हादरा:- (भाग 2)
राहुल च्या या विचित्र वागण्याने साक्षी मनातून एकदम हादरून गेली होती.तिला कळेना काय झालंय आणि का हा असे वागतोय!प्रचंड प्रश्न मनात ठेवून ती घरी पोहचली.
घरी पोचून शांतपणे राहुल ची वाट पाहत बसली. बराच वेळ झाला तरी राहुल आला नाही. तिला वाटले फोन करावा,पण तिने केला नाही.तिने ठरवलं की आल्यावरती त्याला डायरेक्ट जाब विचारावा. त्याच्या गाडीचा जसा आवाज आला, तो आलाय हे जाणवले तशी ती आवरून बसली.
राहुलने बेल वाजवली तशी धावत पळत जाऊन तिने दार उघडले. त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहिले राहुल ने नजर वळवली आणि तो आतमध्ये गेला. आत जाऊन त्याने खांद्यावरच्या बॅग टेबल वर ठेवली आणि काहीही न बोलता तो डायरेक्ट बेड रूम कडे निघाला.
" मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे"
"मला आता काहीच बोलायचं नाहीय." राहुल
" तू अस करू शकत नाहीस, तुला बोलावच लागेल!"साक्षी
" काय बोलायचं तुला? तुला विचारायचं असेल काहीतरी." राहुल
" हो मला विचारायचं तुला!" साक्षी
" काय विचारायचं तुला की मॉल मध्ये मी असा का वागलो ते?" राहुल म्हणाला.
" जर तुला माहीत आहे तर उत्तर का नाही देत? तुला माहीत नाही का मला काय वाटलं असेल ते?" वैतागून साक्षीने विचारलं.
" साक्षी मला वाटलं होतं की तू समजू शकली असतीस आतापर्यंत पण तू नाही समजू शकलीस कारण तुला समजून घ्यायाचेच नाहीय.मी जे वागतो प्रत्येक वेळ ती माझ्या मनाची स्थिती आहे हे का नाही तुला समजत."
" काय मनाची स्थिती? कुठल्या एका मुलीबरोबर शॉपिंग मॉल ला जातो आणि आनंदात शॉपिंग करतो ही मनाची स्थिती असते का?"
" अग ही स्थिती म्हणजे माझी परिस्थिती असेल काही कारणाने!"
" काय परिस्थिती? कोण होती ती मुलगी?"
" तुला प्रत्येक गोष्ट या अशा पद्धतीनेच घ्यायची असेल तर मला काही बोलायचे नाही."
"राहुल मी तुला स्पष्ट पणें विचारतेय कोण होती ती मुलगी?"
" काय सांगू मी, माझी आधीची एक भळभळती जखम असे म्हणू शकतेस!"
" कोड्यात बोलू नकोस राहुल, नक्की सांग कोण होती ती?"
" साक्षी मी आधी पण सांगितलं होतं की माझ्या पास्ट मध्ये काय झालेय."
" अच्छा ती तुझी पहिली बायको होती!"
" हो"
" तिच्याबरोबर काय करत होतास? तिच्या बरोबर तर सगळे संबंध संपले होते न?"
" काही गोष्टी अशा असतात की त्या ठिकाणी आपल्याला आपले मन मारून जावं लागतं."
"अशा कुठल्या गोष्टी असतात राहुल की तुला मन मारून तिच्या बरोबर शॉपिंग करायला जावं लागलं आणि ती सुद्धा आनंदाने शॉपिंग करायला. ही शॉपिंग करून तुला काय मिळवायचं होत हे तर तू सांग."
" साक्षी प्रत्येक गोष्टीचा उत्तर कशामध्ये तरी दडलेलं असेल आणि ते तुला कळतं नसेल तर मी काय सांगू?"
" मला इतकच सांग की कुठल्याही परिस्थितीत तुला तुझ्या त्या बायकोबरोबर जाण्याची गरज का पडली?"
"कारण आमच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्या मला पार पाडाव्या लागतात."
" म्हणजे तू काय करतोस?माझ्या नकळत तिच्या कडे जातोस!"
"हो जातो ."
" तिला भेटतोस?"
"हो तिला भेटतो."
" अजून काय करतोस तू?"
"अजून काय, तुला जे जे वाटत ते सगळं करतो."
"अच्छा म्हणजे तू तुझ्या पहिल्या बायको पासून दूर गेलाच नाही आहेस! तू मला फसवतो आहेस?"
"तुला हा विचार करायचा असेल तर तू करू शकतेस!"
"विचार काय करायचा ते तर स्पष्टच आहे. आज मला दिसलं नसते तर हे किती वर्षे चाललं ते मला कळलंच नसत."
" तुला वाटतंय न तुझं म्हणणं खरं आहे तर खरं आहे! मला याबद्दल काही बोलायचेच नाही आहे."
"पण का नाही बोलायच? तू बोलत का नाही तुझं बोलणं फार गरजेचे आहे."
"साक्षी मला काही बोलायचेच नाहीय कारण माझ्या बोलण्याने तुला काही फरक पडेल असे नाही आणि तुला काही पटणार नाही हे नक्की. आता मला फक्त एकच दिसतंय की तुला खूप त्रास होतोय आणि तो माझ्यामुळे होतोय."
" जर तुला जर माहीत आहे की तुझ्यामुळे मला त्रास होतोय तर तू का नाही बोलत आहेस?"
"कारण माझं बोलणं तुला कुठलेच समाधान देणार नाहीय. हे फक्त तुझे विचार आहेत बाकी काहीच नाही."
" नाही हे माझे विचार नाही, प्रत्यक्ष खात्रीच आहे!"
"मला माहित आहे साक्षी तू किती हट्टी आहेस."
" ठीक आहे मी हट्टी आहे, स्वार्थी आहे अप्पलपोटी आहे पण जर मी तुला एखाद्या स्त्री बरोबर पाहिलं तर विचारायचं पण नाही हे तुला अपेक्षित आहे का?"
"नाही तू विचारू शकतेस पण त्या मागची माझी भूमिका ती लक्षात घेऊ शकतेस का?"
"नाही मला काही समजून घ्यायचेच नाहीय! तू मला फसवतो आहेस!"
"हो ठीक आहे, मी तुला फसवतोय" इतकं बोलून राहुल तिथून निघून गेला आणि धाडकन दार लावून घेतलं.
तो गेला आणि साक्षी तिथे सोफ्यावर बसल्या जागी मोठमोठ्याने रडायला लागली. तिला थोड्या वेळापूर्वी बसलेल्या हादऱ्याची तीव्रता अजून जास्त जाणवत होती.
राहुल तिला काही बोलायला, समजवायला किंवा नेहमीप्रमाणे प्रेमाने जवळ घ्यायला पण बाहेर आला नाही. तो जो आत गेला तो फक्त पाण्याची बाटली आणण्यासाठी बाहेर आला तेवढेच, पण तिच्याकडे वळून सुध्दा पाहिले नाही त्याने.
रडत असलेली, दुखवलेली ती, नकळत त्याच्या येण्याची वाट पहात होती. आता येईल तो, नंतर येईल याच विचारात ती होती पण त्याने न बघताही निघून जाणे तिला खूप हादरवून गेले.
जो राहुल आपल्या सगळ्या गोष्टी ऐकतो,लाड करतो त्याने अचानक दुर्लक्षित केले ही भावनाच तिला सहन होत नव्हती.
तिच्या मते तो पूर्ण चुकीचा होता त्यानेच यावे आणि खरं ते सांगावं हाच हट्ट ती मनात धरून होती. राहुल त्याच्या बायकोला भेटतो आणि काय करत असेल काय नाही ह्या सगळ्या विचारांनी तिला भंडावून सोडले होते. आपण चुकीच्या माणसासोबत आहोत का? हा विचार सुद्धा मनात येऊन गेला तिच्या, पण दुसरीकडे त्याने खूप प्रेम दिले हे पण ती नाकारू शकत नव्हती.आता या क्षणी रडत मनातून खुडत बसली होती.
आतमध्ये तो अस्वस्थ होता.
डोळे मिटून बिछान्यावर पडून होता पण विचारचक्र शांत होत नव्हते. का आज असे घडावे? का तिला समजत नाही? का तिचा विश्वास डळमळतोय? अशा ना ना प्रकारच्या विचाराने तो भंडावून गेला होता.
आयुष्याचे चक्र न त्याच्या हाती न तिच्या.
कसे होणार पुढे असे मोठे प्रश्नचिन्ह त्याला दिसत होते.
त्याची आत तगमग तर बाहेर रडत बसलेली साक्षी असे काही विसंगत चित्र आज होते जे एरवी एकमेकांच्या मिठीत विसावलेले असतात ते आज विस्कळीत मनाने विरुद्ध दिशेंस बसले होते.
दोघंही तू मला समजून घेऊच शकत नाहीस आशा काहीश्या मनस्थिती मध्ये नकळत एकमेकात अंतर घेऊन होते.
पुढे काय झालं ते पुढच्या भागात:-
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा