हा खेळ ऊन सावल्यांचा. भाग-17 अंतिम

अखेर दुसऱ्या दिवशी ती सुंदर सकाळ उमलली होती जिने रियाच्या आयुष्यातील ऊन सावल्यांचा खेळ संपवला होता.
भाग-17

सुयश आणि रियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली होती. नवीन शहर असल्यामुळे रियाला कोणी ओळखत नव्हते. तिच्या मनावर विधवा या शब्दाचा अजिबात ताण नव्हता.ती सुयशसोबत तिचं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणार या विचाराने तिला तिचे जीवन सार्थकी लागले असेच वाटत होते. मनापासून रियाच्या आई देवाचे आणि संकपाळ कुटुंबीयांचे आभार मानत होत्या.

' जिथे आपल्या म्हणणाऱ्या घरच्या माणसांनी रियाला शकून,अपशकुनाच्या फेऱ्यात कैद केले तिथे या परक्या लोकांनी माझ्या रियाला नवं आयुष्य दिले आहे यांचे उपकार या जन्मी फिटणे अशक्य आहे.' रियाच्या आई मनात विचार करून अश्रू ढाळत होत्या. 

"काय झालंय आई तू का रडतेस? कोणी काही बोललं का तुला?" रिया घाबरून म्हणाली.

"नाही गं,मला कोणी काही बोलले नाही. आपल्या घरच्यांचे वागणे आठवले आणि डोळे भरून आले बघ."  आई रियाला म्हणाली.

"असू दे गं आई, त्यांच्यावर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी परंपराचा पगडा आहे तो लगेच कसा दूर होणार? पण आई माझी खात्रीय बाबांनाच काय घरच्या सगळ्यांनाच त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप होत असेल बघ." रिया म्हणाली.

'नाही रिया पश्चाताप खूप लांबची गोष्ट आहे. आताही ते लोक तसेच आहेत. त्यांनी विनाकारण मॅडमच्या घरच्यांना त्रास दिलाय जो मी तुला नाही सांगू शकत.' आई मनात विचार करत होती.

"बरं आई ,तू आता नको टेन्शन घेऊ." रिया आईला म्हणाली. आईने होकारार्थी मान हलवली.

तितक्यात सुयशने रियाला," खरेदीसाठी जायचय ना? चल लवकर म्हणून आवाज दिला."

"हो, हो आलेच. आई येऊ मी?" म्हणून रिया गेली.

आई पाठमोऱ्या आपल्या लेकीला पाहत भरभरून आशीर्वाद देत होती. रिया कॉस्मेटिक्स सामान खरेदी करायला गेली असल्याने सुयश आणि रिया दोघेच गेले होते. तिथे सुयश सतत रियाकडे पाहात देवाचे आभार मानत होता. रिया समजूतदार तर होतीच पण तितकीच हुशार आणि देखणी होती. लांबसडक काळेभोर केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते.

"काय बघतोय?" रिया म्हणाली.

"तुलाच बघतोय. अगं अशी काय प्रश्न विचारतेस कॉलेजमधल्या पोरीसारखी? माझ्या होणाऱ्या बायकोकडे बघणे म्हणजे काय गुन्हा आहे का?" सुयश म्हणाला.

"आता फक्त बघतच बसणार आहेस का? का घरीही जायचंय आपल्याला?" रिया हसून म्हणाली.

बॅगा उचलून "चला निघूया. " म्हणत सुयश आणि रिया गाडीत येऊन बसले. 

"रिया,आय लव्ह यू." रियाचा हात हातात घेत सुयश म्हणाला.

"आय लव्ह यू टू." रिया स्मितहास्य करत म्हणाली.

तुला खरं सांगू सुयश, माझ्या या नवीन आयुष्याचा शिल्पकार तू आहेस. समाजाची पर्वा न करता तू माझ्या आयुष्यात सप्तरंगाची उधळण केलीस. काय झालं असतं तू नसता तर?" रियाच्या डोळ्यात अश्रू आले.

"ये रिया, असे डोळ्यात पाणी नको ना आणू यार. उलट मला माझ्या प्रेमासाठी काहीतरी करता आले याचा आनंद वाटतो." सुयश रियाच्या समोर आपला रूमाल धरून म्हणाला.

"आता तुला आणि मलाही लग्नानंतर क्लास जॉइन करून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे हे विसरू नको. आईबाबांच्या पैशावर नाही जगायचंय मला." सुयश म्हणाला.

खरं तर नवीन घराचे लोन, सर्व सामान खरेदी, नुकतेच पार पडलेले गौरीचे लग्न आणि आता स्वतःचे लग्न यामुळे झालेली आर्थिक चडचण सुयशला स्वस्थ बसू देत नव्हती. सुयशने साधेपणाने लग्न करूया असे म्हटलेलेही आईबाबांना मान्य नव्हते.  सुयशला आईबाबांचा भार हलका करायचा होता पण रियाला हे सांगून त्याला तिला दुःखी करायचे नव्हते. दोघे घरी पोहोचले. 

गौरीच्या घरचे लग्नासाठी पोहोचले होते. गौरीने रियाला प्रेमाने मिठी मारली. 

"काय रिया वहिनी, कशा आहात?" गौरी रियाला म्हणाली.

लाजून रिया "मी छान आहे." म्हणाली.उद्या गौरीचा मेहंदीचा कार्यक्रम असल्याने घर अगदी सुंदर सजवले होते.

सकाळ झाली. सगळे आजूबाजूचे तसेच संकपाळ मॅडमच्या मैत्रीणीच्या ओळखीतले लग्नाला तसेच प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. संकपाळ कुटुंबीयांनी जिथे फ्लॅट घेतला होता त्याच कॅम्पसमध्ये मोठा फंक्शन हॉल होता जिथे रिया आणि सुयशचे लग्न होणार होते. दारात मांडव उभारण्यात आला. देवक बसवले होते. दरवाज्यावर भालदार आणि चोपदार काढण्यात आले होते.

मेहंदीच्या कार्यक्रमासाठी रियाने सिल्व्हज लेस असलेला  मेहंदी कलरचा वनपीस घातला होता. तो मेहंदी कलर रियाच्या श्वेत वर्णावर अतिशय शोभून दिसत होता. साग्रसंगीत मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. सगळेजण आनंदात होते.सुयश आणि रियाची जोडी लक्ष्मी नारायणासारखी दिसत होती.


रियाही खूप आनंदात होती. आता खरोखर रियाला सौभाग्याचा आहेर सुयशकडून मिळणार होता. सुयशला त्याचं पहिलं प्रेम मिळणार होतं. सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. गौरीने "कोणाचीही नजर न लागो." अस म्हणत आपल्या वहिनी आणि दादाला काजळाचा तिट लावला. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम ठरला होता. नवरा नवरीच्या अंगाला लावण्यात येणारी हळद दळण्यासाठी जात्यावरच्या ओव्या ज्यांना येतात त्या शेजारच्या काही स्त्रियांना आमंत्रण देण्यात आले.गौरीने अगदी सुंदर पद्धतीने जाते सजवले होते. दुसऱ्या दिवशी जात्यावरच्या ओव्या गात हळदीसोबत पाच धान्ये दळतानाची ओवी: 

 

पाच पानांचा ग विडा, त्यावरी मोतीयाचा घोस
आधी नेमिला गणेश, आधी पुजियेला गणेश 
हळकुंड,सुपारी बाई बांधिते जात्याला
मुळ चिठ्ठी धाडते गं कुलदेवी,देवतेला…।।धृ।।
जात्या ईश्वरा, तुला तांदळाचा घास
नवरा मोतीयाचा घोस, नवरा मोतीयाचा घोस।।1।।
जात्या ईश्वरा तुला, सुपारीचा पाया
सीतामाईसाठी, नवरा झाला रामराया।।2।।
हळद कुंकू आधी खंडोबा देवाला
मग नवरीच्या बाबाआईला
जात्या ईश्वरा तुला गव्हाचा घास
म्हाळसादेवीसाठी देव खंडेराया खास।।3।।
जात्या ईश्वरा दळतो आता कडधान्य 
रुसलेल्या रुक्मिणीसाठी कासावीस देव पांडूरंग ।।4।।
हळद दळते मी खंडेरायाच्या नावाची
आई अंबाबाई आली करवली भावाची।।5।।
लग्नाच्या मांडवात हळदीचे वाळवण
हळदीचे वाळवण,नवऱ्या मुलाचे केळवण।।6।।
लगीन एवढी चिठ्ठी, देव बालाजीच्या नावा
मग सोयराच्या गावा,मग सोयराच्या गावा।।7।।
लगीन एवढी चिठ्ठी दिली जोतिबा देवाईला मग नवऱ्याच्या बाबाईला..
नवरदेवाच्या बाबाईला।।8।।
लगीन एवढी चिठ्ठी दिली चाफळ गावायला 
चाफळ गावायला, राम न् सीताबाई आले लगीन लावायला..।।7।।

अतिशय सुरेल आवाजात गायलेल्या जात्यावरच्या ओव्यानी लग्नघराची शोभा वाढवली होती. उपस्थित सर्वांना चहा नाश्ता देऊन संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण मॅडमनी दिले होते.

हळदीचा मांडव पिवळ्या रंगाने सजला होता. जिकडेतिकडे पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाचे नेट आणि त्यापासून बनलेले स्टेज अतिशय मनमोहक होते. हॉलसमोरील गार्डन पिवळसर रंगाच्या लाइटिंग आणि दिव्यांनी हळदीच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्वांना वेलकम करत होती. आधी सुयशला हळद लावली नंतर त्याची हळद रियाला लावण्यात आली. रियाने पिवळ्या रंगाची हलकंस वर्क असलेली साडी घातली होती. फुलांचे दागिणे, हेअरस्टाइल यामुळे रिया एकदम गोड दिसत होती. रिया व सुयशला एकमेकांना हळद लावण्यास सांगितले. सुयशने बिनधास्तपणे रियाला हळद लावली. रियाने लाजून सुयशच्या गालाला हळद लावली. मस्त पोज देत फोटो सेशन सुरू होते. घरच्या,  बाहेरच्या सर्वांनी नवरा नवरीला हळद लावली. गौरी सुयश आणि रिया दोघांची करवली बनून त्यांचा मेकअप ठीक करत होती. सर्वांचे जेवण आटोपल्यावर नवरा नवरी आपापल्या खोलीत झोपायला गेले. 

'उद्या फायनली रिया सौ.रिया सुयश संकपाळ बनून माझ्या सुखदुःखात माझ्यासोबत उभी राहणार.' हा मनात विचार करून सुयश स्मितहास्य करत होता. 

दुसऱ्या दिवशी सुयश घोड्यावर बसून राजकुमारासारखा आला होता. मागे डोलीत असलेल्या आपल्या राणीला कधी एकदा पाहतोय असे त्याला झाले होते. बहारो फुल बरसावो, मेरा मेहबूब आया है। मेरा मेहबूब आया है। म्हणत एकमेकांचे हात हातात पकडून दोघे स्टेजवर गेले. नवरा-नवरीनी ठरलेल्या मुहूर्तावर एकमेकांच्या गळ्यात देवाब्राह्मणांच्या साक्षीने हार घातले. लग्न निर्विघ्नपणे पार पडले. सर्व कार्यक्रम यथासांग पार पडल्यानंतर सर्वजण घरी आले. घरात रियाचा गृहप्रवेश अगदी थाटात केला. लक्ष्मीच्या पावलाने दारातील माप ओलांडून रिया घरात गेली. सुयश आणि रियाची बेडरूम रंगीत फुलांनी सजली होती. आज रिया आणि सुयश तनमनाने एकमेकांचे झाले होते.

अखेर दुसऱ्या दिवशी ती सुंदर सकाळ उमलली होती जिने रियाच्या आयुष्यातील ऊन सावल्यांचा खेळ संपवला होता. आता तिला आपल्यावर नितांत प्रेम करणारा जोडीदार मिळाला होता.सावली बनून कठीण प्रसंगात तो उभा राहणार होता.


सर्व वाचक बंधूभगिनीनी बारशाला यायचं हं…!


ही कथा वेळेवर पोस्ट होऊ शकली नाही तरीही वाचकवर्गानी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे कथा पूर्ण करण्याचे प्रोत्साहन मिळाले. 

सर्व वाचकवर्गाचे मनापासून आभार मानते. आज माझी कथा आपला निरोप घेतेय. 

नवीन पर्वाला तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत.

समाप्त!

सौ.प्राजक्ता पाटील 











🎭 Series Post

View all