Jan 20, 2021
General

ग्लास अर्धा भरलेला

Read Later
ग्लास अर्धा भरलेला

ग्लास अर्धा भरलेला..

टेंभे गुरुजी मुंबईस मुलाकडे रहावयास आले होते. मुलगा दिनकर प्राध्यापक होता. सून देवकी शिक्षिका होती. थोडक्यात ज्ञानदानाचं कार्य त्यांच्या पुढच्या पिढीनेही चालू ठेवलं होतं. 

देवकी स्वैंपाक,ओटा सगळं आवरुन दुपारच्या सत्रासाठी निघून जायची. नातवंड सागर व पर्णिका शाळेत गेलेले असायचे.  टेंभे गुरुजी दरवर्षी दिनकरकडे यायचं झालं की सौंना सोबत घेऊन यायचे पण यावेळी त्यांचं कंबंरेचं दुखणं जरा अतिच बळावलं होतं त्यामुळे त्यांनी टेंभे गुरुजींना सफशेल नकारच दिला. खरंतर असं कधी केलं नव्हतं त्यांनी पण प्रक्रुती साथ देत नव्हती त्याला त्या तरी काय करणार. टेंभे गुरुजींना आठवलं नववी,दहावीसाठी ते स्पेशल शिकवणी घ्यायचे स्वतःच्या घरी. दहावीची मुलं तर महिनाभर आधी त्यांच्या घरी रहायला येत होती. टेंभे गुरुजींच्या सौंना गावात सगळी मास्तरीणबाय म्हणायचे. मास्तरीणबायकडे आपलं पोरगं गेलय म्हणजे ते उपाशी झोपणार नाही याची गावकऱ्यांना सोळा आणे खात्री असायची. 

फुलाफुलांचं नववारी लुगडं,केसांचा अंबाडा,त्यावर एखादं घमघमणारं अनंताचं फुल नाहीतर मोगऱ्याच्या सुवासिक फुलांचा गजरा,कपाळाला रुपयाएवढा मोठा कुंकवाचा गोल,हातभर चुडा,,गळ्यात काळ्या पोतीत ओवलेल्या सोन्याच्या डवल्या..बुटकीशी,गोरीपान मास्तरीणबाय म्हणजे गुरुजींच्या घरची अन्नपूर्णा होती.  तिच्या हातच्या वरणभातालाही अम्रुताची चव असायची.

 घरी चंद्रा म्हैस होती. तिचं दूध,दही,तुप कधी विकलं गेलं नाही. मास्तरीणबायच्या मुलांसाठी व शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्या़साठी मास्तरीणबाय कधी ताकाची कढी भात  तर कधी मिरच्या भाजून दह्यात कालवून ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ घालायची. तुप घालून लाडू वळून ठेवायची. कितीतरी विद्यार्थी टेंभे गुरुजींच्या हाताखालून शिकून गेले. 

टेंभेगुरुजी सेवानिवृत्त झाले तरीही गावातला त्यांचा मान काही तसुभरही कमी झाला नव्हता. गुरुजी परसबागेत मन रमवू लागले होते. केळी,माड,पोफळी यांची निगराणी करण्यात त्यांचा जीव रमत होता. ही झाडंही जणू त्यांची लेकरंच होती. 

टेंभेगुरुजींच्या सुनेने,देवकीने शाळेत जाण्याआधी गुरुजींना जेवण वाढून दिलं होतं. त्यांच्या उशाशी एका बशीमधे संत्र ठेवून गुरुजींना येते म्हणून सांगून ती बाहेर पडली होती. गुरुजींनी मास्तरीणबायला फोन लावला

'हेलो,मी गुरुजी बोलतोय.'

'बोला हो. बरे अहात ना आणि सागर,पर्णिका कसे आहेत?'

'सगळी बरी आहेत गं.'

'जेवलात का?'

'हो,मी जेवलो. तुझं जेवण झालं?'

'जेवले हो मीही. तिकडे गेल्यावर बरी माझ्या जेवणाची चौकशी. इकडे असताना..'

'इकडे असताना काय? किंतीदा म्हंटलं माझ्यासोबत जेवायला बसत जा तर नाही.'

'अहो,बरं दिसतं का ते! आपलं राबतं घर. कुणीतरी येतच असतं अधनमधनं शिवाय गडीही आहेतच की.'

'जसं काय घासच भरवायला सांगतोय मी तुला.'

'काय हा चावटपणा. ईश्श,मुंबईचं पाणी लागलं वाटतं तुम्हांला.'

'काय वाईट आहे गं या पाण्यात! आपली सून, देवकी नवऱ्याआधी जेवते. प्रथमदर्शनी मलाही वेगळं वाटलं ते पण आपला दिनकर क्लासेस घेऊन रात्री दहा साडेदहापर्यंत घरी येतो. तोपर्यंत का उपाशी रहाणार पोर! घेते जेवून. कपडे धुवायला मशीन घेतलय. त्यात कपडे टाकतात. अगदी स्वच्छ धुवून,वाळूनही निघतात.'

'अगं बाई! बाई काढली वाटतं. बरी होती. माझ्याशी चार गप्पा मारायची.'

'हे तर काहीच नाही. भांडी घासायचंही घेणारैत म्हणे मशीन.  देवकी नाश्ता,स्वैंपाकाचं आवरुन मुलांना अभ्यासाला बसवते. इमारतीतली पाच सहा मुलंदेखील येतात शिकवणीला. दिनकरही सकाळी देवकीला मदत करतो घर आवरण्यात. एकदंरीत संसाराची भट्टी जमलेय त्यांना. मी मात्र तुलाच कामाला लावायचो. विद्यार्थ्यांसाठी चहा,जेवण..एका शब्दाने कधी बोलली नाहीस मास्तरीणबाय.'

'अहो,ज्ञानदानाचं पवित्र काम करत होता तुम्ही. माझाही त्यात खारीचा वाटा स्वैंपाक करुन. आणि मान का कमी मिळाला मला! इनमिन सातवी शिकलेले मी तरी सगळेजण मास्तरीणबाय म्हणतात.'

'बरं,मास्तरीणबाय मी काय म्हणतो,अनायासे इथे आलोच आहे तर दोन विद्यार्थ्यांना भेटेन म्हणतो. असंच आपलं कुतूहल म्हणून गं.'

'असं म्हणताय. बरं पुरुषोत्तम देसायास भेटा. तो जिल्ह्यात पहिला आलेला न् तोच. त्यास भेटा. बघा सध्या काय करतोय तो. पत्ता,फोन दिनू देईलच तुम्हाला. त्यांचे काय ते वाट्सप ग्रुप आहेत म्हणे. ते संपर्कात असतात एकमेकांच्या.'

'बरं आणि दुसरा गं? दुसरा..कमलाक्ष बेंडेला भेटा. तुमच्या छडीचा जास्तीत जास्त मार त्यानेच खाल्ला असेल.' 

'अगं म्हणजे. होताच तो डांबरट. आत्ता तरी काय दिवे लावलेत कोण जाणे.'

'बरं ,लवकर या हो. करमत नाही इथे तुमच्याशिवाय. तुमच्यासाठी गोधडी शिवायला घेतलीय मी. बाजुची सरु येऊन बस ते गप्पांना.'

'बरं फोन ठेवतो गं काळजी घे.'

रात्री दिनकर फार उशिरा घरी आला. दिनकरची सकसेस कॉमर्स एकेडमी अगदी जोमात चालू होती. एफवायजेसी ते एफवायबीकॉमपर्यंतच्या बँचेच तो घेत होता. हाताखाली अनुभवी प्राध्यापक होते. 

दिनकरचं जेवण झाल्यावर गुरुजींनी विषय काढला.

'काय दिनू,हल्ली फार उशीर होतो तुला घरी यायला.'

'चालायचंच बाबा. क्लासेसचा व्याप वाढतोय. आता एमकॉमच्या बेचेसही घेणार आहे. शिवाय सीए फाऊंडेशन,पर्सनेलिटी डेव्हलपमेंट,इंग्लिश स्पिकींग, अशा अतिरिक्त बेचेस चालू करण्याच्या व्यापात आहे.'

'अरे दिनू,ज्या मुलांना कॉलेजात समजत नाही त्यांनाच क्लासमधे शिकवायचं. मी विद्यार्थ्यांना घरी बोलवून शिकवणी घ्यायचो,पण ज्यांची आकलनशक्ती कमी आहे त्यांनाच शिकवणीला बोलवायचो. सरसकट सर्वांना नाही.'

'हो बाबा,ते तुमच्यावेळचं. आता सगळ्याचेच दर वाढले आहेत. अहो,आम्ही प्राध्यापकाची नोकरी नावाला करतो. तुम्हीच सांगा,कॉलेजमधे आम्ही व्यवस्थित शिकवलं तर आमचे क्लासेसचालतील का! तसं करुन चालणार नाही आम्हांला. सध्या क्लास टाकणं म्हणजे खजिना हाती लागल्यासारखं आहे. वीसेक हुशार विद्यार्थी पकडायचे. त्यांना फीमधे डिस्काऊंट द्यायचं नि ते बोर्डात झळकले की त्यांचे मार्क्स,फोटो चिपकवून क्लासच्या नावाची जाहिरात करायची. तुम्हाला सांगतो बाबा,प्रत्येक स्टेशनच्या प्लेटफॉर्मवर,ब्रीजवर आपल्या सकसेस कॉमर्स एकेडमीचे बँनर झळकताहेत. आता तर मी थ्रीबीएचकेचा एक फ्लेटही बुक केलाय. शिवाय ज्या इमारतीत आपला क्लास चालतो त्यातील अजुन दोन ब्लॉक विकत घेतले आहेत. त्यांना क्लासरुममधे रुपांतरीत करण्याचं काम चालू आहे.' 

'छान, ऐकून आनंद झाला. आपली गावची शाळाही वाढवायचा विचार आहे गावकऱ्यांचा. तू काही डोनेशन वगैरे..'

'हो देतो की किती देऊ?'

'जास्त नाही रे. एक दहा हजार दे बास.'

'बाबा,तेवढे नाही हं जमणार. पाच हजार रुपये देतो मी आणि हो वॉट्सएपवर टाकतो हा मेसेज मग शाळेतले माजी विद्यार्थी देतीलच की.'

'बरं मला पुरुषोत्तम परदेशीचा व कमलाक्ष बेंडेचा फोन नंबर नि पत्ता दे जरा.'

'तो कशासाठी?'

'अरे जरा जावून भेटून येईन म्हणतो.'

दिनकरने पुरुषोत्तम व कमलाक्षचा कॉन्टॅक्ट नंबर गुरुजींच्या मोबाईलमधे सेव्ह केला.

पुरुषोत्तमला फोन करुन गुरुजी पुरुषोत्तमकडे गेले. पुरुषोत्तमाचं घर म्हणजे चार मजल्यांची इमारत होती. त्यातला तळमजला हा रहाण्यासाठी व वरचे सगळे मजले हे त्याच्या इस्पितळासाठी होते. पुरुषोत्तमाने गुरुजींचं स्वागत केलं. एखाद्या पिक्चरचा सेट शोभावा असा त्याचा दिवाणखाना होता. गुरुजींना त्या गुबगुबीत उंची सोफ्यावर बसताना जरा अवघडल्यासारखंच झालं. 

काचेच्या ग्लासेसमधून वेटरने पाणी आणून दिलं. त्यानंतर अगदी नाजूक पोर्सलिनच्या कपबशीतून चहा आला,सोबत बिस्कीटं.  

'घ्या,चहा घ्या गुरुजी,'पुरुषोत्तम म्हणाला.

'बाकी पुरुषोत्तमा तुझी प्रगती पाहून अभिमान वाटला हो. खूप मोठा झालास तू.'

'गुरुजी,तुमच्या आशीर्वादाने जीवाचं सोनं झालं माझ्या.'

इतक्यात पुरुषोत्तमाची सौभाग्यवती आली. तीही एमडी बालरोगतज्ञ होती. गुरुजींना नमस्कार करुन ती दोन शब्द बोलली व तिच्या ओपीडीला निघून गेली. 

'पुरुषोत्तमा,मुलं किती रे तुला?'

'एक मुलगी आहे गुरुजी. प्रज्ञा नाव तिचं.' 

'आहे कुठे ती? बघुदे तरी.'

'अहं इथे नसते ती. इथे आम्ही दोघं आमच्या व्यापात म्हणून तिला होस्टेलवर ठेवलय बंगलोरला. मोठमोठ्या सिनेकलाकारांची मुलं शिकताहेत तिथे.'

'बरं आणि आईवडील रे?'

 'ती दोघं व्रुद्धाश्रमात म्हणजे आमचा निर्णय नाही. तो निर्णय त्यांचा त्यांनीच घेतला. त्यांना समवयस्कांसोबत रहायचं होतं म्हणे. हां पण मी दिवाळीला,पाडव्याला घेऊन येतो दोघांना. चांगले आठाठ दिवस राहून जातात.'

गुरुजींना एकंदरीतच पुरुषोत्तमाच्या राहणीमानाचा उबग आला. मुलगी,आईवडील सगळी नाती बाजुला सारुन पुरुषोत्तम नि त्याची सौभाग्यवती केवळ करियरच्यामागे धावत होती. 

'पुरुषोत्तमा,बरं निघतो मी आता. आपल्या तालुक्यातही एखादं सुसज्ज इस्पितळ बांधायला हवं होतं रे.'

'तुमचं बरोबर आहे गुरुजी पण त्या गावठाणात एवढा पैसा गुंतवायचा म्हणजे तसे सधन रुग्ण भेटले पाहिजेत ओ. आफ्टरऑल हाही एक बिझनेसच आहे. गावात लोकांकडे पैसा आहे कुठे! दुखणी अंगावर काढण्यात धन्यता मानणारी लोकं ती. बरं, कोणी पुढाकार घेत असल्यास सांगा. मी देणगी निश्चित देईन.'

पुरुषोत्तमाचा निरोप घेऊन गुरुजी घरी आले. नीट जेवलेही नाहीत. त्यांच्या मनात येत होतं,मीच कमी पडलो का या मुलांना नीतीचे पाठ शिकवायला! भले स्वतःची पाठ थोपटून घेत होतो,सुसंस्कारित विद्यार्थी घडविल्याबद्दल..हे संस्कार शिकवले मी! छे!

रात्री टेंभेगुरुजींनी मास्तरीणबाईंना फोन लावला व  लेकाची,पुरुषोत्तमाची पैशाच्यापाठी चालू असलेली धावपळ सांगितली.

 'खरंच मास्तरीणबाय,मी कमी पडलो गं माझ्या विद्यार्थ्यांना घडवण्यामधे.'

'अहो,असं काय ते मनाला लावून घेता एवढं! तुम्ही अगदी तन्मयतेने शिकवलात मुलांना पण मुलं बाहेरच्या शानशौकतीला भुलून तिच्याच मागे धावताहेत त्याला तुम्ही तरी काय करणार! तुम्हांला सवयच आहे,सगळं स्वत:वर ओढून घ्यायची आणि मग बीपी कमीजास्त झाला म्हणजे. नका जीवाला लावून घेऊ. जरा कैलास जीवन चोपडा कपाळाला नि प्रभुनाम घ्या. निवांत झोप लागेल बघा.'

चार दिवस पुस्तकं वाचणं,आजुबाजूच्या गल्लीबोळांतून फिरण्यात गेले. दिनकरच्या क्लासेसचं एन्युअल फंक्शन होतं. दिनकर बायको,मुलं व गुरुजींना घेऊन गेला होता. थोडीशी भाषणं वगैरे झाल्यावर सगळी मुलं डान्स फ्लोअरवर जमा झाली. डिजे लावला आणि मुलंमुली मिळून जे काय नाचायला लागली ते पाहून गुरुजींचं डोस्कं उसळलं. 

बऱ्याच मुली या शॉर्ट्स, स्पेगेटी, वगैरे तंग कपडे घालून आल्या होत्या. गुरुजींनी लेकाकडे नजर टाकली. दिनकर म्हणाला,"अहो बाबा,हे असंच असतं हल्ली. या फंक्शनसवर जितका पैसा घालू,तितकी जास्त पब्लिसिटी मिळते आणि मग ओघाने तितके जास्त विद्यार्थी येतात क्लासला." त्या बुफेत गुरुजी अगदी दोनच घास कसेबसे जेवले. त्यांना मास्तरीणबाय आठवली..दहावीच्या विद्यार्थ्यांना गरमागरम आमटीभात वाढणारी,ताज्या दुधाचा चहा करुन देणारी तेही अगदी मोफत. 

गुरुजींनी शनिवारी कमलाक्षला फोन लावला. रविवारी सकाळी कमलाक्ष गुरुजींना न्यायला हजर. कमलाक्षच्या स्कुटरवर बसून गुरुजी त्याच्या चाळीतल्या घरी गेले. टपोऱ्या डोळ्यांच्या गौरी आणि शर्वरीने त्यांचं स्वागत केले. पाठोपाठ कमलाक्षचे वडील होतेच.

 खिडकीजवळच्या पलंगावर कमलाक्षची आई पहुडली होती. तिला संधिवाताने जखडल्याने उठताबसता येत नव्हतं. 
गुरुजी,कमलाक्षच्या वडिलांसोबत सोफ्यावर बसले. कमलाक्षची बायको सहावारी नेसलेली,सावळीशी,नाकीडोळी नीटस अशी चहा घेऊन आली,सोबत आंबोळ्या. गुरुजींना आग्रह करुन वाढत होती.

'गुरुजी खूप बरं वाटलं बघा माझ्या गरीबाच्या झोपडीत आलात ते.'

' अरे,मास्तरीणबाय आठवण काढत होती तुझी. तिनेच तुझ्याकडे जावयास सांगितलं मला. बरं तू काय करतोस सध्या?'

'एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे. वीसेक हजार पगार मिळतो. त्यावेळी शिकण्याकडे कानाडोळा केला नाहीतर कोणतरी वकील,इंजिनिअर झालो असतो.  तुमच्या छडीच्या प्रसादाने इथवर तरी आलो नाहीतर कधीच शाळा सोडली असती.' 

दुपारी खेकड्यांचा रस्सा,भात,तांदुळाच्या भाकऱ्या असा छान बेत होता. गुरुजी मनसोक्त जेवले. रस्सा मागून प्याले. जेवणं झाल्यावर कमलाक्षच्या लहानपणीच्या गंमती त्याच्या मुलींना रंगवून सांगत बसले. कमलाक्ष कसा ग्रुहपाठ अपुर्ण ठेवून यायचा आणि मग गुरुजी त्याचा कोंबडा करायचे. मुलींच्या रिबीनींची फुलं सोडायचा,कधी खेकडा,उंदीर आणून वर्गात सोडायचा आणि मग सगळ्या मुलांची होणारी तारांबळ बघत बसायचा,सपाटून मार खाऊन परत नवीन उपद्व्याप करायला सज्ज व्हायचा हे सारं ऐकून कमलाक्ष व त्याचं कुटुंब खळखळून हसलं. कमलाक्षने गुरुजींना सांगितलं,'गुरुजी,गावातलं,अगर तुमचं कोणतही काम असो. अर्ध्या रात्री हाक मारा. हा शिष्य धावत येईल बघा.' कमलाक्षने शाळेसाठी दोन हजार रुपये वर्गणी दिली शिवाय श्रमदान करण्यासही येईन म्हणाला. 

कमलाक्षने गुरुजींना त्यांच्या इतर विद्यार्थ्यांबद्दलही सांगितलं. शैलजा राजेही वकील झाली होती. गोरगरीबांना न्याय मिळवून देत होती. अच्युत पाथरे हा स्त्रीरोगतज्ज्ञ झाला होता. त्याच्या इस्पितळात मुलगी जन्मास आली की तिच्या आईचं प्रसुती बील तो माफ करत होता. खेड्यापाड्यात शिबीरं भरवून महिलांना आरोग्यविषयक ज्ञान देत होता. कोणी बस ड्रायव्हर, कोणी सीए, कोणी सरकारी अधिकारी, कोणी परिचारिका,कोणी नेत्ररोगतज्ञ, कोणी वैद्यकीय अधिकारी..कमलाक्षने प्रत्येकजण करत असलेली समाजोपयोगी कार्यही सांगितली. गुरुजींना चेहरा अभिमानाने फुलला. 

घरी आल्यावर त्यांनी मास्तरीणबायला फोन लावला व आपल्या विद्यार्थ्यांबद्दल भरभरुन बोलू लागले.

मास्तरीणबाय म्हणाली,'बघा मी म्हणत होते नं. अहो तुम्ही ग्लास अर्धा रिकामी आहे म्हणून चिंता करत होता,तोच ग्लास अर्धा भरलेला आहे हे मात्र तुम्हांला तुमच्या द्वाड विद्यार्थ्याने दाखवून दिलं बरं.'

गुरुजींनी समाधानाने मान डोलावली जी मास्तरीणबायला न दिसताही कळली.

-----सौ.गीता गजानन गरुड.