गुरुविण ठरते अपूर्ण शिक्षण

मानवाचा एक सुसंस्कृत माणूस होण्यासाठी नुसतेच शिक्षण पुरेसे नाही तर त्या शिक्षणाचे योग्य पद्धतीने उपयोजन होणे देखील तितकेच अभिप्रेत आहे. याचं कौशल्य विकासाच्या प्रक्रियेतील गुरूचे स्थान नमूद करणारा लेख.

गोष्ट छोटी डोंगराएवढी... ११


गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

गुरुविण ठरते अपूर्ण शिक्षण
दानी वृत्ती अन् भाव समर्पण!
देव असो वा अल्हा ईश्वर...
या ब्रम्हांडी गुरू परमेश्वर...!


आज माणसाने आपल्या शिक्षणाच्या आणि शिक्षणातून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच अनुसंधान या आणि अशा कित्येक क्षेत्रात रोजमितीला नवनवीन प्रयोग... संशोधन... माणूस करतोच आहे. हल्ली या विविध क्षेत्रांमध्ये अगदी सेकंदाला काहीतरी नवीन घडताना दिसतं. पण हे सारं मिळवत असताना त्या प्रत्येक संशोधकाच्या... अभ्यासकाच्या पाठीशी असतो तो त्याचा गुरू!

हल्ली जसं या संशोधन शाखांचं आणि त्या शाखांमधील अभ्यासकांचं प्रमाण वाढलं आहे अगदी तसंच किंबहूना काहिसं अधिक प्रमाण वाढलं आहे ते त्या विधात्यावरच्या श्रद्धेचं! श्रध्दा वाढली तशी वाढत गेली श्रध्दास्थानं... तिर्थक्षेत्र... आणि पर्यायानं देवी-देवता! मात्र देवी-देवतांच्या आणि शक्तींच्या वर असतो तो म्हणजे गुरू! म्हणूनच तर संत एकनाथ म्हणतात

"गुरु परमात्मा परेशु।
ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला।
स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनीं गुरुदेव ।
येथें नाहीं बा संशय ॥३॥"

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर म्हणतात,

"शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे."

म्हणजेच मानवाचा एक सुसंस्कृत माणूस होण्यासाठी नुसतेच शिक्षण पुरेसे नाही तर त्या शिक्षणाचे योग्य पद्धतीने उपयोजन होणे देखील तितकेच अभिप्रेत आहे. या उपलब्ध ज्ञानाचे सकारात्मक उपयोजन होऊन शिष्यातील विविध कोशल्यांचा विकास होण्यासाठी गुरू सदैव तत्पर असतात. आपल्या संस्कृतीला अगदी पुरातन काळापासून गुरू-शिष्य परंपरा लाभलेली आहे. स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस होते तर गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरू होते महात्मा गांधी...! एवढंच नव्हे तर कूटनीती... अर्थकारण आणि आपल्या कुशल राजनीतीसाठी जगभरात ख्याती प्राप्त असलेले चाणक्य यांचे नाव त्यांचे गुरू चणक यांच्याच नावावरून पडले होते. महाभारतात आपल्या प्रिय मित्र अर्जुनाचा सारथी झालेले भगवान श्रीकृष्ण... त्यांचे एकूण पाच गुरू होते ज्यांची पुराणात देखील नोंद आहे. ते पाच गुरू म्हणजे महर्षी सांदीपनी, जैन धर्मातील बावीसावे तिर्थंकर भगवान नेमीनाथजी, घोर अंगिरस, महर्षी वेद व्यास आणि भगवान परशुराम! म्हणजे या समस्त विश्वाचं... आपल्या धर्माच रक्षण करणारा चक्रधर महान ठरतो तो त्याला लाभलेल्या गुरूंच्या अनमोल मार्गदर्शनामुळेच! गुरू-शिष्य परंपरेतील एक अजरामर जोडी म्हणजे शिष्य एकलव्य ज्याने गुरू द्रोण यांना केवळ गुरूच मानले नाही तर आपली निष्ठा मोठ्या साहसाने सिद्ध केली देखील!

"भारत माँ की परंपरा है;
गुरू आज्ञा पे सब वारा है!
एकलव्य मै भी बन पाऊँ;
गुरू द्रोण से सब सिख जाऊँ!"

आजच्या सेल्फ मोडच्या फास्ट ट्रॅक युगात विद्यार्थ्यांना सगळ काही अगदी झटपट हवं असतं. घर बसल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रातलं काही मोलाचं शिकायला मिळालं तर मुलांची धावपळ कमी होते आणि वेळेचा सदुपयोग देखील होतो. आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिष्यांपर्यंत... त्यांच्या मन आणि मेंदूपर्यंत पोहचण्याचं आव्हानात्मक कार्य गुरू अगदी चपखल पद्धतीने पार पाडताना दिसतात. यामुळे समस्त विश्वावर आलेल्या कोरोनाच्या संकटकाळात देखील ज्ञानदानाचा वसा थांबलेला नव्हता. जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर असलेल्या विद्यार्थ्याला गुरूंनी अगदी पोटतिडकीने भरभरून ज्ञानदान केले. हा ज्ञानदानाचा वृद्धींगत होत जाणारा ज्ञानरूपी वसा युगानुयुगे असाच अखंड चालत राहो हीच गुरुचरणी प्रार्थना!

गुरुजनांनी शब्द दिले हे
काव्य जाहले...शब्द जणू ते!
गुरू जे ठरले परीस... चंदन...
मनापासुनी त्यांना वंदन...
मनापासुनी त्यांना वंदन...!

©® तृप्ती काळे