Login

गुरुविना कोण दाखवील वाट!

शालेय जीवनातील एक सत्यघटना.

गुरुविना कोण दाखवील वाट!





ही गोष्ट सुमारे वीस वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी दहावीच्या वर्गात शिकत होतो. ऐन पावसाळ्याचे दिवस होते. शाळेबाहेर मुसळधार पाऊस पडत होता. शाळेच्या छतावर पावसाचा टपटप असा जोराचा आवाज येत होता. दुपारच्या सुट्टीच्या आधी असणारा विज्ञान विषयाचा तास सर न आल्यामुळे होणार नव्हता. त्यामुळे त्या तासाला वर्गात शिक्षक नसल्यामुळे आमचा दंगा धुडगूस सुरु होता. कोण फळ्यावर सरांचं व्यंगचित्र काढत होता तर,कोण बेंचवर उभे राहून भाषण ठोकत होता. मुली एकमेकींच्या मेहंदीच्या डिझाईनवरून चर्चा करत होत्या. तर काही टारगट मुलं टिंगलटवाळी करत हाणामारी करत होती.



सगळ्या वर्गात अक्षरशः हल्लकल्लोळ माजला होता. तो इतका की सरळ मुख्याध्यापक बसतात त्या केबिनपर्यंत आवाज जाऊन पोहोचला होता. आमची शाळा ग्रामदैवत श्री मारुतीच्या प्रशस्त अशा देवळात भरत होती, गाभाऱ्याच्या सभोवताली असणाऱ्या खोल्यांमध्ये आमचे वर्ग भरायचे. त्यामुळे गाभाऱ्या पलीकडच्या खिडकीतून आमच्या वर्गातील खिडकी दिसायची, त्या खिडकीतून मुख्याध्यापक सरांनी आमच्या वर्गाकडे पाहिलं तर, आमच्या वर्गात अक्षरशः धुडगूस सुरु होता.



त्यांचा अक्षरशः संताप झाला आणि ते आमचे वर्गशिक्षक असणाऱ्या श्री. बी.एस. पाटील सरांना म्हणाले,



"बी.एस. पाटील,ही शाळा आहे की धर्मशाळा! पहा तुमच्या वर्गात काय सुरु आहे."





पाटील सरांनी खिडकीतून पाहिलं तर खरच आमच्या वर्गाचा जणू कुस्तीचा आखाडा झाला होता.





सर त्याक्षणी धावतच आमच्या वर्गाकडे आले आणि सरांनी अक्षरशः साऊथच्या हिरोसारखी एका दणक्यात दरवाजा उघडून वर्गात एंट्री केली. तर समोरच दृश्य पाहून एरव्ही आम्हाला मायेने गोंजारणाऱ्या सरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी डब्लू डब्लू एफ च्या स्टाईलने एकजणाच्या उरावर बसून त्याला मारत होतो. सरांनी माझी कॉलर पकडली आणि एका हिसक्यात त्याच्या अंगावरून ओढून बाजूला काढलं.



क्षणभरापूर्वी आठवडी बाजार वाटणारा वर्ग अगदी शिस्तप्रियपणे आपापल्या जागेवर पुस्तकं काढून वाचण्याचं नाटक करू लागला.



सरांनी दरवाजाला कडी लावली आणि समोर येऊन म्हणाले,



"नालायकांनो शाळा आहे की धर्मशाळा? किती दंगा!किती धुडगूस! जरातरी शिस्त नावाचा प्रकार आहे की नाही! स्टाफरूममध्ये मला शरमेने मान खाली घालायची वेळ आली."





सगळा वर्ग मान खाली घालून फक्त ऐकत होता.





पाटील सर पुढे म्हणाले,



"तुम्ही असे सुधारणार नाही. तुम्हाला कडक शिक्षा करायला हवी. त्याशिवाय तुमची अक्कल ठिकाणावर येणार नाही. मी तुम्हाला मारू शकत नाही हा माझा विकपॉईंट आहे, म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेणार असाल तर मला काहीतरी वेगळी शिक्षा द्यावी लागणार."





सगळा वर्ग निश्चिन्त होता कारण सर पोटच्या पोरांप्रमाणे आमच्यावर माया करायचे आणि म्हणून ते कसलीच शिक्षा वगैरे देणार नाहीत याची खात्री होती. पण आम्ही सरांना गृहीत धरण्याची चूक करत होतो.





पाटील सर म्हणाले,



"दुपारी कोणीही जेवायला घरी जायचं नाही. एकानेही वर्गातून बाहेर पडायचं नाही. खरडी वाळल्याशिवाय अक्कल ठिकाणावर यायची नाही तुमची."





असं म्हणून सर दरवाजा लावून स्टाफरूममध्ये जाऊन बसले.



थोड्याच वेळाने दुपारच्या सुट्टीची घंटा वाजली. पाटील सरांनी दिलेल्या शिक्षेमुळे कोणीच जागेवरून हललं नव्हतं, पण आम्हाला माहित होतं की थोड्यावेळाने पाटील सर वर्गात येणार आणि आम्हाला जेवायला जा म्हणणार.



आमच्या वर्गात मुलामुलींची एकी असल्यामुळे आमचं ठरलं की,



'सर आता जरी जेवायला जा म्हणून सांगायला आले तरी कोणीही जायचं नाही.'





अंदाजाप्रमाणे सुट्टी झाल्यावर दहा मिनिटांनी सर वर्गात आले आणि म्हणाले,



"चला जेवायला जा आता सगळे. पुन्हा असा दंगा अजिबात खपवून घेतला जाणार नाही."





पण आम्ही कोणीच जागचे हललोसुद्धा नाही. कारण तसं ठरलेलच होतं.





सरांना वाटलं आपण निघून गेल्यावर मुलं जेवायला जातील, म्हणून ते पुन्हा म्हणाले,



"लवकर जा आणि लवकर या. घरी जास्तवेळ थांबू नका."





आणि सर स्टाफरूममध्ये निघून गेले. दहा मिनिटांनी सर पुन्हा वर्गात आले, तरी सगळी मुलं जागच्या जागी बसलेली होती.



सरांना समजलं की मुलं आपल्यामुळे नाराज झाली आहेत.



त्यांनी समोर येऊन विनवण्या केल्या की,"अरे बाळांनो घरी जा आणि जेवून या, शिक्षा माफ केली आहे तुमची."





पण कोणीच काही बोललं नाही.



सर तिथेच खुर्चीवर बसून राहिले.



थोड्याच वेळात सुट्टी संपल्याची घंटा वाजली सगळे वर्ग भरले. आमच्या वर्गावर हिंदीचा तास घेण्यासाठी हिंदीचे सर आलेत. तर त्यांनी पाहिलं की पाटील सर खुर्चीवर बसून होते आणि सगळा वर्ग शांत होता.



ते पाटील सरांना म्हणाले,



"अहो पाटील सर, इथे येऊन का बसला आहात? जेवायला पण थांबला नाहीत आमच्याबरोबर. टिफिनसुद्धा स्टाफरूममध्ये तसाच आहे."



त्यावर आम्हाला समजलं की आमच्याबरोबर आमचे सर सुद्धा उपाशी होते.





पाटील सर हिंदीच्या सरांना म्हणाले,



"माझी लेकरं इथं उपाशी असताना माझ्या घशाखाली घास उतरेल का?"



आणि सरांच्या डोळ्यातून अश्रूनी वाट मोकळी केली होती. सरांचे अश्रू पाहून आम्हाला सगळ्यांनाच हुंदका दाटून आला आणि बघताबघता सगळा वर्ग अक्षरशः ढसाढसा रडू लागला. हिंदीचे सर म्हणालेत,



"वेडे आहात सगळे वेडे. शिक्षक आणि विद्यार्थी असून एकमेकांच्याबद्दल किती तो जिव्हाळा आणि किती ते प्रेम. मी माझा तास कॅन्सल करतो,तुमच्यामुळे मलाही रडू येत आहे." आणि हिंदीचे सर स्टाफरूमध्ये निघून गेले.





मी आणि एकजण स्टाफरूममध्ये गेलो आणि सरांचा टिफिन घेऊन वर्गात आलो. सर खूपच भावनिक झाले होते.



आम्ही सरांजवळ जाऊन त्यांचा टिफिन उघडला आणि सरांना घास भरवू लागलो.



तर सरांनी आम्हाला मिठी मारली आणि म्हणाले,



"पोरांनो, अरे मलापण हौस नाही रे तुम्हाला ओरडायची किंवा शिक्षा करायची. मलापण मनावर दगड ठेवावा लागतो तुम्हाला शिक्षा सुनावताना."





सरांना पुन्हा हुंदका आला. कसातरी आवंढा गिळून सर पुढे म्हणाले,



"अरे जर तुम्ही असेच दंगामस्तीत वेळ घालवत राहिलात तर तुमच्या भविष्याचं काय होईल माहित आहे का तुम्हाला? वेळ कोणासाठी थांबत नाही रे. ती आपलं काम चोख पार पाडत असते. म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की इथून पुढे तरी आपला वेळ सत्कारणी लावा. दहावीचं वर्ष आहे स्वतःला झोकून देऊन अभ्यास करा. परीक्षा झाल्यावर सुट्टीत धम्माल करा. पण लक्षात ठेवा आधी करियर मग मजामस्ती. मी हे सांगतोय कारण मला वाटतं माझ्या मुलांनी पुढे खूप मोठं व्हावं आणि त्यांच्याकडे पाहून अभिमानाने छाती ठोकून मला सांगता यावं की,'हा माझा विद्यार्थी किंवा ही माझी विद्यार्थिनी.' म्हणून बाळांनो अभ्यास करा आणि यशस्वी व्हा मोठे व्हा."





असं म्हणून सरांनी आमच्या हातातला घास आम्हालाच भरवला आणि म्हणाले, "जा आधी घरी जाऊन जेवून या, मीही जेवतो."





आम्ही जेवायला घरी जाण्याची तयारी दर्शवली आणि सगळ्यांच्या वतीने आम्ही सरांना म्हणालो,



"सर आज सगळ्या वर्गाकडून तुम्हाला आम्ही शब्द देतो आम्ही मनापासून अभ्यास करणार आणि शंभर टक्के निकाल लावून दाखवणार. "





अशी शपथ घेऊन आम्ही घरी जेवायला गेलो आणि त्यानंतर सर्वांनी मनापासून अभ्यास केला. केंद्रात आमची शाळा प्रथम आली होती. आमचा शंभर टक्के निकाल लागला होता. आम्ही सरांना दिलेला शब्द पाळला होता. तेव्हाही सरांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, पण ते समाधानाचे आणि आनंदाचे अश्रू होते.



माझे गुरू श्री. बी.एस.पाटील हे फक्त गुरू नसून आमचे आईवडीलच होते. त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखे अजून बरेच किस्से आहेत पण तूर्तास इतकंच.





ईश्वर आमच्या पाटील सरांना उत्तम आयुरारोग्य देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.





llजय हिंद जय महाराष्ट्रll





 



लेखक-सारंग शहाजीराव चव्हाण.



         कोल्हापूर.



       9975288835.