हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-1

आयुष्या कधी तर कधी दुःख हे येतच असतं...त्यामुळेच खचून न जाता नेहमी आनंदी जगायचं असत..

पाडोळी हे अगदी छोटसं गाव. आणि याच गावात असलेलं भोसले कुटुंब अगदी पंचक्रोशीत नावाजलेलं कुटुंब. तीन भावाचं एकत्र कुटुंब होतं. भला मोठा वाडा, वाड्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या मोठाल्या ढेलजा. आणि त्या ढेलजावरून काकासाहेब नसतील तेव्हा उड्या मारणारे ते बालगोपाळ पाहिले की वाड्याच्या सौंदर्यात आणखी भर पडत असे. दारातील ती तुळस म्हणजे स्त्रियांच आवडतं ठिकाण. दररोज पहाटे उठून तुळशीची पूजा करून घरातील स्त्रिया तुळशीला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीच्या अखंड सौभाग्यासाठी, घरावर कोणतेही अनिष्ट येऊ नये म्हणून प्रार्थना करत होत्या. डोक्यावरून पदर घेतलेल्या, हातभरून बांगड्या घातलेल्या या स्त्रिया पदर पडू न देता, बांगड्या चा आवाज न होऊ देता काम तरी कशा काय करत असतील ? हाच प्रश्न शहरातून येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांना पडत असे. दूध दुभतं मुबलक असल्याने घरातील प्रत्येक मुलाला सकाळी उठल्याबरोबर ग्लासभर दूध मिळत असे आणि तेही काकासाहेबा सोबत. मुलींना मात्र कपभर दुध ठरलेले असायचे तेही स्वयंपाकघरात बसून घ्यावे लागे. इतर मुलींची काही तक्रार नव्हती पण रियाला हे खटकत होते. 


"आम्ही का नाही काकासाहेबा सोबत बसून दूध घेऊ शकत ?" रिया म्हणाली.


"रिया तू मुलगी आहेस आणि असं माणसांच्या पंगतीत बसणं शोभत नसतं तुला." काकासाहेबा च्या पत्नी हिराबाई आपल्या नातीला रिया ला म्हणाल्या.


काकासाहेब भोसले हे घरातील कर्ते पुरूष होते. त्यांच्या परवानगीशिवाय घराचे पानही हलत नव्हते. काकासाहेब अगदी कडक शिस्तीचे आणि ते म्हणतात ना \"चुकीला माफी नाही\" काहीसे असेच होते. घरातील स्त्रिया तर काकासाहेबा च्या सावलीला ही उभ्या राहत नसत.


रियाला तू मुलगी आहेस मग असं नको करू, तसं नको करू. आणि दादाला कोणी नावे नाही ठेवणार, कारण तो मुलगा आहे. हे ऐकून आपण मुलगी आहोत याचे रियाला फार वाईट वाटत होते.


"त्याने उड्या मारल्या तर चालतात मग मी का नाही?" या रियाच्या प्रश्नाने मात्र आई च्या डोळ्यात पाणी यायचं, पण आईचं ऐकून घेणारं कोणी असेल तर सांगणार ना ती, की असा भेदाभेद करणं योग्य नाही ते. लग्न झाल्यापासून केवळ घरचे सांगतील तेच आणि तेवढंच करायच हे रियाच्या आईला जणू अंगवळणी पडलं होतं. पण जसजशी रिया मोठी होत होती तसतसे तिचे प्रश्न आईला विचार करायला भाग पाडत होते.


तो रविवारचा दिवस होता. शाळेत शिकवणाऱ्या संकपाळ सरांची मुले गौरी आणि सुयश त्यादिवशी वाड्यात खेळण्यासाठी आली होती. गौरी ही रियाच्या वर्गात होती. तर सुयश हा रियाचा भाऊ राहूल च्या वर्गात होता. सुयश ने वाड्यातल्या सगळ्या मुलामुलींना एकत्र करून खेळ खेळायचं ठरवलं. 


तेव्हा राहुल सुयश ला म्हणाला, "आमच्याकडे मुल आणि मुली एकत्र खेळत नाहीत, आपण मुलांचा वेगळा गट करू आणि मुलींचा वेगळा गट करू."


" मी आणि गौरी तर रोज दोघंच खेळतो. आमच्याकडे वेगळा गट नसतो." सुयश राहुल ला म्हणाला.


"आमच्या घरी तसं चालत नाही. सोड मुलींचा हात." खेळण्यातला राज्य कोणावर येणार ? हे पाहण्यासाठी मुलांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवले होते. ते पटापट बाजूला केले.रिया मात्र पून्हा उदास झाली. घरात सतत होणारा मुलगा- मुलगी हा भेद रिया जसजशी मोठी होत होती तसतसा अधिकच प्रकर्षाने जाणवत होता. प्रत्येक सण समारंभात मुलांना मिळणारा मान आणि मुलींना मिळणारा दुय्यम दर्जा हे रियाच्या पचनी पडत नव्हते. आता रिया मोठी झाली होती. \"पाळीच्या दिवसात स्त्री अपवित्र कशी काय होऊ शकते ?\" हा प्रश्न रियाला सतत भेडसावत होता. अगदी कोणाचा स्पर्श ही करून न घेता एका कोपर्‍यात बसून राहायचं, शाळेचं नावही काढायचं नाही रियाच्या नुसतं जीवावर यायचं पण घरातील शिस्तीच्या वातावरणामुळे तोंडातून ब्र काढणेही तिला शक्य नव्हते. रिया दहावीत शिकत होती. गावात दहावीपर्यंत शाळा होती दहावी झाल्यानंतर बाहेरच्या गावी शिक्षण घेण्यासाठी फक्त मुलींना पाठवायचं नाही असा काकासाहेबांचा आदेश होता. त्यामुळे घरातील प्रत्येक मुलीचं दहावी झालं की लग्न उरकून घरातले सगळे मोकळे व्हायचे. काकासाहेब मुलींचं दहावी झालं की लग्न करतात हे पाहुणेमंडळीना ज्ञात असल्यामुळे रिया सारख्या देखण्या मुलीला चांगली स्थळ सांगून येऊ लागली होती. तशी काकासाहेबांनी घरातल्या सगळ्या पुरुष मंडळी सोबत चर्चा सुरू केली. आज रिया चा शेवटचा पेपर होता. पेपर देऊन रिया अगदी आनंदाने घरी आली होती. कारण सर्व पेपर रियाला नेहमीप्रमाणे सोपे गेले होते आणि ती वर्गातला आपला पहिला नंबर कायम ठेवू शकणार होती अशी तिला खात्री होती. पेपर संपल्यावर मी इकडे ऍडमिशन घेणार.. मी तिकडे ऍडमिशन घेणार... अशा मुलींच्या चर्चा सुरू होत्या पण रियाला मात्र हे स्वातंत्र्य नव्हतं की तिने कोठे ऍडमिशन घ्यावे. 


"काय रिया तू कुठे घेणार आहेस अ‍ॅडमिशन ?" एक मैत्रीण  रियाला म्हणाली. रिया काही बोलणार तोच दुसरी म्हणाली,  "अगं रियाचे आजोबा, हे तिला पुढे शिकू देणार आहेत का? त्यांच्या घरी कोणत्याच मुलीला पुढे शिकू देत नाहीत. तिची ताई आणि माझी ताई एकाच वर्गात होत्या. हुशार असूनही तिच्या ताईला लग्न करावं लागलं होतं आजोबांनी सांगितलं म्हणून. हो की नाही गं रिया ?" मैत्रीण बोलून गेली खरी पण रियाला खूपच वाईट वाटलं होतं.


रिया घरी पोचते ना पोहोचते तोच काकासाहेबांनी रियाला साडी घालून तयार राहायला सांगितलं. रियाच्या डोळ्यातून आसवांचा पूर वाहू लागला. 


"अगं आई मला पुढे खूप शिकायचंय गं ! मला आत्ताच लग्न करायच नाही." रिया आईला विनंती करू लागली.


"रिया तु याच घरात लहानाची मोठी झालीस ना. मग लहानपणापासून पाहतेस ना, स्त्रियांचं ऐकलं जातं का या घरात ?" आई आपण आपल्या लेकीसाठी काही करू शकत नाही ही खंत मनात बाळगून लेकीची समजूत काढत होती.


"आई मला चांगले मार्क्स मिळतील अगं. मी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहीन. तू फक्त बाबांशी बोल ना मला आत्ताच लग्न नाही करायचय." प्रिया पुन्हा पुन्हा तेच सांगत होती.


"रिया आता मी काहीच बोलू शकत नाही, तू पटकन तयार होऊन बस. पाहुणे येतीलच इतक्यात." रिया ची आई काळजावर दगड ठेवून रियाला म्हणाली आणि दुसर्‍या खोलीत जाऊन ढसाढसा रडू लागली.


पाहुण्यांसमोर रिया पाटावर जाऊन बसली. पाहुण्यांनी रियाला काही प्रश्न विचारले. सर्व प्रश्नांची रिया ने उत्तरे दिली.आणि रिया आत आली. क्षणाचाही विलंब न लावता पाहुण्यांनी मुलगी पसंत आहे असा निरोप पाठवला. सर्वजण खूप खुश झाले. रियाच्या मनाचा मात्र कुणीही विचार केला नाही. 


रात्री रियाची आई रियाच्या बाबांना धाडसाने म्हणाली, अहो रिया पुढे शिकायचं म्हणतेय. आताच लग्न करायला ती तयार नाही."


रियाच्या आईकडे डोळे वटारून पाहत रियाचे बाबा म्हणाले, "तुम्ही यात पडायची गरज नाही. घरातील पुरुष मंडळी समर्थ आहेत. झोपा आता."


थोड्याच दिवसात रियाचा विवाह थाटामाटात पार पडला. जड अंतकरणाने रिया सासरी पोहोचली आणि अवघ्या महिन्याभरात रियाच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. रिया चा नवरा एका गंभीर आजाराने त्रस्त होता आणि त्याचे निदान समजले तेव्हा खूपच उशिर झाला होता. दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अजून नव्या नवरीचे नवेपण ही संपले नव्हते आणि हे काय होऊन बसले म्हणून रियाच्या आईची तर झोपच उडाली होती. रियाला कायमचेच माहेरी आणून सोडले होते. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने गावभर पसरली. संकपाळ सरांचा सुयश नुकताच गावात आला होता. अधिकारी होण्यासाठी त्याने शहरात क्लासेस साठी एक अकॅडमी जॉईन केली होती. संपूर्ण जिल्ह्य़ाभरातील शाळांमधील मुले वेगवेगळ्या परीक्षांची माहिती घेण्यासाठी, आणि अधिकारी होण्यासाठी या  अकॅडमीत येत होते. सुयश ही खूप खुश होता. तिथे त्याला स्वतःची पात्रता समजली होती, पण गावात आल्यावर त्याला रिया विषयी समजले आणि त्याला अश्रु अनावर झाले. संकपाळ सर आणि सुयश काकासाहेबांना भेटायला गेले होते. सुयश ला रियाची छबी दिसली म्हणून तो आत जात होता. 


तेवढ्यात काकासाहेब म्हणाले, "आता तु लहान राहिला नाहीस आमच्या स्वयंपाक घरात जायला."


सुयश ला परत दिसेल का रिया ची छबी ?


पाहूया पुढील भागात 


क्रमशः 


सौ. प्राजक्ता पाटील 


कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.


कथा वेळात वेळ काढुन वाचलीत त्याबद्दल आभार.


 कथा प्रकाशित करण्याचे सर्व अधिकार लेखीकेकडे राखीव.


#साहित्य चोरी करणे हा गुन्हा आहे.




🎭 Series Post

View all