Login

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १४)

This is a love story of before marriage and after marriage

     सोहम थोड्या वेळाने उठून बाहेर गेला.त्याने ऑफिसमध्ये फोन करून मी दुपारून येईन असे सांगितले. सावीने सोहमचे सगळे बोलणे ऐकले होते. ती समाधानाने कुस बदलून झोपली पण तिचा राग अजून ही शांत झाला नव्हता. तिला अजून झोप लागली. सोहम हळूच आवाज न करता अंघोळ करून त्याचे आवरून पुन्हा हॉलमध्ये गेला. तो पर्यंत कामवाली बाई आली होती. सावीने स्वयंपाक करण्यासाठी तिला लावू दिली नव्हती. बाकी सगळी कामे ती करत असे आज सोहमने तिला सांगून स्वयंपाक आणि नाष्टा ही करवून घेतला.कामवाली गेल्यावर त्याने चहा केला आणि चहा आणि नाष्टा सावीसाठी तो बेडरूममध्ये घेऊन गेला.आता दहा वाजून गेले होते. त्याने टीपॉयवर चहा आणि नाष्ट्याचा ट्रे ठेवला.सावी अजून ही झोपलीच होती.तिचा मलूल झालेल्या चेहऱ्यावरून सोहमने हात फिरवला त्याचे लक्ष अचानक तिच्या दंडाकडे गेले तर तिच्या दंडावर त्याने करकचून धरल्यामुळे त्याच्याच बोटांचे हिरवे-निळे व्रण   त्याला दिसले आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. आपण काल एखाद्या पशू सारखे वागलो सावीशी याची त्याची त्यालाच लाज वाटली आणि तिला दाबून धरून जबरदस्तीने तिची घुसमट होऊ पर्यंत घेतलेल्या किसची ही त्याला आठवण आली आणि त्याचे लक्ष तिच्या नाजूक ओठांवर गेले. न राहवून त्याने त्याचे बोट अलवार तिच्या ओठांवरून फिरवले आणि तिची झोप चळवळी! तिने डोळे उघडले तसं सोहमने त्याचा हात बाजूला केला आणि न कळत तोंड फिरवून त्याने त्याचे डोळे पुसले आणि पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला.

सोहम,“ उठ सावी फ्रेश हो! आणि नाष्टा करून घे आणि औषध घे! अंघोळ करू नकोस! मी स्पंच बाथ देऊ का तुला? अजून तुझ्या अंगात ताप आहे” तो तिच्या कपाळाला हात लावून काळजीने बोलत होता.

सावी,“ हे बघ तुला माझी काळजी  करण्याची गरज नाही. असं ही जो माणूस स्वतःची काळजी घेऊ शकत नाही. तो दुसऱ्याची काय काळजी घेणार आणि इथून पुढे चार महिने मी या घरात राहीन कारण मी तसा बाबांना शब्द दिला आहे! तुला माझा त्रास नाही होणार मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होईन.माझं माझं काय ते मी पाहून घेईन! तुझ्याशी बोलणार ही नाही काळजी करू नकोस चार महिने झाले की स्वतःच निघून जाईल!” ती  रागाने बोलून उठू लागली तर सोहमने तिला स्वतःच्या मांडीवर जबरदस्तीने बसवून घेतले. तिने उठण्याचा प्रयत्न केला पण सोहमने तिला धरून ठेवले आणि तो तिच्या डोळ्यात पाहून बोलू लागला.

सोहम,“ झालं तुझं बोलून आता मी बोलतो ते ऐक! सॉरी माझं काल खूप चुकलं सावी! मला आलेला राग आणि फस्ट्रेशन तुझ्यावर निघालं! खरं तर ते तुझ्यावर निघायला नको होतं. तुझी काही चूक नसताना मी तुझ्यावर चिडलो! I am really very sorry!  हे बघ इथून पुढे अशी चूक माझ्याकडून होणार नाही आणि हो तुला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होण्याची गरज नाही. इथून पुढे चार महिने तू म्हणशील तसं होईल. मी प्रॉमिस करतो तुला!” तो डोळ्यात पाणी आणून तिला बोलत होता.

सावी,“ खरं का? प्रॉमिस ना?” तिने समोर हात करत विचारले.

सोहम,“ हो माझी आई प्रॉमिस! आता तरी फ्रेश होऊन नाष्टा कर ना आणि औषध घे!” तो थोडा हसून म्हणाला.

सावी,“ तू जेवलास का काल पासून? मला नाष्टा कर म्हणत आहेस! मला तुझा याच मुळे राग येतो सोहम तू कोणत्या ही गोष्टीचा राग जेवणावर काढतोस आणि स्वतःची आबाळ  करून घेतोस! औषधे पण घेतली नसशीलच! मी ना आता तुझ्या बरोबर हॉस्पिटलच्या वाऱ्या करून कंटाळले बाबा! अजून काही झाले तर निस्तरावे मात्र मलाच लागेल! तो ट्रे घेऊन जा आणि नाष्ट्याच्या दोन प्लेट्स लाव मी आलेच फ्रेश होऊन!” ती त्याचे डोळे पुसत म्हणाली आणि उठली. 

        सोहम मात्र तिच्याकडे  आश्चर्याने पाहून विचारात  पडला. तो विचार करू लागला. ही तीच सावी आहे का जी चिडली किंवा हट्टाला पेटली तर चार दिवस तरी फुगून बसायची आणि चूक माझी असेल तर एखाद दिवस जास्तच आणि हीचा रुसवा काढता काढता माझी मात्र दमछाक व्हायची पण किती ही रुसली फुगली तरी माझे जेवण वेळेवर होईल याची काळजी घ्यायची. अगदी लग्ना आधी ही आणि लग्नानंतर ही कारण तिला माझा स्वभाव माहीत होता. मना विरुद्ध काही झाले किंवा भांडण झाले तरी माझा सगळा राग जेवणावर निघायचा आणि निघतो तरी  तिच्या एका जळजळीत नेत्र कटाक्षाने मी मात्र गुपचूप जेवण करायचो!आणि आज मॅडम माझी चूक असून ही लगेच मानल्या! तिचा रुसवा काढायला मला जास्त काही करावे लागले नाही. सावीमध्ये इतका बदल! तिच्या सारखी कणखर बाई इतकी बदलू शकते का? की माझ्या एक्सिडेंट मुळे ती हळवी झाली आहे. 

         सोहम  तिथेच बसून  विचारात गढून गेला आणि सावी फ्रेश होऊन आली. सोहमला असे तंद्रीत पाहून तिने त्याच्या समोर चुटकी वाजवली आणि सोहम भानावर आला. सावी त्याला पाहून बोलू लागली.

सावी,“ कुठे हरवलास? भूक लागली नाही का रे तुला? मला तर जाम भूक लागली आहे!” ती त्याला पाहत ट्रे उचलून म्हणाली.

सोहम,“ अsss हो चाल नाष्टा करू!” असं म्हणून तो आणि त्याच्या मागे सावी किचनकडे गेले.


 

      दोघांनी नाष्टा केला. सोहमने कोणाला तरी पाठवून डॉक्टरने रात्री सावीसाठी  प्रिस्क्राईप केलेली मेडिसीन्स मागवून घेतली होती. ती आणि डॉक्टरने दिलेली मेडिसीन्स सावीला दिली. आता घड्याळात अकरा वाजले होते. सावीच्या पोटात भर पडली आणि औषधाच्या डोसमुळे तिला आता गुंगी येऊ लागली. ती जाऊन पुन्हा झोपली. सोहमने ते पाहून तिला पांघरूण घातले आणि तो तिच्या जवळच लॅपटॉप घेऊन त्याच काम करत बसला.तो दुपारी सावी बरोबर जेवूनच ऑफिसला जाणार होता आणि त्याला अजून बराच वेळ होता. तेव्हढ्यात साविचा फोन खनखनू लागला. सोहमने लगेच फोनचा आवाज बंद केला आणि सावीची झोपमोड होऊ नये म्हणून तो बाहेर गेला फोन आदित्यचा होता. सोहमने फोन उचलला आणि सावी समजून आदित्य बोलू लागला.

आदित्य,“तो क्या कर रही हैं मेरी झांसी की राणी?” तो हसून म्हणाला.

सोहम,“ तुझी झाशीची राणी झोपली आहे रे!” त्याने आदित्यच्या भाषेतच त्याला उत्तर दिले.

आदित्य,“काय अशी अवेळी कशी झोपली रे ती सोम्या?” त्याने काळजीने विचारले.

सोहम,“ अरे आद्या तिला बरं नाही ताप आला आहे आणि तिचा…..” तो मध्येच बोलायचा थांबला.

आदित्य,“ काय सावी आजारी आहे तिला ताप आलाय आणि तिचा काय? बोलता बोलता का थांबलास सोम्या सांग सावीला आणखीन काय झाले?” तो काळजीने विचारत होता.

सोहम,“ काही नाही रे तिला बरं वाटत नाही.” तो लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.

आदित्य,“ सोम्या उगीच माझा जीव टांगणीला लावू नकोस सांग लवकर सावीला काय झालंय ते? नाही तर तू नाही सांगितले तरी  तिला काय झाले ते जाणून घ्यायचे आणखीन मार्ग आहेत माझ्याकडे!” तो चिडून म्हणाला.

सोहम,“ सावीचा बी.पी ही खूप वाढला होता!” तो आवंढा गिळत म्हणाला.

आदित्य,“ काय? बी.पी तो ही इतक्या कमी वयात…. एक मिनिट सोम्या तू सावीशी भांडला ना? कारण सावी सध्या तरी तुला भांडण शक्य नाही  कारण मी जेंव्हा ही फोन करतो ती तुझ्या काळजीत असल्याचं जाणवत कारण तुझ्या ब्रेनला झालेली इजा! म्हणजे तुच तिच्याशी भांडलास पण सावी खूप कणखर आहे. ती छोट्या गोष्टीच टेन्शन घेऊन आजारी  पडणाऱ्यातली तर मुळीच नाही. म्हणजे मोठ्ठ भांडण झाले असणार तुमच्यात! काय झालं सोम्या बोलतो का आता?” तो सावीच्या काळजीने आणि सोहमवर चिडून बोलत होता.

       सोहमला मात्र कळत नव्हते की आदित्यला सावी आणि त्याच्यात भांडण का झाले? ते कसे सांगावे. तो पाच मिनिटं शांतच होता. त्याच्या शांततेचा अर्थ आदित्यला कळला की भांडणाचे कारण सोहम सांगायला संकचतो आहे. हे त्याने समजून घेतले व तोच मग पुढे बोलू लागला

आदित्य,“ ठीक आहे भांडणाचे कारण नाही सांगायचे तर राहू दे पण भांडलास तूच ना तिच्याशी?” त्याने जाब विचारण्याच्या सुरात विचारले.

सोहम,“ हो मीच भांडलो!” तो अपराधीपणे सांगितले.

आदित्य,“ सोम्या  मला माहित आहे की सावी चुकली पण त्या चुकीची शिक्षा ती गेल्या सात-आठ महिन्यांपासून भोगते आहे बास ना आता! तू पण काय धूतल्या तांदळा सारखा नाहीस सोम्या तू ही खूप चुका केल्या आहेत. तू सावी पासून खूप साऱ्या गोष्टी लपवल्यास तुला मी खूप वेळा सांगितलं की सावीला सांग सगळं पण तू माझं नाही ऐकलस! सावीने दहा चुका केल्या असतील तर तिच्या पाच चुकांना तू जबाबदार आहेस हे विसरू नकोस! तिला तिच्या चुकांनी जाणीव आहे पश्चात्ताप  आहे पण तुझं काय? ती तुझ्या समोर झूकली म्हणजे ती मजबूत आहे असं नाही समजलं का? तिची आई हिमालयात मनःशांतीसाठी गेली म्हणजे तू तिच्याशी कसं ही वागशील आणि तुला जाब विचारणार कोणी नाही असं नाही! तिचा हा भाऊ आहे अजून जिवंत तुला जाब विचारायला कळलं का? आणि तुमच्या नात्या आधीच माझं आणि तीच नात आहे. तीच कन्यादान ही मीच केलय समजलं! तू जर तिला विनाकारण त्रास देणार असशील तर गाठ माझ्याशी आहे समजलं! मी उद्याच्या उद्या घेऊन जाईन तिला मग तेल लावत गेले तुमचे सहा महिने समजलं! तिला तुझ्या सारखे छपन्न सोहम मिळतील समजलं!” तो चिडून बोलत होता आणि सोहम शांतपणे ऐकून घेत होता.

सोहम,“ झालं तुझं धमकावून? का अजून काही सूनावने बाकी आहे मला?झाली आहे माझ्याकडून आता चूक निस्तारेन मी! माफ कर मला! नाही देणार तुझ्या बहिणीला त्रास मी! ” तो रंकुडीला येत म्हणाला.

आदित्य,“ बास रडू नको आता! काळजी घे तिची आणि स्वतःची ही!” तो वरमूण म्हणाला.

सोहम,“हो घेईन मी सावीची काळजी!” तो म्हणाला.

आदित्य,“ फक्त सावीची नाही तर स्वतःची ही! कळतंय का मी काय बोलतोय ते? आणि  सावी उठल्यावर फोन करायला सांग तिला!” तो दम देत म्हणाला.

सोहम,“हो मी स्वतःची ही काळजी घेईन आणि सावीची ही नाही तर मला रहायचं नाही का या पृथ्वीवर! आणि  साहेब तुमचा निरोप ही पोहचवतो मी सावी मॅडम उठल्याकी!” तो ही नाटकीपणे म्हणाला.

आदित्य,“तुझी नौटंकी झाली असेल तर मी फोन ठेवतो.take care!” असं म्हणून त्याने फोन ठेवला.

       सोहमचा आदित्यशी  फोनवर बोलण्यात एक तास गेला होता.आत्ता तर बारा वाचले होते. तो लंच ब्रेक नंतर ऑफिसला जाणार होता म्हणजेच दोन नंतर पुन्हा तो बेडरूममध्ये फोन घेऊन गेला. त्याने फोन टीपॉयवर ठेवला व तो पुन्हा लॅपटॉप घेऊन बेडवर बसला. सावीकडे त्याने एकदा पाहिले तर ती गाढ झोपली होती. ताप आहे का पाहण्यासाठी त्याने सावीच्या कपाळाला हात लावला तर अजून ही तिचे अंग गरम होते. एकच्या दरम्यान त्याने सावीला जेवण करण्यासाठी उठवले व किचनमध्ये निघून गेला.सावी फ्रेश होऊ येऊ पर्यंत सोहमने डायनिंग टेबलवर सगळं व्यवस्थित लावून ठेवलं होतं. ताट ही वाढून ठेवली होती. सावी हे पाहून खुश झाली आणि ती सोहमला म्हणाली.

सावी,“आजारी पडल्याचे इतके फायदे असतात मला तर माहीतच नव्हतं.आता पंधरा दिवसातून आजारी पडायला हवं मग!” ती हसून खुर्चीवर बसत म्हणाली.

सोहम,“ नको ग माझी आई! तू आजारी पडलेलं परवडायच नाही मला! आत्ताच तुमच्या बंधुराज्यानी धमकावून  झालंय फोनवर या गरीब माणसाला!” तो तोंड फूगवून तोंडात घास घालत म्हणाला.

सावी,“ कोण आदित्य का? पण त्याला कळलेच कसे मी आजारी आहे म्हणून?तूच सांगितले ना?” ती त्याला पाहत म्हणाली.

सोहम,“ हो! कारण  पर्यायच नव्हता माझ्याकडे तुझ्या फोनवर फोन आला होता त्याचा! तू झोपली होतीस मग मी फोन उचलला मग काय c.i.d. सारख्या चौकशा सुरू झाल्या मग  सांगावे लागले सगळे मला मस्त प्रसादाच्या रुपात धमक्या मिळाल्या! सावीला त्रास दिलास तर बघ वगैरे वगैरे!” तो तोंड वाकडे करून म्हणाला.

   त्यावर सावी हसली आणि पण एकदमच काही तरी विचार करून म्हणाली.

सावी,“मग तू भांडण झाले ते ही सांगितलं का त्याला?” ती त्याला रोखून पाहत म्हणाली.

सोहम,“हो पण..” तो पुढे काही बोलण्याच्या आधीच सावी त्याला म्हणाली.

सावी,“ काय? मूर्ख आहेस का तू सोहम? अरे नवरा-बायको मधील असली  भांडणं असे तिसऱ्याला सांगतात का? काय विचार करत असेल आदित्य!” ती चिडून म्हणाली.

सोहम,“ ओयsss calm down! उगीच अजून बी.पी. वाढवून घेऊ नकोस स्वतःचा! मला कळत तेव्हढं मी काही त्याला सगळंच सांगितलं नाही! फक्त भांडण झाले हेच सांगितले!” तो हात धुवून उठत म्हणाला.

सावी,“ तरी बरं!” ती हसून म्हणाली.

सोहम,“बरं हे  मेडिसीन्स घे आणि आरामकर उगीच काही तरी काम करत बसू नकोस! आणि हो त्या आद्याला फोन कर नाही तर तो माझा जीव घेईल!” तो पाणी आणि औषध देत तीला म्हणाला.

सावी,“ मी करते फोन! तू तुझी गोळी घेतलीस का? दुपारचीच आहे फक्त!” तिने विचारले.

सोहम,“हे बघ घेतोय! मला ना म्हातारे झाल्याच्या फील येतोय आज! तू मेडिसिन घेतले का? मी मेडिसिन घेतले का? असं एकमेकांना विचारताना!” तो हसून म्हणाला.

सावी,“ आपण म्हातारे होऊ पर्यंत एकत्र असणार का?( तिने न कळत सोहमला विचारले आणि सोहमचा उतरलेला चेहरा पाहून ती पुढे म्हणाली) तू जा ऑफिसला आता आणि संध्याकाळी वेळेवर ये!”

सोहम,“ अरे देवा तुला सांगायचेच राहिले! संध्याकाळी तयार राहा आपल्याला डॉ. सिंगच्या क्लिनिकमध्ये जायचे आहे त्यांनी रात्रीच सांगितले होते की आज तुझा बी.पी.अजून एकदा चेक करावा लागेल आणि त्यानुसार ते ट्रिटमेंट ठरवतील!”तो म्हणाला.

सावी,“आता कशाला जायचे क्लिनिकमध्ये? मी आता बरी आहे!” ती आढेवेढे घेत म्हणाली.

सोहम,“ हे बघ तू बरी आहेस का नाही ते डॉक्टर ठरवतील तू नाही! संध्याकाळी तयार राहा जाऊन येऊ आपण! मी निघतो!” तो बॅग घेऊन निघत म्हणाला.

सावी,“ ठीक आहे! नीट जा” ती म्हणाली.

       सोहम ऑफिसला निघून गेला. सावीने दार लावून घेतले आणि मोबाईल  घेऊन सोफ्यावर बसली. सकाळीच सडकुन झोप झाल्यामुळे आणि औषधामुळे ती आता फ्रेश फील करत होती. आदित्यचा ही अजून लंच ब्रेक संपला नसेल म्हणून त्याला फोन लावला. दोनच रिंगमध्ये आदित्यने फोन उचलला आणि सावी बोलू लागली.

सावी,“ काय मग बंधूराज फोन केला होता म्हणे?” ती हसून म्हणाली.

आदित्य,“ काय ग ये त्या सोम्या बरोबर राहून राहून तुला पण हॉस्पिटल्स आवडायला लागली की काय? ताप काय? बी.पी.काय? कोणते कोणते आजार झाले तुला?” तो काळजीने म्हणाला.

सावी,“ नाही रे बाबा थोडा व्हायरल फिव्हर आला होता आणि आता बरं वाटतं आहे मला आणि काय रे माझ्या नवऱ्याला हॉस्पिटल्स आवडतात असं म्हणणं आहे का तुझं?” ती जरा जाब विचारण्याच्या सुरात हसून म्हणाली.

आदित्य,“ इथे काळजीने भाऊ झूरतोय तुमच्या आणि तुम्हाला नवऱ्याची पडली आहे! हे बरं आहे! घोर कलयुग दुसरं काय? बघतोस ना रे देवा! ज्याच करावं भलं तो म्हणतो माझच खरं!”तो नाटकीपणे म्हणाला.

सावी,“ झाली का तुझी नौटंकी करून! आता फोन का केला होतास ते सांगतोस आणि सोहमला काय धमक्या दिल्या रे तू?” ती हसून म्हणाली.

आदित्य,“ त्या सोम्या चोंबंड्याने लगेच तक्रार केली वाटत! काही नाही ग जरा जास्तच हवेत उडत होता तो  कोंबडा म्हणून त्याची कान उघाडणी करून त्याला जमिनीवर आणला!(या कोटीवर दोघे ही हसले आणि मग आदित्य पुढे बोलू लागला) अग राखी पौर्णिमा येते आहे ना म्हणून तुला काय गिफ्ट देऊ म्हणून फोन केला दर वर्षी काय सोम्या तुला गिफ्ट घ्यायला मला मदत करायचा! त्याला चांगलं माहीत असायचे तुला काय हवं. पण या वर्षी तो नाही मुंबईत आणि तू ही नाहीस म्हणून तुलाच विचारून पाठवावे म्हणले गिफ्ट! आमच्या झाशीच्या राणीला  गिफ्ट पसंत नाही पडले तर आमच्यावर आक्रमण करायची उगीच!” तो मिश्किलपणे हसून म्हणाला.

सावी,“  असं का म्हणजे तू मला घाबरणार बाप रे! मला गिफ्ट नको!तूच येणा रे इकडे मस्त सेलिब्रेशन करू!” ती म्हणाली.

आदित्य,“ घाबरावं लागत बाबा! अग काय सेलिब्रेशन करणार आमची बहीण जगा वेगळी तिचा राखी बांधणे वगैरे वर विश्वास नाही मग उगीच काय?” तो म्हणाला.

सावी,“ या वर्षी पासून बांधणार ना राखी! तुझी नास्तिक बहीण आस्तिक झाली ना मग आता राखीपण बांधणार तुला!” ती ओल्या झालेल्या डोळ्याच्या कडा पुसत म्हणाली.

आदित्य,“ अरे वा म्हणजे या वर्षी पासून मला fb वर स्टेटस  ठेवायला मिळणार माझा आणि माझ्या सुंदर बहिणीचा! पहा पहा माझी बहिण किती सुंदर आहे! याचं साठी तर इतके वर्षे केला होता अट्टहास!” तो नाटकीपणे हसून म्हणाला.

सावी,“ झाली का तुझी नाटक परत सुरू? देवा मीच मिळाले होते का असे नमुने द्यायला!” ती हसून म्हणाली.

आदित्य,“ ये नमुना मी नाही आ तुझा नवरा आहे! बरं ठेवतो मी तुला कळवतो  मला यायला जमेल की नाही ते!लंच ब्रेक संपत आला माझा!” तो घड्याळ पाहत म्हणाला.

सावी,“ ये माझ्या नवऱ्यावर नाही घसरायचे सारखे आणि मला माहित नाही तू काय करणार आहेस ते तू मला राखी दिवशी इथं चंदिगढमध्ये हवास समजलं बरं! By!” सावी त्याला दम देत म्हणाली.

आदित्य,“ हो बाईसाहेब येईन मी! चल ठेवतो by!” त्याने हसून फोन ठेवला.

       सावी टी.व्ही. पाहत तिथेच सोफ्यावर पहुडली आणि तिला झोप लागली.तिला जाग आली तर सगळी घरात अंधार पडला होता. तिने मोबाईल पाहिला तर संध्याकाळचे सात वाजले होते. तिने उठून लाईटी लावल्या. सात वाजून गेले तरी सोहम अजून कसा आला नाही ती काळजीत पडली. त्याच ऑफिस तर पाच वाजता सुटते जास्तीत जास्त तो सहा वाजेपर्यंत येतो. मग आज सात वाजून गेले तरी कसा आला नाही.तिने सोहमला फोन लावला तर रिंग जात होती पण तो फोन उचलत नव्हता. आता तिच्या मनात भलते-सलते विचार फेर धरून नाचू लागले.  आधीच मेडिसीन्स सुरू आहेत त्याला त्याच्या ब्रेनला आधीच इजा झाली आहे! काही झालं तर नसेल त्याला? की त्याचा अजून एक्सिडेंट….! हा विचार येताच तिने तो पाली सारखा झटकून दिला.तिने अजून एकदा फोन केला पण सोहम फोन उचलत नव्हता.मन चिंती ते वैरी न चिंती उगीच नाही म्हणत! ती दारातून किचनमध्ये गेली आणि देवा समोर सांजवात लावली. ती मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ती अधिकच अस्वस्थ होत होती. ती सतत सोहमला फोन लावत होती पण तो फोन उचलत नव्हता. 

      

             

सोहमने सावीला पुढचे चार महिने तिच्या मना सारखे वागण्याचे वचन तर दिले होते पण ते त्याला जमणार होते का? आणि चार महिन्यांनंतरचे काय? सावीला सोहमने नाही स्वीकारले  तर कारण सोहम तिला माफ करून स्वीकारेल ही आशाच तिने सोडून दिली होती म्हणून तिला त्याचे मूल तर हवे होते ते तिला मिळणार होते का? म्हणून तर मनात नसताना ही ती सोहमशी भांडली होती! सोहम इतका वेळ झाला कुठे अडकला होता?

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.