हाय काय अन् नाय काय!

My Experiments Of Frugality

दुपारी वेळ होता म्हणून सहजच स्वैपाकघरातील कपाट आवरायला घेतलं... (हो! माझ्यासाठी किचन नाही बरं का... स्वैपाकघरच)


तर कपाट उघडताच मुंग्यांची बारीकशी रांग कपाटात कुठेतरी जाताना दिसली... मुंग्यांचा माग काढला तर एका कोपऱ्यात एका एअरटाईट डब्यात प्लास्टिकच्या पुड्यात ठेवलेल्या संत्रागोळ्या...

घरात कुणीतरी संत्रागोळी खाताना एअरटाईट झाकण किंचित उघडं ठेवलं बहुतेक त्यामुळेच मुंग्यांना गोळ्यांचा वास आला! नशीब मुंग्यांनी संत्रागोळीवर ताबा मिळवला नव्हता अजून!!!

ह्या संत्रागोळ्या आमच्याकडे नेहमीच असतात... अगदी वाणसामानात चहासाखरेइतक्या कम्पलसरी!

सासूबाईंना घश्याला कोरड पडली तर तोंडात ठेवायला बऱ्या वाटतात... मुलाला कुडूमकुडूम खायला आवडतात... आईला तर बाहेरगावी जाताना पर्समध्ये हव्याच असतात... एखादेवेळी बाहेरचं खाऊन तोंडाची चव खराब होते ती बदलण्यासाठी.

पूर्वी आम्ही शाळेत असताना पाच पैश्याची एक मिळत असे तेव्हा तिचं केव्हढं अप्रूप होतं! नोकरी लागल्यावर अश्या खूप टोपलंभर गोळ्या विकत घ्यायच्या असं माझ्या बकेटलीस्टमध्ये होतं तेव्हा!!

गेल्या दोन तीन महिन्यात माझे बाहेरगावी बरेच दौरे होते त्यामुळे घरातल्या सामानावरचं नियंत्रण जरा कमी झालं
... आणि नवरोबा तर काय गेले दुकानात की आण सामान... दिसल्या संत्रागोळ्या की घे विकत!!! कारणं काय तर आईला हव्या असतात... पिल्लूला आवडतात... असू दे प्रवासात बऱ्या पडतात!!!

असं करता करता संत्रागोळ्यांची तीन-चार पाकिटं घरात जमा झालेली. तर ह्या संत्रागोळ्या मुंग्याच्या तावडीतून वाचवल्या खऱ्या... पण आता जुन्या होत आलेल्या ह्या गोळ्यांचं करायचं तरी काय???

संत्रागोळ्यांची किंमत म्हणावी तर काही फार नाही. अवघा पन्नास-साठ रुपयांचा मामला!

पण अस्मादिकांना पदार्थ वाया घालवणं पटत नाही म्हणजे नाहीच! मग काय डोकं चालवलं अन् केला एक नवीन #माझा काटकसरीचा प्रयोग!!!

सगळ्या संत्रागोळ्या एका पातेलीत घेऊन त्या बुडतील एव्हढं पाणी घातलं... अधूनमधून ढवळलं... सगळ्या गोळ्या विरघळल्यावर बाटलीत भरून ठेवलं.

संध्याकाळी सगळे एकत्र जमल्यावर त्यात अजून थंडगार पाणी आणि बर्फ घालून ऑरेंज सरबत सर्व्ह केलं... आमच्याकडे मुलाला गोड जास्त हवं म्हणून त्याला सरबतात वरून पिठीसाखर घालून दिली.

तर काय !  हाय काय अन् नाय काय !!!

किती गं बै मी हुशार!!!