हमसफर्स पर्व २ भाग ३

This Is A Love Story


सावी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली. आदित्य तिचीच वाट पाहत होता. तिला पाहून आदित्य तिच्या केबीनमध्ये गेला.सावी नुकतीच लॅपटॉप उघडत होती. आदित्यला पाहून ती हसून म्हणाली.

सावी,“ गुड मॉर्निंग,आज बंधुराज सकाळी सकाळी माझ्याकडे?”

आदित्य,“हो तसंच काम होतं. सावी मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे.”तो म्हणाला.

सावी,“ मग बोल ना.”

आदित्य,“ तुला तर माहीत आहे की आपल्या कंपनीची एक ब्रँच इंदौरमध्ये उघडण्यात येणार आहे आणि भाऊच असं मत आहे की मी तिथले ऑफिस आणि बिझनेस सेट करावा. मी विचार करत होतो तू पण माझ्याबरोबर चल. मी भाईला अजून हो म्हणालो नाही. तू जर माझ्याबरोबर येणार असशील तर मी इंदौरची जबाबदारी स्वीकारेन नाही तर नाही.” तो गंभीरपणे बोलत होता.

सावी,“हो मला माहित आहे ते, एक वर्ष तुला तिथेच रहावं लागणार आहे पण तू भाईला अजून का नाही सांगितलंस आणि माझ्या येण्याचा काय संबंध? मी इथेच राहीन की आई-बाबा, सत्या सगळ्यांची फरपट कशाला? तू जा ना! माझ्या हो किंवा नाही म्हणण्या जवळ काय आहे आदित्य?” तिने विचारले.

आदित्य,“सावी मी तुला इथे सोडून कुठे ही जाणार नाही. सोम्या गेल्यानंतर मी तुम्हाला कधीच एकटं सोडलं नाही आणि तुम्ही माझीनुसती जबाबदारी नाही तर माझा जीव अडकला आहे सावी तुमच्यात! सोम्याने धोका दिल्यापासून मला खूप भीती वाटते.” तो भावूक होऊन बोलत होता.

सावी,“ आदित्य अरे मला कळतय पण मी आहे ना इथेच आणि आता मला मुंबई सोडाविशी नाही वाटत रे!आई-बाबा ही तयार नाही होणार त्यामुळे नाही येऊ शकत मी. तू जा ना.” ती म्हणाली.

आदित्य,“सावी अग तू,सत्या, काका-काकू इथून बाहेर पडलात तर वातावरण बदलेल माणसं बदलतील. सत्याला ही चेंज मिळेल कदाचित जागा बदलल्यामुळे सत्याला सोम्याच्या येणाऱ्या आठवणींची तीव्रता कमी होईल. तुला ही वर्ष भर चेंज मिळेल.” तो तिला समजावत होता.

सावी,“नाही आदित्य मला इथून कुठेच जायचे नाही. माझे घर म्हणजे माझ्यासाठी सोहमचा दरवळ आहे. ते घर सोडून मी कुठेच जाणार नाही.” ती म्हणाली.

आदित्य,“ठीक आहे मग मी ही नाही जाणार कारण तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही.” तो म्हणाला आणि निघून गेला.

सावीच्या मनात मात्र अनेक विचारांचा कल्लोळ माजला. ती दिवसभर आदित्यच्या बोलण्याचा विचार करत राहिली. तिला चांगलं माहीत होतं. आदित्य तिला सोडून कुठे ही जाणार नाही. ऑफिस सुटलं आणि ती घरी गेली. सत्येंन ही शाळेतून कधीच घरी आला होता. सावी फ्रेश होऊन आली आणि निताताईंनी तिला कॉफी दिली. तोपर्यंत सत्येंन तिच्याजवळ येऊन सोफ्यावर बसला. तो आज शाळेत काय काय झाले ते तिला सांगू लागला. त्याची अखंड बडबड सुरू होती पण सावीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. ती विचारात गढली होती. ती काहीच उत्तर देत नाही ते पाहून सत्येंन तिला हाताने हलवत म्हणाला.

सत्येंन,“मम्मा ऐक ना!”

सावी,“ सत्या जा बरं तू खेळ जा.” ती त्याच्यावर भडकली.

तिच्या अशा वागण्याने सत्येंनच्या डोळ्यात पाणी भरले. सुभाषराव तिथेच होते. त्यांनी सत्येंनला जवळ घेतले आणि ते त्याला समजावत त्याच्या रूममध्ये घेऊन गेले. सावी थोड्या वेळाने भानावर आली आणि सत्येंनशी ती जे वागली त्याच तिला वाईट वाटले. आधीच ती सोहम गेल्यापासून सत्येंनच्या बाबतीत खूपच हळवी झाली होती.

सत्येंन कायम सोहमला चिकटून असायचा. सोहम कामावरून आला की त्याचे आणि सत्येंनचे गुलपीठ सुरू असायचे अगदी झोपताना देखील सत्येंनला त्याचा डॅडा लागायचा. पण गेल्या दहा महिन्यांपासून सत्येंन सावीला चिकटला होता. सोहम गेल्यावर दोन महिने तर सत्येंन सारखा सोहमची आठवण काढून रडायचा,सतत आजारी पडायचा. शेवटी बालमानोसपोचारतज्ञाची मदत घ्यावी लागली आणि हळूहळू सत्येंन त्यातून बाहेर पडला. तो आधी सोहमला चिकटलेला असायचा पण आता सावीच्या मागेपुढे असायचा. ती ऑफिसमधून आली की तो तिला बिलगायचा तो रात्री झोपला तरी तिला चिकटून असायचा. सावीला देखील आता जगण्यासाठी सत्येंनच आशेचा किरण होता. ती त्याच्या बाललीला आणि बडबडीत रमून जायची पण आज मात्र ती सत्येंनवर दहा महिन्यात पहिल्यांदा रागावली होती. ती खूपच अस्वस्थ होती. ते निताताईंच्या नजरेतून सुटले नव्हते. त्या सावी जवळ बसल्या आणि तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत बोलू लागल्या.

निताताई,“काय झालं सावी? ऑफिसमधून आल्या पासून तू अस्वस्थ आहेस. ऑफिसमध्ये काही झाले आहे का?”

सावी,“ आई आमच्या कंपनीची नवीन ब्रँच इंदौरमध्ये सुरू होणार आहे. भाईला वाटते की आदित्यने ती जबाबदारी स्वीकारावी आणि इंदौरला एक वर्षासाठी जावे पण आदित्य आपल्याला सोडून जायला तयार नाही. तो म्हणत होता की तुम्ही ही चला माझ्याबरोबर. तेवढाच चेंच मिळेल, सत्याला ही आपल्या सगळ्यांना ही,मला नाही जायचं आई हे घर सोडून कुठे, इथे माझ्या सोहमच्या अस्तित्त्वाचा दरवळ आहे. या घराच्या प्रत्येक कोपऱ्याला त्याचा सुवास आहे. त्याच्याबरोबर आपण या घरात अनेक आनंदाचे क्षण जगलो ते क्षण कुठे तरी या घरात अजून देखील आहेत.” ती त्यांच्या मांडीवर डोके ठेवून रडत बोलत होती.

तोपर्यंत सुभाषराव ही सत्येंनला समजावून खेळात नादी लावून आले होते. त्यांनी ही सावीचे सगळे बोलणे ऐकले होते.

निताताई,“ आदी बरोबर बोलतोय सावी, तू बब्बू गेल्यापासून मुंबईच्या बाहेर पडलीच नाहीस. ना सत्येंनला कुठे बाहेर घेऊन गेलीस. तू जर इथून बाहेर पडलीस तर चेंच मिळेल शिवाय सत्येंनमध्ये ही बदल होईल. सतत इथेच राहून सोहमची आठवण येत राहणार तुला ही आणि त्याला ही. बघ विचार कर. मला वाटतं तू जावंस सत्येंनला घेऊन.” त्या तिला समजावत म्हणाल्या.

सावी,“ नाही आई मी नाही जाणार कुठे ही. तुम्हा दोघांना सोडून तर नाहीच नाही. एक तर नुकतीच थंडी सुरू झाली आहे आणि तिकडे प्रचंड थंडी असते. आपण गेलो तरी बाबांना तिथले वातावरण सूट नाही होणार.” ती असं म्हणाली आणि सत्येंनच्या रूमकडे वळली.

सत्येंन त्याच्या रूममध्ये खेळत बसलेला होता. त्याला कोणाची तरी चाहूल लागली. त्याने वळून पाहिले. त्याला सावी त्याच्याजवळ येताना दिसली आणि त्याने गाल फुगवून पुन्हा मान वळवली. सावी त्याच्या या कृतीवर गालातल्या गालात हसत होती.ती मनात बोलत होती.

‛कार्ट सगळं बापावर गेलंय. नुसती झेरॉक्स कॉपी आहे बापाची, माझा तर लवलेश पण नाही याच्या दिसण्यातच काय? पण वागण्यात बोलण्यात सुद्धा!सोहमच्या ही तो फुगला की गालाच्या पुऱ्या व्हायच्या आणि याच्या ही होतात. चला सावी मॅडम राजे चांगलेच भडकले आहेत. आज काही तरी लाच द्यावी लागणार आहे.’

ती त्याच्या जवळ जाऊन बसली तर सत्येंनने तिच्याकडे पाठ केली. सावीने त्याला दोन्ही हाताने उचलून स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली. सत्येंन आता तोंड फुगवून म्हणाला.

सत्येंन,“सोल मला; मला तुझ्याशी बोलायचे नाही मम्मा!”

सावी,“ सॉरी ना बच्चा! मम्माकडून चूक झाली.हे बघ मी कान धरते.” ती खरंच कान धरून म्हणाली.

सत्येंन,“नको मला तुझे सॉली एक तर माझं काही ऐकून घेतले नाही. आज मला फाईव्ह स्टाल मिलाले आहेत मॅतमध्ये आणि टीचरपण गुड बॉय म्हणाल्या मला, तुला सांगत होतो तर मला रागावलीश तू, जा आता.” तो तोंड फुगवून बोलत होता.

सावी,“ अरे वा! म्हणजे आज माझा बच्चा गुड बॉय सारखा वागला तर आणि बच्चा मॅत नसतं ते मॅथ्स असतं ते, मम्मा सॉरी म्हणतेय ना! बरं आज माझ्या डब्बूला फाईव्ह स्टार मिळाले म्हणून आईस्क्रीम पार्टी.” ती लहान मुलासारखं म्हणाली.

सत्येंन,“ खलंच का?” त्याने तिला मिठी मारत विचारले.

सावी,“हो! जेवण झाल्यावर तुझ्या फेव्हरेट आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊ आपण तू, मी, आजी-आजोबा.” ती त्याला कुरवाळत म्हणाली.

आणि सत्येंनचा रुसवा छुमंतर झाला. खरंच बालपण किती निरागस असते. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधत असते. आपण मोठे होत जातो आणि जगण्यातला आनंद गमावून बसतो. खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या मनात एक लहान मूल जपले पाहिजे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवता येतो.

सावी इंदौरला जायला तयार नव्हती. पण आदित्य म्हणत होता ते देखील कुठे तरी बरोबर होते. जागा,माणसे, वातावरण बदलले की माणसाच्या जगण्यात ही बदल होतो. दुःख थोडं का होईना हलकं होत पण सावीला मात्र ते पटत नव्हतं. तिला सोहमच्या आठवणी सोडून, तीच घर सोडून कुठेच जायचं नव्हतं.

आदित्य आणि निताताई तिला इंदौरला जाण्यासाठी मनवु शकतील का?
©स्वामिनी चौगुले





🎭 Series Post

View all