हा पुरुषार्थ आहे का???

स्त्रीला मारहाण करणे,तिला घराबाहेर काढणे हा पुरुषार्थ आहे का?


आज जरा उशीर झाला उठायला.शाळा बंद असल्यामुळे जरा निवांत होत सगळं. सकाळी उठले तेव्हा आमच्या आपर्टमेंटच्या बाजूला एक तीन मजली इमारत आहे,तिकडून  आवाज येत होता.मी काही फारस लक्ष दिलं नाही.सकाळची काम आटोपून घेतली आणि स्वयंपाकाला लागले.मात्र तो आवाज वाढायला लागला. सकाळी आठ वाजताची गोष्ट असेल,बाहेर बरीच थंडी होती म्हणून मी खिडक्या बंद ठेवल्या होत्या. मी भाजी केली,पोळ्या केल्या तरीही तो आवाज चालूच होता.

"आई, ए आई.. आई मी तुझ्याशी बोलतोय,तू का ऐकत नाही."

"अमेय,बोल काय म्हणतोस?"

"अगं आज पोहे बनव माझ्या आवडीचे."

"हो बनवते, आधी आंघोळ करून घे."

"आई तुझ लक्ष कुठे आहे?झाली माझी आंघोळ केव्हाची."

"बरं बरं थांब देते बनवून."

माझं सार लक्ष बाहेर होतं..मी कसे बसे पोहे बनवून अमेयला दिले.आणि मला राहवलं नाही म्हणून मी खिडकी उघडली.तर बाहेर मोठमोठ्याने भांडण सुरू होती.


तस ते काही आम्हाला नवीन नव्हतं.नवरा ऑफिस वरून आला की रोजचं चालायचं.पण आज पहिल्यांदा सकाळी सकाळी सुरू झालं.

त्या लोकांचं तीन मजली घर होतं.भांडण नेमक कुठे चाललं हे कळत नव्हतं.मात्र नवरा बायको असतील याची बोलण्यावरून खात्री पटली.

प्रत्येक मजल्यावर घरातलेच लोक राहत होते आणि सासू सासरे पण, बाकी कुणाचा आवाज येत नव्हता. त्यात एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला साधारण २ते ३ वर्षाची असेल.

भांडणाच काय कारण असेल काहीच माहीत नाही. एकु येत होतं दिसत मात्र काहीच नव्हतं.

"चल चालती हो माझ्या घरातून,या घराशी तुझा काहीही संबंध नाही",...नवरा

"असं कसं म्हणता तुम्ही?"....बायको

" धड स्वयंपाक येत नाही, एक काम धड करत नाही.फसलो मी लग्न करून तुझ्याशी",...नवरा

" घरचं सगळं मीच करायचं आणि वरून बोलणी पण खायची",...बायको

"एवढं काय काम असते गं दिवसभर तुला?माझ्या तोंडाला लागू नकोस. हेच शिकवलं का तुला तूझ्या आईबापाने?",... नवरा

"माझ्या आईवडिलांवर जाऊ नका.मला काय बोलायचे ते बोला", बायको

"जास्त शहाणपणा करू नको,नाहीतर थोबाडीत देईल तुझ्या",...नवरा

नंतर कदाचित त्याने तिला मारलं...घरात भांड्यांचा आवाज आला, छोट्या मुलीचा रडण्याचा आवाज आला आणि मग तिचाही ओरडण्याचा आवाज आला.

एवढं होऊनही मजल्यावरचे बाकीचे कुणीच भांडण सोडवायला आलं नाही.शेवटी ती बाई ओरडत ओरडत बाहेर आली तेही  मुलीला घेवून. तो ही तिच्या मागे धावला.त्याच्या शिव्या ,बोलन चालूच होत आणि ती बिचारी रडत होती.

त्याने तिच्या हाताला धरलं आणि मुलीला ओढलं.ती मुलगी अजूनच जोरात रडायला लागली.

"नको बाबा, मला दुखतेय सोडा माझा हात...मम्मा मम्मा"...मुलगी

ती थांबली आणि तिने त्याला जोरात ढकललं आणि म्हणाली
"खबरदार... तीला हात लावला तर",....बायको

"का नाही लावणार, ती माझी पण मुलगी आहे,तुला कुठे जायचं ते जा,मेली तरी पर्वा नाही मला तुझी",... नवरा

त्या बाईच्या चेहऱ्यावर खूप राग दिसला. तिने बंगल्याचं दार उघडलं आणि बाहेर निघाली.तो ही तिच्या मागे गेला.तो पर्यंत घरचे सगळे खाली आले. तिचे सासुसासरे आणि त्याचे भाऊ वैगरे  आले पण कुणी मध्ये पडले नाही.सासूबाई तेवढ्या बोलल्या,

"अगं तुला माहित का? त्याला सगळं मनासारखं लागत, थोडंही इकडे तिकडे चालत नाही.आपली चूक झाली मान्य करावं बाईच्या जातीने"\"....सासूबाई

"सासूबाई ,तुमच्या अश्या बोलण्यामुळे त्यांना फावतं",....सून

"चल निघ चालती हो घरातून,नाहीतर परत मस्तक फोडून काढीन",...नवरा

तिने खूप रागाने बघितलं त्याच्याकडे आणि निघून गेली.

तिचे केस विस्कटलेले दिसले,ओठातून रक्त येताना बघितलं.ती ते रक्त साडीच्या पदराला पुसताना दिसली आणि माझ्या नजरेआड झाली.

पण हे सगळं बघितलं आणि माझ्या ह्रुदयात अचानक धडधड वाढत गेली.मला करमेना झालं. वाटत होत पोलिसांना फोन केला असता तर बरं झालं असतं.पण विचार केला आपल्याला काय झालं माहीत नाही.चूक कुणाची हे ही माहीत नाही.

पण जे दिसलं त्यावरून तरी असं वाटलं की, त्या बाईने खूप सहन केलं आणि तिच्या नवऱ्याने  त्याचा पुरुषार्थ गाजवला.मला काहीच सुचेना. सारखा मनात विचार येत होता,ती कुठे गेली असेल?,पैसे असतील का तिच्याजवळ?,लहान लेकरू सोबत,एवढ्या थंडीत कुठे जाईल?, काय करेल ती?.त्याला काहीच कसं वाटलं नाही तिला घराबाहेर काढताना.

अश्या असंख्य प्रश्नांनी माझ डोक सुन्न झाले.

"आई, अगं पोहे गार होत आहे खावून घेना..तुला गार पोहे नाही आवडतं ना "

"नको,आज माझी इच्छा नाही आहे खायची."

"का गं काय झालं ?"

"काही नाही रे!"

"मला माहित आहे ती भांडण ऐकत होतीस ना तू
तुला खूप राग आलाय ना आई त्यांचा."

"नाही रे बाळा."


"अगं आई मी एवढा लहान नाही सगळं कळत मला."

"ए गप की बाळा..जा तुझा क्लास आहे. बुक्स काढून घे ,जे जे पिरियड असतील ते."

"काढ तो गं....आई, सांगा ना तू चिडलिस ना?"

"नाही रे!"

"बर जाऊ दे..चल माझा क्लास आहे मी जातो माझ्या रूममधे."

मी चिडले,मला राग आला हे माझ्या दहा वर्षाच्या मुलाला सुद्धा कळलं, मग ह्या लोकांना कळू नये.ती एक स्त्री आहे म्हणून नाही पण एक माणूस म्हणून तरी बघा तिच्याकडे.तिला दुखलं नसेल का? जेव्हा त्याने तिला मारलं तेव्हा त्याच्या मनाला काहीच कसं वाटलं नाही.त्यांची लहान मुलगी आहे तिच्या बालमनावर काय परिणाम झाला असेल.?"

कदाचित तिचेही चुकलं असेल पण यावर मारणे घरा बाहेर काढणे हा पर्याय आहे का? तिच्या सासूबाईंचे शब्द कानात घुमत होते.आपण ऐकून घ्यायच. का? कशासाठी?  केवळ एक स्त्री आहे म्हणून आणि तो एक पुरुष आहे म्हणून?

आपल्याकडे एखादा प्राणी पाळला असेल तर आपल्याला एकमेकांचा लळा लागतो...आणि इथे तर ती बाई त्याची बायको आहे .एवढा कसला राग?. ज्यात आपला माणूस सुद्धा आपल्याला कळत नाही.पुढे काही विचित्र घडलं तर,तिनेही रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचल तर? विचार करा हे बरोबर आहे का?

एक स्त्री सुद्धा नोकरी करते आणि जी नोकरी नसली करत तरीही ती सगळं घरचं सांभाळते.घर सांभाळणे वाटते तेवढं सोपी नाही.स्त्री घरी असते म्हणून पुरुष बाहेर पडतो.त्याला ऑफीसच टेन्शन असत अगदी बरोबर,तो कमावून आणतो.पण बायको घरी असते म्हणून.मुलाचा अभ्यास,त्याचे कुठले क्लासेससाठी  सोडणे आणि घेवून येने.बाकी किती काम असतात घरी त्याची गनतीच नाही. तिला तर सुट्टी नावाचा प्रकार काय आहे हे सुद्धा  माहिती नसेल.

पण मी पुरुष आहे, मी काहीही केलं तर चालतं, असे म्हणून मिरवणे म्हणजे मोठेपणा  नव्हे.

मी ही एक स्त्री आहे,होतात नवरा बायकोचे भांडण.असं कुठे नाही की भांडण होत नाही.पण त्याला एक लिमिट हवी.जे शिकलेले नसतात तेच लोक आरडा ओरड करतात,दारू पिऊन बायकोला मारतात असे काही नाही.सुशिक्षित माणस सुद्धा काही कमी नाही. थोड्या थोड्या गोष्टीवरून आवाज चढवणे,मारणे हे नाही शोभत कुणाला आणि एक पुरुष म्हणून तर नाहीच नाही.खर सांगा ह्याला पुरुषार्थ म्हणावं का?


आपण जे काही आपल्या घरात वागतो त्याचेच अनुकरण मुल करत असतात.जर नवरा बायको यांनी एकमेकांना आदर नाही केला तर आपण आपली मुलं मोठी झाल्यावर काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून.जेव्हा प्रेम नवरा बायकोत असत तेव्हा त्या घरची मुल सुद्धा प्रेमळ आणि एकमेकांना समजून घेणारी असतात.म्हणतात ना जे पेराल तेच उगवेल. ते जे काही वागतील ते आपल्याच बघितलेले असेल.स्त्रीचा आदर करणे हे पुरुषाच्या हातात आहे,मग एक आई म्हणून बहीण म्हणून जी आदर तुम्ही देता , पण तुम्ही त्यापासून बायकोला मात्र वंचित ठेवता. जमल तर करा थोडा विचार.

होते चूक स्त्री कडून असं नाही की ती चुकत नाही, तिला  समजून सांगा,तिला समजून घ्या.तिला  मारणे,घराबाहेर काढणे हे पुरुषाला शोभत का? आणि तुम्ही चुकलात तर तिने एक कानशिलात लगावली तर चालेल तुम्हाला.

चिडचिड होते माणसाची, कामाच टेन्शन,घरचं बाहेरच टेन्शन म्हणून ते आपण एका स्त्रीवर काढणे कितपण योग्य आहे.याचा विचार नक्की करा.

(प्रत्येक पुरुष असा नसला तरीही ही परिस्तिथी नाकारता येत नाही,बरोबर ना.)

माझा हा लेख कसा वाटला नक्की कळवा.
©®कल्पना सावळे.