गुरुने दिला ज्ञानरूपी वसा..आम्ही चालवू हा पुढे वारसा

Teacher Is Very Important In Our Life To Learn Every Little Thing


                       गुरुविण कोण दाखविल वाट...
हि पंक्ती गुरूंना अगदी योग्य शब्दात वर्णविते.आयुष्यात योग्य मार्गावर चालायला आणि जीवनात विविध गोष्टीचे ज्ञान संपादन करायला गुरु हे हवेच.
जन्माला आल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला बरीच माणसं भेटत असतात.वयाने लहान असो की मोठी,प्रत्येक व्यक्तीकडून एक तरी गोष्ट शिकण्यासारखी नक्की असते असे मला वाटते.

                बाळ आईच्या पोटात असल्यापासून शिकायला सुरुवात करते, त्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो.आई हा आपला प्रथम गुरु असते.जी आपल्याला कसं वागावं,कसं बोलावं,चांगल्या गोष्टी कश्या आचरणात आणाव्यात अश्या एक ना अनेक गोष्टी सतत अंगवळणी लावत असते.
माझी आई नेहमी म्हणते की संकटे आली तर घाबरून जायचं नाही उलट स्वतःला अजून खंबीर बनवायचं आणि न थांबता पुढे चालत राहायचं.कष्ट करणाऱ्या माणसाला यश हे मिळतंचं फक्त धीर सोडायचा नाही.आईची हि शिकवण मला प्रत्येक कठीण प्रसंगी बळ देत असते.
माझ्या आईने मला हेही शिकवलं की, आपली चूक असेल तर ती कबुल करून त्यात सुधारणा करायची.सॉरी म्हंटल्याने कुणी लहान होत नसतो.पण जिथे आपली चूक नसेल तिथे नेहमीच ऐकून नाही घ्यायचं नाहीतर लोक आपल्याला गृहीत धरतात.

            आपले दुसरे गुरु म्हणजे आपले वडील जे आपल्याला स्वतः बऱ्याच गोष्टींचा त्याग करून आपल्या कुटुंबाच्या आनंदात आनंदी कसं राहायचं हे शिकवतात.माणसाच्या अंगी शिस्त हवी आणि नीटनेटकेपणा हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं जे मला माझ्या आयुष्यात नेहमीच कामी येतं.आईवडिलांचे ऋण आपल्याला कधीही न फेडता येण्यासारखे आहेत हेही तितकंच खरं आहे.

आई-वडिलांनी नेहमीच मला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू घाबरू नकोस हा विश्वास दिला त्यामुळे मी जीवनात यशस्वी वाटचाल करू शकले.ते पाठीशी उभे आहेत ह्या विचारानेच मला नेहमी खूप हिम्मत मिळते.
           शाळा कॉलेजमध्ये खूप चांगले शिक्षक लाभले ज्यांनी आमच्यावर चांगले संस्कार आणि पुस्तकाच्या पलीकडे जाऊन जे प्रॅक्टिकल ज्ञान हवे तेही दिले.आजकाल गुगल गुरुमुळे सगळं जग जवळ आलं आहे.जे हवं त्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान आपल्याला गुगल सर्चवर एका क्लिकमुळे सहज मिळते.हे कितीही खरं असलं तरी शेवटी योग्य मार्ग दाखवायला गुरु हे हवेच असतात.जे वेळीच चुकल्यावर कान पकडतात आणि चांगल्या कामाला शबासकी देतात.असे गुरु मला लाभले हे मी माझे भाग्यच समजते.

    आयुष्यात भेटलेले मित्र-मैत्रीणी ह्यांनी मला एकीमध्ये बळ असतं हे शिकवलं.एकमेकांच्या साथीने आपण यशाची शिखरे चांगल्याप्रकारे पादाक्रांत करू शकतो हे मी त्यांच्यामुळे शिकले.
         लग्नानंतर नवरोबाकडून कोणतेही काम करायचे तर त्यात परफेक्शन असावे हे शिकले.आपलं आपण शंभर टक्के दिलं की काम छान होतं आणि आपल्याला मानसिक समाधान मिळते हे त्याच्याकडून अगदी शिकण्यासारखे आहे.माझं छोटंसं बाळ अद्वैत,त्याच्याकडून मी आई म्हणून दिवसागणिक घडत आहे.त्याच्यामुळे मी माझी पेशन्स लेव्हल वाढवायला शिकले,जी आपल्याला जीवनात खूप वेळा गरजेची असते.
          मी इंजिनियरींग कॉलेजला प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.तिथे भेटत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी मला बरंच काही शिकवून जातात.आपण अजून कसं आणि काय शिकवावं ज्यामुळे हे भावी इंजिनियर चांगले माणूस म्हणून घडतील ह्याकडे माझं लक्ष असते.बरीच मुलं नवनवीन टेक्निकल कल्पना सुचवतात तर काही त्यांच्या अफाट विचारशक्तीतून मला चाट पाडतात.


         पहिल्यापासून शाळा,कॉलेज,नोकरी घरापासून थोडया लांब अंतरावर असल्याने मी खूप लहान म्हणजे अगदी पहिलीत असल्यापासून बसने प्रवास केला.ह्या प्रवासात वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्या बोलण्याच्या, वागण्याच्या पद्धती जीवनात कितीहि संघर्ष करावा लागला तरी हार मानायची नाही.लढत राहायचं आणि आहे ह्यात समाधानी राहायचं हे शिकवून गेले.

       मी माझ्या स्वतःकडूनहि रोज शिकत असते की, रोज काहीतरी नवीन शिकण्याचा ध्यास बाळगायचा आणि जीवन खुल्या मनाने जगायचं.आपल्याकडे जे ज्ञान आहे ते पुढच्या पिढीला द्यायचं आणि हि ज्ञानदानाची शृंखला अशीच अविरत सुरु ठेवायची.
शेवटी इतकंच म्हणेल की...माझ्या सर्व गुरूंना माझे नमन करते.
तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहुदेत हेच देवाकडे मागणे मागते.

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु 
गुरुर देवो महेश्वरः 
गुरुर साक्षात परम ब्रह्म 
तस्मै श्री गुरुवे नमः||


©®सुप्रिया शिंदे महादेवकर.

धन्यवाद.