गुरूविण कोण दाखविल वाट - गुरूमुळे बदलली जीवनाची दिशा

About Guru
गुरूविण कोण दाखविल वाट - गुरूमुळे बदलली जीवनाची दिशा

"जयश्री, आर्यनच्या शाळेतून प्रिन्सिपल सरांचा मला फोन आला होता. उद्या शाळेत भेटायला बोलावले आहे. फोनवर जास्त काही सांगितले नाही, कशासाठी बोलावले आहे ते ? मी गेलो असतो पण मला उद्या एक महत्त्वाची मिटींग आहे. तू जाऊन ये ना उद्या शाळेत."

धीरज पत्नी,
जयश्रीला म्हणाला.

"मागच्याच आठवड्यात माझ्या खूप सुट्या झाल्यात,त्यामुळे मला उद्या पूर्ण दिवस सुट्टी घ्यायला जमणार नाही. पण उद्या शाळेत जाणेही गरजेचे आहे, त्यामुळे मी अर्धा दिवस सुट्टी घेते व शाळेत जाऊन येते."
जयश्रीने धीरजला सांगितले.

'असेल काहीतरी काम म्हणून बोलावले असणार' असे समजून धीरज मोबाईल घेऊन बेडरूममध्ये निघून गेला. 'शाळेतून आणि तेही प्रिन्सिपल सरांचा फोन आला,कशासाठी बोलावले असेल? आर्यनविषयी काही चांगले की वाईट सांगणार आहेत ? फोनवर सांगण्यासारखे नव्हते का ? '
असे अनेक विचार करत जयश्री जेवणानंतरची सर्व कामे व उद्या सकाळच्या कामांची पूर्वतयारी करून ठेवत होती.
दिवसभर ऑफिसचे काम व घरातील कामे यामुळे जयश्रीचे शरीर व मन थकून गेले होते व केव्हा एकदाचे झोपू असे वाटत होते. बेडवर पडताच शरीराला आराम वाटत होता पण मन काही शांत होत नव्हते. शाळेतून आलेल्या फोनमुळे झोप काही लागत नव्हती.
रात्री उशिरा झोप लागली तरी,जयश्री रोजच्या सवयीने वेळेतच उठली.
रोजच्याप्रमाणे जयश्री सकाळची कामे करत होती पण मन मात्र स्थिर नव्हते. कधी एकदाचे शाळेत जाते व प्रिन्सिपल सरांना भेटते. असे तिला वाटत होते.
धीरज ऑफिसला गेला, आर्यन व ओम दोघेही शाळेत गेले. ऑफिसमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी घेत असल्याचे सांगून जयश्री भेटायला दिलेल्या वेळेत आर्यनच्या शाळेत प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये पोहोचली.

"मॅडम, तुम्ही एकट्याचं ? मिस्टर नाही आले का? तेही असते तर बरे झाले असते. "
प्रिन्सिपल सरांनी जयश्रीला विचारले.

"त्यांना महत्त्वाची मिटिंग होती म्हणून ते नाही येऊ शकले."
जयश्रीने सांगितले.

"मॅडम,आर्यनच्या क्लास टीचर व इतर टीचर्सच्याही माझ्या कडे आर्यनविषयी तक्रारी आल्या आहेत. आर्यन दिलेला अभ्यास व्यवस्थित तर करतच नाही पण वर्गात शांतही राहत नाही. इतर मुलांना त्रास देत असतो. इतरांच्या खोड्या काढत असतो,अगदी मारामारी ही करतो. इतर मुलांच्या पालकांच्याही तक्रारी येत आहेत.तो शिक्षकांनी सांगितलेले ऐकत नाही, त्यांच्याशीही उद्धटपणे बोलतो.वर्गात तो मुलांना शिव्या वगैरेही देतो. त्याची वागणूक चांगली नाही .
मान्य आहे की, सर्वच मुले सारखी नसतात. काही शांत असतात तर काही खोडकरही असतात. जे विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास पूर्ण करतात आणि ज्यांचे वागणे,बोलणे चांगले असते ते विद्यार्थी शिक्षकांना आवडतात. पण जे विद्यार्थी त्रास देतात,शिक्षकांचे ऐकत नाही आणि त्यांना चांगले सांगून, समजावून व रागवूनही काही कळत नाही तेव्हा पालकांना सांगणे आमचे काम आहे आणि म्हणून तुम्हांला भेटण्यास बोलावले आहे. आमचे शिक्षक गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक तर करतातच पण त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षाही देतात. आर्यनवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. हे दिसून आले. त्याच्या अशा वागण्यामुळे वर्गातील इतरांवर वाईट परिणाम होऊ नये आणि त्याचेही काही नुकसान होऊ नये. असे आम्हांला वाटते,आणि म्हणून तुम्हांला हे सर्व सांगणे आमचे कर्तव्य आहे.
यापुढे आर्यनच्या वागण्यात सुधारणा नाही दिसली तर आम्हांला काहीतरी वेगळी ऍक्शन घ्यावी लागेल.
शिक्षक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य करत आहोतचं पण पालक म्हणून तुम्हांलाही काही निर्णय घ्यावे लागतील."

सरांचे बोलणे ऐकून पुढे काय बोलावे ? हे ही जयश्रीला सूचत नव्हते आणि सरांना काही काम होते म्हणून तेही घाईत होते. असे तिला दिसताच ती जास्त काहीही न बोलता,फक्त सॉरी... थँक्यू सर वगैरे बोलून बाहेर आली.
हे सर्व ऐकून तिला ऑफिसला जाण्याची इच्छाच उरली नाही. पण जाणे गरजेचे असल्याने इच्छा नसतानाही ती ऑफिसला गेली.

आर्यन हा जयश्री व धीरज यांचा मोठा मुलगा, सातवी इयत्तेत शिकत असलेला आणि लहाना ओम तिसरीत.
जयश्री व धीरज दोघेही चांगले शिक्षण घेतलेले व चांगल्या कंपनीत नोकरीला असलेले. घरातील आर्थिक बाजू पाहता जयश्रीला नोकरी करणे गरजेचे होते त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांना पाळणाघरात ठेवत दोघेही नोकरी करत होते.आणि म्हणूनच मुलांना जास्त वेळ देवू शकत नव्हते. जयश्रीचे माहेर गावी होते आणि धीरजची आई त्याच्या लग्नाअगोदच वारली होती त्यामुळे मुलांना सांभाळायला कोणी नव्हते.मुलांचा अभ्यास घ्यायला वेळ मिळत नसल्याने, जयश्रीने मुलांना ट्युशन लावून दिली होती. ओम तर लहानच होता. पण आर्यन जसजसा मोठा होत गेला, तसतसा त्याच्यातील खोडकरपणा, हट्टीपणा,आगाऊपणा वाढत गेला. पाळणाघरात व ट्युशन च्या ठिकाणी येणाऱ्या काही मुलांकडून तो वाईट शब्दही शिकत गेला. अभ्यासातही तो जेमतेम होता.त्याच्या आईवडिलांना वाटायचे, तो अजून लहान आहे,मोठा झाला की होईल सुधारणा . पण ते त्याला त्याने केलेल्या चुकींबद्दल रागवतही असत. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते,मुलांचे चांगले व्हावे असेच त्यांना वाटत असते. त्यासाठी आपल्या मुलांना कधी मायेने सांगावे लागते तर कधी रागवावेही लागते.जयश्री व धीरज यांचेही आपल्या मुलांवर प्रेम होते. फक्त ते त्यांना पुरेसा वेळ देवू शकत नव्हते.
आपल्या आर्यनची अभ्यासातील प्रगती व त्याचा खोडकरपणा याबाबतीत जयश्री व धीरजला कल्पना होती पण शाळेतील त्याची वागणूक ऐकून जयश्रीला खूप वाईट वाटले.

ऑफिसमधून घरी आल्यावर,जयश्रीचा उतरलेला चेहरा पाहून धीरजला वाटले की, आर्यनविषयी प्रिन्सिपल सरांनी काहीतरी सांगितले असणार त्यामुळेचं जयश्रीला टेंशन आले आहे.
जेवण झाल्यावर, मुले झोपल्यावर आपण धीरजला सर्व काही सांगू आणि आर्यनला उदया दोघं मिळून समजून सांगू. असा विचार जयश्री करत असतानाच,तिला आर्यनच्या ट्युशन टीचरचा मेसेज आला की, 'आर्यनला उद्यापासून ट्युशनला पाठवू नका. त्याच्यामुळे इतर मुलांनाही त्रास होतो,तो सांगितलेला अभ्यासही करत नाही... ' अशा अनेक तक्रारी होत्या.
अगोदरचं टेशनमध्ये असलेल्या जयश्रीचे या मेसेजमुळे अजूनच टेंशन वाढले.
जयश्री सर्वांसोबत जेवण तर करत होती पण तिचे आज जेवणात लक्षच नव्हते. कसेतरी जेवण केले, सर्व कामे आटोपली आणि धीरजला आर्यनविषयी प्रिन्सिपल सरांनी सांगितलेले आणि ट्युशन टीचरचा आलेला मेसेज सर्व काही सांगितले.
हे सर्व ऐकून धीरजला वाटले, आपण पालक म्हणून कुठेतरी कमी पडत आहोत का?जयश्रीने नोकरी न करता पूर्ण वेळ मुलांकडे लक्ष द्यायला हवे होते का?आता काय करायचे?

"मी नोकरी सोडते म्हणजे मी मुलांना पूर्ण वेळ देऊ शकेल."

जयश्री धीरजला म्हणाली.

"बघूया एक प्रयत्न करून"
असे म्हणत धीरजनेही जयश्री च्या निर्णयाला दुजोरा दिला.

जयश्री नोकरी सोडून मुलांना पूर्ण वेळ देवू लागली. ओम लहान होता. तो तिचे सर्व काही ऐकत होता. पण आर्यन हा काही तिचे ऐकत नव्हता. तिने त्याचा अभ्यास घ्यायचा प्रयत्न केला पण तो काही तिचे ऐकून अभ्यास करत नव्हता. त्याचे पाहून ओमही नाटक करायचा.

आर्यनला पुन्हा ट्युशनला पाठवावे यासाठी जयश्री विचारपूस करत होती. तिच्या मैत्रीणीने सुजाता मॅडमचे नाव सुचवले. त्या घरीच मुलांना शिकवत होत्या.त्यांचे शिक्षण चांगले झालेले होते पण मुले आणि संसार यामुळे त्यांना नोकरी करता आली नाही. आता मुले थोडी मोठी झाली आणि कामातून थोडा वेळही मिळतो म्हणून त्या ट्युशन घेऊ लागल्या.मुलांना त्यांचे शिकवणे आवडत होते. हे ऐकून जयश्रीच्या मनात आर्यनच्या बाबतीत एक आशेचा किरण दिसू लागला व तिने आर्यनला सुजातामॅडम कडे ट्युशनसाठी पाठवले.

जीवनात आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, अनेकांचा सहवास ही मिळतो आणि काही व्यक्तींचा पहिल्या भेटीतच आपल्यावर प्रभावही पडतो.

असेच काहीसे आर्यनच्या बाबतीत झाले.
सुजातामॅडमच्या पहिल्या भेटीतच त्याच्यावर त्यांचा एक वेगळाच प्रभाव पडला.त्यांचे वागणे,बोलणे व त्यांची शिकवण्याची पद्धत सर्व काही त्याला आवडले.
त्यांनाही आर्यनची अभ्यासातील परिस्थिती, त्याच्या वागण्याबोलण्यातून त्याचा खोडकरपणा, उद्धटपणा हे सर्व जाणवले.

'बघूया आपण प्रयत्न करून..काही फरक पडेल का? 'या विचारांनी त्यांनी आर्यनची ट्युशन सुरू केली. अभ्यासाबरोबर त्या त्याला छोट्या छोट्या गोष्टीतून समजावून सांगू लागल्या. तर त्याने केलेल्या चुकांबद्दल कधी रागावून तर कधी शिक्षा देवून वाईट गोष्टींपासून परावृत्त करू लागल्या.
वाईट सवयी लवकर लागतात पण चांगल्या सवयी लागण्यास वेळ लागतो.
स्वभावाला औषध नसते. असे म्हटले जाते. स्वभाव अचानक बदलत नाही. पण प्रयत्न केले की,स्वभाव ही हळूहळू बदलत जातो.

जीवनात अशा अनेक गोष्टी घडतात, प्रसंग येतात ,कधी व्यक्ती तर कधी अनुभव असे असतात की आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपला स्वभाव बदलण्यास भाग पाडतात.आणि काही वेळेस ते आपले फायद्याचेही ठरते.

आर्यनला सुजातामॅडम सारख्या गुरू भेटल्यापासून,त्याच्या वागण्याबोलण्यात हळूहळू चांगला बदल होऊ लागला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो अभ्यासही करू लागला. यापूर्वी आर्यनला त्याच्या आईवडिलांनी,शाळेतील शिक्षकांनी,ट्युशन टीचर या सर्वांनी समजावून तर कधी रागावून सांगितले. तेव्हा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. पण सुजातामॅडम च्या प्रभावाने त्याच्या मनावर एक वेगळीच छाप पडली. त्यांच्यामुळे त्याला अभ्यासात फायदा होऊ लागलाच पण त्यांच्या रूपात त्याला एक गुरूही भेटल्या,ज्यामुळे त्याच्यातील वाईट गुणांना लगाम बसून त्याच्यातील चांगले गुण विकसित होऊ लागले.

आर्यनच्या वाईट गुणांमुळे अगोदरच्या ट्युशन टीचरने त्याची ट्युशन बंद केली. शाळेतही तक्रारी वाढत होत्या. आईवडिल ही चिंतेत होते.
असेच सुरू राहिले असते तर ..कदाचित आर्यनमधील वाईट गुण वाढत जाऊन त्याचे आयुष्य वाया गेले असते. एक चांगली व्यक्ती न होता , वाईट व्यक्ती म्हणून त्याचा ओळख झाली असती.
पण आर्यनचे नशीब चांगले की,ज्याला सुजातामॅडम यांच्या सारखी गुरू भेटली आणि त्याच्या जीवनाची दिशाच बदलली.


कवी ग.दि.माडगूळकरांनी म्हटलेचं आहे.

'गुरूविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट'


आयुष्याची नौका जेव्हा जेव्हा डगमगते तेव्हा आवश्यकता असते ती सुयोग्य मार्गदर्शन, भक्कम आधार, निःस्वार्थ प्रेम व सकारात्मक प्रेरणेची. आणि हे सर्व मिळत असते गुरूकडून.

बालपणापासून ते आयुष्याच्या शेवटपर्यंत,प्रत्येक व्यक्तीला गुरूची गरज असतेच.
पहिला गुरू तर आईचं असते. आईनंतर वडील, भाऊबहीण,नातेवाईक, मित्रमंडळी.शाळेतील ,क्लासमधील शिक्षक हे शैक्षणिक गुरू असतातचं पण मुलांच्या कलागुणांना वाव देणारे,त्यांच्यावर चांगले संस्कार करणारे गुरू ही असतात.
गुरू म्हणजे फक्त एखादी व्यक्तीचं . असे नाही तर ग्रंथ,पुस्तके हे ही गुरूचं असतात.
आजूबाजूचा निसर्ग, झाडे,पशुपक्षी हे ही गुरू होऊ शकतात.
दत्त गुरुंनी केलेले 24 गुरू हे एक उत्तम उदाहरण ठरते.

जीवनातील एखादा कठीण प्रसंग ही आपल्याला खूप काही शिकवून जातो.
त्यामुळे माझ्या आयुष्यात कोणी गुरू नाही. असे कोणी म्हणूचं शकत नाही.

जे आपल्या गुरूंनी सांगतलेल्या मार्गाने जातात त्यांच्या आयुष्याचे सोने होते.
पुराणात आणि इतिहासात गुरूशिष्याची अशी अनेक उदाहरणे पाहण्यास मिळतात.
ज्यांना आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगायचे असेल आणि आयुष्यात काहीतरी चांगले करायचे असेल तर त्यांना गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज असतेचं.
कारण

गुरूमुळे कळते
जीवनाची दिशा
निराशेतून मिळते
जगण्याची आशा


नलिनी बहाळकर