हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-9

गौरीच्या "ट्रूथ ऑर डेयर" गेमने कमाल केली आणि अखेर सुयशने प्रेमाची कबुली दिली..
भाग-9


पोटभर रसगुल्ले फस्त करून झाल्यावर रियाला वास्तविकतेचे भान झाले. रियाने थोडेसे लाजून सुयशकडे आणि सर्वांकडे पाहिले. जणू काही घडलेच नाही या आवेशाने सुयश रियाला म्हणाला, "अशी काय पाहतेय रिया तू ? हवे असतील तर अजून घेऊ शकतेस तू हे रसगुल्ले. तुझ्या लाडक्या मॅडमनी ते तुझ्यासाठी पाठवले आहेत."

मग रियाने स्मितहास्य केलं तिला आठवलं की, ती लहान असताना मॅडमच्या घरी गेलेली. तेव्हा मॅडमनी रियाला बाऊलमध्ये दोन रसगुल्ले दिले होते. मनकवडया मॅडमना रियाला अजून रसगुल्ले हवे आहेत हे समजले. " रिया आणखी हवे आहेत का ?" म्हटल्यावर "हो." म्हणत रियाने अख्या डब्यातले सर्व रसगुल्ले एकटीने फस्त केले होते. तरीही सरांनी आणि मॅडमनी या लाडक्या विद्यार्थिनींचे कौतुक केले होते.

"अगं रिया काय झालंय हसायला?" रियाची आई म्हणाली.

"काही नाही. मी लहान होते तेव्हाचा मजेशीर किस्सा आठवला." रिया हसून म्हणाली.

"मलाही आठवतो." सुयशही हसून म्हणाला.

"सांगू नकोस हा." रिया चिडून म्हणाली.

सुयश हाताने दोन्ही कान पकडून मानेने नाही म्हणाला. खरोखर सुयशच्या डोळ्यात रियाच्या भावनाविषयी आदर दिसत होता. जणू तो आज सगळ्याच गोष्टींसाठी रियाची माफी मागत होता.

रियाच्या आईला सुयशच्या मनात रियाविषयी मैत्रीच्या पलीकडे काही आहे असे वाटत होते, 'पण माझ्या रियाच्या बाबतीत असा विचार करणे पाप आहे असे त्यांना वाटत होते. सुयश चांगला मुलगा आहे म्हणून त्याचा गैरफायदा घ्यायचा का? वेळीच त्याला सावध करायला हवे.' रियाच्या आई मनात विचार करत होत्या.

"सोड आता कान." रिया सुयशला म्हणाली.

"आधी तू म्हण, मला माफ केलंस म्हणून." सुयश म्हणाला.

"अरे तू काही सांगितलंच नाहीस मग सॉरी का म्हणतोयस?" रिया म्हणाली.

'मी तुला आधी केलेल्या, मुद्दाम नाही पण चुकून का असेना तुला दुःखी केलेल्या चुकांसाठी माफी मागतोय.आता परत  गौरी काय म्हणाली होती? किंवा ओढणीचा विषय काढून रिया मला तुला परत अपसेट नाही करायचय. त्यापेक्षा मी कानाला लावलेला हात काढतो.' सुयशने स्मितहास्य करत कानाला लावलेले हात खाली घेतले.

तितक्यात तिथे गौरी आली. गौरी रियाला म्हणाली, "रिया तू जेंव्हा हसतेस ना तेंव्हा खूप छान दिसतेस.मला तुला नेहमी असं हसताना पाहायचे आहे."

"तुला माहितीय गौरी मलाही कधीच कोणाला उदास झालेलं पाहावत नव्हतं, पण काय माहित होतं ? पुढे देवाने माझ्याच आयुष्यात उदास राहणं लिहीलं होतं." रियाचा बदललेला स्वर सुयशला पाहवत नव्हता. 

'गौरीच्या पाठवणीनंतर रिया मी तुला लग्नाची मागणी घालणार आहे. त्यानंतर तू तुला हवं तसं जीवन जगू शकतेस.' सुयश मनात विचार करत होता.

"अगं रिया, लोकांचे बोलणे मनाला लावून घेतले ना की तुला आयुष्यभर उदास राहावे लागेल.त्यापेक्षा लोकांकडे दुर्लक्ष करत आपण आपल्या मनाला पटेल तेच करावं असं मला वाटतं. तुला आठवतय का? शाळेत असताना सर आपल्याला एका मुलाची आणि त्याच्या वडिलांची गोष्ट सांगायचे. ते गाढव घेऊन जात होते तेव्हा ते कसेही वागले तरी लोक त्यांच्या चुकाच काढायचे. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की आपण लोकांच्या तोंडाला हात लावू शकत नाहीत म्हणून काही बाबतीत आपल्या बुद्धीचे ऐकण्यापेक्षा मनाचा कौल घ्यावा आणि तसेच करावे." गौरीला वाटत होते समाजाची पर्वा न करता रियाने दादाला लग्नाला होकार द्यावा. रियाला गौरीचे शब्दनशब्द बरोबर वाटत होते.

"अगदी खरंय तू बोलतेस ते." रियाचा ऑफ मूड गौरीने समजून सांगितल्यावर पुन्हा फ्रेश झाला.

सर्वांचे जेवण आटोपल्यावर उमा मावशी सुयशला आम्ही रिक्षाने निघतो म्हणाल्यावर गौरीने सर्वांना हॉलवर मुक्काम करण्यास सांगितले. पण उमा मावशीचे मिस्टर रात्रीच्या फ्लाईटने दिल्लीहून परत येणार असल्याने मावशीने उद्या लग्नाला आम्ही सगळेच हजर असू असे सांगितले.तेव्हा गौरीने मोका साधला आणि ती रियाला म्हणाली, "रिया मग तुला श्रेयाला आणि काकूंना तरी इथे रहावे लागेल माझ्यासाठी."

"श्रेयाला नको गं. तिचे बाबा फार प्रश्न विचारतील ती घरी नसेल तर. आम्ही उद्या नक्की येऊ. हव तर रियाला राहू दे. रमा आणि आम्ही जाऊ रिक्षाने." सुयश आणि रिया एकत्र यावे असे उमा मावशीलाही वाटत होते म्हणूनच मुद्दाम त्या रियाला थांबवत होत्या.

"नाही, नको. मी पण येईन ना उद्या." रिया म्हणाली.

"अगं रिया उद्या मी लग्न करून सासरी गेल्यावर आपल्या दोघींना असा एकत्र वेळ घालवायला मिळेल का? नाही ना. मग थांब ना प्लीज." 

"अगं पण माझे कपडे?" रियाने सहज विचारले.

"एवढच ना. आहेत ना माझे. ते घाल. आणि हो,उद्या तुला साडीच घालायचीय मी स्वतः तुझ्यासाठी खरेदी केलीय." गौरी म्हणाली.

"तुला कसं माहिती मी येणार आहे तुझ्या लग्नाला?" रिया म्हणाली.

अगं तो शाहरुख म्हणतो ना, "अगर कोई भी चीज दिल से चाहो तो पुरी कायनात तुम्हे उनसे मिलाने में लग जाती है.." तसच माझं मन मला सांगत होतं की तू नक्की येणार.." रियाला मिठी मारून गौरी म्हणाली.

"गौरी एवढा आग्रह करतेय तर रहा रिया तू. आम्ही निघतो मग आता." रियाच्या आई म्हणाल्या.

"काय म्हणतेय मग रिया तू?" गौरी रियाकडे पहात भुवया उंचावत म्हणाली.

रियाने होकारार्थी मान हलवली. तसा सुयशचा चेहरा खुलला. गौरीही फार खुश झाली होती. 

"मी येतोय तुम्हाला सोडायला." सुयश रियाच्या आई आणि मावशीला म्हणाला.

"अरे तू कशाला धावपळ करतोय? जाऊ ना आम्ही रिक्षाने.   इथे तुझी मदत लागू शकते." रियाच्या आई म्हणाल्या.

तितक्यात मॅडम तिथे आल्या आणि त्यांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर त्या रियाच्या आईला म्हणाल्या , " तुम्ही इथली काही काळजी करू नका. तुम्हाला घरी सोडून सुयश लगेच येईल परत."

"हो आई .मी ही तेच म्हणतोय, एवढ्या रात्री रिक्षाने जाणं योग्य नाही होणार. मी पार्किंगमधून गाडी घेऊन आलोच तुम्ही तोपर्यंत गेटजवळ थांबा." म्हणून सुयश गाडी आणायला गेला.

रियासोबत आलेले आई,श्रेया आणि उमा मावशी यांना सोडायला मॅडम, प्रिया आणि गौरी गेटजवळ आल्या होत्या.सुयशही गाडी घेऊन हजर झाला.सर्वजण गाडीत बसून गेले. गौरी रियाला तिच्या खोलीत घेऊन गेली. गौरीच्या मिस्टरांचा तिला कॉल आला. ती फोनवर बोलत होती. रिया गौरीचं सामान आवरत होती. तितक्यात गौरी तिथे आली. ती रियाच्या हातातला बॉक्स खाली ठेवत म्हणाली, "किती तो तुझा नीटनेटकेपणा. सगळा पसारा चुटकीसरशी आवरलास. ये इथे. ते राहू दे. ते राहिलेलं आवरतील गं धनु आणि आरती." 

"तू फोनवर बोलत होतीस ना म्हणून तुला वेळ समजला नसेल बहुतेक. अर्धा तास लागला हे सगळं आवरायला चुटकीसरशी नाही झालं." गौरी स्मितहास्य करत म्हणाली.

"काय गं रिया तू पण." गौरी लाजत म्हणाली. गौरीच्या कुरवल्याही स्मितहास्य करत होत्या. गौरीच्या खोलीत सगळ्या नातेवाईकांच्या तरूण मुलामुलींच्या छान गप्पा रंगल्या होत्या. 

इतक्यात सुयश गौरीच्या खोलीत आला. सुयश आणि रियाला बोलतं करण्यासाठी गौरीने एक छान योजना आखली. ती "ट्रूथ ऑर डेयर" हा गेम खेळण्याचा हट्ट सुयशकडे करू लागली. सुरूवातीला ना चा पाढा असलेला सुयश अखेरीस "ओके. ठीक आहे." म्हणाला.

गेम खेळायला सुरुवात झाली.सुरूवातीला रिया, गौरी, सुयश आणि गौरीचा मावसभाऊ शिव एवढेच जण गेममध्ये सहभागी झाले.

बॉटल टेबलावर फिरू लागली. जेंव्हा बॉटल स्टॉप झाली तेंव्हा गौरी आऊट झाली. गौरीने ट्रूथ सांगायचे ठरवले. गौरी म्हणाली, "मला गौतमने मोबाईल, साडी आणि पर्फ्यूम गिफ्ट केलेला पण मी कोणालाच सांगितले नव्हते जे आज सांगतेय." 

गौरीच्या या ट्रूथवर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर शिव आऊट झाला त्याने डेअर स्विकारले. सगळ्यांनी त्याला "झालंय झिंग झिंग झिंगाट" या गाण्यावर नाचायला सांगितले. सैराट झाल्यासारखा शिव नाचायला लागला. आता बॉटल रियाजवळ येऊन थांबली आणि रिया आऊट झाली. रियानेही ट्रूथ निवडले. रिया म्हणाली, "माझे लग्न झालेल्या दिवशीच काय ते मी माझ्या नवऱ्याला पाहिले होते. तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह हॉस्पिटलमधून अंतिम संस्कारासाठी घरी आणला गेला. अशा आजारी व्यक्तीसोबत माझे लग्न झाले होते जे आजवर कोणालाच ठाऊक नाही." रिया डोळे पुसत म्हणाली.

शेवटी राहिला तो सुयश. त्याने डेअर स्विकारले. त्याला वाटले शिवसारखे नाचून मोकळे व्हावे. पण सगळेजण सुयशला त्याच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या मुलीविषयी किंवा पहिल्या प्रेमाविषयी बोलण्याचा हट्ट धरून बसले. 'आता खरं तर सांगायचय पण रियाही नाराज होता कामा नये.' हा विचार सुयशच्या मनात सुरू होता.

काय सांगेल सुयश त्याच्या पहिल्या प्रेमाविषयी?

रिया पुन्हा नाराज होणार नाही ना?

पाहूया पुढील भागात क्रमश:

सौ.प्राजक्ता पाटील 







🎭 Series Post

View all