हा दुजाभाव कशासाठी भाग 1
आकाश दीप्तीच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती. त्यांना एक मुलगी होती "जाई" . ती बालवाडीत होती. आकाश जॉब करत होता. दीप्ती ग्रॅज्युएट होती. ती पूर्वी नोकरी करायची. आता घरी ट्यूशन घेत होती. जाईची पूर्ण वेळ शाळा सुरू झाल्यावर ती नोकरी करणार होती. त्यांचा व्यवस्थित दिनक्रम सुरू होता. सुखी कुटुंब होत.
बालवाडीत असल्यामूळे जाईला अर्धा वेळ शाळा असायची. नेहमीप्रमाणे काम आटपून दीप्ती जाईला शाळेतून आणलाय गेली. येतांना जाई पुढे पळत होती. "थांब थोड जाई आपल्याला भाजी घ्यायची आहे."
ती दुकानाजवळ येवून थांबली. "आई केळी घे."
"हो घेते." दीप्तीचा फोन वाजत होता. तिने पर्समधुन फोन बाहेर काढला. आईचा फोन होता. "आई दोन मिनिट मी भाजीचे पैसे देते मग फोन करते."
त्या दोघी बाजूच्या छोट्या गार्डनमधे आल्या. "जाई सावकाश खेळ. मी आजीशी बोलते." तिने तिथे बाकावर बसून घेतल. तिने फोन लावला. अलका ताईंनी उचलला.
"काय ग बिझी आहेस का?"
"काय ग बिझी आहेस का?"
"नाही आई. बोल ."
"अग रोहन साठी मुलगी बघायला जायच आहे रविवारी."
"पण तुम्ही मागच्या आठवड्यात जावून आले ना मुलीकडे? "
"हो आम्हाला माधुरी पसंत आहे. तुम्ही दोघी बाकी आहात. एकदा तू आणि ताईने बघितल की झाल. " अलका ताई खूप उत्साहाने बोलत होत्या.
"सगळ्यांना जायला हव का?"
"हो म्हणजे तसा रोहनचा आग्रह आहे. ये ग. "
"हो नक्की ठरवते. सांगते यांना."
"ऐक दीप्ती तुझी ताई चांगल्यातली साडी नेसणार आहे. "
" हो का. मी ती माझी हिरवी साडी नेसू का?"
"तुला दुसरी साडी नाही का? मागच्या वेळी दिवाळी साठी तू तीच साडी नेसली होती. " अलका ताई कुत्सितपणे बोलल्या.
दीप्तीला कसतरी झाल. ठेवल आमच्या परिस्थिती वर बोट. तिने आवाजावर नियंत्रण ठेवल. "आई अग दिवाळी साठी घेतली होती ना ती साडी. नवीन आहे. "
"नको ती. नवीन साडी घे ना आज. "
" कशाला खर्च करायचा? सारखं सारखं एवढे महागातले कपडे घ्यायची काही गरज नाही. मी येईल बरोबर माझे कपडे घेवून. तू सगळ्याच गोष्टीच टेंशन घेवू नकोस. " दीप्ती वैतागली.
"बर. उद्या ये लवकर घरचे काम पडू दे. ते कधीच संपत नाही."
हो.
अलका ताईंनी फोन ठेवला.
रोहन तिचा लहान भाऊ. त्याच लग्न बाकी होत. दोघी बहिणींचा लाडका होता तो. ताई खूप करत होती त्याचं. थोडे दिवस तो शिकायला होता तिच्याकडे. आता त्याच लग्न जमत तर मुलगी पसंत करतांना सहाजिकच त्याला वाटत होत. दोघी बहिणी सोबत असाव्या.
दीप्ती घरी आली. आई पण ना काय अस करते काय माहिती. तिला काय बाहेरील दिखाव्याची हौस आहे समजत नाही. जस आहे तस रहायच. आईला मी आवडत नाही तिला श्रीमंत लोक आवडतात ताई जिजाजीं सारखे . आमची परिस्थिती मध्यमवर्गीय आहे तिला आमची लाज वाटते. जावू दे काय करणार.
तिने जेवायचे ताट केले. "आई चला."
जाई, सासुबाई आल्या. त्यांनी जेवून घेतल.
" माझ्या आईचा फोन आला होता. रोहनच लग्न जमत आहे."
"अरे वाह."
"मी उद्या आईकडे जावू का?"
"हो जा ना."
"तुम्ही याल का?"
"नाही तू जावून ये."
" चला सासुबाईंना सांगून झाल. मोठ काम संपल. तश्या आता हल्ली त्या काही बोलत नाही. मलाच निर्णय घ्यायचा असतो." दीप्तीला बर वाटत होत.
दीप्तीने थोड्या वेळ आराम केला. सासुबाई फिरायला गेल्या. जाई होम वर्क करत होती. तिने स्वयंपाक करून घेतला. सासुबाई आल्या टीव्ही लावून बसल्या. त्यांच्या घरात नेहमी शांतता असायची. कोणी आवाज वर करून कधी बोललं नाही. रोजचे काम समजुतीने सुरू असायचे.
"आज आकाशला घरी यायला थोडा उशीर झाला. नौकरी म्हटलं की अस होत."
इंजिनीअर झालेला आकाश मोठ्या कंपनीत सर्विसला होता. स्वभावाने अतिशय शांत आणि चांगला. जे आहे ते नीट वापरायच. उगीच फालतू खर्च त्यांना आवडायचा नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी होती.
©️®️शिल्पा सुतार
