गुरुवंदना

Guruna vandan karnara chotasa lekh



"गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः"

ज्ञान, समाधान, आदर, जीवनाच्या वाटेवरचा प्रकाश, प्रेरणा, मार्गदर्शक ,आत्मिक अनुभव म्हणजे गुरू. साक्षात परब्रम्ह! गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवन अधिक सुखकर होते. शिष्याचे 'नाव ' आपल्या गुरुंसोबत जोडले जाण्याचा आत्मिक आनंद हा केवळ शिष्यालाच ठाऊक असतो!

आपले प्रथम गुरू आई -वडिलांचे बोट धरून आपण जीवनाच्या वाटेवर पहिले पाऊल टाकतो. आई प्रेम, माया संस्काराचे धडे देते, तर वडील जबाबदारी, विश्वास, व्यवहाराचे धडे देतात.
शाळेतले शिक्षक ज्ञानाबरोबरच आपल्याला 'घडविण्याचे 'कार्य करतात.
आपले मित्र, सवंगडी, आयुष्यात येणाऱ्या अनेक व्यक्ती या आपल्या जीवनात कळत -नकळत 'मार्गदर्शकाचे' कार्य करत असतात.

त्याचप्रमाणे जीवनात 'अनुभवासारखा' सर्वात मोठा गुरू नाही. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, तो खूप काही शिकवतो, आपले भावविश्व समृध्द करतो.
आयुष्यात येणारी प्रत्येक परिस्थितीही आपल्याला काही ना काही शिकवून जात असते.

तसेच 'निसर्ग ' हा देखील आपला गुरू. निसर्गाशी एकरूप होऊन आपल्याला येणारा शांततेचा अनुभव काही निराळाच असतो. तो सढळ हाताने आपल्याला जे 'देणं ' देतो, त्याचा सन्मान करून ते अबाधित ठेवणं, हीच निसर्गाला दिलेली 'गुरुदक्षिणा 'म्हणता येईल.

शिष्यास समजून घेणारे, योग्य मार्ग दाखवणारे, नि:स्वार्थपणे ज्ञान देणारे, मार्गदर्शन करणारे गुरू व त्यांचा आशीर्वाद, प्रेम आणि पाठीवर कौतुकाची थाप मिळणे, याहून भाग्याची गोष्ट ती काय?

प्रेरणास्थानी असणारे माझे आई -वडील, बहीण, शिक्षक, सासू - सासरे, नवरा, मित्रमंडळी, ईराची संपूर्ण टीम आणि वाचक यांना 'गुरूपौर्णिमेच्या' मन:पूर्वक शुभेच्छा.