हक्कसोडपत्र "नावावर जागा करणे" किंवा "७/१२ वा प्रॉपर्टी कार्डला नाव लावणे" या बाबतीत अनेक लोकांमध्ये गैरसमज दिसून येतात. बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, ७/१२ च्या उताऱ्याला किंवा प्रॉपर्टी कार्डला नाव लागले की, आपण मालक झालो. आणि नाव गेले कि आपला मालकी हक्क गेला. वस्तूथिती मात्र उलटी आहे. अश्या उताऱ्यांनी मालकी हक्क ठरत नाही. आपल्याकडे एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. हे दस्त कायद्याने नोंदविणे गरजेचे आहे आणि त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरणे गरजेचे असते. त्याचप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा वारसा हक्काने तबदील होऊ शकतो. ह्या दस्तांमधील "हक्कसोड पत्र" किंवा ज्याला इंग्रजीमध्ये "रिलीज डीड" म्हणतात ह्या प्रकारची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू. ह्या दस्ताच्या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की, हक्क सोडण्यासाठी मिळकतीमध्ये हक्क असणे अभिप्रेत आहे. जेव्हा २ किंवा अधिक व्यक्तींना एकाच मिळकतीमध्ये हक्क असतो, आणि त्यामधील कुठल्याही एका सहमालकाला त्याचा/तिचा हिस्सा हा अन्य सहमालकाच्या लाभामध्ये सोडून द्यायचा असेल, तेव्हा हक्क सोड पत्र दस्त बऱ्याच वेळा केला जातो. हक्कसोड पत्राला बरेचवेळा बहीण-भावाचा दस्त असे समजले जाते. कारण बहुतांशी वेळा बहिणींचा वडीलोपार्जित मिळकतींमधील हक्क भावांच्या लाभात सोडण्यासाठी ह्या दस्ताचा वापर केला जातो. हक्कसोड पत्र आणि स्टॅम्प ड्युटी.जेव्हा एखाद्या व्यक्तीला वडिलोपार्जित मिळकतीमधील आपला हिस्सा स्वतःच्या भावाच्या किंवा बहिणीच्या किंवा मुलगा/मुलगी ह्यांच्या लाभात किंवा जेव्हा मुलगा/मुलगी मयत असतील तर त्यांच्या मुला मुलींच्या म्हणजेच नातवंडांच्या लाभात किंवा स्वतःच्या आई किंवा वडिलांच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या लाभात , पण कुठल्याही प्रकारचा मोबदला न स्वीकारता सोडून द्यायचा असेल, तर फक्त २०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी वर हक्क सोड पत्र नोंदणीकृत करता येते. ह्या नाममात्र स्टॅम्पड्युटीसाठी वडिलोपार्जित मिळकत आणि विना-मोबदला ह्या दोन महत्वाच्या अटींची एकाचवेळी पूर्तता होणे आवश्यक आहे. इतर सर्व प्रकारच्या हक्क सोड पत्रासाठी मात्र खरेदीखतासारखीच संपूर्ण स्टॅम्प-ड्युटी भरावी लागते. वडीलोपार्जित मिळकत आणि स्वतंत्र/स्वकष्टार्जित मिळकत म्हणजे काय ह्याचा आपल्याकडे बऱ्याचवेळा गोंधळ दिसून येतो. वडिलोपार्जित मिळकत हि संकल्पनाच हळूहळू संपत चालली आहे, हे मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केले आहे. मात्र एखाद्या व्यक्तीची स्वतंत्र/स्वकष्टार्जित मिळकत हि कायम स्वतंत्रच राहते आणि तिच्या पुढच्या पिढीकडे ती मिळकत वडिलोपार्जित म्हणून जात नाही, असे निकाल १९८६-८७ सालापासून मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. बरेच वेळा मिळकत स्वतंत्र का वडिलोपार्जित अणि स्टॅम्पड्युटी ह्यावरून वाद-विवाद होतात. अश्यावेळी बक्षीस-पत्राचा तुलनेने कमी स्टॅम्प-ड्युटी लागू होणारा किंवा कुठलीच स्टॅम्पड्युटी न लागणार मृत्यूपत्रासारखा दस्त करणे श्रेयस्कर असते. हक्क - सोड पत्राचा उपयोग. हक्क-सोड पत्र नोंदणीकृत करून दिल्यावर दस्त लिहून देणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीमधील हक्क संपुष्टात येतो आणि लिहून -घेणाऱ्या व्यक्तीचा त्या मिळकतीमधील मालकी हिस्सा त्या प्रमाणात वाढतो. हक्क सोडपत्र हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. हा दस्त करण्यामागे देखील दस्त करणाऱ्या पक्षकारांची परस्परांबद्दलची आपुलकी अभिप्रेत असते. कधी कधी हक्क-सोड पत्रामागे "सोड-हक्क" अशी भावना असल्याचेही दिसून येते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा