोघ ही एकमेकांना डेट करत राहिले. एव्हाना ऑफिसमध्ये ही सगळ्यांना त्याच्या बद्दल माहिती झाले होते. दोघांचे ही लॉंग ड्राइव्ह, डिनर, विकेंडला फिरायला जाणे हे सगळं सुरूच होते.दोघे ही एकमेकांच्या सहवासात खूश होते. पण दोघांनी ही त्यांची मर्यादा कधी ओलांडली नाही.

       आता दोघांचाही घरून लग्नाचा तगादा सुरू झाला. मग एक दिवस दोघांनी घरी सांगायचे आणि लग्न करायचे ठरवले. कारण आता दोघांना आयुष्य स्थिरता आणि एकमेकांचा पूर्ण सहवास हवा होता. व्हीकेंडला दोघे ही पुण्याला गेले.तिथे सोहमने त्याच्या आई-बाबांना थोडी कल्पना देऊन सावीच्या आईला घेऊन सावीला त्याच्या घरी बोलावले.दोघांना ही धाकधूक होती की हे तिघे कसे रियाक्ट होणार पण त्या तिघेच सावी आणि सोहमला सरप्राईज देणार होते. सोहम जरा गंभीर होत एकदा सावीकडे पाहून म्हणाला.

सोहम,“ आम्हा दोघांना ही तुमच्या तिघांशी  बोलायचे आहे!” तो म्हणाला.

सोहमचे बाबा,“ आम्हाला माहीत आहे तुम्ही दोघे काय बोलणार आहेत ते हेच ना की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुम्हा दोघांना लग्न करायचे आहे?” ते गंभीर असल्याचं नाटक करत म्हणाले.

सोहम,“ पण हे तुम्हाला कस माहिती?”  त्याने आश्चर्यकारकपणे विचारले.

सावीची आई,“ आरे आम्ही आई-बाबा आहोत तुमचे आम्हाला तीन वर्षे आधीच म्हणजे जेंव्हा चाकू हल्ल्याचे प्रकरण झाले तेव्हाच कळले होते की तुमच्यात मैत्री नाही तर प्रेम आहे. तेंव्हा पासूनच आम्ही एकमेकांच्या काँट्याक्ट मध्ये आहोत. बरोबर ना नीताताई?” त्या हसून म्हणाल्या.

सावी,“ मग तुम्ही आम्हाला का विचारले ना?” तिने तिच्या आईला विचारले.

नीताताई,“ कारण तुम्ही अजून शिकत होता. अजून सेटल व्हायचे होतात तुम्ही! म्हणून नाही विचारलं आणि वाटत होतं की तुम्ही दोघे येऊन एक दिवस सांगणार पण कशाच काय? तीन वर्षे झाले तरी काहीच नाही जॉब लागून! मग आम्ही तिघांनी ठरवून तुमच्या मागे लग्नाचा तगादा लावला मग आलात पळत पळत आज!” त्या हसून म्हणाल्या.

 सोहम आणि सावीने लाजून  माना खाली घातल्या.

बाबा,“ मग करणार ना लग्न?काय सोहम काय ग सावी?” ते हसून म्हणाले. तसे दोघांनी ही होकारार्थी मना हलवल्या.

नीताताई,“ मग पुढच्या महिन्याचा मुहूर्त काढला आहे.लग्न विधिवत सगळे रीती रिवाज पाळून होईल! सावी मला माहित आहे तू नास्तिक आहेस पण तूला लग्न धार्मिक पध्द्तीने करावे लागेल! काय मग करणार ना!” त्या म्हणाल्या.

सावी,“.हो ठीक आहे.” तिच्या आईकडे पाहून म्हणाली

बाबा,“ मग बाकी सगळं आम्ही पाहू पण तुमच्या तुमच्या कपड्याची खरेदी आणि सोहम मंगळसूत्राची खरेदी तुम्ही दोघांनी करायची आता इथे करा नाही तर मुंबईत ते तुमचं तुम्ही ठरावा.” ते म्हणाले.

नीताताई,“ आणि हो लग्नाला महिना भराची सुट्टी काढा!लग्नाच्या आठ दिवस आधी पासून!”

  सोहम आणि सावीने नुसती होकारार्थी मान  हलवली कारण दोघांच्या ही मनासारखे सगळे घडत होते.त्यामुळे दोघांच्या ही मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. दोघांची एकमेकांना बोलण्याची चुळबूळ चालली होती. त्याची नेत्रपल्लवी पाहून सोहमचे बाबा हसून सोहमला म्हणाले.

बाबा,“सोहम जा सावीला आपले घर दाखव!”

      तसा सोहम पडत्या फळाची आज्ञा मानून उठला. सोहमचे घर तास थ्री.बी.एच. के. ऐसे पैस बंगला होता. पुढे छोटीशी बाग आणि पार्किंगला जागा, खाली मोठा प्रशस्त हॉल,किचन आणि देवघराची वेगळी रूम आणि एक बेडरूम जी सोहमच्या आई बाबांची होती. वरती दोन बेड रूम होत्या. एक सोहमची आणि एक गेस्ट रूम सोहमने सावीला खालचे सगळे दाखवले आणि वरच्या रूम दाखवायला घेऊन गेला. त्याने सावीला त्याच्या रूममध्ये नेले सावी रूम पाहत होती.अगदी टापटीप आणि व्यवस्थित प्रशस्त रूम होती. मोठा किंगसाईज बेड. एका कोपऱ्यात स्टडी टेबल आणि एक बुक शेल, दोन वोर्डरोब,  सोहमच्या  फोटो फ्रेम, टेनिसच्या रॅकेट भिंतीला लावलेल्या आणि फुटबॉल ही व्यवस्थित एका स्टॅंड मध्ये ठेवलेले होते. एक छोटीशी गॅलरी आणि एक लक्षवेधक मोठी खिडकी होती.  खिडकीला स्लाइडिंगच्या काचा आणि एक माणूस आरामात पाय पसरून बसू शकेल असा कट्टा सावी ती खिडकी पाहू लागली तर सोहम तिच्या जवळ जात तिला म्हणाला.

सोहम,“ मस्त आहे ना ही खिडकी मीच बाबां जवळ हट्ट करून बनवून घेतली आहे ही खिडकी! संधकाळी इथे बसून सनसेट पाहत चहा प्यायची मजाच न्यारी आहे. मुबंईला गेल्यापासून मिस करतोय मी हे सगळं!” तो खिडकीत बसत त्यावरून हात फिरवत म्हणाला.

सावी,“ मस्त आहे रे तुझी रूम!आपण मुंबईत ही तिथे घर घेतल्यावर अशी खिडकी बनवून घेऊ!” ती म्हणाली.

सोहम उठून तिच्या जवळ जात तिला जवळ ओढत म्हणाला.

सोहम,“ तुझी नाही आपली कारण लवकरच ही रूम तुझी ही होणार आहे!”

सावी,“ I am so happy shona!फाईनली  आपण लग्न करत आहोत आणि आपल्याला आपल्या परेन्ट्सला कन्व्हेयन्स करायला लागलच नाही!” ती आनंदानी बोलत होती.

सोहम,“ हो ना! मला तशी धाकधूक होती पण हे लोक तर आपल्या परस्पर सगळं ठरवून मोकळे झाले. आपल्यालाच सरप्राईज दिलं यांनी!” तो ही खुश होऊन म्हणाला.

सावी,“ बरं चल मग खाली खूप वेळ झाला!” ती असं म्हणून त्याच्या हातातला  हात सोडवून घेत म्हणाली.

सोहम,“ अग थांब! असंच जायचं का तोंड तर गोड कर माझं!” तिला जवळ ओढून तिच्या कमरेत हात घालून तो म्हणाला.

सावी,“ चल खाली खूप मिठाई आहे तुला देते आता सोड! कसं वाटत सोहम सगळे खाली बसलेत आणि आपण दोघ असं वर! चल ना!” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

सोहम,“ काही नाही वाटत.तू माझं तोंड गोड कर आधी! मला ती मिठाई नको आहे!” तो तिच्या डोळ्यात पाहत हसून म्हणाला.

सावी,“अच्छा! तू ऐकणार नाहीस तर?” तिने नाटकीपणे त्याच्या गळ्यात हात गुंफत विचारले.

सोहम,“ नाही!” तो म्हणाला.

सावी,“नालायक आहेस तू! ठीक आहे” ती हळूच हसून म्हणाली.

     आणि सोहमने तिच्या ओठांवर ओठ ठेवले. थोड्या वेळाने तो सावीला हळूच कानात म्हणाला

सोहम,“ love you!”

सावी,“ love you too!”असं म्हणून ती त्याच्या मिठीत विसावली.

     बराच वेळ ते दोघे खाली येत नाही म्हणाल्यावर सोहमच्या आईने सोहमला हाक मारली.तसे दोघे भानावर आले आणि सोहम गडबडीत सावीला सोडून निघाला.ते पाहून सावी हसून त्याचा हात धरून म्हणाला.

सावी,“ असा जाणार खाली काय म्हणतील आपल्याला सोहम थांब!”

    असं म्हणून तिने त्याच्या ओठाची लिपस्टिक तिच्या ओढणीने पुसली आणि स्वतःच्या ओठाची लिपस्टिक ड्रेसिंग टेबलच्या आरशात पाहून व्यवस्थित केली. सोहमने डोळा मारला आणि तो हसला. सावीने हे पाहून त्याचा गाल ओढला व दोघे घाईतच खाली पोहचले.

●●●●

 त्या नंतर दोघे मुबंईला गेले. तिथे दोघांनी लग्नाची शॉपिंग सुरू केली आणि रेंटवर घर पाहिले. सोहमने आणि तिने प्रत्येक फंक्शनसाठी मॅचिंग कपडे खरेदी केले. मंगळसूत्र खरेदी करताना मात्र दोघांची धांदल उडाली.किती डिझाईन पाहिल्या तरी  सावीला मनासारखे मंगळसूत्र मिळत नव्हते.शेवटी सोहमला त्या सगळ्या डिझाईन खाली एक मंगळसूत्र दिसले. दोन नाजूक सोन्याच्या हिरेजडीत वाट्या आणि त्या वाट्यांना लागून असणारे छोटे-छोटे सहा हिरेजडित मनी व एक पदरी काळ्या मान्यांची लड नाजूक पण सुंदर असे ते सोन्याच्या तारेत गुंफलेले ते मंगळसूत्र त्याने सावीला दाखवले आणि सावीला ही ते पसंत पडले.

                   सगळी हौस-मौज करून दोघांचे ही लग्न धुमधडाक्यात पार पडले.आदित्यने सावीचा भाऊ म्हणून सावीच्या आई बरोबर तिचे कन्यादान केले आणि सोहमचा कान ही त्यानेच पिळला. त्या नंतर दोघे ही उटीला हनिमूनला जाऊन आले लग्नानंतरचे गुलाबी दिवस दोघे ही एन्जॉय करत होते. घरी आल्यावर सावीने दहा दिवसातच लग्नाचा  चुडा, मंगळसूत्र,जोडवी सगळे काढून ठेवले. नीताताई म्हणजेच सोहमच्या आईला मात्र ते रुचले नाही एक दिवस सावी दुपारची झोपली असताना त्यांनी सोहमला बोलावून घेतले.सोहम त्यांच्या रूममध्ये खाली गेला आणि तो त्यांच्या मांडीवर डोके ठेवून  झोपला आणि म्हणाला.

सोहम,“ काय झालं आई काही बोलायचे होते का तुला?” तो म्हणाला.

नीताताई,“ हो बब्बू तुझ्याशी बोलायचे होते मला” त्या त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या.

         तेव्हढ्यात सावी तिला सोहम रूममध्ये दिसला नाही म्हणून त्याला शोधत नीताताईच्या रूम पर्यंत पोहचली पण त्या दोघांचे बोलने ऐकून आत न जाता तिथेच थबकली.

सोहम,“बोल ना मग आई!” तो म्हणाला.

नीताताई,“ काय हे बब्बू सावीने दहा दिवसातच मंगळसूत्र,लग्नाचा चुडा सगळं काढून ठेवलं कमीत कमी महिनाभर तरी ठेवायचं ना! बच्चा असं सगळंच काढून ठेवण चांगलं नसत रे!” त्या नाराजीने म्हणाल्या

सोहम,“ आई आपण सावीला ती जशी आहे तशी स्वीकारली आहे ना मग! तिचा नाही विश्वास या सगळ्या गोष्टींवर! तू म्हणालीस तर ती हे सगळं घालेल ही पण मनापासून नाही!त्या पेक्षा न घातलेल बरं ना आपण तिला तिची स्पेस देऊया!”तो समजावत म्हणाला.

नीताताई,“ तू म्हणतोस ते बरोबर आहे बब्बू! तिला जेंव्हा मनापासून हे सगळं घालायची इच्छा होईल तेंव्हा ती घालेल! मला फक्त तुमच सुख हवं बच्चा!” त्या त्याचा चेहरा लाडाने कुरवाळत म्हणाल्या.

      सावीने हे सगळं ऐकलं आणि ती तिथून परत फिरली. आपल्याला इतक समजून घेणारा नवरा आणि सासू मिळाली याचा तिचा तिलाच हेवा वाटला. त्यानंतर तिने ही सोहमला आज तागायत ही गोष्ट बोलून दाखवली नाही.

              इकडे सोहमला जाग आली आणि सावी त्याला रूममध्ये दिसली नाही म्हणून तो तिला शोधत किचनमध्ये पोहचला आणि सावी त्याला डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसलेली दिसली.सोहमने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो म्हणाला.

सोहम,“ सावी इतक्या रात्रीची इथे काय करते आहेस?” त्याच्या आवाजाने आणि स्पर्शाने सावी भानावर आली.

सावी,“ अरे तुझ्यासाठी दूध गरम करायला आले होते.” दुधाची आठवण झाल्यावर ती पटकन उठली.गॅस बारीक असल्याने दूध उतू गेले नव्हते पण थोडे आटले होते.

     तिने दूध ग्लासमध्ये ओतले आणि सोहमला देत म्हणाली.

सावी,“ दुखायचे कमी झालं का रे आता? तू तुझी चिडचिड बंद कर सोहम! त्याचा तुलाच त्रास होतो!” ती काळजीने बोलत होती.

सोहम,“ हुंम! पण हे दूध आणि कशाला? मी जेवलो आहे ना!” तो ग्लास पाहून तोंड वाकड करत म्हणाला.

सावी,“नखरे बंद कर तुझे आणि पी ते पेनकिलरने पोटात आग होते सोहम!” असं म्हणून तिने त्याचा हात धरून ग्लास त्याच्या  तोंडाला लावला. दूध पिऊन तोंड वाकड करत सोहम तिला म्हणाला.

सोहम,“ झालं ना समाधान तुझं चल आता झोपायला! अकरा वाजून गेले आहेत बघ!” तो म्हणाला.

सावी,“ हो चल!” म्हणून तिने दूध झाकून ठेवले आणि लाईट बंद केली.

        थोड्याच वेळात सोहम गाढ झोपला. सावी मात्र जागीच होती.झोपलेल्या सोहमच्या केसातून हात फिरवला त्याला पाहत आणि पुन्हा विचारात गढली. तिचा हात पुन्हा अपचुकच मंगळसूत्राला गेला. सोहम आज म्हणत होता तशी मी  खूपच बदलली आहे का? तो म्हणतो मी रडूबाई झाले खरं तर मी बदलले तर आहेच या दुर्घटघटनेमुळे   सबाह्य! सोहमच्या बाबतीत जरा जास्तच पजेसीव आणि ओहर प्रोटेक्टिव्ह झाले मी!  पण मी तर काय करू मला नाही आता सहन होत याला कोणता ही त्रास झालेला! काही म्हणा आजकाल स्वारी भलतीच मेहरबान आहे.  का हे मात्र माहीत  नाही? याच्या मनाचा तळ मला गाठता येत नाही.

          माझ्यामुळे खूप त्रास सहन केला आहे सोहमने पण आता नाही. खरंच आई म्हणत होत्या ते खरं असेल का? म्हणजे मी सगळे सौभाग्यलंकार काढून ठेवले त्याचा तर परिणाम सोहमवर झाला नसेल ना! लग्नानंतर  या दीड-दोन वर्षात सोहमवर दोन संकटे येऊन गेली. पहिल्या तो डेंगूने किती आजारी पडला आणि आता हा एक्सिडंट! बाप रे आपणच या सगळ्याला जबाबदार आहोत का प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे!

 हा सगळा विचार करून तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले! तिच्या ही नकळत ती सोहमच्या कपळावरून  झोपल्या जागेवरूनच   हात फिरवत होती. त्यामुळे सोहमची झोप चाळवली आणि तो म्हणाला.

सोहम,“  झोपू दे ना सावी खूप झोप येतेय!” असं म्हणून त्याने सवयी प्रमाणे तिला मिठीत ओढून घेतले.

      सावीने तिचे डोळे पुसले आणि ती त्याच्या कुशीत विसावली.

माणसाचे मन हे खूपच विचित्र रसायन आहे. एकदा त्यात अपराधी भावनेने प्रवेश केला की मग ते घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीला स्वतःलाच जबाबदार धरायला लागते. आता ही सावीच्या बाबतीत तेच घडत होते  आपराधीपानाच्या  भावनेतून ती आत्मग्लाणीकडे  वाटचाल करत होती आणि ही आत्मग्लाणी  तिला कुठे घेऊन जाणार होती ते मात्र काळच  ठरवणार होता.  

     सोहम त्याच्या बाजूने खरच हे नाते संपवणार होता का?  सावीला वाटत होतं तसं त्याच निर्णय झाला होता का? खरंच सावीला वाचवणे ही सोहम म्हणत होता तशी त्याची प्रतिक्षिप्त क्रिया होती? पण मग एक वचन निभावण्यासाठी कोणती ही व्यक्ती इतकं सगळं करू शकेल? 


 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

©Swamini (asmita) chougule