Jan 26, 2022
नारीवादी

हळद हसली

Read Later
हळद हसली


मीरा चा हळदीचा कार्यक्रम मोठ्या हॉल मध्ये ठेवण्यात आला होता. शंतनु आणि मीराला दोघांनाही एकाच ठिकाणी हळद लावण्यात येणार होती. हळदी च्या कार्यक्रमासाठी मीराने पिवळी साडी नेसली होती. शिवाय तिने हळदीचे मोत्याचे दागिने सुद्धा घातले होते. मीरा खूप सुंदर दिसत होती. जेव्हा ती हॉलमध्ये गेली तेव्हा शंतनु फक्त तिच्याकडे पाहत होता. पिवळ्या साडी मध्ये तिचा गुलाबी गुलाबी चेहरा खूपच खुलून दिसत होता. शंतनुला तर तिला पाहून काहीच समजेनासे झाले.

मीरा येऊन शंतनुच्या शेजारी बसली आणि हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक व्यक्ती येऊन त्या दोघांना हळद लावू लागली. मीराला ही मनात खूप वाटत होते की माझ्या आईने सुद्धा मला हळद लावावी. मीराच्या बाबांना जाऊन एक वर्ष झाले होते. मीराची आई आता एक विधवा होती. 

मीराने आईला दोन तीन वेळा खुणावले पण तिची आई काही केल्या गेली नाही.. तिचे धाडस झाले नाही. ती एक विधवा होती आणि विधवा स्त्रियांना कोणत्याही कार्यक्रमात पुढाकार घेता येत नाही त्यात शंतनुकडचे इतके श्रीमंत.. त्यामुळे तिला अजिबात धाडस झालेच नाही.. मीराने बोलावून देखील ती काही गेली नाही. लोक काय म्हणतील? आपल्या मुलीच्या लग्नात आपणच विघ्न आणतोय असे तिला सारखे वाटत होते. त्यामुळे ती तशीच जास्त बसून राहिली. शंतनुकडच्या मंडळींनी सगळ्यांनी एक एक करत त्या दोघांना हळद लावली. हळदीमध्ये ती आणखीनच खुलून दिसत होती. शंतनुने सुद्धा पांढरा शुभ्र कुर्ता घातला होता त्यामध्ये तो आणखीनच हँडसम दिसत होता. कुर्ता आणि धोती त्याने घातली होती. सर्वांनीच या दोघांना हळद लावून झाल्यानंतर एकमेकांना लावू लागले.

बऱ्याच वेळा बोलून देखील आई काही केल्या येईना म्हणून मीराने सर्वांच्या समोर तिला जोरात हाक मारली.. "आई ग, ये ना! तू सुद्धा हळद लाव.. मुलीला हळद लावायला इतका घाबरतेस." मीराचे हे वाक्य ऐकून हॉलमध्ये एक प्रकारची शांतता पसरली. सगळेजण आहे त्या जागी तसेच उभारले आणि एकमेकांकडे पाहू लागले. तिच्या आईला देखील क्षणभर काहीच सुचले नाही.

"मीरा बाळा मला चालत नाही ग. मी एक विधवा आहे. विधवा स्त्रीयांनी कोणत्या कार्यक्रमात पुढाकार घ्यायचा नसतो. तुझे जे चालू आहे ते असू दे. मी काही येत नाही.. बाकीचे सगळे हळद लावत आहेत ते लावून घे बाळा.. मी लावू शकत नाही." असे आईने तिचे म्हणणे स्पष्टच मीराला सांगितले. ते ऐकून मीराला खूप वाईट वाटले. तिला क्षणभर काहीच कळले नाही.

मुलीला जन्म आईनेच द्यायचा.. सारं काही पालन-पोषण अगदी खडतर परिस्थितीमध्ये तिनेच करायचे, तिला चांगले शिक्षण द्यायचे, तिला चांगले संस्कार द्यायचे, तिला घडवायचे.. सार काही आईने करायचे आणि लग्नामध्ये त्याच मुलीला हळद लावायचा अधिकार सुद्धा तिला नाही.. हा कसला न्याय.. लोक काय म्हणतील? या भीतीने स्वतःच्या लेकीला हळद लावायची सुद्धा तिला सक्ती नाही.. इच्छा असूनही तिला काहीच करता येऊ नये.. अशा प्रश्नांनी मीराच्या मनाची चलबिचलता चालू होती..

मीरा तशीच उठली आणि आई जवळ गेली. आई चा हात तिने दोन्ही हाताने पकडला आणि तिचे हात धरून तिला आपल्या जवळ आणले. स्वतःच्या हातानेच तिचे हात धरून हळदीच्या वाटीमध्ये आईचे हात बुडवले आणि स्वतःच्या गालाला हळद लावून घेतले. या कृत्याने सगळे नाराज झाले. पण त्या पात्रातील हळद मात्र खुदकन गालात हसली.

©®प्रियांका अभिनंदन पाटील.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..