हमसफर्स पर्व २ भाग ४

सोहम आणि सावीच्या आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट
सावी जेवणं झाल्या नंतर सगळ्यांना घेऊन आईस्क्रीम खायला गेली. तिथून येई पर्यंत सत्येंन नेहमीप्रमाणे झोपला होता. सावी गाडी पार्क करून आली. तोपर्यंत सुभाषराव सत्येंनला तिच्या बेडरूममध्ये झोपवून आले. सावी रूममध्ये गेली. सत्येंन मस्त झोपला होता. आज आईस्क्रीम मिळाल्यामुळे तो खुश होता आणि झोपेत देखील त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. सावीने प्रेमाने त्याच्या गालाचा पापा घेतला आणि ती देखील आडवी झाली.

सावीचा दिवस सभोवतालच्या कोलाहलात निघून जात असे पण रात्रीची शांतता मात्र तिला खायला उठत असे. रात्रीच्या वेळी तिच्या मनाचा डोह ढवळून निघत असे आणि सोहमच्या एक म्हणता हजार आठवणी तिला छळत असत. तिच्यासाठी खरं तर सोहमच्या आठवणी म्हणजेच जगण्यासाठीचा एक मार्ग बनल्या होत्या आजकाल. ती कायम त्यांच्या भूतकाळातील आठवणींमध्ये रमायची. कधी कधी एखादा प्रसंग त्या ताज्या करून जायच्या. आजच प्रसंग ही तिला सोहमच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवत होता आणि ती त्या हिंदोळ्यावर आपसूकच झुलत होती.

एक वर्षापूर्वी….

आज सत्येंनच्या शाळेत पॅरेन्स मिटिंग होती. ती सत्येंन बरोबर घरी आली ती तणतणतच. सत्येंन गुबचुप सोफ्यावर येऊन बसला. ती चिडून बोलत होती.

सावी,“या सोहमने या सत्याला जास्तच डोक्यावर बसवलं आहे आई, आज मॅडम सांगत होत्या ही तो क्लासमध्ये खूप खोड्या करतो.आता येऊ दे याच्या डॅडाला आणि याला पण.”


सत्येंन खाली मान घालून तोंडावर हात ठेवून हसत होता. सुभाषरावांनी त्याला तोंडावर बोट ठेवून गप्प बस म्हणून खूण केली.

सुभाषराव,“ सावी अगं पण आज रिजल्टपण होता ना त्याचा त्याच काय झाले?”

सावी,“ हा घ्या. साहेब या टेस्टमध्ये ही फस्ट आले आहेत. नुसतं बापावर गेलं आहे कार्ट! आईचा एक पण गुण नाही याच्यात.” ती बडबडत होती.

सत्येंन,“ ये माझ्या डॅडाला काही म्हणायचं नाही.” तो चिडून तिला त्याच इवलसं बोट दाखवत म्हणाला.

सावी,“ आला का लगेच नाकावर राग तुझ्या?” ती स्वतःचे हसू दाबत खूप रागात असल्याचा आव आणत म्हणाली.

दोघा माय-लेकाची जुगलबंदी सुभाषराव आणि नीताताई कौतुकाने बघत होते.

सुभाषराव,“ सावी तुला राग नेमका कशाचा आला आहे ते ठरवं बाई एकदा? म्हणजे बघ तुला सत्या सोहमवर गेला आहे याचा राग आला आहे? की तो पहिला आला म्हणून राग आला आहे?” त्यांनी हसू दाबत खूप गंभीर असल्याचा आव आणत विचारले.

सावी,“मला याच्या खोडकरपणाचा राग आला आहे बाबा. याच्या टीचर सांगत होत्या की हा खूप हुशार आहे. स्वतःच पटापट लिहून मोकळा होतो आणि मग दुसऱ्याच लिहून देत बसतो. क्लासमध्ये उनाडक्या करतो. सतत त्याच्या भोवती मुलींचा घोळका असतो म्हणे.” ती तणतणत होती.

आणि ऑफिसमधून दारात शूज काढत असलेला सोहम सगळं ऐकत होता. तो आत आला आणि सत्येंन त्याला पळत जाऊन बिलगला.

सत्येंन,“डॅडा या मम्माला सांग ना. उगीच मला लागवतेय.” तो तोंड फुगवून त्याच्या पायाला मिठी मारून बोलत होता.

सोहमने त्याची बॅग टीपॉयवर ठेवली आणि सत्येंनला कडेवर घेत म्हणाला.

सोहम,“ सावी का रागवत आहेस ग माझ्या बच्चूला?” तो खूप राग आला आहे अशा अविर्भावात तिला विचारत होता.

सावी,“डॅडा आला की झाल्या का सुरू माझ्या तक्रारी?त्याला श्वास तरी घेऊ दे. जा सोहम फ्रेश होऊन ये. चहा नाष्ट्याचे पाहते मी.” ती म्हणाली.

निताताई,“ मी नाष्टा तयार केला आहे.चहा ठेवते आता. तू जा त्याच्याबरोबर त्याला काय हवं नको ते पहा. डब्बू तू जा आजोबांच्या बरोबर नाष्टा कर.” त्या म्हणाल्या.

सोहम पुढे गेला आणि सावी त्याच्या मागोमाग गेली. तो फ्रेश होई पर्यंत तिने त्याचे घालायचे कपडे काढून ठेवले. सोहम फ्रेश होऊन आला. तो कपडे घालत तिला पाहत होता. आज सावीने पॅरेन्स मिटिंगला जायचे म्हणून ग्रे कलरची साडी नेसली होती. केस बांधलेले होते. मुळातच सुंदर असणारी ती आणखीनच सुंदर दिसत होती.तो तिला पाहत म्हणाला.

सोहम,“ look at you! You are looking gorgeous!”

सावी,“ सोहम इथं मी काय म्हणतेय? तुला रोमान्स सुचतोय का?” ती त्याला रागाने पाहत म्हणाली.

सोहम,“काय झालंय सावी? माझ्या बच्चूवर का भडकली होतीस उगीच?” तो केस विंचरत तिला आरशात पाहत म्हणाला.

सावी,“ हेच हेच माझा बच्चा माझा बच्चा म्हणून तू त्याला लाडाऊन ठेवले आहेस.तो शाळेत स्वतःचा अभ्यास करून दुसऱ्याचा ही अभ्यास करून देतो. त्याच्या भोवती सतत मुलींचा गराडा असतो म्हणे.त्याच्या टीचर सांगत होत्या.” ती त्याला सांगत होती.या तिच्या बोलण्यावर सोहम मोठ्याने हसायला लागला.

सोहम,“ म्हणून तू त्याला रागवत होतीस. सावी तो K. G. मध्ये आहे फक्त. त्याचा पहिला नंबर तर आलाच असेल ना.” तो तिला बेडवर बसवून तिच्याजवळ बसत म्हणाला.

सावी,“ हो फस्ट आला आहे तो. पण ना त्याच्यामध्ये माझा एक पण गुण नाही आला. तुझीच कार्बन कॉपी आहे तो.” ती तोंड वाकडं करत म्हणाली.

सोहम,“ म्हणून पोटात दुखत आहे तर? तुझ्यात ना एक छोटीशी सावी आहे बघ. तुला सत्य तिच्या सारखा नाही म्हणून वाईट वाटत आहे. पण सावी तू आई आहेस त्याची, तू आमच्या सगळ्यांचा विरोध न जुमानता.स्वतःचा जीव धोक्यात घालून जन्म दिला आहेस त्याला. तुला किती त्रास झाला होता त्याला जन्म देताना. तू त्याची आई आहेस हे कोणीच झुगारु शकत नाही. त्याच्यावर सगळ्यात जास्त अधिकार तुझा राहणार आहे कळलं तुला? आता तो माझ्यासारखा आहे त्याला मी काय करणार बुआ हा पण हट्टीपणा त्याच्यात तुझ्याचकडून आला आहे.इतकी पॅनिक नको होऊस. तो अजून खूप लहान आहे आणि मी समजावतो त्याला इथून पुढे तो कोणाच काही लिहून वगैरे देणार नाही.” तो तिचा हात हातात घेऊन बोलत होता.

सावी,“बरं आणि आता मस्का मारावा लागेल छोट्या साहेबांना नाही तरी आत्ता पर्यंत गालाच्या पुऱ्या फुगल्या असतीलच.” ती लटक्या रागाने म्हणाली आणि दोघे हसले. तोपर्यंत नीताताईंनी दोघांना हाक मारली.

सोहम बरोबर सत्येंन अगदी झोपे पर्यंत मस्ती करत राहिला. सावी जेंव्हा रूममध्ये आली तेंव्हा सत्येंन सोहमच्या गळ्यात हात घालून त्याच्या पोटावर निवांत झोपला होता आणि सोहम त्याला प्रेमाने थोपत होता. सोहमने सत्येंनला गाढ झोप लागली याची एकदा खात्री केली आणि त्याला अलगद बेडवर झोपवले. गार्गीने त्याला पांघरूण घातले आणि मायेने त्याला कुरवाळले.

सोहम उठला आणि हळूच सावीला घेऊन त्याच्या आवडत्या खिडकीत गेला. त्यांच्या बेडरूमला एक मोठी खिडकी होती. तिथे एक माणूस सहज झोपेल अशी व्यवस्था केली होती. तिथे गादी अंथरलेली होती. त्या काचेच्या खिडकीचे पडदे उघडले की पूर्ण मुंबई तिथून दिसायची.सोहम खिडकीत बसला आणि सावी त्याच्या मिठीत विसावली.बराच वेळ दोघे ही शांत होते.

सावी,“तुला आठवतंय सोहम आपल्या पुण्यातील घरात मी पहिल्यांदा आले होते तेंव्हा मी आपल्या बेडरूममध्ये अशीच खिडकी पाहिली होती आणि ती मला खूप आवडली होती. मी तेंव्हाच तुला म्हणाले होते की अशीच खिडकी आपण मुंबईच्या घरात ही बनवून घ्यायची आणि तू ती बनवून ही घेतलीस. सोहम मी अक्षम्य चुका करून देखील तू मला माफ केलंस. आज जे काही सुख मी उपभोगते आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे; नाही तर मी तुझ्या शिवाय काय केले असते?कशी जगले असते काय माहीत?” ती भावुक होत बोलत होती.

सोहम,“सावी झाली तुझी पुन्हा तीच रेकॉर्ड सुरू.अगं मी जगावेगळं काहीच केले नाही. तू चुका केल्यास तर त्या चुकांना मी ही जबाबदार होतोच की आणि मी तर तुझ्या शिवाय कुठे जगू शकलो असतो आणि हे सुख माझ्या एकट्यामुळे नाही तर आपल्या दोघांमुळे आहे.रादर आई,बाबा ,अद्या सगळ्यांच्यामुळे आहे आणि मिसेस सावनी सोहम सरपोतदार मी तुमचा पिच्छा असाच थोडी सोडणार आहे. मी तर तुला तू म्हातारी होई पर्यंत पिडणार आहे.” असं म्हणून त्याने सावीला आणखीन घट्ट मिठी मारली.

सावीच्या ओठांवर आपसूक हास्य पसरले आणि हसता हसता तिच्या डोळ्यात पाणी तरळले.

सावी,“सोहम मला म्हातारी होई पर्यंत पिडणार होतास ना तू? मग असं अर्ध्यावर सोडून का गेलास? मी नाही जगू शकत तुझ्या शिवाय, कोणता राग कढलास सोहम माझ्यावर?” त्याच खिडकीत बसून ती रडत पुटपुटत होती.

माणूस आपल्या आयुष्यातुन कायमचा निघून जातो पण त्याच्या आठवणी, त्याच्याबरोबर घालवलेले सुखद क्षण मागे राहिलेल्या माणसांना मात्र छळत राहतात पण त्याच सुखद आठवणी माणसाला जगण्याचे बळ देखील देतात. सावी याच सगळ्यातून जात होती.


सावी या घराशी असलेल्या सोहमच्या सुखद आठवणी सोडून जायला तयार नव्हती मात्र नियतीने तिच्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची यत्किंचितही कल्पना तिला नव्हती.
©स्वामिनी चौगुले









🎭 Series Post

View all