हक्काची चौकट

लघुकथा



"अगं, तुला आठवतंय ना. आपण एकाच वेळी या आश्रमात आलो होतो. मी सात वर्षांची आणि तू पाच वर्षांची होती." सुषमा.
"पण, उद्या तुला हा आश्रम सोडावा लागणार? मग तू कुठे जाणार आहेस? काय करणार आहेस?" राधा.
खरं तर प्रश्न खूपच गंभीर होता. वासनाने भरलेल्या या जगात , नुकतेच कळीचे फुल होण्याच्या वयात , शरीर झाकावं तरी नको तिथे आणि नको त्यांची नजर जाते. कमीत कमी इथे सुरक्षित तरी आहे. उद्याची सकाळ येण्याआधी मला बोलावचं लागेल.
सुषमा अचानक उठली आणि रेक्टर कडे गेली. मला बोलायचं आहे तुम्हा सगळ्यांशी ?
परवानगी न घेता ती ऑफीसमध्ये आली. सर्व अधिकारी लोकांची मिटींग चालूच होती.
" सुषमा, काय आहे हे ? काही मॅनर्स" आमची महत्वाची मिटींग चालू आहे कळत नाही का तुला.
"साॅरी मॅम....पण खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ."
"बोल आता आलीच आहे तर".... नैना
आपल्या आश्रमात मुलींना फक्त अठरा वर्षांपर्यंच का ठेवले जाते? पुढे मुली बाहेर पडून काय करतात? त्यांच आयुष्य कसं जगतात? "
"अगं, नियमच आहे तसा. अठरा वर्षांच्या मुली सज्ञान असतात. त्या त्यांचा निर्णय घेऊ शकतात. काय करायचं हे ठरवू शकतात. त्यामुळे"....नैना.
मॅम, मी तुम्हांला मध्येच थांबवते. पण, ज्याप्रमाणे तुम्ही आम्हांला लहानपणी, अजाणत्या वयात आम्हांला तुम्ही आसरा दिला. तो अठरा वर्षांनंतर का नाही. निदान आम्हांला काही काम मिळेपर्यंत, नोकरी लागेपर्यंत किंवा आमचे लग्न....
"अगं,‌काय बोलतं आहेस तू?" नैना
हो मॅडम कारण, आम्ही इथे खूप सुरक्षित आहोत. वखवखलेल्या नजरांना आमचे शरीर जणु खाऊची पुडीच वाटते. वाटेल तेव्हा कोणीही यावं आणि सोडावं. वाटेल तेवढा खाऊ खावा आणि पोट भरलं तर चुरगळलेल्या कागदाप्रमाणे फेकून द्यावं. बोलता बोलता एक आवंढा गिळून पुन्हा बोलणारचं." सुषमा.
सुषमा....तू.
"थांबा नैना मॅडम. सुषमाच्या बोलण्यावर आपण विचार करायला हवा."
संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले राजाध्यक्ष सर स्वतः उठून उभे राहिले.
सर उभे राहताच इतर सदस्य देखील उठून उभे राहिले.
"पण सुषमा तुला असं का वाटतं की आम्ही तुझ्या बोलण्याला दुजोरा द्यावा."
"सर , खरं तर आमचं आयुष्य एका अशा प्रवाहातून गेलेलं आहे की तो प्रवाह आणि तो प्रवास अतिशय खडतर आहे. माझ्या सारख्या अनेक मुली येथे येऊन गेल्यात. पण, त्यातील एका मुलगी जी माझी मैत्रीण होती. तिने काही महिन्यांपूर्वीच आत्महत्या केली. तुम्हांला माहीतच आहे. पण, तिने असे का केले? हे मात्र कोणीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
"हो, खरंच आमच्या कडून अशी चुक झाली. पण, या गोष्टीचा तुझ्या आश्रमातून बाहेर पडण्याशी काय संबंध ?"
सर, \"मी म्हणा किंवा माझ्या सारख्या अनेक मुली म्हणा. अशा एका कुटुंबात जन्माला येतो की जिथे गरीबी तोंड वासून उभी असते. माझेही तसेच. आई वडीलांचे सतत भांडणे, ना राहायला पुरेशी जागा ,ना दोन वेळेचं खायला पुरेसं अन्न. पण, खाण्याची तोंड खूप. मला पाच भावंडे. मी घरात मोठी. आई सतत कामासाठी मरमर करायची आणि आमचे पालनपोषण करायची. बाप मात्र सारखा दारू ढोसायचा. सतत आईशी भांडायचा. मारझोड करणे हे तर नित्याचेच काम.
खरंतर आई वडील म्हणजे आपल्या आयुष्याचा आधार. जिथे संस्काराचे बीज रुजते आणि त्याची मुळं खोलवर जातात. पण, जर ते मूळच कमकुवत असले तर.... आमच्या बालमनाचा तर कोणीच विचार करीत नाही. आम्ही भावंडं वाढत होतो. मोठे होते होतो. ना विकास,ना आकार मिळत होता. आम्हांला साधी सुरक्षेची चौकट देखील नव्हती. वडीलांच्या आधाराची चौकट... तो तर विचार देखील करू शकत नव्हतो आम्ही. मग आमच्या भविष्यातल्या स्वप्नांचा अर्थ कोण समजून घेईल. आम्हांला फक्त एका बापामध्ये दडलेला हैवान दिसत होता. माझ्याच नव्हे तर आम्हां पाचही भावंडांची अशीच वाताहत झाली. एका क्षणात आम्ही अनाथ झालो.
एके दिवशी अचानक जेवणावरून आई वडीलांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि क्षणात सगळं संपलं.
तिच्या आवाजात कापरे भरले होते. डोळ्यांत अश्रुंचे अंगारे फुटत होते.
\"तो दिवस आमच्या आयुष्यातील काळा दिवस होता. मी सहा वर्षांची होते. आईने पिठलं भाकरी बनवली होती. सगळेजण जेवण करीत होते. पण, अचानक दारुड्या बापाने अन्नाचे ताट भिरकावून दिलं आणि आईशी भांडायला लागला. सुरवातीला आई शांत होती. पण, बापाचा वाढत्या आवाजाने तिला अतिशय राग आला आणि जवळच असलेला लाकडी पाट त्याच्या डोक्यात घातला. एकदा.... दोनदा.... तीनदा.... बापाच्या आर्त किंकाळी ने सारी वस्ती जमा झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाकडे बघावे की दुर्गेसारखं रुप घेतलेल्या आईला. माझ्या बापाचा श्वास थांबला होता, एका वाईटाचा अंत झाला होता.
हातातला घास हातातच राहिला. आम्ही आईला बिलगलो. आईने जोरात हंबरडा फोडला. काही वेळातच पोलिसांची गाडी आणि रुग्णवाहिका आली आणि दोघांनाही घेऊन गेली. आम्ही रडू लागलो , आईचा पदर सोडवेना. सगळे अधिकच गहिवरलो. घरात आम्ही बहीण भाऊ उरलो. शेजारी आले आणि निघून गेले.
मी घरात मोठी. आम्ही सगळेजण रडत होतो . मी सगळ्यांना जवळ घेतले. घरात एवढी स्मशान शांतता पसरली होती. की जीव तगमग करीत होता. सख्खं नातेवाईक म्हणावं असं कोणीच नव्हतं आणि असेलही तर आमची जबाबदारी घेण्यासाठी कोणीच पुढे आले नाही.
जी घराची चौकट आम्हांला सुरक्षित वाटत होती. ति कुठेतरी हरवली होती. पण, पोटाची आग कुठे शांत बसु देईना. आईने बनविलेला स्वयंपाक आम्ही जेवलो आणि एका कोपऱ्यात गोधडी टाकून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशीची सकाळ भयानक होती.‌ रक्ताच्या सड्याने आम्हांला आणखीन भीती वाटायला लागली. मी बाहेरून पाणी आणून‌ सगळं घर स्वच्छ केले. पण, आता पोटापाण्याचा प्रश्न समोर उभा होता. घरात तर काहीच नव्हते. आम्ही अक्षरशः गावात जाऊन भीक मागून खाऊ लागलो. पण, किती दिवस हे चालणार माहिती नव्हते. त्यामुळे आईने पोलिस स्टेशनमधून आमच्या सुरक्षिततेसाठी मागणी केली. अनाथ झालेल्या आम्हां पाचही भावंडांना पोलिस आईला भेटायला घेऊन गेले. कारण, नंतर तिची रवानगी एका मोठ्या जेलमध्ये होणार होती. आईने सांगितल्या प्रमाणे आमची रवानगी या आश्रमात करण्यात आली. आई मात्र कुठे होती ? कशी होती ? काहीच कळायला मार्ग नव्हता. तुम्ही लोकांनी देखील आम्हांला काहीच सांगितले नाही. पण, माझी एक कळकळीची विनंती आहे. की मला अजून काही दिवस तरी येथे राहू द्यावे. कारण, आमची हरवलेली चौकट पुन्हा शोधायची आहे. या चौकटीचा आधार स्तंभ म्हणजे माझी आई.... तिला मी परत मिळविलंच. मला नाही तर माझ्या भावंडांना आईचे प्रेम मिळेल. माझी ही सुरक्षेची चौकट काढून घेऊ नका सर... "प्लीज सर.
सुषमा हात जोडून उभी होती. रडून तिचा चेहरा लालबुंद झाला होता. सगळे वातावरण गंभीर झाले होते. निःशब्द शांतता पसरली.
नैना मॅडम , सुषमाला तिच्या खोलीत घेऊन जा. तिला सांभाळा.... राजाध्यक्ष सर बोलले.
"सुषमा तू बाहेर जा. आम्ही बघतो काय करायचं ते." राजाध्यक्ष सर.
शरीराने आणि मनाने थकलेली सुषमा हतबल होऊन ऑफीस मधून बाहेर पडली.
त्यांची थांबलेली मिटींग राजाध्यक्ष सरांनी परत सुरू केली.
" सुषमा जे बोलली ते आपण सर्वांनीच ऐकले. पण, आता या क्षणी निर्णय घेण्याची वेळ आली आहे आणि मी तो घेतला आहे. जो पर्यंत आपल्या येथील मुले आणि मुली स्वतः च्या पायावर उभे राहत नाही किंवा त्यांचा संसार मार्गी लागत नाही. तोपर्यंत येथेच राहतील. त्यांचा तो हक्क आहे आणि त्यांच्या हक्काची चौकट आपणच त्यांना मिळवून द्यायची."
राजाध्यक्ष सरांचा निर्णय ऐकताच सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले आणि सुषमा सारख्या अनेक अनाथ मुलामुलांनी हक्काची चौकट दिली.

©®आश्विनी मिश्रीकोटकर