हळदी कुंकू आणि ती ! ( भाग-३)

An emotional struggle of a widow.


पूर्व सुत्र-
( मिताली तिच्या आईचं असं वागणंही सकारात्मक घेत होती हे पाहून प्रीतीला खूप छान वाटलं.)

आता मात्र प्रीतीने मितालीला मिठी मारली व खूपच भावनिक होऊन रडायला लागली. सासूबाईंच्या वागण्यातली ही भूमिका तिच्या लक्षात आली नव्हती. पण मिताली इतका सकारात्मक विचार करतेय हे पाहून तिला बरं वाटलं.

प्रीतीला बरंच काही सांगायचं होतं पण ते या विचारामुळे मनातच ठेवावं लागलं.
काय होतं नेमकं प्रीतीच्या मनात?
क्रमशः

हळदी कुंकू आणि ती! (भाग -३)


कथा पुढे -


भोगी दिवशी संध्याकाळी ही सगळी चर्चा झाली.
तिथलं हळदी कुंकू संपलं तेव्हा आई परत आली व येताना सोबत कॉलनीत राहणार्‍या मराठे काकू पण आल्या. त्यांना मितालीला भेटायचं होतं.


मितालीची आई आली तर कपाळ अगदी कुंकवाने भरलं होतं. चेहरा तेजस्वी दिसत होता पण डोळे मात्र उदास होते. त्या सासर्‍यांच्या जेवणाचं बघायला आत गेल्या आणि सासूबाईंना काहीतरी सांगायला प्रीती पण आत गेली.

हॉलमधे मिताली बसली होती. काकू येवून समोर सोफ्यांवर बसल्या. मराठे काकूंनी तिला शाळेच्या काळापासून पाहिलेलं होतं .त्या खूप मायाळू होत्या पण आता यावेळी त्यांच्याशी काय बोलावं हे कळत नव्हतं . नकळत तिचे डोळे पाणावले.


काकूंनीच सुरुवात केली," काळजी घे गं मिता. खंबीर हो आता. . . मुली गोड आहेत गं तुझ्या , खाली भेटले त्यांना.  काय बोलू मी या प्रसंगी? बरं झालं मिता,  तू आलीस इकडे. किमान आईचं लक्ष तरी राहिल तुझ्यावर. तिकडे येवू शकल्या नाहीत त्याची खूपच अपराधी भावना आलीय त्यांना. "

" हो ना बाबांची तब्येत बरी नव्हती म्हणून नाहीतर ती आलीच असती. पण हे असं सगळं अकल्पितच झालं. . . प्रीती तिकडे होती म्हणून तरी मला काही सुचलं."

"ते तर अगदी खरं. प्रीती व मयंक तिकडे होते म्हणून तुझ्या आईला चिंता नव्हती. अजून एक तू हे आजकाल जसं चाललंय तसं केलंस आणि पूर्वीसारखंच राहतेस म्हणून कौतुक वाटतय बघ.  म्हणजे माणसाला मनात ठेवतोच ना , साता जन्माच्या गाठी अशा कशा संपतील.  सौभाग्याचं  लेणं एकदा घातलं की मिरवून घ्यावं ते उतरवू नये. आमच्या तरूण काळापासून मला वाटायचं गं की आपण कुंकू- गंध लहानपणापासून लावतो ना मग असं नवरा गेल्यावर ते कुंकू पुसायची पद्धत कुणी काढली असेल ? कुंकू म्हणजे तसं जुन्या काळासारखं कुणी पंजरी तर कुणी लावत नाही. सगळे टिकल्याच लावतात. मग टिकली लावली, ठेवली , काढली काही फरक नाही पडला पाहिजे."

" ते तर मान्यच आहे काकू. पण प्रीतीचा खूप सपोर्ट मिळाला मला.  तिने खूप जोर केला , मुलींसाठी राहता तशाच रहा किंवा पुढे नोकरी करावीच लागेल तर तेव्हा ऑफिसमधे बरं वाटलं पाहिजे असं  रहा ,  हे सांगून तिने मला धीर दिला हो."

" मला एक सांग मिता , ते नाहीत म्हणून तू सतत  त्यांचा विचार करत राहणार ना !  जावई बापूंची कमी तर कशानेच भरून निघू शकत नाही. तुझं हे दु़ख जन्मभराचं आहे पण प्रत्येकवेळी पाहणार्‍याच्या डोळ्यातही ते  दुख दिसतं किंवा मग चेहरा आरशात पाहिला की प्रकर्षांने ते जाणवतं म्हणून टिकली न काढणेच उत्तम. आता खरं सांगते तुला. कितीतरी बायकांनी टिकली, गंध किंवा कुंकू लावायचंच बंद केलंय. मंगळसुत्रही त्या दागिन्यासारखं वापरतात कधी घातलं कधी नाही. आणि कशामुळे माहित नाही? जीन्सवर चालत नाही अन फ्रॉक वर चालत नाही . फॅशन प्रमाणे सौभाग्याचं लेणं घालायचं काढायचं  पण मग या लोकांना कुण्या बाईचा नवरा गेल्यावर त्या कुंकवाची व मंगळसुत्राची का आठवण येते ,  कळत नाही. पुन्हा नवीनच एक की बायकांना टिकली लावा म्हणलं तरी लगेच ती स्त्री विरोधी भूमिका वाटते मग  पेपरमधे बातम्या अन तुमच्या त्या नेटवर सगळं   येतं म्हणे. याला काय अर्थ आहे. 
इतकं स्वातंत्र्य झालंय तुला सांगते . . . हे सौभाग्य लेणं वगैरे काही राहिलं नाही मग उगीच तू मनाला लावून घेवू नको. रोज टिकली न लावणार्‍या , जीन्स व ट्रावजर घालून फिरणार्‍या या पोरी आता हळदी कुंकवाला मात्र अगदी पारंपारिक तयार होऊन येतात.   पाहून खूप छान वाटलं पण लक्ष मात्र त्या हळदी कुंकू व विधीमधे नसतंच ते फक्त शेल्फीमधे अन फोटोमधेच असतं. "

प्रीती इतक्यात चहाचा कप घेवून आली व म्हणाली
" काकू तुमचं मला हे फार आवडतं. सत्तरीच्या जवळ असूनही तुम्ही आमच्यासारखा विचार करता, सगळी लेटेस्ट बातम्या तुम्हाला माहित असतात. शिवाय सुधारवादी विचार आहेत. "

" आहे बाई मी आधुनिक विचारांची ! मी सगळीकडेच ऍडजस्ट करते म्हणून तर मला सगळेच बोलवत असतात रहायला. पण प्रीती , सगुणा - तुझी सासू मात्र फार कर्मठ आहे बाई. माझी मैत्रिण आहे , खंबीर आहे पण तिचं काही काही अठराव्या शतकातल्यासारखं मत काही मला पटत नाही बघ. आता आज इतकी रडली हळदी कुंकवाच्या वेळी!"

"हो का! अहो त्यांना मोकळं रडताही आलं नसेल ना इतके दिवस. . . " प्रीती म्हणाली.

" आता स्पष्ट च सांगते मुलीचं  तिच्या समोर असं झालं म्हणून रडणं स्वाभाविक आहे पण सगुणा रडली कारण तिला वाटतंय की तिने इतकं देवधर्म केलं , कुलाचार , सोवळं-ओवळं सगळं पाळलं तरीही देवाने असा अन्याय का केला? माझी मुलगी पण एवढी धार्मिक तरीही देवाने तिचा संसार अर्धवट का मोडला ? असं म्हणून रडत होती. मला वाईट वाटलं गं ."

आता मात्र प्रीती थक्कच झाली.

पाप पुण्य व माणसं जाणे याचा काहीतरी संबंध आहे का ? मग हे असं सगळं वाटून त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे.

त्यांची चर्चा चालू होती.

" या अशा सणांना  बायकांना खूपच जास्त जाणवतं काकू की नवरा गेला म्हणून आपण काहीच कामाच्या नाहीत असं?"

" आपण तसं नाही समजायचं. तू म्हणतेस तसं काही सण आहेत जेव्हा समाजात सवाष्ण बाईला मान देण्यच्या फंद्यात विधवा बायकांचं दुख जास्त जिवंत केलं जातं. पण काही ठिकाणी शिकलेल्या बायकांत हल्ली सगळ्यांनाच हळदी कुंकवाला बोलावण्याची पद्धत येतीय . . . चांगलं आहे बदल हा हवाच!"

"काकू , हे प्रमाण  खूप कमी आहे.  ते कथा किंवा वाटस अप मेसेजवरच होतं . प्रत्यक्षात क्वचितच. काही दिवसांपूर्वी एका शहीद झालेल्या सैनिकाच्या बायकोचा असाच अपमान झाला हळदी कुंकवात. अहो नवरा गेला तर त्या बाईने जगूच नये का? तिचा काय दोष? ती रडत बसली तर मुलांकडे बघ बाई पुढे चाल म्हणतात आणि ती आनंदी राहिली तर ते लोकांना सहन होत नाही. विधवा म्हणून कुठल्या स्त्री ला कमीपणा दाखवायचा असेल तर. . असं करायचं असेल तर हे सणच बंद करावेत. नाहीतर सर्वांना सामावून घ्यायचं मग."

प्रीती तावातावाने बोलत होती.

मितालीला मनातून हे सगळं ऐकायला बरं वाटत होतं. प्रीतीने यावर्षी सण साजरा करणंच सोडून दिलं होतं.

"झांसीची राणी , अहिल्याबाई , अशा कितीतरी महिलांची यादी आहे इतिहासात ज्यांनी नवरा गेल्यावर आपलं कर्तृत्व  गाजवलंय."  प्रीती मिताली कडे पाहून म्हणाली.

" अगदी बरोबर प्रीती. बाई ही पुरुषापेक्षा खंबीर असते पण ते तिला कळालं पाहिजे. निघते आता , सगुणे!"
टेबलावर मुलींनी केलेला पसारा व हळदीकुंकवाच्या पुड्या ,  वाणाचं ताट असा खूप पसारा होता. उगीचच मन रमवण्यासाठी मिताली उठली व आवरायला लागली इतक्यात आतून आई आली व पटकन प्रीतीला म्हणाली , " तू काढ ना ते प्रीती , तिला कशाला ? मिते तू काही नको करू नकोस शांत बस बरं इथे!"


मिता नाराज होऊन बसली. मग मराठे काकू गेल्या . बाकीची जेवणं वगैरे आवरली . उद्या संक्रांत, अगदी मोठा व उत्साहाचा सण !

(काय होईल पुढे , मितालीच्या आयुष्यात? उत्सुकता असू द्या. प्रतिक्रिया कळवा.)

क्रमशः
©® स्वाती बालूरकर ,सखी
२३. ०१ .२०२३

🎭 Series Post

View all