हापिसर

Story of a poor ambitious village girl .


#गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय- माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

केंद्रात पहिल्या आलेल्या गीताचा शाळेने सत्कार समारंभ ठेवला होता. शाळेत सर तिच्याबद्दल भरभरुन बोलत होते. महिपतराव आणि शांताबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. गरीबांच्या घरी सरस्वती जन्माला आली आहे, असं महिपती नेहमी म्हणायचा. या गीताच्या जिद्दीची मेहनतीची तिच्या जीवनाला कलाटणी देणारी ही कहाणी‌. 

महिपतराव, शांताबाई आणि तीन मुलं असं गरीब शेतकऱ्यांच पंचकोनी कुटुंब. पोटापुरती शेती होती. त्यात कष्ट करुन चटणी भाकरी खाऊन, प्रसंगी पोटाला चिमटा काढून आहे त्या परिस्थितीत महिपत आणि शांता घर चालवत होते. गीता त्यांची मोठी मुलगी. लहानपणापासून हुशार. आईला घरात, शेतातल्या कामात मदत करत अभ्यास करायची. हुशार, चुणचुणीत असलेल्या गीताने शाळेत पहिला नंबर कधीच सोडला नाही. शिक्षकही तिला प्रेरणा द्यायचे, कौतुक करायचे. एक दिवस तिने आपल्या आईबाबांचं बोलणं ऐकलं. 

“आपल्या गीताला मोठी हापिसर करायची.. कष्ट करु, पडंल ते काम करु पण तिला हापिसर बनवू..”

गरिबीमुळे दहावीतून शाळा सोडायला लागलेला महिपती आपल्या लेकीसाठी मोठी स्वप्नं बघत होता. गीताने आपल्या बाबांचं स्वप्न खरं करायचं ठरवलं. दहावीला मन लावून अभ्यास केला. इतर मुलांसारखा क्लास लावता आला नाही पण शाळेत जादा तास होते त्यात मन लावून अभ्यास केला आणि त्याचा परिणाम म्हणजे ती केंद्रात पहिली आली. शाळेत, गावात सगळीकडे कौतुक झाले. महिपतराव आणि शांताबाई तिचा तो कौतुक सोहळा बघून भारावून गेले. पण आता पुढे काय? या प्रश्नासह गीताला घेऊन सरांकडे सल्ला मागायला गेला. सरांनी सल्ला दिला की तिचा कल कशात आहे ते पाहुया. गीता म्हणाली 

"सर मला बाकी काही माहीत नाही पण मला मोठी ऑफिसर बनायचं आहे." 

“ठीक आहे बेटा, पण त्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल तुला. अर्थात तसा तू करशीलही मला खात्री आहे; पण तूला आत्तापासून तयारीला लागावं लागेल. मी काही पुस्तकं तुला देईन, मार्गदर्शनही करेन; पण तू आतापेक्षा जास्त चिकाटीने अभ्यास करायचा.” 

“हो सर, मी नक्की करेन.” 

“ठीक आहे. मग तू कला शाखेत प्रवेश घे म्हणजे तुला अभ्यासाला अधिक वेळ मिळेल.”

सरांनी सांगितल्याप्रमाणे तिने साताऱ्याच्या एका महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. तिच्या पवार सरांनी कॉलेजमधील तिच्या शिक्षकांनाही तिला मार्गदर्शन करण्यास सांगितले. ती कॉलेजला जाऊ लागली. लायब्ररीतून पुस्तकं घेऊन वाचू लागली. नोट्स काढू लागली. हे सगळं करत असताना घरात आईला मदत करणं सुरूच होतं.
    
आई बाबा दोघांनाही कुटुंब चालवण्यासाठी शेतात काबाडकष्ट करावे लागत असत, स्वतःच्या शेतात राबत तेव्हा दोन घास खायला मिळत असत़. आहे त्या परिस्थितीत गुण्यागोविंदाने, समाधानाने राहण्याचा त्यांचा तो प्रयत्न गीता बघत होती. आई बाबांची घर चालवताना होणारी ओढाताण पहात होती. एक दिवस आपण हे सगळं बदलून टाकू, याच जिद्दीने ती कॉलेज करत करत सोबत एम.पी.एस.सी.ची अधिक जोमाने तयारी करू लागली. सुट्टीच्या दिवशी कधी तिला गुरांकडेही जावे लागे. कधी आईला शेतातून यायला उशीर झाला तर संध्याकाळचा स्वयंपाक करणे, केरवारे करणे अशी कामे करत असे. ती सगळ्या कामात पारंगत होती. एवढी सगळी कामं करून ती बारावीला उत्तम गुणांनी पास झाली. बी.ए. करत असतानाही एम.पी.एस.सी. चा अभ्यास सुरूच होता. शेतात, गुरांकडे गेली तरी हातात पुस्तक असायचे.

बघता बघता पदवीची तीन वर्षे निघून गेली. मेहनत फळाला आली आणि गीता बी.ए.ची परीक्षा विशेष श्रेणीत पास झाली. पदवीधर होताच स्पर्धा परिक्षेचा फॉर्म भरला. आता घरी बसून आईला कामाला मदत करत अभ्यास करायला वेळ मिळत होता. तेवढ्यात शेजारच्या सुनिताने स्वतःच्या भावासाठी तिच्या बाबांकडे गीताला मागणी घातली. पण महिपतरावांनी शिक्षणाचं कारण देऊन स्थळ नाकारले. सुनिताचा अपमान झाला. ती येता जाता गीताला टोमणे मारू लागली. गीताने तिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. परीक्षा दिली. निकाल लागला पण गीताला पहिल्या वर्षी अपयश आले. अपयशाने खचून न जाता तिने परत एकदा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. मोठं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ती परत अभ्यासाला लागली. दरम्यानच्या काळात नाकी डोळी नीटस असलेल्या गीताला नात्यातून, गावातून लग्नासाठी विचारणा होऊ लागली पण आलेली स्थळे महिपतराव नाकारत होते आणि मुलीला ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा देत होते. काही लोकं कुत्सितपणे आणि काहीजण काळजीपोटी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यावर महिपतरावाचं एकच उत्तर असायचं,

“माझी लेक हापिसर झाल्यावरच तिचं लगीन लावून देणार.."

गीताला आपल्या घरची परिस्थिती बदलायची होती. आई वडिलांचे कष्ट तिने बघितले होते. भावंडांना शिक्षण द्यायचं होतं आणि बाबांनी तिच्यासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. गीताने अपार मेहनत घेऊन दुसऱ्यांदा परीक्षा दिली. यावेळी तिला खात्री होती तिला नक्की यश मिळेल, पण इतके? याचा तिने विचारही केला नव्हता. ती एम.पी.एस.सी. परीक्षेत चक्क राज्यात पहिली आली होती. कमाल म्हणजे ही बातमी तिला समजली तेव्हा ती माळावर गुरे चारायला घेऊन गेली होती. घरी तिच्या सत्काराला बुके घेऊन येणाऱ्यांची अगदी रांग लागली होती. महिपतराव आणि शांताबाईंना अश्रू अनावर झाले होते. सगळा गाव जमला होता. पत्रकार लोकं घराबाहेर हजर होते आणि ही ‘क्लास वन ऑफिसर’ गुरांना घेऊन घरी  येत होती. किती ते पुष्पगुच्छ, किती ते कौतुक, पत्रकार फोटो काढत होते, तिची मुलाखत घेण्यासाठी चढाओढ लागली होती. सगळे तिच्या जिद्दीला सलाम करत होते. खरंच क्षणार्धात तिचं आयुष्य बदलून गेलं होतं. पण त्यामागे तिने तहानभूक विसरून वर्षानुवर्षे घेतलेली मेहनत होती.

यावरून एकच लक्षात येतं की प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर परिस्थिती कितीही बिकट असो आयुष्यात एक असं वळण आणता येतं, जे आयुष्याला झळाळी देऊन जातं. 

(सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका मुलीची ही सत्यकथा आहे.)
  ©सौ. सुप्रिया जाधव