गुरुपौर्णिमा..

गुरूपौर्णिमा

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥


 भावार्थ :

आयुष्यात आपल्याला प्रेरणा देणारे, वेळोवेळी आपल्याला चांगल्या सूचना देणारे, सत्याची जाणीव करून देणारे, योग्य मार्ग दाखवणारे, चांगल्या वाईट कृतींचा बोध करणारे, आपल्याला ज्ञान देणारे हे सारेच आपले गुरू समान आहेत..


खरंच.. किती सुंदर संस्कृत सुभाषित.. कोणाला गुरू मानावं हे सांगताना गुरूंची महती सहजपणे मांडणारं.. 


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला गुरूंची भेट होत असते.फक्त ते गुरू आपल्याला ओळखता आले पाहिजेत. नतमस्तक होऊन नमन करावंस वाटावं अशी एक तरी पुज्यनिय जागा असावी. मनःशांतीसाठी.. गुरुविण आयुष्याला आकार येऊच शकत नाही. आधार मिळू शकत नाही. हे सत्य.. 



जिने आपल्याला जन्म दिला ती म्हणजे आपली 'आई' 'ईश्वरी आत्मा'.. तिच्यामुळेच आपण या जगात आलो हे जग पाहू शकलो. आपल्या जन्मानंतर जेंव्हा आपण बोलण्याचा प्रयत्न करत असतो तेंव्हा पहिला शब्द बोलायला शिकतो. तो शब्द म्हणजे "आई.." नंतर मग आई आपल्याला बोलायला शिकवते, आईचं बोट धरून आपण पहिलं पाऊल टाकतो. खरंच आईचं थोरपण शब्दात व्यक्त करता येणार नाही आणि म्हणूनच 'आई'सारखा श्रेष्ठ गुरू या जगात दुसरा नाही हे सत्य.. त्यानंतर बोट धरून जीवनाचा प्रवास चालायला शिकवणारे बाबाही आपले श्रेष्ठ गुरुच. आई वडील हेच सर्वात प्रथम आपले सर्वश्रेष्ठ गुरू.


मग खरी सुरुवात होते जीवनाच्या प्रवासाची आणि आईवडिलांच्या सुरक्षित छत्रछायेखाली वाढलेले आपण एका नवीन दुनियेत प्रवेश करतो आणि इथेच भेटतो आपला दुसरा अतिशय महत्वाचा साथी.. आपले गुरू.. आपल्याला घडवणारे आपले शिक्षक ओल्या मातीच्या गोळ्याला जसा आकार द्यावा तसा ते आपल्याला आकार देण्याचं काम करतात. एक सुजाण नागरिक बनवण्यात सर्वात मोठा सहभाग आपल्या गुरूंचाच.


त्यानंतर सदैव आपल्या पाठीशी राहणारा, वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आपला मित्र परिवार हेही गुरूस्थानीच, ज्यांनी आयुष्यात वाईट अनुभव दिले, विश्वासाला तडा दिला, माणूस कसा ओळखावा हे स्वतःच्याच कृतीतून आपल्याला शिकवलं तेही आपल्यासाठी पुज्यनियच.. 


फेसबुकसारख्या सोशल मीडियावर वाचकांच्या रूपाने भेटलेले, आपल्या बाळबोध लिखाणावर मनापासून प्रेम करणारे, प्रतिक्रियेच्या रूपाने वेळोवेळी आपल्या लेखन शैलीत सुधार आणणारे आपल्यासाठी गुरुसमानच, सर्वाना मनापासून वंदन..


आपल्याला जन्म देणारे आई वडील, ज्ञान देणारे घडवणारे आपले पुज्यनिय गुरुवर्य,गुरूस्थानी असलेले आपले स्नेही सर्वाना मनापासुन विनम्र वंदन.. आणि सर्वांना अंतःकरणापासून गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ??????


©© निशा थोरे (अनुप्रिया)