हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-11

रिया आणि सुयशची अनोखी प्रेमकहाणी

भाग-11



सुयश आणि रिया एकमेकांकडे प्रेमाने पाहत होते. सुयशने जिच्यावर मनापासून प्रेम केल होतं ती रिया आता फायनली त्याची होणार होती. प्रश्न उरला होता तो रियाच्या आईचा.  पण ते म्हणतात ना "मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी।" त्यामुळे रियाचा होकार सुयशला जास्त महत्त्वाचा वाटत होता. रियाही सुयशला लहानपणापासून ओळखत होती. त्याचा तो दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव, रियासाठी तर तिची सावली बनून तो तिला प्रत्येक वेळी साथ देत होता हे त्याचे उपकार कधीही न विसरता येण्यासारखे होते. आणि त्याची सोबत कोणाला नकोशी वाटेल? दोघांच्याही नजरेत प्रेमासोबतच कृतज्ञतेचा भाव दिसत होता. दोघे आपल्याच विश्वात काही क्षण विसावले होते. या दोघांना पाहून मॅडम, गौरी आणि संकपाळ सर गालातल्या गालात हसत होते. बराच वेळ झाला तरी दोघांची नजर खाली होत नाही म्हणून मॅडमनी हलकासा खोकल्याचा आवाज केला. दोघेही भानावर आले आणि लाजतच बाजूला सरकले. 


"तुम्हा दोघांना वेगळं करण्याचा आमचा मुळीच हेतू नव्हता हो पण.." मॅडम पुढे बोलणार तोच गौरी म्हणाली, "आता तुम्हा दोघांना आयुष्यभर एकमेकांना दररोज पाहायचे आहे. जन्मो-जन्मीच्या नात्यात गुंतायचे आहे पण त्याआधी माझ्या डोक्यावर अक्षता पडायला हव्यात ना. त्यासाठी उद्याची तयारी करायला आता आराम हवा आणि म्हणूनच चला आता झोपायला." गौरी हसत-हसत म्हणाली.


रिया लाजून गौरीला बिलगली. सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य झळकत होते. सुयशही "ओके. गुड नाईट." म्हणून लाजतच रियाच्या खोलीबाहेर गेला. 


गौरीने रियाला तिचा नाइट ड्रेस घालायला दिला.गौरीच्या खोलीमध्ये प्रशस्त बेड होता.रिया आणि गौरी बेडवर झोपल्या. खालीही गाद्या अंथरल्या होत्या. बाकी सगळ्या कुरवल्यानसोबत मॅडमही खालीच झोपल्या.


रिया आज मनापासून खूश होती. घरातल्या सगळ्यांना ती आज मीस करत होती. तिचे डोळे पाणावले होते.


"काय झालंय रिया ? तू का रडतेस?" गौरी रियाचा हात हातात घेऊन म्हणाली.


'गौरीला घरच्यांविषयी सांगू की नको? नकोच तिला काही सांगायला. सगळेजण किती आनंदात आहेत आज.'रियाने मनात विचार केला. आणि ती गौरीच्या हातावर आपला हात ठेवून म्हणाली, "अगं वेडाबाई, मी रडत नाहीये.आनंदाश्रू आहेत ते." 


'रिया मी तुला आज ओळखत नाहीये गं, लहानपणापासून ओळखते. तुला कशाची तरी खंत वाटतेय पण असो तुला आता खरे कारण नसेल सांगायचे तर मलाही नाही ऐकायचे. यापुढे तुझ्या आयुष्यात सुखाची बरसात होवो हिच ईश्वराकडे प्रार्थना.' गौरी मनात विचार करत हसत म्हणाली, "आता यापुढे तुझ्या आयुष्यात आनंदाची बरसात असेल याची मला खात्री आहे." 


रियाने हसून होकारार्थी मान हलवली. 


"आता गप्पा खूप झाल्या झोपा बघू दोघीही." या मॅडमच्या सुचनेचे पालन करत "गुड नाईट." म्हणून दोघीही झोपी गेल्या.


सकाळ झाली होती. पण आज ही सकाळ रियाला वेगळी भासत होती. नेहमी पाहिलेला सुयश आज अगदी हृदयात स्थिरावला होता. त्याला पाहताच रियाच मन उडू उडू होऊ लागलं होतं. रियाचे लग्नाआधीचे कार्यक्रम झाले होते. रियाला सुयशच्या घरच्यांनी सून मानलं होतं. सगळेजण हक्काने रियाला कामे सांगत होते. रियाही मनापासून ती सर्व कामे करत होती. आता लग्नाला थोडाच अवधी उरला होता. नवरी आणि कुरवल्यानचेही मेकअप करण्यात पार्लरवाल्या व्यस्त होत्या. गौरीने रियासाठी खास डिझाईन केलेली साडी तिला नेसायला दिली. गौरीतर अप्रतिम दिसत होतीच पण रियाही खूपच सुंदर दिसत होती. ती लाल रंगाची साडी, ते काळेभोर केस त्यात माळलेला तो गजरा, त्या थ्रेडवर्क केलेल्या बांगड्या हे सगळं मॅडमच्या आग्रहास्तव केलं असलं तरी टिकली लावताना रियाचे हात थरथरत होते. बाहेरून आत आलेला सुयश रियाचा हात पकडून म्हणाला," मी असं ऐकलंय की कुंकू किंवा टिकली जेवढी मोठी असेल तेवढं नवऱ्याला आयुष्य जास्त मिळतं."


रियाने हात खाली घेतला. टिकली पॉकेटला परत चिटकवून टाकली आणि रिया गौरीकडे गेली. सुयशला प्रश्न पडला 'अरे यार, काही चुकीचे बोललो का मी. पण रियाने माझी चूक मलाच सांगायची गौरीला सांगायला जायची काय गरज आहे.' सुयश मनात विचार करत होता. 


रिया गौरीजवळून आली आणि सुयश समोर उभी राहिली. क्षणाचाही विलंब न करता सुयश म्हणाला, "रिया सॉरी ना. अजून मी तुझा नवरा नाही झालो मी असे बोलायला नको होते. पण तू माझी चूक मलाच सांगायची गौरीला सांगायला जायची काय गरज होती?"


"काय? अरे माझ्याकडे बघ आधी तू." रिया सुयशला म्हणाली.


" आज खूप सुंदर दिसतेय तू!" सुयश रियाला म्हणाला.


"वो तो मै पहेले से ही हूँ ।" रिया हसून म्हणाली.


रियाच्या चेहऱ्यावरील ती खळ सुयशला भुरळ घालत होती. रियाच्या चेहऱ्यावरील सौंदर्य तिने लावलेल्या त्या मोठ्या टिकलीने अधिकच खुलले होते. सुयशला रिया गौरीजवळ जावून ही मोठी टिकली लावून आलीय हे समजलं.


"म्हणजे मी, म्हणालो म्हणून तू ही मोठी टिकली लावायला गेलेलीस गौरीकडे?" सुयश म्हणाला. 


"अहं" नकारार्थी मान हलवत रिया म्हणाली, " तू म्हणालास म्हणून नाही. माझ्या या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी लावलीय मी ही टिकली." रिया हसून सुयशकडे बोट दाखवत म्हणाली.


"थॅंक्स ! अ‍ॅन्ड लव्ह यू रिया." सुयश म्हणाला.


रियाने स्मितहास्य केलं.


"मला खूप कामं आहेत रिया." सुयश म्हणाला.


"अरे जा ना मग. मी थोडी ना तुझे हात पकडलेत." रिया म्हणाली.


"पण तू काहीच उत्तर नाही दिलं." सुयश म्हणाला.


"कशाचं उत्तर? तू कधी प्रश्न विचारलास मला ?" रिया म्हणाली.


"अगं प्रश्न विचारायला हवा का? मी बोलल्यावर तू ही बोलायला हवं ना." सुयश चिडून म्हणाला.


"काय?" रिया म्हणाली.


"अगं लव्ह यू टू." सुयश म्हणाला.


रियाने क्युट स्माईल दिली.


"बोल." सुयश म्हणाला.


रिया "हं." म्हणाली. तोवर संकपाळ सरांनी सुयशला हाक मारली. "आलो बाबा." म्हणून सुयशने धूम ठोकली. रियाही मग गौरीचं आवरलं की नाही ते पाहायला तिच्याजवळ गेली. गौरी छान तयार झाली होती. गौरीचे बाबा गौरीला घ्यायला आले होते. 


"लग्नघटिका समीप आली आहे. नवरी व नवदेवाचे मामा नवरी मुलीला व नवरदेवाला घेऊन स्टेजवर येण्याची कृपा करावी." गुरुजी स्पीकरवर विनंती करत होते.


गौरीला मामा नसल्याने संपकाळ सरांचे एक बालमित्र गौरीच्या मागे मामा म्हणून उभे राहिले. गौतम ही अगदी ऐटीत दिसत होता. गौरी आणि गौतम एकमेकांच्या हातात हात धरून "बहारो फुल बरसाओ, मेरा मेहबूब आया है। मेरा मेहबूब आया है । " या गाण्याच्या सुरात स्टेजकडे निघाले. लक्ष्मी नारायणाचा जोडा अतिशय सुंदर दिसत होता . रियाची आई, उमा मावशी, तिचे मिस्टर आणि श्रेया लग्नाला आले होते. अगदी थाटामाटात लग्न पार पडले होते. फटाक्यांचे आवाज जणू लग्न लागल्याचे सुचीत करत होते. नवरा नवरीनी एकमेकांना हार घातले. पाहूणे मंडळी जेवणाच्या हॉलकडे निघाली होती. रिया मंगळसूत्राच्या साक्षीने सात जन्मासाठी गौतमची सहचारिणी बनली होती.सर्वजण नवरा नवरीला पुष्पगुच्छ देऊन नवीन आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत होते. सगळे निर्विघ्नपणे पार पडत होते. तितक्यात फोटोग्राफर फोटो शुट करण्यासाठी नवरानवरीला गार्डनमध्ये घेऊन गेला. रियालासोबत घेऊन गौरी गार्डनमध्ये गेली. फोटोग्राफर फोटो शुट करण्यात मग्न होता. गौतमही पोज देत होता. रियाला समोरून जाणवले की, गौरीला काहीतरी होतेय.ती "गौरी" म्हणून मोठ्याने ओरडली. गौतमने गौरीकडे पाहत तिला घट्ट पकडले. गौरीला चक्कर आली होती. तिला गौतमने उचलून घेऊन स्टेजच्या मागे असलेल्या छोट्या रूममध्ये फॅनखाली झोपवले. सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. रिया कोपऱ्यात उभारून रडत होती. रियाची आई रियाला शोधत मागे आली तेव्हा रियाने घडलेला प्रसंग आईला सांगितला. आईचाही कंठ दाटून आला होता. रियाच्या डोक्यावरून हात फिरवत आई रियाला धीर देत होती. सुयश प्रसंगावधान दाखवत डॉक्टरांना घेऊन आला होता.आधी गौरीला काय झालंय? ते पाहावे म्हणून सुयश घाईने गौरीजवळ गेला. मॅडमना रिया रडताना दिसली. मॅडम तिला म्हणाल्या, "होईल सगळं ठीक. तू नको घाबरूस. तिला पोटात काही नसले की हमखास चक्कर येते. सकाळी कितीही खा म्हणून आग्रह केला तरी तिने आज अक्षता पडल्याशिवाय मी काहीही खाणार नाही म्हणून कशालाही हात लावला नाही. बघ हेच सांगतील डॉक्टर." मॅडमनी रियाला समजावले.


डॉक्टरांनी गौरीच्या आईला आत बोलावले. बाकी सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितले. सुयश रियाजवळ येऊन थांबला.


"काय झालं तुला रडायला ? रडू नकोस बरं. आपल्या गौरीला काही होणार नाही." सुयश रियाचे डोळे पुसत म्हणाला.


"सुयश, आज मी या शुभप्रसंगात नसते तर हे घडले नसते ना रे. मला सतत असे वाटतेय." रिया रडत म्हणत होती.



रियाच्या या प्रश्नावर काय असेल सुयशचे उत्तर ?


परत रियाला कोणी दोष देणार नाही ना ?


गौरी ठीक होईल ना? 


या सगळ्या प्रश्नांची उकल पाहूया पुढील भागात क्रमश:


सौ.प्राजक्ता पाटील.















🎭 Series Post

View all