हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-5.

एक आई निमूटपणे सगळा संघर्ष सहन करते पण जेंव्हा प्रश्न तिच्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या संघर्षाचा असतो तेव्हा ती परिस्थितीशी दोन हात करायला तयार होते. अशीच रिया आणि तिच्या आईची ही कथा...

भाग-5

https://www.facebook.com/581606972323826/posts/1349741285510387/


"सुयश परका असतानाही त्याच्यासोबत वेळ घालवताना आपलेपणा जाणवला. पण घरी गेल्यावर रक्ताच्या नात्याने जोडली गेलेली माणसे असून सुद्धा पावले जड का होत आहेत घराच्या दिशेने जाताना?\" रिया मनात विचार करत होती. आईला रियाच्या मनाची घालमेल समजली होती. रियाचा हात आपल्या हातात घेऊन आई म्हणाली , "रिया, आता घाबरायच नाही. जे होईल त्याला सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल हे लक्षात ठेव."


"हो आई." रियाही आईला आश्वासन देत म्हणाली.


सुयश गाडीजवळ जाऊन थांबला होता.


"काकू मी सोडू का तुम्हाला घरी?" सुयश म्हणाला.


"अरे नको. आज जी मदत केली ना तू , ती माझ्या रियासाठी आयुष्यभराच्या सुखाची शिदोरी असेल. आणि शिवाय तुझ्यासोबत आम्ही घरी आलोय म्हटल्यावर घरचे प्रश्न विचारून भांबावून सोडतील आम्हाला. यातही माझी रियाच दोषी ठरेल. मग विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे देताना खरं काय ते सांगावे लागेल मग तू रियासाठी निर्माण केलेली सावली पुन्हा ऊन्हात परावर्तित होईल. बघ चालेल का तुला?" आई अगदी मनापासून बोलत होती.


"नाही काकू. कधीच नाही. जा तुम्ही. माझ्यामुळे रियाला कधीच कसला त्रास होणार नाही याची काळजी नक्की घेईन मी." सुयश म्हणाला.


पाठमोऱ्या रियाकडे पाहात सुयश मनात विचार करत होता \"रिया मला तुझ्या आयुष्यात सावली बनून राहायला नक्की आवडेल. त्यासाठी मला कितीही त्रास झाला तरी मी मागे हटणार नाही.\" 


रिया आत्मविश्वासाने पावले टाकत बसमध्ये चढली. रियाचे ते काळेभोर ,लांबसडक केस रियाच्या आत्मविश्वासात आणि सौंदर्यात भर घालत होते. गाव जसजसे जवळ येत होते तसतसा रियाचा निर्धार पक्का होत होता. आता तिची भिती दूर झाली होती. गावचे बसस्थानकही आले. दोघी बसमधून खाली उतरल्या.  रियाच्या आई डोक्यावरील पदर सावरत भरभर पावले टाकत चालत होत्या.  रियाही तोच वेग पकडून चालत होती. मागच्या दाराने दोघी वाड्यात आल्या.


पाहतात तर काय ? रियाच्या खोलीबाहेर तिचे बाबा उभे होते. रिया आत जात होती तितक्यात बाबांनी रियाला काकासाहेबांच्या खोलीत बोलावून घेतले. रिया न डगमगता आत गेली. 


"तुला किती वेळा सांगितले रिया? मुलीने कसं चालायचं ते? " आजी रियाला म्हणाली.


"असे नियम कुठे वाचले तुम्ही? मुलींनी नेहमी दबक्या पावलांनी व खाली मान घालूनच चालले पाहिजे." रिया चिडून म्हणाली.


"या सगळ्याला आईचा पाठिंबा आहे. म्हणूनच ही कोणाचच काही ऐकत नाही. उद्धटपणे वागते. पण रियाच्या या अशा वागण्याने आमच्या मुलींची लग्न कशी होणार ?" रियाची काकी रागाने म्हणाली.


काकासाहेब समोर असताना कोणीच काही बोलत नसे पण आज सगळे वेगळेच घडत होते. खूप दिवसांपासून घरातील मुलीपासून स्त्रियांपर्यंत सगळ्यांच्याच मनाचा जो कोंडमारा झाला होता त्या ज्वालामुखीचा आज उद्रेक होणार होता हे नक्की होतं.


"काकी काय बोलताय तुम्ही? कशावरून उद्धट ठरवताय मला ? घरातल्यांनी जसं सांगितलं तसंच वागत आलीय मी लहानपणापासून जरी माझ्या बुद्धीला ते पटत नसलं तरी.  दहावीत पहिला नंबर मिळूनही केवळ तुम्ही सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी लग्नाला तयार झाले.  एवढंच नाही आधीच रोगाने त्रस्त असणारा माझा नवरा ज्याने मला स्पर्शही केला नाही तो काही दिवसातच मृत्यूमुखी पडला आणि मला हे असं आयुष्यभर विधवा म्हणून जगायला भाग पाडून गेला.  यातही माझाच दोष आहे असंच दाखवलंत तुम्ही राधाला पाहूणे बघायला आले होते तेव्हा. इतकंच नाही तर वचन मागितले तुम्ही मला की मी दिवसभर खोलीत स्वतःला बंद करून घ्यावं म्हणजे माझी सावलीही राधावर पडणार नाही म्हणून." रिया धायमोकलून रडू लागली.


"उगाच मागचे पुराण ऐकवून ती आज जे वागलीय त्यावर पांघरून घालतेय बाकी काही नाही." काकी तोऱ्यात म्हणाली.


कोपऱ्यात उभारून केवळ अश्रू ढाळत उभ्या असलेल्या रियाच्या आई आता स्वतःला रोखू शकल्या नाहीत. त्याही आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत म्हणाल्या , "काय चुकीचं वागली माझी लेक आज? ते मला कळायलाच हवं." 


"सगळे जे सांगत आहेत ते खरं आहे तर. तुम्हीच तिला पाठिंबा देताय हवं तसं वागायला. आज ती त्या मास्तरच्या पोरासोबत शहरात फिरली काय ? हॉटेलात गेली काय? याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही." रियाचे काका रियाच्या आईला म्हणाले.


रियाच्या आई हताश होऊन गप्प बसल्या.  पुढे काही बोलले तर रियाचं ऍडमिशन हे लोक कॅन्सल करतील याची त्यांना पूर्ण खात्री होती.


"म्हणजे रियाला इन्फेक्शन वगैरे काही झालंच नव्हतं ? तू माझ्याशी खोटं बोललीस ? किती चुकीची वागलीस तू ? काय साध्य करायचय तुला ? आमची अब्रू अशी चव्हाटय़ावर आणून. बोल ना. " म्हणून रियाच्या बाबांनी रियाच्या आईवर हात उगारला. 


रियाच्या बाबांचा हा असा अवतार कधीच कोणी पाहिला नव्हता. सर्वजण आश्चर्याने पाहत होते.


"आलंच आज तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर. अब्रू चव्हाट्यावर आणण्यासारखं मी काहीच केलं नाही उलट लग्न झालेल्या दिवसापासून आपल्या नवऱ्याचे एका परस्त्रीसोबत संबंध आहेत हे सासरी व माहेरी कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी कोणालाही न सांगता मरण यातना सहन करत राहिले. तेंव्हाच जर आपला नवरा आपल्या मुलांवर खर्च करण्यापेक्षा त्या स्त्रीवर जास्त पैसे खर्च करतोय म्हणून घर सोडून गेले असते तर मग आली असती तुमची अब्रू चव्हाट्यावर. " रियाच्या आई रडू लागल्या.


काकासाहेबांना हे सर्व ऐकून धक्काच बसला होता. 


\"काय घडतेय हे सर्व ? अख्या पंचक्रोशीत माझ्या परिवाराला विशेष मान होता पण दिव्याखाली अंधार म्हणतात तो हाच का?\" काकासाहेब निशब्द होऊन मनात विचार करत होते तोच जोरात खुर्चीवरून खाली पडले. 


रिया धावत काकासाहेबांच्या जवळ गेली. तोच सगळ्यांनी तिला अडवले. रियाला घरात राहायचे असेल तर खोलीच्या बाहेरही न निघण्याची अट घातली. 


"मी असलं कोणतंही वचन देणार नाही." रिया ठामपणे म्हणाली.  


"तुला जर ऐकायचं नसेल तर तुला घराचे दरवाजे मोकळे आहेत. या घराबाहेर तू तुला हवी तशी वागू शकतेस. माझ्या ह्या गोकुळाला कोणाची नजर लागली कोण जाणे ? " रियाची आजी रागाने बोलत होती.


रियाचे बाबाही काहीच न बोलता काकासाहेबांना दवाखान्यात घेऊन जात होते.


"बाबा." रिया बाबांचा हात पकडत रडत-रडत म्हणाली.


बाबांनी रियाचा हात जोरात झिडकारला. आता रियाच्या आईला राग अनावर झाला. त्यांनी आपल्या लेकीचा हात हातात घेतला खोलीत जाऊन त्या बॅग भरू लागल्या.


"हे काय करतेय आई तू ? " रिया घाबरून म्हणाली.


"जे खूप मला खूप आधी करायला हवं होतं. तुला माहितीय रिया, लग्नानंतर तुझ्या वडीलांनी मला कधीच प्रेमाचा शब्द बोलला नाही तरी मी माझ्या नशीबाला दोष देत सारे सहन केले. आज ना उद्या परिस्थिती नक्की बदलेल ही खोटी आशा उराशी बाळगून होते. त्यातच तुझा जन्म झाला आणि तुझ्या बाललीलापुढे इतर गोष्टी गौण वाटत गेल्या. माझी लेक मोठी होऊन नक्की बदल घडवेल अशी खात्री होती. हे काय झालं बघ ना पुन्हा माझी आशा खोटी ठरली. पण आता मला माझ्या लेकीचं आयुष्य खोट्या आशेपासून दूर ठेवायचंय तिला वास्तवाचं भान करून द्यायचंय त्यासाठी आता काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही. मग त्यासाठी मी हे घरही सोडायला तयार आहे." रियाची आई हिंमत एकवटून म्हणाली.


रियाचीही बॅग भरून दोघी देवघरात गेल्या. 


\"देवा, मला माझ्यासाठी काहीच नकोय पण माझ्या रियाच्या आयुष्यात क्षणभर सावली आणि कायम ऊन हा चाललेला खेळ बंद कर.\" आई मनापासून लेकीच्या सुखासाठी प्रार्थना करत होती.


"चल रिया." म्हणत आईने रियाचा हात पकडून तिला बाहेर आणले.


घरातील पुरूष मंडळी आणि काकासाहेबांच्या पत्नी हिराबाई काकासाहेबांना घेऊन दवाखान्यात गेले होते. घरात दोन्ही काकी आणि त्यांच्या मुली होत्या. पण त्यातल्या कोणीही रिया आणि तिच्या आईला अडवले नाही. मिळेल त्या वाहनात बसून शहरात जायचं रियाच्या आईने ठरवलं होतं. त्या वाहनाची वाट पाहत बसल्या होत्या पण वाहन काही येत नव्हते.


"आई, मी सुयशला फोन करू का?" रिया म्हणाली.


"नको रिया, त्याच्या घरी गौरीच्या हळदीची तयारी सुरू असेल आता. उगीच आपल्यामुळे त्याच्या घरचे आनंदी वातावरण कशाला खराब करायचे." आई रियाला म्हणाली.


रिया आणि आई शहरात जाऊ शकतील का? सुयशला रियाच्या घरी काय घडले हे समजू शकेल का? कसा असेल रियाच्या आयुष्यातील हा ऊन सावल्यांचा खेळ?


पाहूया पुढील भागात क्रमश: 


सौ.प्राजक्ता पाटील 






🎭 Series Post

View all