भाग-8
\"रियाच्या डोळ्यात माझ्यामुळे पाणी आलं. \" या विचाराने सुयशचेही डोळे डबडबले होते.
"रिया माझं ऐकून तरी घे. थांब ना प्लीज." म्हणत सुयश रियाच्या मागे जात होता. तितक्यात गौरीने "दादा थांब." म्हणून सुयशला थांबवलं.
"काय वाटले असेल रियाला? मी काही चुकीचे बोललो का गौरी?कुठे गेली असेल रिया?" सुयश नाराज होऊन म्हणाला.
"दादा, आता तू रियाला काही बोलू नकोस. तिला थोडा वेळ दे. मी रियाला चांगली ओळखते ती कुठेही जाणार नाही. कोणताही निर्णय भावनेच्या भरात ती घेत नाही सारासार विचार करून ती तिचा निर्णय सांगेल.आज ना उद्या तुला तुझ्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते. कारण वेळ निघून गेल्यावर बोलून काय उपयोग असतो का ? तू काळजी नकोस करूस. " गौरी आपल्या दादाला धीर देत म्हणाली.
"काय हे रिया तू अजून तयार झाली नाहीस?" आई गौरीला म्हणाली.
"अगं आई, हे काय ? तयार झालेय न मी." गौरी आईला म्हणाली.
"अगं मग दागिने कुठे आहेत तुझे? ते नाही घातलेस?" आई पटकन म्हणाली.
"मावशी दागिने माझ्याजवळ आहेत. हल्ली नवरीला हळदीच्या कार्यक्रमाला हा फुलांचा सेट घातला जातो. बघ ही बिन्दी, कानातले, ह्या बांगड्या आणि हा गळ्यातला सेट किती सुंदर दिसतोय ना?" गौरीच्या मावशीची मुलगी धनश्री संकपाळ मॅडमना म्हणाली.
"अगं पण साखरपुड्यात घातलेले दागिने नवरीच्या गळ्यात नाहीत म्हटल्यावर तिच्या सासरचे काय म्हणतील?" आई गंभीरपणे म्हणाली.
नवरी तयार झाली का नाही हे पाहण्यासाठी आलेल्या गौरीच्या सासूबाईंच्या कानावर संकपाळ मॅडमचे बोल पडले.
त्या लगेच म्हणाल्या, "कोणी काही बोलणार नाही. तुम्ही निश्चिंत रहा. अहो, आजकालच्या मुलींना एकतर साडीची सवय नसते आणि त्यात दागिन्यांचं ओझं. त्यामुळे असे हलकेफुलके दागिने घातले तरी चालतात."
"अरे मी पाहिलंच नाही.तुम्ही कधी आलात? आता तुमचीच परवानगी आहे तुमच्या सुनेला म्हटल्यावर आम्ही काय बोलणार? " हसत-हसत संकपाळ मॅडम म्हणाल्या.
सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते. "चल गौरी, झालं न तुझं? गुरूजी बोलावतायेत?" गौरीच्या सासूबाई गौरीला म्हणाल्या.
"हो आई येते." म्हणून गौरी आपल्या कुरवल्यानसोबत सासूबाई आणि आईच्या पाठोपाठ स्टेजकडे जायला निघाली.
वाटेत तिला सुयश सामानाची ने-आण करताना दिसला. \"किती नाराज दिसतोय दादा. मला खात्री आहे रियाने चुकीचा अर्थ नसेल घेतला. दादा, तू निश्चिंत रहा. मी नक्की रियाला होकार द्यायला भाग पाडेन.\" गौरी मनात विचार करत होती.
गौरी स्टेजवर चढली. तिला रिया आईजवळ बसलेली दिसली. \"जरी रिया आज नाराज दिसत असली तरी यापुढे माझ्या दादाच्या सहवासाने तिचं जीवन बहरून जाईल मला खात्री आहे.\" गौरी रियाकडे पाहात मनात विचार करत होती.
"छान दिसतेय गौरी तू!" गौरीचा होणारा नवरा हळूच पुटपुटला.
"हो मला माहितीय. मी जन्मापासून सुंदर आहे." गौरी स्मितहास्य करत म्हणाली.
"हो का?" गौरीचा होणारा नवराही स्मितहास्य करत म्हणाला.
\"किती सुंदर दिसतेय गौरी आणि गौतमची जोडी! कोणाची नजर नको लागायला.असेच नेहमी आनंदी रहा.\" मनात विचार करत असतानाच मॅडमची नजर सुयशकडे गेली. त्या रियाला शोधत होत्या. रिया आईजवळ उदास होऊन बसलेली पाहून त्यांना प्रश्नच पडला.
\" मगाशी सुयशबरोबर जाताना तर रियाचा मूड चांगला होता आता हिला काय झाले असेल? कोणी तिचा अपमान तर केला नसेल ना?\" मॅडम स्टेजवरून रियाकडे चाललेल्या पाहून सुयशने त्यांना अडवले आणि तो त्यांना बाजूला नेऊन म्हणाला,"आई तू रियाकडे चालली आहेस ना?"
"हो. पण तू का अडवले मला?"मॅडम म्हणाल्या.
"अगं आई, मी रियावर खूप प्रेम करतो अगदी तिच्या लग्नाआधीपासून. पण तेव्हा मी तिला नाही सांगू शकलो आणि वेळ निघून गेली. पण आज तिच्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ती पाहून मला सगळं बोलावसं वाटलं आणि मी बोललोही. यात माझं काय चुकलं? रियाला मला या सगळ्यांतून बाहेर काढायचयं बाकी मला काही नकोय."
हे सांगताना सुयशचे डोळे पाणावले होते.
"अगदी मनापासून प्रेम करतोयस तू रियावर. काळजी करू नकोस. मी आहे ना. गौरीच लग्न झालं की मी आणि तुझे बाबा आम्ही स्वतः बोलू रियाशी. मला खात्री आहे दुसर्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देव कधीच कमी होऊ देत नाही." आईचे हे उद्गार ऐकून सुयशने आईला प्रेमाने मिठी मारली.
मुलं कितीही मोठी झाली तरी ती आई-वडिलांसाठी लहानच असतात हेच खरं.आईही लेकाला पाठीवर हात ठेवून धीर देत होती.
हळदीचा विधी सुरू झाला होता म्हणून सुयश आणि मॅडम स्टेजवर गेले. खूप छान साग्रसंगीत हळदीचा तो कार्यक्रम पार पडणार होता. मांडव फुलांनी सजवला होता. त्याला लावलेली तोरणं, ओढण्या आणि लक्ष्मीनारायणाचा जोडा असलेली नवरा-नवरी हे दृश्य अगदी मनमोहक होतं. प्रसन्न वातावरणात प्रथम नवरदेवाला हळद लावायला उपस्थित असलेले सर्वजण एक-एक करून स्टेजवर येत होते. रिया नको म्हणत असतानाही मॅडमनी तिला हळद लावायला स्टेजवर येण्याचा आग्रह केला. सगळ्यात शेवटी आल्याने रिया नवरदेवाला हळद लावत होती.तितक्यात कोणीतरी सुयशला गौरीला हळद लावायला सांगितले. सुयश खाली बसला. त्याच्या पायाखाली रियाची ती नाजूक वर्क केलेली ओढणी अडकली. रिया नवरदेवाला हळद लावून गौरीला हळद लावण्यासाठी उठत होती. ओढणी अडकल्याने तिचा तोल जाताना सुयशने तिला सावरलं. तितक्यात तिच्या हाताची हळद सुयशच्या गालाला लागली.
\"हेच नियतीच्या मनात असेल कदाचित रिया आणि सुयशचं एक होणं.\" मॅडम मनातून देवाचे आभार मानत होत्या.
गावाकडच्या बायका जे घडले तो अपशकुन आहे अशी कुजबुज करत होत्या.विधवा बाई शुभप्रसंगात आली म्हणून हे घडले अशी चर्चा करत होत्या. हे रियाच्या आईने ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले."का माझ्या रियाच्या आयुष्यात हे पुन्हा पुन्हा घडते? माझी लेक अपशकुनी नाहीये.\" मनात विचार करून त्या कोपऱ्यात जाऊन डोळे पुसून स्टेजवर गेल्या.रियाला त्या आपल्यासोबत खाली घेऊन आल्या. आता त्याही नाराज दिसत होत्या. या सगळ्याचा सुयशला फार त्रास होत होता. \"जे घडले त्यात रियाचा काहीच दोष नाहीये पण सगळेजण तिलाच माझ्यामुळे दोषी ठरवत आहेत आणि मी काहीच करू शकत नाही.फक्त थोडेच दिवस रिया त्यानंतर "भाग्यवान" या शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून लोकांना समजेल.\" सुयश मनाशी निश्चय करत म्हणाला.
हळदीचा कार्यक्रम त्यानंतर संगीतावर ठेका धरत रियाच्या नात्यातले मुलंमुली नाचू लागले. रियाच्या आई आणि रिया मात्र अपराधी असल्यासारख्या बसल्या होत्या. थोड्या वेळाने संकपाळ मॅडमजवळ रियाच्या आई "आम्ही घरी जाऊ का?" असं विचारू लागल्या.
"जेवण केल्याशिवाय मी कशी जाऊ देईन तुम्हाला?" मॅडम म्हणाल्या.
"नाही खरंच भूक नाही मला." रियाच्या आई म्हणाल्या.
रियाच्या आई असे का बोलत आहेत? हे मॅडमच्या लक्षात आलं.
संकपाळ मॅडम म्हणाल्या, "तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर माझ्या गौरीची पाठवणी होईपर्यंत तुम्ही इथे जे घडेल त्याकडे दुर्लक्ष करणार असं वचन द्याल मला."
रियाच्या आई विचारात पडल्या होत्या. हे पाहून मॅडम पुन्हा म्हणाल्या, " रियाला आयुष्याभर सुखी पाहायचे आहे ना तुम्हांला. मग तिच्यासाठी कराल ना नक्की एवढं?"
रियाच्या आईच्या डोळ्यासमोरून भूतकाळातील घटना झरझर सरकल्या तेव्हा देवदूत बनून आलेले सुयश आणि मॅडम त्यांना आठवले. क्षणाचाही विलंब न करता रियाच्या आईनी मॅडमच्या हातात हात दिला.
"माझा पुर्ण विश्वास आहे मॅडम तुमच्यावर." रियाच्या आई भरल्या डोळ्यांनी म्हणाल्या.
मॅडमनी विश्वासाने रियाच्या आईचा हात हातात घेतला. उदास झालेल्या रियाला आणि श्रेयाला डान्समध्ये सहभागी करण्यासाठी गौरीने दोन्ही हात पुढे केले.
रियाने नकारार्थी मान हलवली.
"रिया अब हम परदेसी होनेवाले है। इतना भी नहीं करोगी हमारे लिए।" डोळ्यात पाणी आणून गौरी म्हणाली.
रिया बालमैत्रिणीच्या डोळ्यातील अश्रू पाहू शकली नाही.ती फक्त गौरीमुळे नृत्यामध्ये सहभागी झाली. गावाकडील स्त्रियांच्या कुजबुज करण्याकडे रियाच्या आईने पूर्ण दुर्लक्ष केले. रियाने धरलेला ठेका पाहून सुयश रियाच्या नृत्याच्याही प्रेमात पडला. जेवणाची सोय गार्डनमध्ये करण्यात आली होती. अंधारात चमकणारे ते प्रत्येक टेबलावरील दिवे आणि गार्डनमधील ती हिरवळ पाहून अंगावर शहारे येत होते. रिया,श्रेया, उमा मावशी आणि रियाच्या आई एकाच टेबलवर जेवायला बसले होते. सुयशची नजर मात्र त्याच टेबलावर खिळली होती. मॅडमनी रसगुल्ले असलेला पॉट सुयशच्या हातात दिला आणि रियाच्या आवडीचे रसगुल्ले तिला स्वतःच्या हाताने द्यायला सांगितले. सुयश थोडासा घाबरत घाबरत रियाजवळ गेला. त्याने चमच्यात रसगुल्ला घेतला आणि रियाच्या बाऊलमध्ये ठेवला. रसगुल्ला पाहिल्यावर रियाची कळी खुलली तिने "अजून एक… अजून एक…" म्हणत दहा रसगुल्ले फस्त केले. रियाच्या आई ,श्रेया आणि उमा मावशीला हसू अनावर झाले. सुयश भलताच खूश होता. डोळ्यांतून त्याने आपल्या आईचे आभार मानले.
रसगुल्ल्यासारखी गोडी सुयश आणि रियाच्या आयुष्यात उतरेल का?
रिया आणि सुयशला एकत्र आणण्यासाठी मॅडम काय प्रयत्न करतील?
गौरीच्या पाठवणीनंतर रियाच्या आयुष्याला वेगळे वळण मिळेल काय?
सौ.प्राजक्ता पाटील.
