हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-10

अखेर रियाने दिली सुयशवर असलेल्या तिच्या प्रेमाची कबुली ..

भाग-10


'आज हे डेअर मी मोठ्या हिंमतीने स्वीकारलय. त्यानंतर रिया जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल पण मी तिला स्वतःहून माझं तिच्यावर प्रेम आहे हे बोललो नाही तर मग मात्र माझ्या मनात आयुष्यभर ही सल राहील त्यापेक्षा सांगेन मी रियाला सर्व.' सुयश मनात विचार करत होता. सर्वजण कानात प्राण आणून ऐकत होते. 


काय असेल सुयशची पहिली लवस्टोरी ? कोण असेल ती भाग्यवान मुलगी? सर्वजण विचारचक्रात अडकले होते. पण गौरीला मात्र पक्के ठाऊक होते. पण दादाने मनातले बोलून दाखवले तर रिया परत नाराज होणार नाही ना याची गौरीला चिंता वाटत होती. सुयश उभा राहिला. 


सर्वांच्या नजरा सुयशवर खिळल्या होत्या. तो म्हणाला, "मी माझी अगदी खरी असलेली प्रेम कहाणी तुमच्यासमोर सांगणार आहे." 


"दादा, त्या प्रेम कहानीतील राजकुमारीचेही खरेच नाव सांगावे लागणार आहे हं. नो चिटींग." धनश्री सुयशला म्हणाली.


"हं." म्हणत गंभीर होऊन सुयश म्हणाला, "आपण नेहमी चांगल्या गोष्टींच्या प्रेमात पडतो. म्हणजे बघा ना, एखादं सुंदर फुल दिसलं की, आपलं लक्ष चटकन तिकडे वेधलं जातं. मग त्यात कोणाचा दोष असतो? डोळ्याचा की व्यक्तीचा ? तर कोणाचाच नाही. हो ना. कारण डोळ्यांच ते कामच असतं. आणि आपणही डोळ्यांना सुंदर दिसणाऱ्या गोष्टीच्या प्रेमात पडतोच."


"हो." सगळेजण एका सुरात म्हणाले.


"अरे सुुयश दादा, आम्ही तुला फुलाच्या प्रेमात कधी पडलास हे नाही विचारले. तू मुलीच्या प्रेमात कसा पडलास? ते सांग."


"अरे उदाहरण म्हणून फुल घेतलं. काही वेळा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रभावी भाषणाने त्या व्यक्तीच्या विचारांच्या प्रेमात पडतो, एखादे पुस्तक खुप आवडल्यास आपण त्या लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या प्रेमात पडतो, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तसेच तिच्यामध्ये असणारे कलागुण यांच्याही आपण कधी-कधी प्रेमात पडतो. मग आवडलेलं पुस्तक कितीदाही वाचलं तरी पुन्हा-पुन्हा वाचावंस वाटतं आणि हळूच एकदा ते पुस्तक आपल्या घरच्या लॅबररीमध्ये प्रवेश करतं. मग आपण त्या पुस्तकाला जीवापाड जपायला लागतो. त्याची काळजी घेतो. त्याच्या कवहरला जरी कोणी फाडलं तर आपल्याला त्रास होतो. कारण आपण त्या पुस्तकावर मनापासून प्रेम केलेलं असतं. "सुयश प्रेमाविषयी सांगतोय की एखाद्या गंभीर विषयावर बोलतोय." हळूच सुयशची मामेबहीण म्हणाली.


रियाचे मन दुखावले जाऊ नये हाच सुयशचा प्रयत्न होता आणि म्हणूनच तो गंभीरपणे बोलतोय हे गौरीला माहित होतं.  पण ती ही काहीच बोलू शकत नव्हती. 


"असच मी एका राजकन्येवर प्रेम केलं. हो.हो.राजवाडाच होता तो जिथे ती राहायची. अगदी कसं शिस्तीत असायचं त्यांच्या घरी. मुली म्हणजे मुलांपेक्षा कुठेतरी कमीच मानायचे ते लोक. त्यां मुलींना बाहेर पडायचे म्हणजे शंभर प्रश्नांना तोंड द्यावे लागायचे. घरातील स्त्री बाहेरच्या पुरुषांना दिसता कामा नये पण त्याच कुटुंबातील मुलं किंवा पुरुष कसेही वागले तर तो त्यांचा पुरुषार्थ समजला जायचा. एवढंच काय मुलींनी आहारही कमी घ्यायचा जिथे पाळलेल्या मांजराला आणि कुत्र्यांना जेवढे दूध मिळायचे तेवढे घरातील मुलींना कधीच नाही. मुलींनी खाली मान घालूनच चालायचे अन्यथा शाळा बंद व्हायची त्यांची. तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून द्यायचं आणि तिच्या सासरी काहीही घडलं तरी तिलाच दोषी ठरवायचं. " सुयशचे डोळे पाणावले होते. रियाला रडू कोसळले.


सुयश रियाजवळ गेला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, "रिया मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय. आणि मला खात्रीय तुझंही माझ्यावर खूप प्रेम आहे. तुला आठवतेय का? जेंव्हा तुझं लग्न ठरलेलं तेव्हा आपण तुमच्या शेतात गेलो होतो. तेंव्हा मी सर्वांना झाडावरचे पाडाचे आंबे काढून दिले आणि ते आंबे खाताना तू किती आनंदी दिसत आहेस म्हणून मी तुलाच पाहत बसलो. मी एकही आंबा खाल्ला नाही हे लक्षात आल्यावर तू ही माझ्यासाठी एक आंबा काढून ठेवला होतास सर्वांना चोरून. हो ना रिया? का? सांग ना. बिकॉज यू अल्सो लव मी." रिया आणि सुयश दोघांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. 


"आता ते शक्य नाही सुयश. हे सगळं पाप ठरेल." रिया सुयशचा हात बाजूला करत म्हणाली. हे सर्व संभाषण मॅडम दुरून ऐकत होत्या. मॅडमच्याही डोळ्यातून अश्रू ओघळत होते. डोळे पुसत मॅडम म्हणाल्या, रिया, आज मी तुला जे सांगेल त्याने तुझा सुयशबरोबर लग्न करण्याचा निर्णय पक्का होईल अशी माझी पूर्ण खात्रीय. प्लीज तुम्ही सगळेजण बाहेर जाल का? मला रिया आणि सुयशशी एकांतात बोलायचयं."


मॅडमसोबत आत आलेले संकपाळ सरही बाहेर जाऊ लागले ते पाहून मॅडम म्हणाल्या," सर तुम्ही कुठे निघालात? आज मी हे जे समाधानी आयुष्य जगत आहे त्याचे श्रेय तुम्हाला का जाते? माझ्या आयुष्यातील तो कटु प्रसंग आणि तुमची मला मिळालेली भक्कम साथ मला आज माझ्या सुयश आणि गौरीसमोर रियाला सांगायचीय. तेंव्हा तुम्ही इथेच थांबा प्लीज."


संकपाळ सर मॅडमसमोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, "कशाला हव्यात त्या कटू आठवणी ? इतक्या आनंदाच्या क्षणी. पुन्हा केंव्हातरी सांगूया."


"नाही बाबा. जसा माझ्या आयुष्यात हा आनंदी क्षण आलाय तसाच आईच्या सांगण्याने दादाच्या आणि रियाच्या आयुष्यात येणार असेल तर सांगू देत आईला. कितीही कटू असलं तरीही आम्ही ऐकायला तयार आहोत. सांग आई तू." गौरी म्हणाली 


"हं." म्हणत मॅडमनी खिडकीजवळ जाऊन सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या," माझी मोठी बहीण दोन वर्षांची होती. आईला दुसऱ्यांदा दिवस गेले म्हटल्यावर तिला मुलगाच झाला पाहिजे असा घरातल्या सगळ्यांचा अट्टाहास होता पण माझे बाबा दुसऱ्यांदा मुलगी झाली तरी तिच्याही स्वागतासाठी मी तयार आहे.तेंव्हा तू लक्ष नको देऊ कोणाच्या बोलण्याकडे असे म्हणून आईला धीर द्यायचे.पण इतके प्रेमळ वडील मला पाहूही शकले नाहीत. घरी माझा जन्म झाला आणि त्याच रात्री त्यांना शेतात साप चावला. आजीने तर माझे तोंडही पाहिले नाही. माझे बाबा म्हणजे आजीचा एकुलता एक लेक होता. अडाणी असल्यामुळे माझ्याच पायगुणाने हे घडले असा आजीने समज करून घेतला. कधीच आजीकडून प्रेमाचा एक शब्दही माझ्या कानावर पडला नाही. वडिलांचे छत्र नसलेल्या आम्ही दोघी शाळेमध्ये हुशार होतो. ताई दहावीत आणि मी आठवीत शिकत होतो. ताईला स्थळ आलं आणि होकारही आला. मग आमच्या आजीने तिच्या नात्यातल्या एका मुलाबरोबर माझंही लग्न जमवलं. आईने विरोध केल्यावर आजी म्हणाली, "कुसुम तुझी धाकटी लेक अपशकुनी आहे लक्षात ठेव. तेंव्हा गप्प बसून हो म्हण लग्नाला, नाहीतर तुझ्या लेकीला सांगेन की जन्मली आणि बाप मेला ते. इतके दिवस तुझी शप्पथ घातलीस म्हणून गप्प बसले होते पण आता नाही." आजीचे ते शब्द तप्त शिसं कानात ओतल्यासारखे भासले. माझ्या मनातील ही खंत घेऊन मी सासरी आले. इथे आल्यावर समजले ज्याच्याशी माझे लग्न झालेय तो चोवीस तास दारू पिऊन नशेत वावरणारा बेवडा आहे. दिवसभर काम करून तो आला की त्याला रोज जेवण गरम करून देणे एवढंच माझं अस्तित्व उरले होते. एक दिवस त्याने बायको म्हणून हक्क गाजवला आणि लग्नाची बायको असल्याने मी ही त्याला माझे सर्वस्व दिले. एक महिना झाला होता. मी प्रेग्नंट होते. पण मला हे ज्या दिवशी समजलं त्याच दिवशी माझ्या नवऱ्याचा अपघात झाला. आता मला स्वतःचा राग येत होता. मी आईकडे गेल्यावर आजी सतत मला अपशकुनी म्हणायची, विधवा म्हणून होणारी अवहेलना ती वेगळीच शिवाय रोजच आईची होणारी कोंडी मला पाहवत नव्हती म्हणून मी जीव द्यायचा निर्णय घेतला. मी ज्या शेजारच्या गावच्या नदीत उडी मारणार होते ते यांचेच शेत होते. मग काय यांनी मला वाचवले. मी सगळं खरं सांगितल्यावर माझ्याबरोबर लग्न केले. माझ्या त्या पोटातील बाळाला स्वतःचे नाव दिले.तोच हा माझा सुयश.एवढंच नाही तर त्यांनी मला पुढे शिक्षण घेण्यास प्रेरित केले आणि मी ही आज तुमच्यासमोर शिक्षिका म्हणून त्यांच्यामुळेच उभी आहे." 


सर्वांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.


"बाबा." म्हणून सुयशने संकपाळ सरांना आणि मॅडमना मिठी मारली. गौरीही त्या तिघांना जाऊन बिलगली. खरोखर आज मुलांना आईने केलेल्या संघर्षाची आणि बाबांच्या निस्सीम प्रेमाची प्रचिती आली. 


" रिया हे ऐकल्यावर आता तूच ठरवं हे पाप, पुण्य, शकून किंवा अपशकुन यावर विश्वास ठेवायचा की खरं प्रेम करणाऱ्या माझ्या सुयशला होकार द्यायला.निर्णय तुझा तूच घ्यायचा आहेस." मॅडम रियाला म्हणाल्या.


"तुझा काहीही निर्णय असू दे तो सांग. मला तो मान्य असेल. हवा तेवढा वेळ घे. झोपा आता. वेळ खूप झालाय. काही लागलं तर आम्ही बाजूच्या खोलीत आहोतच. " सुयश रियासोबत आई आणि गौरीला म्हणाला.


संकपाळ सर आणि सुयश खोलीच्या बाहेर जाणार तोच रिया म्हणाली, "माझा निर्णय झालाय. ऐकतोस ना सुयश?"


होकारार्थी मान हलवत सुयश डोळे मिटून दारातच उभा होता. रियाने सुयशला मिठी मारली आणि ती हळूच त्याला म्हणाली, "मुझसे शादी करोगे?"


सुयशही म्हणाला, "तुमसे शादी करूंगा।"


सगळेजण खूप खूश झाले. आनंदाला उधाण आले होते.  


उद्या मॅडम रियाच्या आईशी बोलल्यावर त्या तयार होतील ना रिया आणि सुयशच्या लग्नाला?


पाहूया पुढील भागात क्रमश:


सौ.प्राजक्ता पाटील 












🎭 Series Post

View all