हमसफर्स पर्व २ भाग ५

This Is A Love Story


चार-पाच दिवस असेच निघून गेले. आदित्यने पुन्हा इंदौरचा विषय काढला नाही. त्यामुळे सावी देखील तो विषय विसरून केली. सगळ्यांचेच रुटीन व्यवस्थित सुरू होते. सावी आज ऑफिसमधून आली. ती सत्येंन बरोबर खेळत होती आणि तोपर्यंत आदित्यचा मोठा भाऊ अमित ज्याला सगळेच भाऊ म्हणायचे तो आला. सुभाषरावांनी त्याला दारात पाहिले आणि ते उठून दारात जात त्याला म्हणाले.

सुभाषराव,“ ये अमित बऱ्याच दिवसांनी?सावीsss अगं अमित आला आहे.”

अमित,“ काका बिझनेसचा व्याप इतका वाढला आहे की वेळच मिळत नाही. सत्या इकडे ये हे बघ तुझ्यासाठी कॅटबरी आणले आहे.” तो त्याच्या हातात कॅटबरी देत म्हणाला. पाणी घेऊन येत असलेल्या सावीलाकडे सत्येंनने घेऊ का? अशा नजरेने पाहिले आणि सावीने डोळ्यांनीच घे म्हणून सांगितले.सत्येंनने कॅटबरी घेतले.

सत्येंन,“ थांकू काका.” तो म्हणाला. सावीने पाणी अमितला दिले आणि ती सत्येंनला म्हणाली.

सावी,“ बच्चा जा तुझ्या रूममध्ये खेळ जा.(सत्येंन गेला आणि ती खुर्चीवर बसत अमितला म्हणाली.) भाई आज तुम्ही घरी? काय काम होत का?”तिने आश्चर्याने विचारले कारण अमित सहसा त्यांच्या घरी येत नसे. तो कार्यक्रम अगर फॅशन असेल तरच त्यानिमित्ताने त्यांच्याकडे येत असे. म्हणून तिला आज अमित आल्याचं आश्चर्य वाटत होतं.

अमित,“ सावी तुझ्याकडे काम आहे माझे म्हणून मी आलो आहे आज.”तो म्हणाले.

सावी,“ बोला ना भाई असं काय काम आहे?” तिने असमंजसपणे विचारले.

अमित,“ मी तुला विनंती करायला आलो आहे सावी!” तो म्हणाला.

सावी,“विनंती? कसली विनंती?” तिने आश्चर्याने विचारले.

अमित,“ सावी आदित्य इंदौरला जायला नाही म्हणत आहे कारण तू त्याच्याबरोबर जायला तयार नाहीस. आदित्य नाही गेला तर मला इंदौरला जावे लागेल कारण तिथे बिझनेस सेट करायचा आहे.पण सध्या मी नाही जाऊ शकत कारण तिथे एक वर्ष राहावे लागणार आहे. त्यामुळे फॅमिली घेऊन जावे लागेल. विरेन(त्याचा मुलगा) या वर्षी दहावीला आहे त्यामुळे तो आमच्या बरोबर येऊ शकत नाही. संध्याला(त्याची बायको) संधीवाताचा प्रचंड त्रास आहे आणि थंडीत तो बळावतो. इंदौरला तर खूप जास्त थंडी असते त्यामुळे मी तिला तिकडे घेऊन गेलो तर तिचा त्रास आणखीन वाढेल. बरं मी तिला आणि विरेनला इथे ही सोडून जाऊ शकत नाही कारण संध्या सतत आजारी असते. आई-बाबांची ही वयं झाली आहेत. मी अडचणीत सापडलो आहे सावी! म्हणून मी आदित्यला जा म्हणत आहे पण तो तुम्हांला सोडून जायला तयार नाही. तू आणि आदित्य तिकडे गेलात तर तुमच्या कामाचा उरक पाहता वर्ष्याच्या आधीच काम पूर्ण होईल. सत्येंन आणि रिधाला सांभाळायला श्रेया आहे. तिथे शाळेत या दोघांना सहज ऍडमिशन मिळून जाईल. सत्येंन, तू आणि काका-काकू सगळ्यांनाच चेंज मिळेल. प्लिज सावी तू आदित्य बरोबर जा.” तो हात जोडून त्याची कैफियत मांडत होता.


सावी मात्र आता चांगलीच कात्रीत सापडली होती. तिला अमितशी काय बोलावे कळत नव्हते.


सावी,“ भाई अहो हात काय जोडत आहात माझ्या समोर तुम्ही काळजी नका करू मी आदित्यशी बोलते.” ती कशीबशी म्हणाली.

अमित,“ सावी तो नाही ऐकणार कोणाचं, तू आणि सत्येंन त्याचा विक पॉईंट आहात. एक तर सोहम गेल्यापासून तो खूप हळवा झाला आहे. तुमच्या बाबतीत तर तो पझेसिव्ह आहे. त्याचा कोणावर ही विश्वास नाही. अगदी माझ्यावर देखील.मला माहित आहे. मी तुला पेचात टाकत आहे पण माझ्याकडे देखील दुसरा पर्याय नाही सावी.”तो गंभीरपणे बोलत होता.

इतका वेळ शांतपणे दोघांनाचे बोलणे ऐकत असणारे सुभाषराव आता बोलू लागले.

सुभाषराव,“सावी अमित बरोबर बोलतोय. आदित्य या बाबतीत कोणाचे ही ऐकणार नाही. एक तर तो सत्येंनला भेटल्या शिवाय दोन दिवस देखील राहणार नाही कारण सत्येंनला भेटल्यावर त्याला त्याचा सोम्या भेटल्याचे समाधान मिळते. तो बिझनेस टूरला जरी गेला तरी रिधा पेक्षा जास्त कॉल सत्याला करतो आणि तू सत्येंनला घेऊन इथून बाहेर पडलीस तर सत्येंनला येणाऱ्या सोहमच्या आठवणींची तीव्रता कदाचित कमी होईल. तुला देखील चेंज मिळेल. एक वर्षाचा तर प्रश्न आहे.” ते तिला समजावत होते.

सावी,“म्हणजे तुम्ही आणि आई आमच्या बरोबर येणार नाही जर मी इंदौरला गेले तर?” तिने चिडक्या आवाजात विचारले. तोपर्यंत नाष्टा आणि चहा घेऊन येत असलेल्या निताताई बोलू लागल्या.

निताताई,“ असं कसं येणार नाही सावी तुझ्याबरोबर आम्ही येणार की, या बद्दल आमची कालच चर्चा झाली आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि तुझ्या बाबांना दमा आहे. तिकडे थंडी जरा जास्तच असते म्हणून हे थंडीचे चार-पाच महिने गेले की आम्ही येऊ. तोपर्यंत तू सत्याला घेऊन पुढे जा.” त्या म्हणाल्या.

शेवटी नाही होय म्हणत सगळ्यांनी समजावल्यामुळे सावी आदित्य बरोबर इंदौरला जायला तयार झाली. आदित्यने महिन्या भरात तिथे दोन फ्लॅट तसेच सत्येंन आणि रिधाचे ऍडमिशन या सगळ्याची व्यवस्था करून घेतली. उद्या दुपारच्या फ्लाईटने ते इंदौरला जाणार होते. सावी आज ऑफिसला न जाता. तिची आणि सत्येंनची राहिलेली पॅकिंग करत होती.

तिला खरं तर जायचे नव्हते पण सगळ्यांच्या जोर देण्याने आणि समजवण्याने तिला जाणे भाग पडले. तसेच सत्येंनला इथून दूर गेल्यावर चेंज मिळेल आणि तो सोहमच्या आठवणीतून थोडाफार बाहेर येईल हा देखील त्यामागे एक उद्देश होता. ती तिचे घेऊन जाण्याचे काही कपडे भरत होती आणि तिच्या हाताला सोहमने तो जाण्याआधी तिच्यासाठी हट्टाने घेतलेला शॉर्ट वन पीस लागला. तिने तो वन पीस एकदाच घातला होता. तोही ती आणि सोहम दोघेच डिनरला बाहेर गेले होते तेंव्हा, सोहम तिला त्या वन पीसमध्ये पाहून चांगलाच रोमँटिक झाला होता. तिने ते सगळे आठवले. तिने क्षण भर त्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि पुन्हा जिथे होता तिथे ठेवून दिला.

ती सोहमच्या वॉर्डरोबकडे वळली. तिने वॉर्डरोब उघडले आणि सोहमच्या देहाचा टिपिकल सुगंध तिला शहारून गेला. तिने त्याचे कपडे, घड्याळे, सेंट आणि बऱ्याच वस्तूंवरून प्रेमाने हात फिरवला.ती बराचवेळ त्याच्या वस्तूंवरून हात फिरवत राहिली. तिने त्यातला त्याचा एक शर्ट घेतला आणि त्याचा सुगंध दिर्घ श्वास घेऊन श्वासात भरून घेतला. तिने तोच शर्ट आणि त्याची एक सेंटची बाटली, त्याचा फोटो सगळं तिच्या बॅगेत ठेवलं. तिथे असलेला एक फोटो तिने हातात घेतला आणि ती बोलू लागली.

“सोहम मी इंदौरला जात आहे. तुझा तो आद्या आहे ना तो हटून बसला आहे की माझ्याशिवाय तो जाणार नाही. मग काय मला जावंच लागेल ना! खरं तर मला आपले घर सोडून कुठेच जायचे नव्हते पण जावे लागेल. त्या येड्या आदित्यसाठी! एक वर्षाचा तर प्रश्न आहे.” ती डोळे पुसत म्हणाली.

तिने स्वतःला सावरले आणि हॉलमध्ये बाकी बॅगांच्या जवळ ती बॅग आणून ठेवली. सत्येंन नवीन ठिकाणी जाणार म्हणून खुश होता. आज काही केल्या सावीला झोप लागत नव्हती. सत्येंन कधीच गाढ झोपून गेला होता. सावी मात्र तळमळत होती. तिला आज पुन्हा एकदा सोहमपासून दूर जाण्याचा आभास होत होता. ती उठली आणि खिडकीत जाऊन बसली. ती मनातून खूपच अस्वस्थ होती. त्याच अवस्थेत तिला मध्यरात्री कधीतरी झोप लागली.

सोहम,“ सावी अग इतकं दुःख कशाच होत आहे तुला? तू तर कायमच स्वच्छंदी जगत आलीस. तुला बंधनात राहायला कधीच आवडले नाही. तू तुझ्या आयुष्यात एकाच बंधन स्वीकारलेस आपल्या प्रेमाचे बंधन! त्या शिवाय तू कधीच बंधनात नव्हतीस आणि नाहीस मग आज का अडकत आहेस तू नसत्या भावनांच्या बंधनात!का स्वतःला बांधून घेत आहेस तू या घरात!सावी हे घर म्हणजे माझं अस्तित्व नाही. मी तर माझं अस्तित्व तुझ्याजवळ ठेवून गेलो आहे सत्यच्या रुपात मग या भौतिक गोष्टींचा मोह तू का करत आहेस?सत्यला घेऊन एका नवीन दुनियेत बिनधास्तपणे प्रवेश कर. काय माहीत तिथे तुला जगण्याची नवीन उभारी मिळेल.मी तर तुला भेटतच राहीन कायम.”

तो म्हणाला आणि हवेत विरून गेला. सावी झोपेतून सोहम सोहम म्हणत जागी झाली. ती उठली तर सकाळचे सहा वाजले होते.ती उठली आणि इथेच खिडकीत बसून मनात बोलू लागली.

‛ हे कसले स्वप्न होते? कसला संकेत? सोहम तू मला कायमच जगण्याची दिशा दाखवतोस पण आज तुझ्या बोलण्याचा अर्थ मला उलगडत नाही. काय सुचवायचे आहे तुला?’

ती या सगळ्या विचारात गढली होती आणि निताताईनी तिला हाक मारली.त्यानंतर तिला या स्वप्नाचा विचार करायला वेळच मिळाला नाही. सत्येंनचे आवरणे.निताताईना औषधे बाकी सगळ्या गोष्टी समजावून सांगणे यात बारा कधी वाजले तिला ही कळलं नाही. तोपर्यंत आदित्य आणि श्रेया रिधा सह गड्या घेऊन एअरपोर्टला जाण्यासाठी तिच्या घरी हजार होते.नीताताईंनी सावीच्या हातावर दही-साखर दिले.सावीने दोघांना वाकून नमस्कार केला.

सावी,“बाबा तुमचे आणि आईचे सगळ्या रिपोर्टच्या फाईली मी आईंच्याकडे दिल्या आहेत. औषधं आणून ठेवली आहेत. बाकी बिलं मी ऑनलाईन भरेन.किराणा बाकी सगळं तो दुकानदार घरी आणून देईल. तुम्ही दोघांनी काळजी घ्या. मी ज्यावेळी तुमच्या दोघांनाचे रुटीन चेकअप असेल तेंव्हा येईलच आणि अधूनमधून ही येत राहिनच. तुम्हाला इथं करमले नाही किंवा आमची आठवण आली की लगेच मला सांगा मी फ्लाईटचे तिकीट बुक करेन आणि हो एवढे थंडीचे चार-पाच महिने गेले की मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही इंदौरला माझ्याकडे येणार आहात” ती डोळ्यातले पाणी पुसत बोलत होती.

सुभाषराव,“ हो सावी अग आम्हाला वाटले की आम्ही तुम्हाला भेटायला येणार बेटा आणि हे थंडीचे महिने सरले की आम्ही येणारच आहोत. आम्हाला तर कुठे करमते आमच्या डब्बू शिवाय!” ते हसून सत्येंनचा गाल ओढत म्हणाले.

सत्येंन,“ आजोबा डब्बू नाही म्हणायचं!” तो त्यांना मिठी मारत फुर्गटून म्हणाला.

निताताई,“बरं! बच्चा मम्माला त्रास नाही द्यायचा.हट्ट नाही करायचा. गुड बॉय आहे ना तू?मग गुड बॉय सारखं वागायचं!” त्या डोळ्यातले पाणी लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या पण सत्येंन त्यांना बिलगला आणि त्यांचा बांध फुटल्या त्यांनी सत्येंनला उचलून घेतले आणि त्याचे पापे घेत त्याला प्रेमाने कुरवाळू लागल्या.

सत्येंन,“ आजी तू पण चल ना आमच्या बरोबर!” तो रडक्या आवाजात म्हणाला.

सुभाषराव,“ काय गं नीता राडवलस ना बच्चाला! बच्चा आम्ही येणारच आहोत थोड्या दिवसांनी.” ते त्याचे डोळे पुसत त्याला समजावत म्हणाले.

सुभाषरावांना देखील वाईट वाटत होते पण त्यांनी तसे दाखवले नाही. त्यांना कणखर राहणे गरजेचे होते.शेवटी ते सोहमनंतर घरचे कर्ते पुरुष होते. त्यांच्या थकलेल्या खांद्यावर सोहमच्या जाण्याने पुन्हा जबाबदारी पडली होती आणि ती जबाबदारी ते नेटाने निभावत होते.

जड पावलांनी सावी सत्येंनला घेऊन आदित्य-श्रेया बरोबर इंदौरला गेली. नियतीने मात्र आता वेगळेच फासे या सगळ्यांच्या समोर टाकायची तयारी केली होती.
©स्वामिनी चौगुले




















🎭 Series Post

View all