Oct 27, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ११)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ११)

 

फस्ट सेमिस्टर तोंडावर होती. आता फक्त दीड महिना राहिला होता परीक्षेला त्यामुळे सगळे अभ्यासाला लागले होते प्रोजेक्ट समिशन ही करायचे होते त्यामुळे सगळेच आता त्या कामात मग्न होते.या सगळ्या धामधुमीत  ती घटना घडून आज आठ दिवस होऊन गेले होते आणि सगळे त्या घटनेला विसरून गेले होते. आज रविवार होता त्यामुळे आदित्यने सोहमला गळ घातली की आज सावीला बाहेर घेऊन जा आणि तिच्या मनात काय आहे याचा अंदाज घे म्हणजे तुला प्रपोज करायला सोपं जाईल. सोहमने सावीला फोन करून संध्याकाळी नेहमीच्या कॅफे मध्ये भेटायला बोलावले.

 

      सावी आढेवेढे घेत तयार झाली. संधकाळी पाच वाजता सोहम मस्त तयार होऊन निघाला. बाईक काढावी म्हणून तो बाईक जवळ आला तर बाईक पंचर होती. तो चांगलाच वैतागला. पण कॅफे जवळ आहे जाताना चालत जाऊ आणि येताना सावीच्या स्कुटीवर बसून येऊ असा विचार करत तो निघाला. तरी कॅफे पर्यंत सोहमला चालत जायला अर्धा तास लागतो. तो पर्यंत सावी तिथे पोहोचलेली असते.पहिल्यांदा तर सावी त्याला वेळ झाला म्हणून त्याला चिडून म्हणाली.

 

सावी,“ काय हे सोहम मी गेला अर्धा तास तुझी वाट पाहत आहे इथे! एक तर परीक्षेचे दिवस आहेत. प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहेत आणि तू म्हणजे?” ती चिडून बोलत होती.

 

सोहम,“ अग हो हो! किती चिडशील माझी बाईक पंचर झाली म्हणून मग चालत आलो म्हणून उशीर झाला!” तो टेबलवरचे  ग्लासभर पाणी पिऊन म्हणाला.

 

सावी,“ are you crazy? तू एवढ्या लांब चालत आलास? फक्त मला भेटण्यासाठी! फोन करून सांगायचं ना मला मी माघारी गेले असते. सोहम परीक्षेच्या काळ आहे आणि तुझं काय चालले आहे रे?” ती वैतागून म्हणाली.

  

       सावीची चिडचिड पाहून सोहमने मात्र तिला काहीच न बोलण्याचे ठरवले. त्याने परीक्षा झाल्या नंतर काय ते पाहू असे मनोमन ठरवले. पण नियतीने मात्र त्यांच्या पुढे वेगळेच ताट वाढून ठेवले होते याची कल्पना दोघांना ही नव्हती. त्याला विचार मग्न पाहून सावीच पुढे बोलू लागली.

 

सावी,“ सोहम ये सोहम! अरे कसला विचार करतो आहेस? काय काम होते तुझे बोल ना?” ती त्याला हाताने हलवत म्हणाली.

      तिच्या हलवण्याने तो तंद्रीतून बाहेर आला. पण आता सावीला काय सांगावे आणि वेळ कशी मारून न्यावी या विचारात तो पडला तरी काही तरी आठवून म्हणाला.

 

सोहम,“  काही नाही सहजच बोलवलं होतं ग! त्या प्रोजेक्टमध्ये मला तुझी हेल्प हवी होती!” काही तरी बोलायचे म्हणून तो बोलला.

 

सावी,“ काय माझी मदत हवी टॉपरला? काही तरी बोलू नको सोहम सांग कशाला बोलवलेस मला इथे भेटायला?” ती अविश्वासाने म्हणाली.

 

सोहम,“ का असच भेटायला नाही बोलावू शकत का मी तुला? वाटलं भेटावं म्हणून बोलावलं!” तो विषय बदलत म्हणाला.

 

सावी,“ हो बोलावू शकतो! सोहम तू पण ना वेडा आहेस तुझ्या मनात केंव्हा काय येईल सांगू शकत नाही! बरं घे कोल्ड कॉफी  तुझी आवडती!” ती वेटरने आणलेली कॉफी देत त्याला हसून म्हणाली.

 

         सोहमने सुटकेचा निःश्वास सोडला. दोघांनी कॉफी घेतली आणि बराच वेळ गप्पा मारत बसले. साडे सहा वाजून गेल्यावर आणि बाहेर अंधार दिसू लागल्यावर सोहम सावीला म्हणाला. चल खूप उशीर झाला.दोघे कॅफे मधून बाहेर आले आणि सावी स्कुटी काढू लागली तर काय तिची ही स्कुटी पंचर होती.  सावी ते पाहून चांगलीच वैतागली आणि सोहम हसू लागला. तो तिला हसून म्हणाला.

 

सोहम,“ आज पंचर डे आहे वाटत!” 

 

सावी,“ हसू नकोस तू! तुझ्याच मुळे झालय हे सगळं तुला कधी कशाची हुक्की येईल सांगता येत नाही.चला आता चालत!” ती नाराजीने म्हणाली.

 

सोहम,“ चालत कशाला? ती बघ या रोडवर रहदारी कमी असली तरी आज लकी आहोत आपण रिक्षा येतेय. त्याने जाऊ!” तो रिक्षा दाखवून रिक्षा थांबवत तिला म्हणाला.

 

आता सात वाजत आले होते त्यामुळे बराच अंधार पडला होता. दोघे ही रिक्षात बसले.रिक्षावाल्याने  हॉस्टेलपासून जरा लांब त्या दोघांना सोडले. दोघे उतरून गर्ल्स हॉस्टेलकडे निघाले कारण कॉलेज कॅम्पसच्या मागच्या बाजूला गर्ल्स हॉस्टेल होते तर पुढच्या बाजूला बॉईज हॉस्टेल होते म्हणून सोहम सावीला हॉस्टेलच्या गेटच्या आत सोडून मग स्वतः जाणार होता.दोघे रोड वरून गप्पा मारत  चालत होते. सावी रस्त्याच्याकडेने तर सोहम तिच्या शेजारून चालत होता. पण सोहमचे लक्ष मात्र गप्पा मारण्यात नव्हते.रिक्षात ही तो सारखे मागे वळून पाहत होता कारण एक टू व्हीलर ते रिक्षात बसल्या पासून त्याच्या मागून येत होती त्यावर हेल्मेट घातलेली दोन माणसे होती. आता टू व्हीलर त्यांच्या पासून थोडी लांब थांबली होती. पण अचानक ती टू व्हीलर त्यांच्या जवळ जवळ येत असलेली दिसली. सावीला काय कळायच्या  आतच सोहमने तिला दोन्ही हातांनी कवेत घेतले व तो त्या टू व्हीलरला पाठमोरा उभा राहिला आणि चर्रर्रकन आवाज झाला. टू व्हीलर आली तशी वाऱ्याच्या वेगाने निघून गेली. सोहम मात्र खाली बसला. सावीवर कोणी तरी चाकु हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण वेळीच सोहमच्या ते लक्षात आले आणि सोहमने सावीला वाचवण्याच्या प्रयत्नात तो वार पाठीवर झेलला होता. त्याचाच आवाज चर्रर्र असा झाला होता. सोहम खाली बसला त्याच्या पाठीवरून रक्त ओघळू लागले होते. सावी मात्र ते पाहून खूप घाबरली तिने तिची ओढणी त्याच्या पाठीला लावली आणि प्रसंग अवधाण राहून आदित्यला मोबाईवरून फोन केला आणि ती बोलू लागली.

 

सावी,“ आदित्य लवकर गर्ल्स हॉस्टेलच्या रोडकडे ये सोहमss वर हल्ला झाला आहे” ती रडत घाबरून सांगत होती.

 

     हे ऐकून आदित्य हॉस्टेलमधील मुलांना घेऊन तिथे पोहचला तर सोहम सावीच्या मांडीवर  कळवळत त्याला झोपलेला दिसला. त्याच्या पाठी वरून रक्ताचे ओघळ वाहत होते. काही मुलांनी रेक्टरला बोलावून त्यांची फोर व्हीलर काढली आणि त्यात सोहमला घालून हॉस्पिटल गाठले आदित्य आणि सावी त्याच्या बरोबर होते.रेक्टरने फोन करून प्रिन्सिपलला बोलावून घेतले त्यामुळे डॉक्टरांनी जास्त आढेवेढे न घेता पोलीसांना  फोन करून सोहमवर उपचार सुरू केले. सावी सुन्न होऊन खुर्चीवर बसली होती. ती काहीच सांगण्याच्या आणि बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. आदित्यने फोन करून सोहमच्या आई-बाबांना आणि सावीच्या आईला बोलवले होते. डॉक्टर अर्धा तासांनी बाहेर आले. सावी त्यांना पाहून पळतच त्यांच्या जवळ गेली आणि विचारू लागली.

 

सावी,“ डॉक्टर सोहम कसा आहे?” ती रडत विचारात होती.

 

डॉक्टर,“  त्याच्या पाठीवर जवळून वार केल्यामुळे बरीच खोल जखम झाली आहे !सहा स्टीचेस घातले आहेत आम्ही  don't worry! तो ठीक आहे काळजीचे कारण नाही” ते म्हणाले.

      हे ऐकून सगळ्यांच्या जिवात जीव आला.

 

सावी,“ मी  भेटू शकते का त्याला?” तिने विचारले.

 

डॉक्टर,“ नाही तो बेशुद्ध आहे म्हणजे आम्हीच त्याला स्टीचेस घालण्यासाठी बेशुद्ध केले होते. तुम्ही त्याला पाहू शकता रूममध्ये शिफ्ट केलय त्याला!” ते म्हणाले.

 

आदित्य,“ thanks डॉक्टर!” आदित्य म्हणाला.

 

         सावी त्याला पाहायला रूममध्ये गेली. सोहम शांत  झोपला होता. ती त्याच्या जवळ जाऊन खुर्चीवर बराच वेळ त्याचा हात धरून बसली होती. आदित्यने तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती भानावर आली. आदित्य तिला म्हणाला.

 

आदित्य,“ सावी बाहेर पोलिस आले आहेत चौकशी करायला त्यांना तुला काही प्रश्न विचारायचे आहेत तुझा जबाब लिहून घ्यायचा आहे त्यांना!” 

 

सावी,“ हुंम चल!” ती सोहमचा हात बेडवर ठेऊन त्याचे पांघरून व्यवस्थित करून डोळे पुसत आदित्य बरोबर निघाली.

 

       सावी आदित्य बरोबर  बाहेर आली. पोलिसांनी तिला तुम्ही जबाब देऊ शकता का? असे विचारून  ती हो म्हणाल्यावर पुढचे प्रश्न विचारायला सुरुवात केली.

 

इन्स्पेक्टर माने,“ मिस जाधव तुम्ही आणि सोहम सरपोतदार कुठे गेला होता आणि काय काय झालं नेमका हल्ला कोणावर झाला सविस्तर न घाबरता सांगा! या बसा इथे!” असं म्हणून त्यांनी सावीला बसायला लावले.

 

सावी,“ मला सोहमचा फोन आला होता की आपण इथेच जवळच्या कॅफेमध्ये भेटू! सोहम माझा चांगला मित्र आहे आम्ही ज्युनिअर कॉलेज पासून एकत्र शिकतो त्यामुळे असं भेटणे आम्हाला नवीन नाही. मी आणि तो कॅफेमध्ये भेटलो! तिथे अभ्यासा विषयी बरीच चर्चा झाली. आम्ही कॅफे मधून बाहेर निघालो तर माझी स्कुटी पंचर होती. मग आम्ही रिक्षा केली आणि होस्टेलवर निघालो. तर तीथूनच एक दुचाकी आमचा पाठलाग करत होती. त्यावर दोन हेल्मेट घातलेली  माणसे होती. होस्टेल जवळ आल्यावर आम्ही रिक्षातून उतरलो तर ती दुचाकी आमच्या पासून लांब होती. सोहम मला गर्ल्स होस्टेलवर सोडून मग तो त्याच्या हॉस्टेवर जाणार होता म्हणून मग आम्ही चालत हॉस्टेलकडे निघालो तर ते दुकाची स्वार आमच्या दिशेने वेगाने येत असलेले दिसले. त्यांना माझ्यावर हल्ला करायचा होता पण सोहमने ते ओळखले आणि त्याने मला मिठी मारून त्यांच्याकडे पाठ केली आणि त्यात सोहम जखमी झाला!” असं म्हणून ती रडू लागली आदित्यने तिला पाणी आणून दिले.

 

इं.माने,“ अच्छा म्हणजे मिस जाधव त्यांना तुमच्यावर हल्ला करायचा होता पण तुम्हाला वाचवण्याच्या प्रयत्नात सोहम सरपोतदार जखमी झाले. तुम्ही दुचाकीचा नंबर पाहिला आहे का? तुम्हाला  कोणावर संशय?” त्यांनी विचारले.

 

सावी,“ हो दुचाकीचा नंबर माझ्या लक्षात आहे नोट करून घ्या. माझे  तसे कोणाशीच वैर नाही.” ती म्हणत होती. मध्येच आदित्य म्हणाला.

 

आदित्य,“ एक मिनिट सावी एक आठवड्या पूर्वी तू संकेत आणि निरंजनला संजालीची छेड काढली म्हणून चोप दिला होतास आणि प्रिन्सिपलनी ही दोन आठवड्यासाठी त्यांना सस्पेंड केले होते. त्या दोघांनी तर हे सगळं केलं नसेल?” तो म्हणाला.

 

सावी,“ हो असू शकत तसं ही!” तिने दुजोरा दिला.

 

इं. माने,“ ठीक आहे मी लागलीच त्या दोघा संशयितांना ताब्यात घेतो आणि माझ्या पध्द्तीने विचारपूस करतो” ते म्हणाले.

 

        डॉक्टरांशी चर्चा करून इन्स्पेक्टर मानेंनी सोहमचा जबाब उद्या घेतो. असं म्हणून निघून गेले. तो पर्यंत सोहमचे आई-बाबा आणि सावीची आई हॉस्पिटलमध्ये आले. आदित्यने सोहमच्या आई-बाबांना सगळे सांगितले आणि तो त्यांना सोहमच्या रूममध्ये घेऊन गेला. आदित्यकडून हे सगळं ऐकून ते दोघे चिंतीत दिसत होते. सोहमची आई सोहमला असे पाहून रडत होत्या. डॉक्टरांनी सोहमच्या आई-बाबांना सविस्तर सगळे सांगितले व चिंता  करण्याचे कारण नाही फक्त थोडे दिवस सोहमला आराम करावा लागेल व त्याची काळजी घ्यावी लागेल असे सांगितले. सावी तिच्या आईला पाहून त्यांना मिठी मारून रडू लागली. तिने तिच्या आईला काय-काय घडले ते सांगितले. सावीची आई सावीला घेऊन सोहमला पाहायला आणि सोहमच्या आई-बाबांना भेटायला गेल्या. हे सगळं होई पर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते. सावी हॉस्पिटलमध्येच बसून होती. आदित्य तिच्या जवळ गेला व तिला समजावून सांगून तिच्या आईला व तिला होस्टेलवर पाठवून दिले. सावी व सावीची आई सावीच्या होस्टेलवर तिच्या रूम मध्ये गेल्या. सावी एक सारखी रडत होती. सावी आईच्या मांडीवर झोपली होती. सावीची आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला बोलू लागल्या.

 

आई,“ सावी बेटा मी  तुझ्या नजरेत सोहम विषयी प्रेम पाहिले आहे आणि सोहम ही तुझ्यावर प्रेम करतो असेच मला वाटते. बेटा जो मुलगा मागचा पुढचा विचार न करता तुझ्यावरचा वार स्वतःवर झेलू शकतो तो मुलगा तुझ्यावर किती प्रेम करत असेल याचा विचार कर! माहीत आहे तुझे प्रेम,लग्न या विषयी निगेटिव्ह मत आहे कारण आपला भूतकाळ! पण बेटा आपल्या भूतकाळाचा तुझ्या भविष्यावर परिणाम करून घेऊ नकोस! आणि प्लिज सोहम सारख्या मुलाला गमावू नकोस बेटा! तू नशीबवान आहेस तुला असा प्रेम करणारा मुलगा मिळाला!” त्या तिला समजावत होत्या.

 

        सावी मात्र अश्रू ढाळत आईचे बोलणे  नुसते ऐकत होती. या घटनेचा तिच्या मनावर कुठे तरी खूप खोल परिणाम झाला होता. आज तिच्या धारणांना तडा गेला होता आणि तिने स्वतः भोवती बांधून घेतलेल्या भक्कम तटबंदीला सोहमने हादरा दिला होता. 

 

      सावी रात्र भर झोपलीच नाही. तिला सतत सोहमचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. तिला कधी सकाळ होईल आणि ती सोहमशी कधी भेटते असे झाले होते. सावी तिच्या  आईला सकाळी लवकरच घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. सोहम नुकताच उठलेला दिसत होता आणि नीताताई त्याला काही तरी भरवत होत्या. सोहमचा चेहरा उतरलेला दिसत होता. तरी सावीला पाहून तो हसला. सावीच्या आईने सोहमच्या तब्बेतीची चौकशी केली आणि त्याचे आभार ही  मानले. सोहमने त्याच्या आई-बाबांची ओळख सावीच्या आईशी करून दिली आणि ते तिघे खाली कॅन्टीनमध्ये चहा घ्यायला निघून गेले. आता रूममध्ये सावी आणि सोहम दोघेच होते.सावी शांतच होती.सावीचे डोळे काठोकाठ भरले होते आता कधी ही महापूर येणार हे ओळखून सोहम सावीला म्हणाला.

 

सोहम,“ या सगळ्यात माझा फेव्हरेट शर्ट फाटला आहे सावी! तो मला भरून पाहिजे!” तो सावीकडे तिरकस पाहून बोलत होता.

 

सावी,“ असं का? मूर्खपणाची हद्द आहेस सोहम तू! काल इतकं सगळं झालं तुला किती लागलाय आणि तुला शर्टची पडलीय!” ती रागाने म्हणाली.

 

        तसा सोहम हसू लागला आणि म्हणाला.

 

सोहम,“ बरं झालं तुला राग आला नाही तर तुझ्या डोळ्यातल्या महापुराने मी वाहून गेलो असतो!”

 

सावी,“  तुला थट्टा सुचते का अशा ही अवस्थेत? काल मी किती घाबरले होते!”

 

    ती पुढे बोलत होती तो पर्यंत सोहमचे आई-बाबा,  सावीची आई पोलिसां बरोबर तेथे आले. सोहमचा जबाब इन्स्पेक्टर मानेनी लिहून घेतला. संकेत आणि निरंजनला त्यांनी ताब्यात घेतले होते आणि टू व्हीलरच्या मालकाचा ही शोध लागला होता. टू व्हीलर संकेतच्या एका नातेवाईकांची होती जी त्याने काही तरी काम आहे असे खोटे बोलून घेतली होती. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला आणि दोघे पोपटा सारखे बोलले. 

 

                  सावीला सगळ्या प्रोसिजरसाठी पोलीस  स्टेशनमध्ये जावे लागले आणि तिला पोलीस स्टेशनमध्येच संध्याकाळ झाली त्यामुळे सोहमला नंतर तिला भेटता ही आले नाही आणि बोलता ही आले नाही. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आणि कॉलेजच्या प्रिन्सिपलने संकेत आणि निरंजनच्या आई-वडिलांना बोलावून घेतले व त्यांच्या मुलांनी केलेला पराक्रम सांगितला. प्रिन्सिपल सरांनी त्यांना रेस्टीकेट केले.पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर करायची तयारी सुरू केली पण संकेत आणि निरंजनचे आई वडील हॉस्पिटलमध्ये येऊन सावी आणि सोहमच्या हातापाया पडू लागले. त्यांचे म्हणणे होते की त्यांच्या मुलांनी गुन्हा केलाच आहे. रेस्टीकेट केल्यामुळे त्यांचे करिअर तर बर्बाद झालेच आहे पण जर ही केस कोर्टात गेली तर त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसेल आणि त्यांचे आयुष्य ही बर्बाद होईल.सावीने नजरेनेच सोहला विचारले काय करायचे आणि सोहमने नजरेनेच सोडून दे असे तिला सांगितले. दोघांची ही नेत्रपल्लवी सोहमच्या आई-बाबांच्या नजरेतून सुटली नाही आणि त्या दोघांमध्ये मैत्री पलीकडचे नाते आहे हे त्यांना कळाले होते. सावीने दोघांना सोडून दिले तरी तिने पोलिसांसमोर संकेत आणि निरंजनकडून इथून पुढे ते तिला आणि सोहमला कसला ही त्रास देणार नाहीत हे लिहून घेतले.

 

           हे सगळे प्रकरण मिटू पर्यंत दुपार झाली आणि सावीला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये केस मागे घेण्यासाठी जावे लागले. सावी परत सोहमला भेटण्यासाठी  हॉस्पिटलमध्ये आली तर सोहम झोपला होता आणि संध्याकाळी सहा वाजता तर तो त्याच्या आई-बाबां बरोबर पुण्याला निघाला. सावी त्याला मोजकेच बोलू शकली. त्या घटने  नंतर दोघांमध्ये खास काही बोलणे झालेच नाही. सोहम आता आठ दिवस तिला भेटणार नव्हता. या विचाराने सावी अस्वस्थ होती.

 

       ती रोज सोहमला फोन करून त्याची चौकशी  करत असे पण सारख-सारख फोन करण जमत नव्हतं तिला आणि दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा फोन केला तर सोहम झोपलेला असायचा आणि नीताताई त्याचा फोन उचलत असत.त्या तिच्याशी छानच बोलायच्या पण सोहमशी बोलणे होत नाही म्हणून ती मनोमन खट्टू व्हायची.

 

     ती कॉलेजला जात होती तरी तिचे लक्ष मात्र कुठेच लागत नव्हते. तिला सतत सोहमची आठवण येत होती. कॉलेज सुटून अर्धा तास झाला तरी ती एकटीच बेंचवर उदास बसली होती. आदित्यने लाब्ररी मधून येताना तिला पाहिले. त्याने विचार केला बरं झालं ही एकटी भेटली त्याला ही तिच्याशी बोलायच होतच! तो तिच्या जवळ येऊन बसला. त्याला पाहून सावीने पुसटशी स्माईल दिली. आता आदित्य बोलू लागला.

 

आदित्य,“ सोहमला मिस करत आहेस?” त्याने विचारले.

 

सावी,“ हो!” नकळत तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले.

 

आदित्य,“ मी पण मिस करतोय सोम्याला! बरं त्याच्यासाठी तू नोट्स काढणार होतीस त्या काढते आहेस ना? त्याचा प्रोजेक्ट मी पूर्ण करतो आहे!” तो म्हणाला.

 

सावी,“ हो काढत आहे मी नोट्स!” ती म्हणाली.

 

आदित्य,“ तुझ्याशी थोडं बोलायचं होत सावी मला!” तो गंभीर होत म्हणाला.

 

सावी,“ बोल ना आदित्य!” ती म्हणाली.

 

आदित्य,“ हे बघ सावी मी सोहमला ही चांगलं ओळखतो आणि तुला ही! तुमच्या दोघांच्या डोळ्यात मी एकमेकान विषयी प्रेम पाहिलं आहे पण ते अजून ही अव्यक्त आहे. सोहम तुझ्यासमोर ते व्यक्त करायला धजावत नाही कारण तुझे प्रेम,लग्न या विषयीचे  निगेटिव्ह विचार! त्याला वाटत की जर त्याने तुला प्रपोज केलं आणि तुला ते नाही आवडल तर तो तुझी मैत्री ही गमावून बसेल. त्या दिवशी ही मीच सोहमला तूला भेटायला पाठवले होते तुझ्या मनाचा अंदाज घ्यायला. पण हे भलतेच होऊन बसले. सावी तुझे प्रेमा विषयी आणि लग्ना विषयी इतके निगेटिव्ह विचार का आहेत? पुरुषां बद्दल तुझ्या मनात इतका रोष का आहे? हे सगळं मी तुला नाही विचारणार पण प्रत्येक पुरुष सारखा नसतो. तूच बघ आता सोहमने तुझ्यावर होणारा वार कोणता ही मागचा पुढचा विचार न  करता स्वतः झेलला का? तर त्याच तुझ्यावर प्रेम आहे म्हणून जर तू त्याला तुझ्या भूतकाळातील घटनांमुळे नाकारलीस तर तुझ्या इतकी मूर्ख तूच असशील! कारण सोहम इतकं प्रेम करणारा मुलगा तुला नाही भेटणार! बघ विचार कर अजून ही वेळ गेलेली नाही. विचार कर!” असं म्हणून तो तिच्या उत्तराची वाट न पाहता निघून गेला.

 

     सावी मात्र अजून तिथेच बसून होती विचार करत.

 

 या घटनेमुळे सावीचे विचार बदलणार होते का आणि कसे? आता सोहम आणि सावीचे अव्यक्त प्रेम कोणते नवीन वळण घेणार होते?


 

         

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule