हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २६) अंतिम

This is a after marriage love story

      नीताताईंनी म्हणजेच सोहमच्या आईंनी सावीच्या आईला म्हणजेच सुमेधाताईंना फोनवर सगळी कल्पना दिली आणि बोलवून घेतलं. सुमेधाताई आल्या. त्या अचानक कशा आल्या हे सावीने मात्र ओळखले होते.त्या सावीच्या रूममध्ये गेल्या तर सावी काही तरी करत होती डॉक्टरने अबोर्शन करायला सांगून ही आता आठ दिवस झाले होते. आदित्य सावीला समजावून सांगून सांगून शेवटी मुबंईला निघून गेला होता. सोहम आणि त्याचे आईबाबा मात्र जसे दिवस पुढे जात होते तसे टेन्शनमध्ये येत होते. सावीची आई तिच्या जवळ गेली आणि तशी सावी त्यांना म्हणाली.


सावी,“हे बघ आई तू जर अबोर्शन कर म्हणून मला समजवायला आली असशील तर मी तुझं काहीच ऐकणार नाही!” सावीने त्यांनी काही बोलायच्या आतच त्यांना रागाने सांगून टाकले नाही तरी सावीच्या मनात त्यांच्या बद्दल राग होता कारण त्या तिला तू तुझ्या वडिलांसारखी आहेस असं म्हणाल्या होत्या. तरी सावीची आई बोलू लागल्या.


आई(सुमेधाताई),“ सावी काय मिळवायचे आहे ग तुला हे सगळे करून सांग मला? सगळे तुला इतकं सांगत आहेत तू ऐकत का नाहीस जरा त्या सोहमकडे पहा किती टेन्शनमध्ये आहे तो! का असा जिवाशी खेळ चालवला आहेस तू? तुला काही झाले तर बाळाला घेऊन काय करणार आहोत आम्ही आणि आई विना पोर कसं जगणार आहे सावी जरा तरी विचार कर ग! नसता हट्ट करू नकोस अजून ही वेळ गेली नाही एकदा का हा आठवडा गेला तर ती वेळ ही निघून जाईल!” त्या समजावत होत्या.


सावी,“ हे बघ आई मला नाही होणार काही आणि झालेच तर सोहम आहे माझ्या बाळाला सांभाळायला तू नकोस काळजी करू तू जा पुन्हा तुझ्या मनःशांतीच्या शोधात!” ती रुक्षपणे म्हणाली.



             सावीने कोणाचेच काही ऐकले नाही त्यामुळे तिची पुढची ट्रीटमेंट सुरू झाली.सावी अधिकच अशक्त होऊ लागली तरी तिला पाचव्या महिन्यात ब्लड चढवण्यात आले.तिला डॉक्टरने कंम्प्लित बेड रेस्ट सांगितला. सगळेच आता काळजीत दिसत होती. सातव्या महिन्यातच रात्री तिला अस्वस्थ वाटू लागले. तिने सोहमला उठवले आणि ती म्हणाली.


सावी,“ सोहम उठ मला अस्वस्थ वाटतंय खूप! बाळाची हालचाल मंद झालीय!” ती अस्वस्थपणे बोलत होती.


           सोहमने सगळ्यांना उठवले आणि सावीला घेऊन हॉस्पिटल गाठले.स्टाफने डॉ.मनजीत कौरला ताबडतोब बोलवून घेतले आणि त्यांनी सावीचे सिझेरियन करण्याचा निर्णय सगळ्यांना सांगितला. सगळे  टेन्शनमध्ये ओ.टीच्या बाहेर बसून होते. सोहमची आणि सावीची आई देवाचा धावा करत होत्या सोहम मात्र खूपच अस्वस्थ दिसत होता.जवळ जवळ दीड तासाने एक नर्स बाळाला घेऊन आली. सावी आणि सोहमला मुलगा झाला होता.सातव्या महिन्यातीले प्रीमॅच्युअर बाळ होते. तसा बाळाच्या जीवाला काही धोका नव्हता तरी त्याला I. C. U. मध्ये ठेवावे लागणार होते.सोहमने बाळाला हातात घेतले आणि नर्सला सावी कशी आहे विचारले तर नर्सने त्याला काहीच सांगितले नाही अजून तासाभराने डॉ. कौर ओ. टीच्या बाहेर आल्या त्याच्या जवळ जात  काळजीने सोहम म्हणाला 


सोहम,“ डॉक्टर सावी कैसी हैं?” 


डॉ.कौर,“ सावनी क्रिटिकल हैं?सुबह तक तक कुछ कहा नहीं जा सकता!हम उन्हें I. C. U. में शिफ्ट कर रहे हैं आप चाहे तो देख सकते हैं उन्हें! बच्चा बिल्कुल ठीक हैं!” त्या म्हणाल्या.


     सोहम हे ऐकून सुन्न झाला होता. त्याने सावीला काचेतून पाहिले आणि तो एखाद्या मूर्ती सारखा खुर्चीवर बसला.आत्ता साडे बारा वाजले होते. डोंगरा एव्हढी मोठी रात्र सगळ्यांनाच वाटत होती. सोहम मात्र काहीच रियाक्ट होत नव्हता आता सावी बरोबर सोहमची ही काळजी त्या तिघांना वाटत होती.शेवटी न राहवून सोहमच्या बाबांनी आदित्यला फोन केला आणि सगळे सांगितले. आदित्य रात्रीच्याच फ्लाईटने पाहटे चार पर्यंत चंदिगढला पोहोचला. त्याने बाळाला पाहिले आणि सावीला ही त्याला सोहमशी काय बोलावे हेच कळत नव्हते. 

        शेवटी कसे बसे सकाळचे सहा वाचले आणि सावीला चेक करायला गेलेली नर्स धावतच डॉक्टरला घेऊन आली. डॉ. कौरने सावीला चेक केले आणि त्या म्हणाल्या सावी शुद्धीवर आली आहे तुम्ही भेटू शकता हे ऐकून सोहम त्यांचे पुढचे बोलणे न ऐकताच  सावीला भेटायला गेला. सोहमची चाहूल लागताच सावीने डोळे उघडले.सोहम तिच्या जवळ जाऊन उभा राहिला त्याला पाहून तिने अगदी हळू आवाजात विचारले.


सावी,“ काय झालं सोहम आपल्याला?”


सोहम,“ मुलगा झाला आहे!” तो तिचा हात धरून म्हणाला.


सावी,“ त्याला तुझ्या सारखा बनव माझ्या सारखा नाही” ती हळूच म्हणाली.


सोहम,“ तुला काय बनवायचे ते तूच बनव त्याला मी नाही काही बोलणार!” तो डोळ्यात पाणी आणून रागानेच म्हणाला.


सावी,“ आईला माझा एक निरोप दे मी माझ्या बापा सारखी नाही” ती म्हणाली.


सोहम,“ तूच सांग काय ते त्यांना!”असं म्हणून त्याने सावीला पाहिले तर सावीने डोळे झाकले होते

★★★★

         चार महिन्या नंतर….


          सोहमच्या मुबंईच्या घरात धावपळ सुरू होती आज त्यांच्या मुलाचे बारसे होते. घरगुती सोहळा होता तरी बरेच मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक जमले होते. आदित्य बाळाला घेऊन खेळवत बसला होता.नीताताईंची गडबड उठली होती.बाबा केटरर्सला फोन करून जेवण आणि नाष्टा लवकर पोहोचवा असे फोनवर सांगत होते.सुमेधाताई नामकरण विधीसाठी आणि पूजेसाठी भडजिंना साहित्य देत होत्या. श्रेया पाहुण्यांचे स्वागत करत होती.तारा ही काही बाही मदत करत होती.


              नीताताईंनी सोहमला हाक मारली. 


निताताई,“ बब्बू ये रे लवकर! मुहूर्ताची वेळ टळून जाईल राजा!”


सोहम,“ आलो आलो पाच मिनिटं!”


       असं म्हणून तो खाली बसून सावीच्या साडीच्या निऱ्या नीट करत वैतागून बोलत होता.


सोहम,“ तुला कोणी सांगितले होते ग साडी नेसायला! एक तर तुझी तब्बेत अजून ठीक नाही आणि त्यातून ही असली साडी वगैरे नेसण्याची हौस भारी तुला! सुटसुटीत पंजाबी सूट घालायचा ना! श्रेया सटकली साडी नेसवून तुला  अडकवून!”


सावी,“ इतकं ही बोलायची गरज नाही मला! नुसत्या निऱ्या नीट कर म्हणाले तर! जा बरं तू मी पाहते माझं काय ते!” ती लटक्या रागाने म्हणाली.


     सोहम उठला आणि तिला आरशा पुढे घेऊन गेला आणि तिला मागून मिठी मारून तिचे प्रतिबिंब आरशात पाहत तिला म्हणाला.


सोहम,“ by the way you are looking gorgeous!” 


सावी,“ अच्छा! आत्ता तर ओरडत होतास की साडी नेसली म्हणून!” ती त्याला आरशात पाहतच लटक्या रागाने म्हणाली.


सोहम,“ मग ओरडू नाही तर काय करू!बरं चला बाहेर वाट पाहत आहेत सगळे आपली!”तो म्हणाला.


सावी,“ अरे पण डब्बू कुठे आहे रे माझा? सकाळी घेऊन गेले ते त्याला! अजून दिसला नाही!”ती म्हणाली.


सोहम,“ काय ग त्याला डब्बू म्हणयच नाही म्हणून किती दा सांगितले आहे तुला! आज नाव ठेव त्याच काय ते जे मला पण नाही सांगितलेस अजून!” तो काहीसा चिडून म्हणाला.


सावी,“ डब्बूच आहे तो बब्बूचा डब्बू!” असं म्हणून  ती हसत होती तो पर्यंत तिथे आदित्य आला बाळाला घेऊन आणि सावीला दुजोरा देत सोहमला चिडवत म्हणाला.


आदित्य,“ सावी आज याच नाव तू खरंच डब्बूच ठेव ग! कस सूट होईल ना डब्बू बब्बू सरपोतदार!” असं म्हणून तो हसू लागला आणि त्याच्या बरोबर सावी ही; हे पाहून सोहम मात्र लटक्या रागाने दोघांना म्हणाला.


सोहम,“झाली का खेचून माझी भावा-बहिणीची!”


      बाळाला पाळण्यात घातले आणि सावीला नीताताईंनी विचारले.


नीताताई,“ नाव काय ठेवायचे ग डब्बूचे सावी?”


सावी,“ सत्येंन! सत्येंन सोहम सरपोतदार!” ती हसून म्हणाली.


      सोहम मात्र त्याच्या ही न कळत चार महिने मागे गेला.


   सावीने डोळे झाकले आणि सोहम बाहेर येऊन रडू लागला. तो डॉक्टरला सावीला पाहण्यासाठी बोलवत होता. सगळे त्याला काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. शेवटी आदित्यने त्याला जोरात हलवले आणि तो म्हणाला.


आदित्य,“ सावी ठीक आहे सोम्या she is safe now! शुद्धीवर ये सोम्या! ती ग्लाणीत आहे म्हणून तिने बोलता बोलता डोळे झाकले आहेत!”तो म्हणाला आणि सोहम त्याला मिठी मारून रडू लागला.


      सोहम सावी शुद्धीवर आली हे ऐकून डॉक्टरचे बोलणे  पूर्ण न ऐकताच तिला पाहायला गेला होता.डॉक्टरने ती आता सेफ आहे हे बाहेर सगळ्यांना सांगितले होते. त्यानंतर ती पुन्हा शुद्धीवर आल्यावर तिला बाळ दाखवण्यात आले. पण सावी खूप अशक्त असल्याने ती बाळाची जबाबदारी उचलू शकत नव्हती.उलट तिचीच काळजी घ्यावी लागणार होती. सावीच्या आईने सुमेधाताईनी बाळाची पूर्ण जबाबदारी घेतली तर नीताताईनी सावीची काळजी घेतली. त्यामुळे सोहमला इतके टेन्शन आले नाही आणि तो त्याच्या कामाकडे लक्ष देऊ शकला. त्याला ट्रस्टने महाराष्ट्रातील नेटवर्किंगची जबाबदारी देऊन त्याला M. D ची पोस्ट दिली आणि मुबंईमध्ये मेन ऑफिस केले आणि एक महिना आधीच सोहम मुंबईमध्ये शिफ्ट झाला.

              सोहम या सगळ्या विचारात असताना सावीने त्याच्या डोळ्यात पाणी पाहिले आणि त्याच्या जवळ येऊन इशऱ्यानेच काय झाले असे विचारले तर त्याने मानेनेच काही नाही असे सांगितले.

            खरं तर सावीला बाळाचे बारसे मोठे करायचे होते म्हणून ती हटून बसली होती पण तिला इतकी दगदग झेपणार नाही म्हणून मग सोहम आणि तिच्यात तह झाला की बारसे घरगुती करू आणि पहिला वाढदिवस मोठा करू.तेंव्हा कुठे सावी गप्प बसली. कार्यक्रम यथासांग पार पडला.आता   घरात कुटूंबीय आणि आदित्य आणि श्रेया राहिले होते.आदित्य सावीला म्हणाला.


आदित्य,“सावी माझ्या कंपनी मध्ये मुबंई ब्रांचला एक  कोडिंग C. E. O.ची जागा एका महिन्याने रिकामी होणार आहे. तू जॉईन करणार तिथे?”


सावी,“ नाही रे आदित्य सध्या तरी माझा जॉब करण्याचा विचार नाही thanks for asking me!” ती हसून म्हणाली.


आदित्य,“ बग ये सोम्या ही मला thanks म्हणणार आता! देवुका एक रट्टा लावून!” तो नाराजीने सोहमकडे पाहून म्हणाला.


सोहम,“ ते तुमचं तुम्हीं पहा बाबा दोघ! पण सावी कर की जॉईन असं ही बाळाला सांभाळायला दोन आज्या आणि आजोबा आहेत की!” तो हसून म्हणाला आणि नीताताईंनी ही त्याला दुजोरा दिला.


सावी,“ नाही म्हणत thanks आदित्य झालं!(ती हात जोडून मिस्कीलपणे म्हणाली) सध्या नाही करायची मला नोकरी सोहम!” ती म्हणाली.


सोहम,“ as you wish!” तो म्हणाला.


           निताताईनी जबरदस्तीने सावीला आराम करायला रूममध्ये पाठवले. सुमेधाताई बाळाला झोपवून सावीच्या रूममध्ये त्याला सोडायला गेल्या  सावीने बाळा घेतले आणि झोपवले. सुमेधाताई बेडवर बसून सावीला म्हणाल्या.


सुमेधाताई(सावीच्या आई),“ सावी तुझ्याशी मला बरेच दिवस झाले  काही तरी बोलायचे आहे!” ती म्हणाल्या.


सावी,“ मग बोल ना!” ती अगदी सहज म्हणाली.


सुमेधाताई,“ तू हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आल्या आल्या सोहमला काय म्हणाली होतीस बच्चा?” त्या डोळ्यात पाणी आणून तिचा हात प्रेमाने धरून म्हणाल्या.


सावी,“ काय म्हणाले होते मी!नाही आठवत ग मला!” ती म्हणाली.


सुमेधाताई,“ तू सोहमला मला निरोप द्यायला सांगितलंस की ‛तू तुझ्या बापा सारखी नाहीस म्हणून!’खरंच तू नाहीस बच्चा तुझ्या बापा सारखी! तू तर माझा बच्चा आहेस फक्त माझा! मी तुला रागात जास्तच बोलले बघ!तुझ्या मनाला ही गोष्ट इतकी लागेल हा विचारच मी केला नाही sorry ग! तू फक्त माझी आहेस! माझा बच्चा आहेस बेटा दुसरी कोणा सारखीच नाही!” असं म्हणून त्या रडायला लागल्या.


      हे ऐकून सावीने तिच्या आईला मिठी मारली. दोघी माय-लेकींमधले अजून एक मळभ आज दूर झाले होते.दिवस असाच निघून गेला. रात्रीचे जेवण झाली. सोहम बेडरूम मध्ये लॅपटॉपवर काम करत होता. सावी येऊन बेडवर बसली. बाळ पाळण्यात झोपले होते. ती सोहमला म्हणाली.


सावी,“काय मग नाव आवडले की नाही डब्बूचे?” ती हसून म्हणाली.


सोहम,“ परत डब्बू आता ठेवलेस ना नाव त्याचे  सत्येंन म्हण आता! छान आहे की नाव! पण सत्येंनच का?” त्याने लॅपटॉप ठेवला आणि सावीला जवळ ओढून म्हणाला.


सावी,“ किती बिनडोक आहेस रे तू सत्येंन मध्ये स -सोहमचा आणि न- सावनीचा म्हणून सत्येंन!” ती हसून त्याला म्हणाली.


सोहम,“ अच्छा असं आहे तर! खूप हुशार ग तू!” तो हसून म्हणाला.


सावी,“ मग आहेच मी हुशार!बायको कोणाची आहे मी टॉपर सोहम सरपोतदारची! ” ती त्याला बिलगून हसत म्हणाली.


सोहम,“ हो का? बर तू आदित्यची ऑफर का नाकारलीस? आज ना उद्या तुला जॉब करायचाच आहे ना!” तो तिचा हात धरून म्हणाला.


सावी,“ सध्या मला नाही करायचा जॉब आणि अजून किती दिवस मी डब्बूची जबाबदारी आईवर टाकणार आधीच चार महिने झाले.तेच करतात ना माझं आणि डब्बूचे ही!आणि दुसरी गोष्ट  मला आता इंटरेस्ट नाही जॉब मध्ये पाहू पुढे जाऊन काही तरी स्वतःचच सुरू करणे! आणि मी जॉब केला तर तुझ्या मागे-पुढे कोण करणार ना! माझ्या नवऱ्याला आवडते ना मी असं सतत मागे पुढे केलेले त्याच्या!” ती डोळे मिचकावत म्हणाली.


सोहम,“असं आहे तर मग ठीक आहे!” असं म्हणून त्याने तिला मिठी मारली.


             शेवटी खूप सारी वादळे झेलून सोहम आणि सावीची नैय्या पार लागलीच! दोघांना ही एकमेकांची किंमत कळली होती.दोघांमध्ये प्रेम तर होत पण त्यांना एकमेकांची किंमत कळत नव्हती पण खास करून सावीला सोहमची किंमत नव्हती. ती तिच्या भूतकाळातील अनुभावरून चुकीचे विचार आणि  धारणा मनात बाळगून सोहमशी ती चुकीच्या पद्धतीने वागली. सोहमने ही तिच्या पासून  गोष्टी लपवून चूकच केली होती. दोघांनी ही त्यांच्या नात्यात चुका केल्या पण सावीच्या चुका मात्र जास्त होत्या. जेव्हा सोहमला कायमचे गमवण्याची वेळ तिच्यावर आली तेव्हा तिचे डोळे उघडले.सोहमने ही कोणत्याच गोष्टीची लपवा- छपवी न करता तिला सगळे सांगायला हवे होते पण त्याने ते केले नाही.

       आपण जन्माला येताना आई-वडील, भाऊ-बहीण ही रक्ताची नाती बरोबर घेऊन येतो पण नवरा-बायकोचे नाते आपण आपल्या पसंतीने निवडत असतो.  आपण मोठे होत जातो तस तसे प्रत्येक नात्यावर एक वेस्टन चढत जाते.उदा- जी मुलगी लहान असताना  बापाच्या अंगा खांद्यावर खेळते तीच मुलगी मोठी झाल्यावर बापा पासून थोडे नंतर राखून राहू लागते. 


   पण नवरा-बायकोचे नाते हे अनावृत्त असते त्याला कोणत्याच प्रकारचे आवरण किंवा वेस्टन असत नाही.म्हणूनच कदाचित हे नाते सर्वात महत्त्वाचे आहे.त्यात लपवा-छपवी वगैरेला जागा नसते.म्हणूनच नवरा-बायकोचे नाते हे पारदर्शक हवे.


____________समाप्त_____________


    मी माझ्या प्रत्येक कथेतून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असते.लेखक म्हणून ती माझी जबाबदारी आहे असे मला वाटते. हमसफर्सच्या निमित्ताने ही मी सामजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

        कायमच आपल्या समाजात स्त्रीवर होणारा अत्याचार आणि अन्याया बद्दल बोलले जाते. पण बऱ्याच वेळा पुरुषांच्या वर ही अन्याय आणि अत्याचार होत असतोच की हेच मी या कथेतून थोडया-फार प्रमाणात दाखवायचा प्रयत्न केला आहे. सोहमवर सावी तिच्या असलेल्या पुरुषांबद्दलच्या चुकीच्या विचार धारेमुळे कुठे तरी अन्यायच करते.तिला या सगळ्याची उपरती होते.पण सोहम सारखे अनेक पुरुष अशा प्रकारचा अन्याय  आज समाजात सहन करत आहेत. कधी सोहम प्रमाणे प्रेमा पोटी! कधी मुलांसाठी तर कधी समाज काय म्हणेल म्हणून ते हा अन्याय सहन करत असतात.

           आता कथेचं नाव हमसफर नसून हमसफर्स का ठेवलं? कारण सावी आणि सोहम हे दोघे एकमेकांचे हमसफर असले तरी त्यांच्या बरोबर बरेच सह प्रवासी या प्रवासात सामील होते. सावी आणि सोहमचे बरीच जवळची माणसे आणि नाते संबंध त्यातील पैलू मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या खऱ्या आयुष्य ही नवरा-बायोको या नात्या भोवती अनेक नात्यांची गुंफण असतेच की प्रत्येक नात्याचा एक वेगळा पैलू दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.


सोहमच्या आई म्हणजेच नीताताईचे आणि सावीचे सासू-सुनेचे पण मैत्रिणी सारखे नाते!


सोहम आणि सावीच्या आईचे म्हणजे सुमेधाताईंचे जावई आणि सासू पेक्षा मुलगा आणि आईचे नाते!


सोहमचे बाबा आणि सावी यांच्यातील सून-सासऱ्या पेक्षा मुलगी आणि वडील यांचे हक्काचे नाते!


सोहम आणि आदित्य या दोघांमधील मैत्री पेक्षा ही वरचे नाते असा मित्र जो मित्राच्या पाठीशी कायम उभा आहे 


सावी आणि आदित्यचे नोक झोपवाले पण हळवे भावा-बहिणीचे नाते!


आणि सगळ्यात महत्त्वाचे ज्या नात्या भोवती ही कथा गुंफली गेली आहे ते नवरा आणि  बायकोचे सुंदर नाते!


  तर कशी वाटली कथा नक्की सांगा आणि मला दिलेल्या भरभरून प्रेमा बद्दल खूप खूप आभार!


  लवकरच भेटू एका नव्या कथे सह!


या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.


©Swamini (asmita) chougule




    


      



     


          


        

   





🎭 Series Post

View all