Login

हमसफर्स पर्व २भाग २

This Is Love Story


हमसफर्स पर्व 2 भाग 2
संध्याकाळी ठरल्याप्रमाणे एका पंचतारांकित लॉनमध्ये पार्टी झाली. सावीने सत्येंनच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना आणि तिच्या कलीग तसेच जवळच्या मित्र-मैत्रिणींना पार्टीसाठी बोलावले होते. सत्येंनने केक कापला. मुलांच्या आवडीच्या पदार्थांची रेलचेल होती. तसेच लहान मुलांसाठीचे वेगवेगळे गेम्सही ठेवण्यात आले होते. सत्येंन खुश होता आणि तो गेम्स तसेच त्याच्या मित्रांमध्ये रमला होता. ते पाहून सावीला बरे वाटले. कारण सत्येंन सतत सोहमची आठवण काढत असे. त्यामुळे तिला त्याची चिंता वाटायची. आज देखील तो पार्टीच्या वेळी कसा वागेल? रडेल का? असे अनेक प्रश्न तिला सतावत होते. कारण सकाळीच तो सोहमची आठवण काढून रडला होता.

सगळे पार्टी एन्जॉय करत होते. आदित्य सगळी व्यवस्था जातीने पाहत होता. निताताई आणि सुभाषराव देखील पाहुण्यांनाशी बोलण्यात, त्यांचे हवे नको पाहण्यात गढले होते. पार्टी अकरा वाजता संपली. तोपर्यंत सत्येंन पेंगु लागला होता.

आदित्य,“ सावी तू काका-काकू आणि सत्याला घेऊन घरी जा. मी इथलं सगळं पाहतो. सत्या झोपायला लागला आहे.”तो म्हणाला.

सावी,“ बरं!” म्हणून ती सत्येंनला कडेवर घेऊन निघाली.

ती घरी पोहचली. निताताई-सुभाषराव त्यांच्या रूममध्ये गेले. सावी सत्येंनला घेऊन तिच्या रूममध्ये जात होती. सत्येंन झोपेत पुटपुटत होता.

“ डॅडा आपण पालटी करू. मम्माला न्यायचं नाही….” असं बरंच तो पुटपुटत होता.

त्याचे पुटपुटतने ऐकून सावीचा मात्र बांध फुटला. तिने सत्येंनला बेडवर व्यवस्थित झोपवले, त्याला पांघरूण घातले आणि ती बाथरूममध्ये गेली. इतका वेळ कसाबसा अवरलेला हुंदका आता तोंडातून बाहेर पडला. ती मनसोक्त रडली. तिला आजकाल सवयच झाली होती. एकट्याने रडण्याची आणि पुन्हा मुखवटा घालून सगळ्यांसमोर वावरण्याची, आज ही ती तेच करत होती. ती तोंड धुवून बेडवर येऊन बसली. आज काही केल्या तिला झोप लागत नव्हती. ती सोहमच्या विचारत गढून गेली होती आणि तिच्याही न कळत ती मनाने दहा महिने मागे गेली.

दहा महिने आधी…

आज आदित्य आणि श्रेयाची मॅरेज एनिव्हर्सरी होती. त्यामुळे सावी-सोहम आणि बाकी सगळेच पार्टीला गेले होते. पार्टी धुमधडाक्यात झाली आणि रात्री सगळे घरी आले. सोहमच्या कडेवर सत्येंन झोपला होता. त्याला सुभाषरावांनी त्यांच्याकडून घेतले आणि ते म्हणाले.

सुभाषराव,“ जा बब्बू तुम्ही झोपा आता, सत्याला झोपू दे आमच्याकडे.”

सोहम,“ बरं ” म्हणून तो बेडरूममध्ये गेला.

सावी आधीच बेडरूममध्ये गेली होती. ती ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहून कानातले काढत होती. तर सोहमने येऊन तिला मिठी मारली. ते पाहून सावी हसली आणि तिने त्याला विचारले.

सावी,“ डब्बू कुठे आहे? तुझ्याकडे होता ना तो?”

सोहम,“सावी तुला किती वेळा सांगितले त्याला डब्बू म्हणू नकोस म्हणून तर तू आणि तो अद्या मुद्दाम करता ना? आणि सत्यला बाबा घेऊन गेले. त्यांच्या रूममध्ये.” तो म्हणाला.

सावी,“ अरे मला आवडत त्याला डब्बू म्हणायला. आई आहे मी त्याची, मी काही ही म्हणेन त्याला आणि तू नाही का त्याला सत्य म्हणत?” तिने विचारले.

सोहम,“मी त्याला सत्य म्हणतो कारण तो आपल्या स्वप्नातून उतरलेले सत्य आहे आणि तुला काय म्हणायचे ते म्हण बाई. तुझ्यासमोर आधीच आम्ही शरणागती पत्करली आहे.” तो तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत, त्याचे तिच्या भोवतीचे हाताचे कडे अजून घट्ट करत म्हणाला.

सावी,“बरं सोड सोहम मला, साडी काढून फ्रेश होऊन येते.” ती म्हणाली.

सोहम,“राहू दे साडी! तू साडीत खूप सुंदर दिसतेस सावी! असं ही ती कुठे राहणार आहे थोड्या वेळाने तुझ्या अंगावर?” तो तिला डोळा मारत म्हणाला.

सावी,“ अच्छा! म्हणजे साहेबांचा मूड आज रोमँटिक आहे तर!” ती त्याच्याकडे वळून त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत म्हणाली.

सोहम,“ हो मग मी उद्या दिल्लीला जाणार आहे सावी, कॉन्फरन्स आहे तिथे.”तो म्हणाला.

सावी,“ तुझं ते आहेच का सोहम अजून?माझं ऐक ना प्लिज नको जाऊस ना तू उद्या, मला चांगले व्हेवस येत नाहीत रे! एक तर ताराला जाऊन दोनच महिने झाले आहेत. तिचा नवऱ्याचे विक्रमच म्हणणं आहे की तिचा अपघात नाही तर खून झाला आहे. ते काही वर्षांपूर्वी सेक्स रॅकेट तिच्याचमुळे उघडकीस आले होते म्हणून आणि तू ही त्यात होतास तूच तर त्यांची साईड हॅक केली होतीस ना, मला भीती वाटते.” ती काळजीने बोलत होती.

सोहम,“सावी अग त्या घटनेला नऊ वर्षे होऊन गेली आहेत आणि माझं नाव सुरक्षेच्या करणामुळे पुढे आलेच नव्हते. ताराच म्हणशील तर तो अपघात होता. पोलिसांनी तसं सांगितले आहे. तुला चांगलच माहीत आहे माझे जाणे किती गरजेचे आहे ते. मीच तर नेटवर्किंग केले आहे ना आमच्या संस्थेचे आणि मी महाराष्ट्र विभागाचा M. D. तर आहेच पण आता ट्रस्टी देखील आहे ना? अग भारतातून सगळ्या विभागाचे M. D., C. E.O. आणि ट्रस्टीज येणार आहेत कॉन्फरन्सला. मग मीच नाही जाऊन चालेल का?” तो तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेऊन तिला समजावत होता.

सावी,“ तू मेडिकल एमर्जन्सी आहे म्हणून सांग ना! तू असं कर माझा एक्सिडंट झाला म्हणून सांग. तुला जावं लागणार नाही मग.” ती त्याचा हात धरून बोलत होती.

सोहम,“ मूर्ख आहेस का तू? काही ही काय बोलते आहेस. जाऊदे, सगळा मूड स्पॉईल केलास माझा. मला उद्या जायचं आहे मी झोपतो.” तो चिडून म्हणाला आणि जाऊन बेडवर झोपला.

सावी,“सॉरी ना! पण सोहम तुला कळत का नाही? मला काय वाटते ते? मी तुला कधी तरी अडवले आहे का? तू जातोसच ना बिझनेस टूरला कायम.”ती बेडवर त्याच्याजवळ बसून बोलत होती.

सोहम,“ तेच म्हणतोय मी सावी अग आत्ताच अशी का वागत आहेस तू?” त्याने उठून बसत वैतागून विचारले.

सावी,“ जाऊदे तुला नाही कळणार. सॉरी ना तू तुझा मूड नको ना घालवू एक तर आठ दिवस तू जाणार आहेस.” ती त्याला मिठी मारत तोंड पाडून म्हणाली.

सोहम,“सावी या आठ वर्षांत तू किती बदललीस. म्हणजे माझा तो एक्सिडेंट झाला आणि तू बदलत गेलीस. आधी हेकेखोर, हट्टी, डॉमीनेटिंग, करिअर ओरियेंटेड सावी आता शांत, समजूतदार झाली. कधी कधी ना मला वाटतं की हीच ती सावी का? जिच्या प्रेमात मी पडलो होतो?But you know I love you!”तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

सावी,“पण सोहम तू मात्र बदलला नाहीस. तोच उत्साहाचा खळखळता धबधबा राहिलास आणि मी त्याच सोहमवर प्रेम करते. आता गोष्ट राहिली मी बदलण्याची तर साहेब मी आधी फक्त प्रेमिका होते नंतर बायको झाले आणि मग आई झाले. मग बदल तर होणारच ना? आणि काय रे माझी स्तुती करतोस की मला नावं ठेवतो आहेस?” तिने गाल फुगवून विचारले.

सोहम,“ फुगले का गाल लगेच? मी तर स्तुती करत होतो तुझी, तुला नावं ठेवून मला घरात राहायचं नाही का? एक तर मला आजकाल प्रश्न पडतो की आई-बाबा माझे आहेत की तुझे? कारण सतत आपलं सावी सावी करत असतात.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.

सावी,“ जलकुकडा कुठला! बरं आता गप्पाच मारायच्या का नुसत्या?” तिने विचारले.

सोहम,“असं कसं होईल सावी मॅडम?” असं म्हणून त्याने तिच्या भोवतीचे हातांचे कडे आणखीन घट्ट केले.
★★★

दुसऱ्या दिवशी सोहम जाणार म्हणून सावी सकाळपासून अस्वस्थ होती. तिने त्याला हर तऱ्हेने थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही थांबायला तयार नव्हता.

तो दुपारी बाराच्या फ्लाईटने जाणार होता म्हणून मग एक तास आधीच एअरपोर्टसाठी निघाला. सत्येंन शाळेत गेला होता.

निताताई,“नीट जा आणि पोहोचल्यावर फोन कर बब्बू! जास्त दगदग करू नकोस.” त्या सांगत होत्या.

सुभाषराव,“रोज फोन करत जा आठवणीने. आता तुझा लेक आला की रडून घर डोक्यावर घेईल त्याला त्याचा डॅडा न भेटता गेला म्हणून.” ते हसून म्हणाले.

सोहम,“ तुम्ही आहात की त्याच्या डॅडाचे डॅडा त्याची समजूत काढून त्याला शांत करायला.”तो हसून म्हणाला.

सावीचा चेहरा मात्र उतरलेला होता. तिचे मन त्याला जाऊ द्यायला तयार होत नव्हते. असं वाटत होते की काही तरी निसटून जाणार आहे. पण सोहमच्या हट्टा पुढे तिचे काही चालले नाही. त्याचे देखील बरोबर होते. त्याच्यासाठी ही कॉम्फरंन्स खूप महत्त्वाची होती. त्याने सावीकडे पाहिले आणि निताताईने त्याला डोळ्यांनीच खुणावले. तसा तो सावीला म्हणाला.

सोहम,“सावी माझा पेन ड्राइव्ह तेव्हढा दे ग!” (तो म्हणाला आणि सावी काहीच न बोलता बेडरूममध्ये पेन ड्राइव्ह शोधायला गेली. तर सोहम तिच्या मागे गेला आणि त्याने दार पुढे लोटले. त्याने तिला मागून मिठी मारली आणि बोलू लागला.)सावी असं बाय करणार का मला? तू असा चेहरा पाडलास तर माझा पाय निघेल का घरातून? थोडं हसून बाय म्हण ना!” तो म्हणाला.

सावी,“सोहम तुला जाऊ नको म्हणलं तर तू चालला आहेस. नीट जा. स्वतःची काळजी घे. तुझी बॅग मी नीट पॅक केली आहे. काही नाही सापडलं तर फोन कर आणि अजून थंडी नाही संपली तर थंड काही खाऊ नकोस. चल उशीर होईल तुला.” ती त्याच्याकडे वळून त्याला सूचना देत होती.

सोहम,“हो मॅडम तुमच्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल. मग आता हसून बाय कर ना!” तो म्हणाला आणि सावी हसली.

सोहम निघून गेला. तो कायमचाच कधीच परत न येण्यासाठी!

सावी भूतकाळातुन वर्तमान काळात आली. ती त्याच्या फोटोशी बोलत होती.

“मी जाऊ नको म्हणत होते ना तुला? का गेलास सोहम तू? तू ना माझ्याशी कायम असंच वागतोस. तू माझं ऐकलं असतेस तर आज आमच्या जवळ असतास. आपल्या सत्यला, आई-बाबांना, मला सगळ्यांनाच तुझी गरज आहे सोहम! तू फसवलस मला!” ती रडत पुटपुटत होती आणि सत्येंनची झोप चाळवली,सावीने डोळे पुसले. सोहमचा फोटो तिथेच ठेवला आणि सत्येंनला प्रेमाने थोपटले त्यामुळे सत्येंन पुन्हा गाढ झोपला.

सोहम या जगात नाही हे कटू सत्य अजून देखील कोणाला ही नीट पचवता येत नव्हते. पण असं काय घडलं होत की सोहम या जगात नव्हता?

©स्वामिनी चौगुले